Sunday, April 3, 2011

आपण, ते आणि जननीबाय

वर्ल्ड कपची कोणती मॅच पाहण्यासाठी तुम्ही जिवाचा आटापिटा केलात? 
कोणती मॅच पाहताना तुमचे प्राण डोळय़ांत गोळा झाले होते?
 
काही मोजके दळभद्री नतद्रष्टवगळता या प्रश्नांवर तमाम भारतवर्षाचं एकमुखी उत्तर एकच असेल.. अर्थातच भारत-पाकिस्तान सेमी फायनल.
 
का? तीच मॅच का?
 
कारण ही मॅच पाकिस्तानबरोबर होती.. सिंपल.
 
असेल. पण, तीच इतकी महत्त्वाची कशी? पाकिस्तान हा जगातला नंबर वन क्रिकेट खेळणारा देश आहे का?
 
नाही.
 
पाकिस्तानला हरवणं हा अशक्यप्राय पराक्रम ठरावा इतकी ती बलाढय़ टीम आहे का?
 
नाही.
 
मग, ‘ही मॅच जिंकलीच पाहिजे, फायनल हरलो तरी फरक पडत नाही, आपल्यासाठी हीच फायनलअसा युद्धोन्मादी उत्साह निर्माण करणारं त्या मॅचमध्ये असं काय होतं?
 
ती मॅच पाकिस्तानबरोबर होती, ठोंब्या! तो आपला शत्रू नंबर वन आहे..
 
का? आपल्या सीमेलगत इतर जेवढी शेजारी राष्ट्रं आहेत, त्यापैकी कोण आपला मित्र आहे? कोणाशी आपले संबंध शंभर टक्के सौहार्दाचे आहेत? पाकिस्तान शत्रू नंबर वन असेल, तर चीनचं काय? तो काय परममित्र नंबर वन आहे?
 
ओ भाऊ, ते इंटरनॅशनल पॉलिटिक्स, एक्स्टर्नल अफेअर्स वगैरे जडजंबाल गोष्टी शिकवू नका.. पाकिस्तान हा शत्रू नंबर वन आहे, कारण तशीच आपली सगळ्यांची भावना आहे. तसंच बाळकडू आपल्याला सतत मिळालं आहे. पाक- डय़ांचे उद्योग दिसत नाहीत का तुम्हाला? अतिरेकी हल्ले, कारगिल, बाँबस्फोट वगैरे विसरलात का?
 
छे छे! ते कोण विसरेल? पण, एकशे एकवीस कोटींचा हा बलाढय़, सुपरपॉवर होत्साता आपला देश उत्तर प्रदेशापेक्षाही कमी लोकसंख्या असलेल्या पाकिस्तानला इतका टरकतो, हे अजब नाही का?
 
ओ भाऊसाहेब, तोंड सांभाळून बोला. टरकतोबिरकतो बोलायचं काम नाही. अरे, आपला देश एवढा बलवान आहे की आपण सगळे मिळून वाघा बॉर्डरवर नुसतं अं अं केलं, तरी तो टिंपुकला देश सगळाच्या सगळा वाहून जाईल, आहात कुठं!
 
हेही बरोबर! आतापर्यंतच्या प्रत्येक लढाईत आपण हरवलंय त्या देशाला. म्हणूनच तर प्रश्न पडतो की इतक्या मरतुकडय़ा देशाशी कोणत्याही मैदानावरची लढाई इतकी महत्त्वाची का वाटते आपल्याला? पाकिस्तानला हरवलंच पाहिजे, असा घोषा लावणं म्हणजे पाकिस्तानला अनावश्यक महत्त्व देणंच नाही का?
 
म्हणजे मुद्दा पुन्हा तोच. अख्ख्या देशाला भारत-पाकिस्तान मॅच हीच विश्वचषकाची खरी फायनल वाटणार असेल, तर आपल्याला पाकिस्तानफोबिया झालेला आहे, हे मान्य केलं पाहिजे.
 
आपल्याला पाकिस्तानला हरवणं इतकं महत्त्वाचं वाटतं कारण तो त्यांचा देश आहे, हेही मान्य केलं पाहिजे.
 
