Monday, April 18, 2011

ऊठसूट उत्सवांच्या देशा...

मुंबईतली एक गल्ली..
 
टिपिकल कामगारवर्गातली, निम्नस्तरीय वस्ती.. रस्त्याच्या एका बाजूला बैठी घरं, दुस-या बाजूला वेगवेगळ्या योजनांमध्ये झोपडय़ा-चाळी पाडून उभ्या राहिलेल्या इमारती.. वस्तीत विखुरलेली काही प्रार्थनास्थळं, काही चकाटय़ा पिटण्याची स्थळं (या दोहोंमध्ये अलीकडे फार गल्लत होऊन राहिली आहे), किरकोळ किराणा दुकानं, चहाच्या टप-या, पानबिडीचे ठेले, हेअर कटिंग सलून, देशीचा गुत्ता आणि विदेशीचा बार हे सगळं नेहमीचंच नुक्कडछाप नेपथ्य.. त्यात दिवसरात्र वावरणा-या व्यक्तिरेखाही नुक्कडमधल्यासारख्याच, पण अधिक अस्सल असल्यामुळे त्यांची तिखटजाळ कारी आणि कारी भाषा कानात शिशासारखी ओतली जाऊन मेंदूला झिणझिण्या आणत असते..
 
या नेहमीच्या कामगार वस्तीच्या सीनमध्ये हल्लीच्या काळात काही पर्मनंट भर पडत चालली आहे.. काही घरांवर, इमारतींवर वेगवेगळय़ा पक्षांचे ध्वज, सोबत काही पक्षांचे आडवे कापडी बॅनर, रस्त्याकडेला ठिकठिकाणी स्थानिक कामांचे श्रेय ओरबाडण्याची अहमहमिका दाखवणारे नेत्या-कार्यकर्त्यांचे बटबटीत फ्लेक्स, समस्त भंपकराव भुस्कुटेंना वाढदिवसांच्या शुभेच्छा देणा-यांचे फलक, रस्त्यावर अस्ताव्यस्त सांडलेले मांडव, त्यांत (कधी कधी एकमेकांच्या समोरासमोर वेगवेगळी गाणी वाजवणारे) मोठमोठे स्पीकर आणि रस्त्याच्या दुतर्फा पताकांच्या माळा आणि रात्री झगमगणारी विजेच्या माळांची रोषणाई..
 
आता हे कोणत्याही वस्तीतल्या कोणत्याही उत्सवाच्या वेळी दिसणारं सर्वसामान्य दृश्य एवढं रंगवून सांगण्याची काय गरज आहे?..
 
.. कारण, यातली गंमतीची गोष्ट अशी आहे की या आणि इथल्या अशा बहुतेक सगळय़ा वस्त्यांमध्ये ऑल्मोस्ट वर्षाचे 365 दिवस हेच दृश्य दिसतं.. म्हणजे बारा महिने तेरा काळ कोणते ना कोणते उत्सव सुरू असतात..
 
गणपती, नवरात्र हे तर नेहमीचे यशस्वी सामाजिक जागृती करणारे उत्सव (इथे जागृतीच्या पुस्तकी अर्थाकडे वळायचं नाही, माणसांना जागे ठेवणेएवढाच अर्थ पाहायचा).. या दोन्ही उत्सवांना हल्ली वन्समोअर मिळालेला आहे, त्यामुळे, गणेशोत्सवाला माघी गणपतीची जोड मिळालीये आणि नवरात्र तर 18 रात्रींचं होऊन गेलंय. अन्य सर्व धर्मामधले पवित्र दिवस, नववर्षदिन, मग विविध देव आणि देव्यांचे जन्मोत्सव (नशीब त्यांच्या पुण्यतिथ्या नसतात), पंचम्या, सप्ताह, नवम्या, दशम्या, आधुनिक भारतातल्या महापुरुषांच्या जयंत्या आणि पुण्यतिथ्या, असंख्य बाबा-बुवा-बापूंचे भंडारे, प्रकटदिन, अंतर्धानदिन वगैरे.. या आणि असल्या उत्सवांनंतरही काही दिवस कोरडे उरलेच, तर उत्सवबाज मंडळी सत्यनारायणाच्या पूजा, लग्नं आणि बारशांचे दणकेबाज सोहळे करून वर्षातला एकही दिवस भाकड जाऊ देत नाहीत..
 
