‘‘अय्या, कित्ती अश्लील!’’
पलीकडच्या कोप-यातून आवाज आला आणि आमची मान गर्रकन 180 अंशाच्या कोनात वळली.
मुळात कोठूनही नाजूक स्त्रैण आवाज आला, कांकणे वाजली, गजरा दरवळला, यंत्रफवारित सुवासिक अंगगंध परिमळला की आमची मान- प्रसंगी 360 अंशातसुद्धा- वळते आणि डोळे- ज्यांना आमचे कलत्र बटाटय़ाची उपमा देते- ते रताळ्याच्या आकाराचे होतात.. ‘‘..आणि जीभही हातभर लोंबू लागते..’’ हे उद्गार अर्थातच आमच्या कलत्राचे.. तिकडे लक्ष न देणेच इष्ट.
तर सांगण्याचा मुद्दा असा की ‘‘अय्या कित्ती अश्लील’’ हे उद्गार कानांवर पडताच आमची मान गर्रकन वळली आणि मनात अत्युच्च कोटीचा आपुलकीचा भाव दाटून आला.. ‘‘..बाई दिसली की पाघळलेच..’’ हे आमच्या कलत्राचे विश्लेषण हे सांगायला नकोच. पण, या आपुलकीच्या भावनेमागची आमची कारणमीमांसा वेगळीच आहे. आम्ही होतो ते पहिली ते चौथीच्या मुलांच्या बालचित्रकला स्पर्धेतील पारितोषिक विजेत्या चित्रांच्या प्रदर्शनात. मुलांनी नेहमीचीच- म्हणजे दोन डोंगरांच्या आडून उगवणारा सूर्य, एका वाहत्या नदीच्या काठी असलेलं कौलारू घर, झाड, पान, गुलाबाचं फूल, सफरचंद वगैरे चित्रं काढली होती. त्यातल्याच एका चित्रासमोर उभ्या राहिलेल्या भगिनीच्या तोंडून हे उद्गार निघाले आणि आमचे कान धन्य झाले. शेजारच्या दुस-या भगिनीला उद्देशून ती बोलत होती, ‘‘बघ ना गं ते दोन्ही डोंगर कित्ती अश्लील दिसतायत.’’
‘‘हो ना आणि त्यांच्याआडून उगवणारा तो सूर्य.. तो तर कित्ती भयंकर अश्लील दिसतोय!’’
‘‘ते लालचुटुक सफरचंद पाहिलंस ना? केवढं भयंकर अश्लील आहे ते.’’
‘‘टीव्ही-सिनेमे पाहून लहान वयातच कित्ती बिघडतात नै मुलं?’’
‘‘आणि मग असली चित्रं काढतात काहीबाही.’’
‘‘हो ना, म्हणून परवा आम्ही टीव्हीची एक शो रूमच फोडून टाकली सगळ्याजणींनी मिळून.’’
हे अमृतमय शब्द कानी पडताच आम्ही लगेच पुढे सरसावलो. आमच्या अशा पुढे सरसावण्यात नेमकी काय गडबड असते, देव जाणे, पण, सहसा तदनंतर ज्यांच्या दिशेने आम्ही सरसावतो त्या भगिनीवृंदाची प्रतिक्रिया काही फारशी प्रोत्साहक नसते.. याही वेळी तसेच झाले. आमच्या सरसावण्याउपरांत ती भगिनी खाली- बहुधा पायताण काढण्यासाठी- वाकली. प्रसंग ओळखून आम्ही तिला परवलीच्या शब्दांनी संबोधित केले, ‘‘जय भोंदू!’’
तीही ताबडतोब पायताण सोडून सरळ झाली आणि आश्चर्यचकित स्वरांत उद्गारली, ‘‘जय भोंदू!’’
कुठले कुठले भोटमामा भरतात आपल्या संघटनेत, असा काहीसा भाव आम्ही तिच्या नजरेत पाहिला. पण, त्याकडे दुर्लक्ष करून आम्ही म्हणालो, ‘‘तुम्ही अगदी माझ्या मनातलंच बोलतात. इतकं कुसंस्कारी, चित्रकलेची विटंबना करणारं, अत्यंत अश्लील अशा चित्रांनी भरलेलं हे प्रदर्शन आपण बंद पाडलंच पाहिजे.’’
हे एक आमचं फारच भारी आहे बरं का. आम्ही एकटे असलो की तोंडावरची माशी उडेल की नाही, अशी शंका येते. मात्र, आणखी दोन टिळेवाले भेटले की आमच्या अंगात अनामिक स्फुरण चढतं. तसंच झालं. आम्ही तिघांनी मिळून प्रदर्शन बंद पाडलं.