तेम्हणजे मुसलमान.
 पाकिस्तान भारतातून मुस्लिमबहुल प्रांताचा लचका तोडून बनवण्यात आलेला आहे आणि भारतातल्या बहुसंख्य हिंदूंना मुस्लिमद्वेषाचा बूस्टर डोसच दिला जात असल्याने या देशातल्या प्रत्येकाला पाकिस्तानचा पराभव हा वर्ल्डकपपेक्षा मोठा विजय वाटतो. इथल्या प्रत्येक मुस्लिमालाही तसंच वाटलं पाहिजे (नाहीतर जा लेको पाकिस्तानात!) असा आपला आग्रह असतो. भारतातल्या मुस्लिम वस्त्यांमध्ये मुस्लिम बांधवभारत विजयी व्हावा, यासाठी अल्लाहची करुणा भाकताहेत, असे फोटो छापून येतात सगळय़ा पेपरांत. हे राष्ट्रीय मुस्लिमअसल्याचं सर्टिफिकेट त्यांना दर मॅचला मिळवावंच लागतं. (इंग्लंडचे नागरिक झालेले हिंदू मात्र तिकडच्या मॅचमध्ये त्या देशाला नव्हे, तर भारतीय संघाला चीअरअप करतात, तो देशद्रोह नसतो, ते फक्त वेळीअवेळी उफाळून येणारं संधिसाधूंचं मातृभूमीप्रेम असतं.)
भारतावर पाकिस्तानातून अतिरेकी हल्ले झाले आहेत.
 
भारताशी पाकिस्तानने लढाया केल्या आहेत.
काश्मीरसारख्या प्रश्नांच्या जखमा तो देश आंतरराष्ट्रीय पातळीवर चिघळत ठेवतो आहे.
 
भारतद्वेषाच्या आसाभोवतीच गरगरणारी तिथली राजवट आणि लष्करशाही घृणेला पात्रच आहे. पण, तिथल्या सामान्य माणसांनी काय घोडं मारलंय? इकडची आणि तिकडची सामान्य माणसं- आपला विश्वास बसणार नाही इतकी- एकमेकांसारखी आहेत, हे आपल्या भेज्यात कधी शिरणार? त्यांची नाळ- कुणी कितीही उपटून अरबस्तानात नेऊन उम्माला (म्हणजे इस्लाम हेच एक राष्ट्र, ही थियरी) चिकटवायचा प्रयत्न केला तरी- इथल्याच मातीत पुरलेली आहे.. ती नाळ मुंबई-अमृतसर-दिल्लीशी जुळलेली आहे, दुबई-कैरो-तेहरानशी नव्हे.
 
त्यांनी आणि त्यांच्या हिरव्या आकांनी कितीही नाकारलं तरी पाकिस्तानातले बहुसंख्य मुसलमान हे संस्कारांनी भारतीय मुसलमान आहेत.
 
भारताशी हरलो, तर एवढे काय भुंकताय? आपण सिनेमेही त्यांचे पाहतो, त्यांच्याकडचेच रीतीरिवाज पाळतो, तर त्यांच्या- बद्दल नफरत कशाला,’ असं परवाच्या मॅचनंतर तिकडच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये दरडावणारा आफ्रिदी तरी वेगळं काय सांगत होता.
 
तिकडे तो तसं सांगतोय आणि इकडे आपण मात्र मॅचच्या उन्मादात इकडच्याही मुसलमानांना ते पाकिस्तानीअसल्याप्रमाणे वागवतोय..
 ते किती भारतीयआहेत, यावर विश्वास बसत नसेल, तर बाय जननीबायला विचारा. 
बाय जननीबाय
 
काली श्री कालकाय
 
पाच दिवस खेलाय निगालीस
 
ही रोशन तुझ्या चरणाशी आलीय
 
हिची लेक..
 
(कुलसुम कुलसुम, नाव घे तिचा आयसमोर..)
 
हां.. तर हिची लेक कुलसुम
 
(रोह्याला असते ती, भायेरगावी असतो तिचा नवरा..)
 
