‘‘देखिए साहब, एकेक रूम कितना बडा है. एकदम तबियत से बनाया है..’’ नव्या को-या बिल्डिंगमधला बिल्डरचा जुना, विश्वासू मुकादम रंगात येऊन सांगत होता, ‘‘इधर सामने भी बिल्डिंग बनाने का आयडिया था. पण, मी मालकला सांगितला, नाय चालणार. हिते गार्डन अने प्ले ग्राऊंडच झाला पायजे. आपल्या बिल्डिंगमधली मुलं खेळणार कुठे? मालकने ऐकला माझा. तो माझा ऐकतोच. साइटवर मीच असतो ना. कस्टमरला काय पायजे ते मला बराबर कळतं.
‘‘टोटल 16 च फ्लॅट हायेत बिल्डिंगमध्ये. सोसायटी एकदम छोटी. डोक्याला तरास नाय. आणि एक..’’ मुकादमाचे डोळे बारीक झाले.. आवाज एकदम सस्पेन्समध्ये गेला.. ‘‘आमच्याकडे ‘यां’ना प्रवेश नाय..’’ त्याच्या ‘यांना’ला हाताने हनुवटीवर दाढीच्या खुणेची जोड आहे.
‘‘यांना म्हणजे?’’ त्या खुणेनेही न कळून प्रश्न.
मग मुकादमाचा काल्पनिक दाढीवरचा हात वेगाने फिरतो. चेह-यावरची तुच्छता तिरस्कारात बदलते. आवाज चिरका होतो, ‘‘मुसलमान लोगला नो एण्ट्री!’’ ओ हो हो! या शहरातल्या, या राज्यातल्या आणि या देशातल्या अनेक सोसायटय़ांप्रमाणे ही सोसायटीही ‘मुस्लिम्स नॉट अलाऊड’ आहे, तर.. अर्थात अनऑफिशियली. अधिकृतपणे असं करता येणार नाही, हे सगळय़ांना समजतं. आता या मुकादमाला जरा खेचलाच पाहिजे.
‘‘का हो, पण, ‘त्यां’ना का प्रवेश नाही?’’
‘‘गंदे लोग. मांसमच्छर खानेवाले.’’
‘‘अहो, पण मांस तर ‘आपले लोक’ पण खातात आणि तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, मच्छर कोणीच खात नाही. तोच माणसाला खातो.’’
मुकादमाला ‘त्यां’चा विषय इतका नकोसा आहे की त्याच्याकडे हा विनोद वाया जातो.
‘‘तो सगळा बराबरच आहे. पण, शेवटी आपला माणस वेगळा नि त्यांचा माणस वेगळा. इकडे त्यानला जागा देयेल, तर आपली माणसं येणार नाय. आमचा शेठ तिकडे त्यांच्या बस्तीतबी बिल्डिंग बांधतो ना त्यांच्यासाठी. इकडे कशाला पाहिजेत ते.’’ ‘‘मग, तुम्ही सरळ नाही म्हणून सांगता? म्हणजे, तुम्ही मुसलमान आहात म्हणून तुम्हाला आमच्या सोसायटीत घर नाही, असं थेट?’’
‘‘नाय नाय नाय. असा कसा करता येईल. त्यांच्यातला
कोण आला, तर सांगतो, समदा फ्लॅट बुक्ड हाय. तोबी समजून जातो.’’
‘‘पण, एखादा माणूस त्यांच्यातला आहे की आपल्यातला आहे, हे तुम्हाला कळतं कसं?’’ ‘‘हेच्यावरनं समजतेच ना!’’ हात हनुवटीवर फिरतोय, दाढीची खूण करीत.‘‘ती नसेल तर.’’
‘‘आमी घर दाखवण्याच्या पयलेच सगळी चोकशी करून घेतो. नाव काय? घरी कोन हाय? गोड बोलून माहिती काढून घेतो..’’ आता मुकादमाच्या चेह-यावरचे भाव अचानक बदलतात. या खेपेला त्याने ही काळजी घेतलेली नाही. आम्हाला घर दाखवण्याच्या आधी काहीही विचारलेलं नाही. आमच्यासोबतचा इस्टेट एजंट अगदी ओळखीचा असल्यामुळे तो निर्धास्त होता बहुतेक. पण, आता या प्रश्नोत्तरांनंतर त्याला फारशी खात्री राहिलेली नाही. त्यात आधुनिक विचाराच्या बायकोच्या गळ्यात ना सौभाग्यलेणं ना कपाळावर सौभाग्यचिन्ह. आता मुकादमाच्या चेहऱ्यावर चिंतेचं जाळं पसरतं. पण, त्या जाळय़ातूनही सफाईदार प्रसन्न हास्य फेकून तो नको इतक्या सहज सुरात चौकशी करतो, ‘‘आपला नाव काय साहेब?’’
