Sunday, April 24, 2011

वाघाचं शेपूट!

‘कान्हा टाइम्स’ची हेडलाइन वाचताच चकोरनं पेपर बाजूला ठेवून अजूनपर्यंत झोपून असलेल्या ज्युनियर चकोरच्या कंबरसदृश भागावर पाय मारला. हडबडून पंख खडबडवत ज्यु. चकोर जागा झाला आणि म्हणाला, ‘‘डॅडा, तुम्ही काय मला मराठी माणसांमधला तो फेमस मोरू आणि स्वत:ला मोरूचा बाप समजता काय? एकदम कंबरेत लाथ घालून जागं करताय ते.’’
 
‘‘डोण्ट वेस्ट टाइम. तीन मिनिटात दाणेबिणे काय ते खाऊन घे. आपल्याला लगेच निघायचंय.’’
 
‘‘कुठे?’’
 
‘‘नेमकं ठाऊक नाही. पण, बहुतेक ईशान्येच्या पाणथळीवर चक्कर मारावी लागेल.’’
‘‘कशाकरता?’’
 
‘‘जंगलात एक वेगळाच प्राणी आलाय. तो पाहायला.’’
 वेगळा प्राणी म्हणताच ज्यु. चकोर आनंदला आणि झटपट आवरून बापाबरोबर त्याने लगेच उड्डाण केलं. थोडय़ाफार फरकानं सगळ्या जंगलात त्या सकाळी हेच घडलं. ज्या कुणाकडे ‘कान्हा टाइम्स’ किंवा ‘कान्हा समाचार’ किंवा ‘खबरें कान्हा’ असे पेपर येत होते, त्या सगळ्याच प्राणीपक्ष्यांच्या घरटय़ांमध्ये-गुहांमध्ये टाकोटाक निघण्याची तयारी झाली. ज्यांच्याकडे पेपर येत नव्हते त्यांना सगळीकडे सुरू असलेल्या लगबगीमुळे आपोआपच खबर मिळाली आणि उत्सुकतेपोटी मंडळी निघाली. ‘कान्हामध्ये आलेला विलक्षण प्राणी’ हाच त्या दिवशी जंगलभर चिवचिवाटाचा, खुसफुशीचा, गुरगुरींचा, हंबरांचा, भेकांचा, चित्कारांचा आणि कलकलाटांचा विषय होता.
चकोरासारख्या पक्ष्यांनी हवेतून, सुसरीसारख्या उभयचरांनी पाण्यातून आणि वाघ, हत्ती, कोल्हे, ससे, लांडगे, माकडं यांनी जमिनीवरून बराच शोध घेतला. पण, वेगळा प्राणी काही दिसेना. ब-याच वेळानंतर चकोरनं ज्यु. चकोराला डोळ्यांनी खूण करत ‘लँडिंग’ची गिरकी घेतली. दोघेही अल्लाद एका झाडाच्या फांदीवर उतरले. चकोरनं जमिनीवरच्या एका झुडपाच्या दिशेनं खूण केली. तिकडे पाहताच आधी ज्यु. चकोरचं डोळे बारीक झाले, मग विस्फारले आणि त्यानं आपल्या इवलाल्या पंखांनी डॅडा चकोरला फटकारायला सुरुवात केली.
 
‘‘यासाठी मला इतक्या लांब घेऊन आलात सकाळी सकाळी घाई घाई करून? यासाठी? एक माणूस पाहायला? मी माणसं पाहिली नाहीत का कधी? नॉन्सेन्स..’’
 
‘‘अरे अरे, हो बाळा’’ आपल्या संतप्त बाळाचे फटकारे चुकवत चकोर म्हणाला, ‘‘शांत हो, आणि माझं ऐकून तर घे. नीट बघ. तो माणूस किती भेदरलेला आहे ते.’’
 
‘‘कमॉन डॅडा! अहो भेदरलेली माणसं मी काही पाहिली नाहीत का जंगलात? मोठे शूरवीर बनून जंगलात येतात आणि दोन मैलांवरून वाघकाकांची डरकाळी ऐकू आली की टरकतात. एखादं रानडुक्कर समोर आलं तर पळता भुई थोडी होते. सापमामा पायात सळसळले तर पांढरे कपडे पिवळे होतात. उडता उडता हे सगळं पाहात असतो मी. भेदरलेला माणूस हा काही आवर्जून पाहायलाच हवा असा वेगळा प्राणी आहे का?’’
 