एक थोर पुण्यकर्म केल्याच्या सात्त्विक आनंदानं थबथबलेल्या मनानं आणि चेह-यानं आम्ही नाक्यावरच्या उपाहारगृहात तेवढाच सात्त्विक आणि थबथबलेला साबुदाणावडा खाल्ला आणि टिळेवाले शाळेकडे निघालो. तिथेच आमच्या संस्थेचे ‘अश्लीलता प्रशिक्षण वर्ग’ भरतात ना! अॅक्चुअली खरं सांगायचं तर हे नाव ऐकल्यावर तुमच्या मनात जो विचार आला, त्याच विचारानं आम्हीही सुरुवातीला या वर्गाकडे ओढला गेलो होतो. इथे अश्लीलतेचं नव्हे तर अश्लीलता कशी ओळखायची, याचं प्रशिक्षण दिलं जातं, हे कळेपर्यंत बराच उशीर झाला होता. असो. अहाहा, काय तो वर्गाचा देखावा!
एक टिळेवाले बंधू हातात खडू घेऊन उभे होते. त्यांनी फळ्यावर एक रेघ मारली.
‘‘बाई गं, कित्ती अश्लील?’’ समोरची एक भगिनी अशा काही अदेनं म्हणाली की ते पाहून आम्हाला- अं.. अंऽ आम्हालाही ती रेघ अश्लील वाटू लागली.
‘‘मग ताई, शेजारी दुसरी रेघ काढतो.’’ बंधूंनी आणखी एक रेघ काढली.
‘‘बाई बाई, हे तर फारच अश्लील.’’ दुसरी भगिनी चित्कारली.
‘‘मग या रेषा जोडू का?’’
‘‘नको नको. ते तर बघवणारही नाही.’’ तिसरी भगिनी डोळे झाकून घेत म्हणाली.
चौथी उठली आणि बंधूंच्या अंगावर धावून जात म्हणाली, ‘‘आधी तो खडू फेकून द्या. बुटाखाली चिरडून टाका. तोच सर्वात अश्लील दिसतोय. अशा भयंकर अश्लील आकाराचे खडू घेऊन शिक्षक शाळाशाळांमध्ये मुलांना शिकवतात. मग, मुलं वेगळं काय शिकतील?’’
‘‘ठरलं.’’ टिळेवाले शाळेचे मोठे टिळेवाले मुख्याध्यापक पुढे सरसावले, ‘‘यापुढचं आंदोलन खडूविरोधी आंदोलन करायचं. अख्ख्या भारतवर्षातल्या सर्व शाळांमधले हे खडू वापरण्यावर आपण बंदी आणायची. जो शिक्षक किंवा जी शिक्षिका हातात खडू घेईल, त्याला छडीनं मारायचं.’’
‘‘अय्या नक्को!’’ आणखी एक भगिनी चित्कारली.
‘‘का हो ताई?’’
‘‘इश्श! अहो, छडी हातात घ्यायची म्हणजे.. तीही कित्ती अश्लील असते!’’
‘‘हो ना बाई, माझ्या अंगावर तर शहाराच आला.’’
..अखेरीस अश्लीलताप्रसारक शिक्षकांवर डस्टर फेकून मारण्याचे ठरले आणि आमची सभा बरखास्त झाली.
० जड अंत:करणाने भगिनीवृंदाचा निरोप घेऊन महान राष्ट्रकार्य केल्याच्या सात्त्विक आनंदात आम्ही स्वगृही पधारलो, तर घरात वेगळाच प्रसंग. आमचे पाऊल घरात पडताच चिरंजीव शंकर याने गळामिठी घालून स्फुंदायला सुरुवात केली, ‘‘बाबा, आज माझ्या चित्राला पहिला नंबर मिळाला होता. पण, शाळेच्या प्रदर्शनात एक बाप्या आणि दोन बायकांनी मिळून नासधूस केली. माझं चित्र फाडून टाकलं..’’
..आमचं डोकं गरगरायला लागलं..
‘‘भेटूदेत ते भेकड भोंदू एकदा समोरासमोर.. नाही तापल्या कालथ्यानं डाग दिला त्यांच्या फुलीफुलीवर तर नावाची भीमाबाई नाही.’’
गळामिठी सैलावताना शंकरनं आमच्या चेह-याकडे पाहिलं.. मग खूप निरखून पाहिलं.. त्याला बहुधा प्रदर्शनातली ‘ओळख’ पटली.. मग त्याच्या चेह-यावर आश्चर्य, संताप, लाज, घृणा असे भाव क्रमाक्रमाने उमटत गेले..
..अतिशय अश्लील, ओंगळ आणि अमंगळ असं काही पाहिल्यावर एखाद्याच्या चेह-यावर उमटावेत तसे! (प्रहार, १० एप्रिल २०११)
एकदम झक्कास , खुसखुशीत झालायं लेख .
ReplyDeleteबारीक चिमटे काढत मस्त हसवणारा .
असेच चटकदार लिहित रहा त्याची फार
गरज आहे सध्या ..
कल्पना जोशी
Waah! Shevtamadhe sixer!
ReplyDeleteमस्तच !!
ReplyDelete