नाव ऐकल्यावर त्याला हायसं वाटतं.. हे नाव ‘त्यां’च्यात असणं शक्य नाही.. ‘‘आपलं नाव मॅडम?’’ आता गडी खुल्या मैदानात आला. आंतरधर्मीय विवाह तर नाही ना यांचा? थेट खातरजमा.
मग अर्ध ओशाळं, अर्ध रिलॅक्स्ड हसत ‘‘मला वाटलाच होता. इतकी वर्ष मी कस्टमर बघतोय. आमाला पण बराबर अंदाज येतो, हे बघा साहेब. ही बाल्कनी..’’
..आता त्याच्या त्या टकळीकडे फारसं लक्ष जात नाही. डोळय़ांसमोर एका मित्राचा चेहरा तरळतो. तो 20 वर्षापूर्वी मुंबईत नोकरीला आला. दूरच्या खेडय़ातून. काही दिवस इकडे तिकडे काढल्यानंतर एकदम विरारच्याही पल्याड राहायला गेला. लग्न झालं, मुलं झाली. तिकडून गैरसोयीची अडनिडी मेल पकडून इकडे यायचं, इकडून तसाच लंबाचौडा प्रवास करून जायचं. याचे दिवसाचे पाच तास प्रवासातच जातात. हा तिकडे इतका का रमला, हे आजवर ठाऊक नव्हतं. नुकतंच कारण समजलं. त्याने जेव्हा जेव्हा मुंबईच्या उपनगरांमध्ये घर घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेव्हा त्याला ‘त्यां’च्यातला म्हणून वेगवेगळय़ा मार्गानी प्रवेश नाकारण्यात आला. हा प्रकार पाच-सहा वेळा घडला, तेव्हा त्यानं नादच सोडला. त्याला ‘त्यां’च्या वस्तीतच येऊन राहण्याचा पर्याय खुला होता. पण, ते त्याला नको होतं. आपल्या मुलांना धर्माच्या घेट्टोमध्ये डांबायची त्याची इच्छा नव्हती.. त्याची किंमत तो रोज पाच तास प्रवास करून चुकवतोय..
काय गैर आहे यात? मनात विचार आला, जगात बहुतेक माणसं अशाच प्रकारे आपल्याला कम्फर्टेबल वातावरणात, कम्फर्टेबल माणसांसोबत राहण्याचा विचार करतात. कुणाला मटण-मच्छीचा वास सहन होत नाही. तिथे धर्मापेक्षा शाकाहारी असणं महत्त्वाचं ठरतं. याच शहरात कितीतरी सोसायटय़ांमध्ये आपल्यालाही मांसाहारी आहोत, म्हणून जागा मिळणार नाहीच.
‘‘जेचा तेचा चॉइस असतो ने साहेब. आम्हाला काय जागा बेचायचाच आहे. पन कस्टमरच्या डिमांडचा विचार करावा लागते,’’ मुकादम काकाचा सूर आता मवाळला आहे. हे गि-हाईक ‘सेफ’ आहे, हे समजल्यावर ते पटवण्यासाठी तो एकदम सर्वधर्मसमभावीही व्हायला तयार दिसतोय, ‘‘तुमचा पन चॉइस असेलच ना?’’ बिनतोड सवाल.
मग आता याला आपला चॉइस सांगायलाच हवा.
‘‘काका, आम्हाला ना शांतता फार प्रिय आहे. दिवसरात्र भजनांचे, बिरहांचे, घरगुती समारंभांचे लाऊडस्पीकरी गोंगाट नसलेल्या, सदासर्वकाळ कसले ना कसले उत्सव साजरे न करणा-या, रात्री दहानंतर शांतता पाळण्याचा नियम पाळणाऱ्या, आवारात मंदिर नसणाऱ्या सोसायटीतच घर घ्यायचंय. तुमच्या मालकाने तशी सोसायटी बांधलीच, तर कळवा.’’
काकाचा हात आता हनुवटीवर प्रश्नार्थक रेंगाळून राहिला.(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(1/8/10)
aata builder lobby suddha ek jamat zali aahe.
ReplyDeleteTalu varch loni khanari aani rajkarnyanchi saath asleli ek tolich zali aahe.