‘‘अरे बेटा, माझं ऐकून तर घे. हा माणूस भेदरलाय तो जंगलात आल्यामुळे, असा तुझा समज आहे.. करेक्ट. पण, तो भेदरल्यामुळे जंगलात आलाय, असं मी तुला सांगितलं तर?..’’
‘‘भेदरल्यामुळे.. जंगलात?.. साऊण्ड्स इंटरेस्टिंग..’’
 
‘‘आता त्याच्याकडे नीट बघ.. काय कळलं तुला त्याच्याकडे पाहून..’’
‘‘लग्नाचा फोटोग्राफर दिसतोय.. गळ्यात कॅमेरा आहे..’’
 
‘‘गधडय़ा, लेन्सा बघ त्याच्या कॅमे-याच्या? लग्नात अशा लेन्स वापरल्या तर दारात उभं राहून स्टेजवरची फोटोग्राफी करता येईल.’’
 
‘‘वाइल्ड लाइफ फोटोग्राफर तर नाहीये ना हा? पण, ते तर कसे स्मार्ट आणि धाडसी दिसतात..’’
 
‘‘अरे, हे सेनापती आहेत सेनापती..’’
 
‘‘हा असला दरदरून घाम फुटलेला सेनापती? आणि यांची सेना कुठंय?’’
 
‘‘ती तिकडे माणसांच्या जंगलात लढतेय..’’
 
‘‘आणि मग हे इकडे कुणाचे कपडे सांभाळतायत?’’
 
‘‘स्वत:चेच. हा अखिल जगतातला असा पहिला सेनापती असेल, जो सेनेला चाल करून जाण्याचा आदेश देतो आणि स्वत: ‘सुपारी’ चघळत मागच्या मागे धूम ठोकतो.’’
 
‘‘आँ.. आणि त्यांची सेना त्यांचा आदेश ऐकते?’’
 
‘‘अरे, माणसांमध्ये हल्ली काय काय प्रकार असतात, तुला ठाऊक नाही. हा त्यातलाच एक आयटम.’’
‘‘पण, यांना स्वत:ला लढायचं नसेल, तर हे आदेश कशाला देतात?’’
 
‘‘कारण त्यांना आदेश द्यायला फार आवडतं. मध्यंतरी तिकडे मुंबईतल्या दादर भागातही त्यांनी असाच एक ‘आदेश’ दिला होता लोकांना. लोकांनी तो उलटटपाली त्यांच्याकडेच परत पाठवला.’’
 
‘‘तरी ते आदेश देतात?’’
 
‘‘असतो एकेकाचा छंद!’’
 
‘‘पण, मला एक कळत नाहीये डॅडा. यांना स्वत:ला लढता येत नाही, तर हे इतरांना कशाला लढवतात?’’
‘‘तीच तर त्यांची स्पेशालिटी आहे. यांची सेना चाल करून गेली की कधी कधी समोरचे घाबरतात. पान-सुपारीचं तबक पाठवतात. यांना सुपारीचा भारी शौक. चांगली सुपारी मिळाली की लढाई खतम.’’
 
‘‘आणि सैनिकांचं काय?’’
 
‘‘त्यांना मिळतो ना.. चुना.’’
 
‘‘अरे बापरे, भलताच विलक्षण प्राणी दिसतोय हा. पण, मग आता हे कशाला आलेत?’’
 
‘‘लपायला. हे इकडे आले की समजायचं, यांचं सैन्य तिकडे लढतंय आणि हे इकडे फोटो काढतायत. लढाई संपली, सगळं वातावरण शांत झालं, तबक पुढे आलं की मगच हे जंगलातून बाहेर पडणार.’’
 
‘‘धन्य ते सैन्य! फोटोग्राफरला सेनापती नेमल्यावर दुसरं काय होणार म्हणा. बाबा, मी मघापासून पाहतोय. सेनापती गळ्यातली दुर्बीण डोळ्याला लावून सारखे जंगलाच्या बाहेरच पाहतायत. ते का?’’
 
‘‘ते लढाईवर बारीक नजर ठेवून आहेत.’’
 
‘‘इथून?’’ ज्युनियर चकोरची हसून हसून पुरेवाट झाली. कसंबसं हसू आवरून तो म्हणाला, ‘‘अहो, हे फोटोग्राफर सेनापती इथून दुर्बीण लावून तिकडे बारीक नजर ठेवत असताना समोर भुकेलेले वाघकाका येऊन उभे ठाकले तर काय होईल?’’
 ‘‘सैनिकांची आणि महाराष्ट्राची सुटका!!!!’’


(चित्र: अरुण मोहिते)

(प्रहार, २४ एप्रिल, २०११)

No comments:

Post a Comment