आता कुणी म्हणेल की असतो एखादा समाज उत्सवप्रिय, त्यात काय बिघडतं?..
 
बिघाड काय आहे, हे जाणून घ्यायचं असेल, तर यातल्या कोणत्याही उत्सवाचं स्वरूप पाहा.. सगळय़ा उत्सवांमध्ये मांडव, पताका, लायटिंग आणि सकाळपासून मध्यरात्रीपर्यंत आणि अनेकदा त्यानंतरही ढणाढणा वाजत असलेले स्पीकर कॉमन. सणासुदीला, जनरल उत्सवांना हिंदी-मराठी सिनेमातली प्रसंगाशी असंगत नाचरी गाणी वाजतात आणि धार्मिक उत्सवांना धार्मिक गाणी- म्हणजे काय तर हिंदी मराठी सिनेमातल्या असंगत गाण्यांच्या चालींवर बेतलेली, गीत-संगीत-गायन या सर्वच पातळय़ांवर सुमार दर्जाची गाणी वाजतात, एवढाच काय तो फरक. धार्मिक उत्सव असेल, तर भंडारा, प्रसाद किंवा तीर्थप्रसाद आणि सामाजिक उत्सव असेल तर कार्यकर्त्यांचा रात्रीचा तीर्थप्रसाद’- असे सगळे उत्सव सारख्याच निर्बुद्धपणे साजरे करायचे. बुद्धिदात्या गणपतीच्या उत्सवाशी बुद्धीचा संबंध नाही, धम्मदात्या डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या उत्सवात शिक्षण-वाचन-अभ्यासाचा संबंध नाही, उलट बाबासाहेबांना अप्रिय अशी त्यांचीच मूर्तीपूजा मांडलेली.
 
या असल्या उत्सवांमधूनच कार्यकर्ते घडतात, म्हणे. आसपास असली करयसोडून काहीही अर्थपूर्ण घडत नसेल, तर राजकीय पक्षांना लागणा-या अल्पमती उत्साही वीरांच्या फौजाच तयार होणार. उत्सवांच्या मुशीत तयार झालेले हे टिपिकल कार्यकर्ते मग दरसाल विद्यार्थ्यांना वह्यावाटप आणि गरजू महिलांना शिवणयंत्रवाटपासारखे तेच तेच कल्पनाशून्य कार्यक्रम सदासर्वकाळ घेत राहतात.. आधी गल्लीतल्या एकाही पोराचं अभ्यासात लक्ष लागणार नाही, इतक्या मोठय़ा आवाजात स्पीकर लावून त्यांच्या अभ्यासाचा, शैक्षणिक कारकिर्दीचा कायमस्वरूपी खेळखंडोबा करायचा आणि मग त्यांना वह्या वाटायच्या? कशाला? कोणत्या तरी बुवा-बापू-महाराजाचं नाव गिरगटवून भंपक पुण्य कमावायला?
 
रोज ही गल्ली चालावी लागते.
 
रोज या गल्लीत उत्सव सुरू असतो.
 
रोज या गल्लीतून चालताना प्रश्न पडत राहतात..
 
..हा समाज सतत इतके उत्सव का साजरे करत असतो?
 
हे सगळे उत्सव तो इतक्या एकसाची बथ्थडपणाने का साजरे करतो?
 
आपल्याकडे रोज साजरं करण्यासारखं काहीतरी आहे, असं घसा खरवडून, लाइटमाळांचा झगमगाट करून तो कोणाला सांगत असतो?
 
असल्या कोणत्याही उत्सवात समाजाचं ख-या अर्थाने प्रबोधन करणारं, त्याची सद्यस्थिती मांडून दाखवणारं, समाजाच्या व्यापक हिताचं कोणतंही ठोस काम कधीच का घडताना दिसत नाही?
 
समूहाला कशाचा विसर पडावा म्हणून हे मेंदूला झिंग आणणारे अफूचे डोस दिले जातात?
 या बारमाही उत्सवांमधून समाजभान, एकोपा वगैरे वाढीला लागतो म्हणतात, मग, एवढे उत्सव साजरे करूनही हा समाज इतका चिरफाळलेला, विभागलेला, पराकोटीचा स्वार्थी आणि आप्पलपोटा कसा?  

(प्रहार, १७ एप्रिल, २०११) 


(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

No comments:

Post a Comment