आता हे काय नवसात सांगू? अगं मेन नवस काय आहे ते सांग पटापट. मागं मान्सा खोलंबलीत.
(तिचा नवरा आता आलाय परत, तिला प्वॉर नाय, प्वॉर होऊदे)
 
अगं नवरा आलाय ना आता परत. मग आता होईलच की पोर. नवस कशाला बोलायला पायजेल.. हा हा हा
 
(परत बोल नवस समदा..)
 
बाय जननीबाय
 
काली श्री कालकाय
 
पाच दिवस खेलाय निगालीस
 
ही रोशन तुझ्या चरणाशी आलीय
 
हिची लेक कुलसुम, रोह्याला असते, तिला पोर नाय, तिची इच्छा पूर्ण कर, तिला पुढच्या वर्षीच पोर होऊ दे,
 
तिच्या पाठिशी सादर आस.
 पुढच्या वर्षी ती तिच्या मनाप्रमाणे काय तुझ्या भेटीला देईल, पाच नारळांची ओटी, सव्वाशेर पेढे आणील. तेव्हा तिची इच्छा पूर्ण कर. पाठिशी सादर आस. हरहरहर.. महादेव!
असे कित्येक नवस होळीच्या आगेमागे कोकणाच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या आय-बाय-मायच्या समोर बोलले जातात.. कपाळावर कुंकू आणि गळय़ात मंगळसूत्र नसलेल्या कितीतरी रेहाना, रुक्साना, शबनम भक्तिभावानं देवीची ओटी भरत असतात.. भक्तिभावानं देवीचं कुंकू कपाळावर लावून घेत असतात.. कोकणातल्या गावांमधली मुस्लिम वस्ती म्हणजे मोहल्ला’.. त्या मोहल्ल्यातला कोणीही शाळकरी अर्शद, अस्लम, शारूक सर्दीपडशानं गांजला, तर याच आय-बाय-मायचा अंगारा त्याच्या भाळी लागतो, मुखात पडतो, क्वचित ताईताच्या रूपानं श्रद्धेचं कवचही बनतो..
 मूर्तीपूजा मान्य नसलेल्या इस्लाममध्ये ही देवपूजा म्हणजे धर्मद्रोहच.. पण, या मातीशी एकरूप झालेला प्रत्येक मुसलमान तो इतक्या भोळ्या श्रद्धेने करतो, की त्याचे त्या अल्लातालालाही कौतुक वाटावे.. मुस्लिमांचेच का? बाय जननीबायपुढच्या श्रीफळांप्रमाणेच कोणत्याही दग्र्यावरच्या चादरी आणि मोतमाऊलीपुढच्या मेणबत्त्याही धर्माची मर्यादा ओलांडूनच वाहिल्या जातात.. धर्माचा ऊग्र दर्प चपलेप्रमाणे बाहेर ठेवून तिथे करुणा भाकण्यासाठी झुकलेला असतो निखळ माणूस..
याचं भान न ठेवता दरवेळी भारताने पाकिस्तानला हरवल्यानंतर कोठूनतरी सणसणत येणाऱ्या दगडानं मोहल्ल्यातल्या अन्वरच्या घराची खिडकी फुटणार असेल, अमीनाबीने खपून भाज्या लावलेल्या परसात लवंगीचे सर तडतडणार असतील, विजयोत्सवी मिरवणुकीत अर्शद, अस्लम, शारूक यांना तेच हरले आहेतअशा मिजाशीत टपल्या, ठोसे, बुक्के खावे लागणार असतील, दरवेळी भारत पाकिस्तानविरुद्ध जिंकेल तेव्हा आपण आपल्या मोहोल्ल्यात पाकिस्तानचं प्रतिबिंब पाहणार असू.. तर आपल्याला पिडण्यासाठी पाकिस्तानची गरज काय?
 ..आपणच आपल्या मोहोल्ल्यात पाकिस्तान तयार करतो आहोतच.

(प्रहार, ३ एप्रिल, २०११)

1 comment:

  1. मुकेश,
    हे चांगलं लिहिलं आहेस. पण लक्षात कोण घेतो?
    क्रिकेटचं हे कौतुक vulgar पासळीवर चाललेलं आहे.

    ReplyDelete