Friday, February 11, 2011

आवाजाची झिंग

महाराष्ट्रात आवाज कुणाचा (कंपोझिटर, ते ‘वा’ आणि ‘ज’च्या मध्ये पाच सहा SSSS ची चिन्हं टाकायला विसरू नका, म्हणजे आवाज कसा दीSSSSर्घ आणि जोरकस होईल), हा प्रश्न सध्यातरी मिटला आहे....हा मजकूर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात असेल आणि ‘आवाज काँग्रेसचा’ असा त्याचा प्रतिपाद्य विषय असेल, अशी बा वाचका, तुझी समजूत झाली असेल, तर ती चूक आहे. इथे चर्चेला असलेल्या वार्षिक आवाजाच्या तुलनेत निवडणुकीचा तो पंचवार्षिक आवाज म्हणजे लक्ष्मी बाँबच्या तुलनेत फुसकी टिकलीच म्हणायला हवी. तर आखिल महाराष्ट्रात सगळ्यात कर्णभेदी आवाज मुंबईचा आहे, असं नुकतंच स्पष्ट झालेलं आहे. या आवाजाबद्दल आपल्याला खरंतर शरम वाटायला हवी. पण, आपल्या ‘परंपरे’प्रमाणे त्याचाही अभिमान वाटणारी मंडळीच खूप निघू शकतात.
गर्व से कहो, हम पटाखे फोडते है!
 किती वाजलेत, आसपास किती वस्ती आहे, लहान बाळं, आजारी लोक, म्हातारी मंडळी यांचे काय हाल होत असतील, दमेक-यांची कशी छाती फुटून निघत असेल, फटाके फोडून आपण किती धूर आणि कचरा निर्माण करतोय, यापैकी कशाकशाचीही पर्वा न करता मुंबईकरांनी तुफान फटाके वाजवले. ध्वनिप्रदूषण, वायूप्रदूषणाबरोबरच त्यांनी सायलेन्स झोन, फटाके वाजवण्याचं वेळापत्रक वगैरे सगळ्या नियमांचीही मस्त गुंडाळी केली, त्यात फक्त आपल्या आनंदापुरतं पाहण्याची दारू ठासून भरली आणि बेपर्वाईच्या वातीला मग्रुरीची बत्ती दिली.. धडाम् धूम्! गेली दुनिया उडत!
 तसं पाहायला गेलं तर दिवाळीची परंपराच आपण पाळली म्हणायची. दिवाळी हा ‘दिवे लावण्याचा सण’ ना! आपण तो अशा प्रकारे ‘दिवे लावून’ साजरा केला. कुठेही, कसेही फटाके वाजवणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मिळवण्यासाठीच लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्याचा लढा उभारला असावा, अशा थाटात मंडळी दरसाल एकमेकांचे कान फोडत असतात आणि एकमेकांच्या फुप्फुसांची गोणती करीत असतात. आता आपल्या मूळ परंपरेत फटाके कुठेच नव्हते, ते चीनमधून इकडे आले आणि तिकडच्यापेक्षा इकडेच त्यांचा आवाज कसा वाढला, हा संशोधनाचाच विषय आहे.. आणि तो आपल्या धार्मिक उपवासाचे सगळेच पदार्थ (साबुदाणा, बटाटा, मिरची वगैरे) विदेशी कसे आहेत, याइतकाच गहन विषय आहे.
 आवाजाचा हा उच्छाद दिवाळीत पराकोटीला जातो म्हणून त्याचे मोजमाप तरी होते. एरवीचे काय? मुंबईतच नव्हे, तर देशभर असे वार्षिक उच्छाद वर्षभर सुरू असतात, सणांचा, धार्मिक उत्सवांचा, लग्नसमारंभांसारख्या व्यक्तिगत सोहळ्यांचा इथे सुकाळच असतो. हे सगळे आनंद लोकांचे कान किटवल्याशिवाय साजरे होतच नाहीत. साजरं करण्यासारखं काहीही असलं की एक म्युझिक सिस्टम येते, लाऊडस्पीकरांची खोकी रचली जातात आणि दिवसरात्र प्रसंगाशी सर्वस्वी विसंगत कर्कश्श गाण्यांचा भयावह गोंगाट आसमंत व्यापून टाकतो.
 
का करायचा असतो एवढा आवाज माणसांना?
 
काय सिद्ध करत असतात हे लोक?
 
आवाजाचीही दारूसारखी झिंग चढते का?
 
मादक पदार्थ घेतल्यावर दोन थपडांच्या बारीकरावालाही आपण किंगकाँग असल्यासारखं वाटतं, तसं आवाजानंही होतं का?
 
ही हिंसाच आहे.. दुर्बळांची हिंसा.
 
काटकुळ्यांच्या बेटकुळ्या.
 
आवाजाची मूळ परंपरा आदिम समाजातली.
 
आपले पूर्वज जेव्हा वल्कलं नेसून जंगलात फिरायचे, तेव्हा रात्रीच्या वेळी आग चेतवून त्याभोवती जमायचे आणि ढोल पिटून नाच करायचे.. आदिवासींमध्ये आजही ही पद्धत आहे.. आनंद व्यक्त करण्यापेक्षा त्यात जंगली प्राण्यांना मनुष्यवस्तीपासून दूर ठेवण्याचा भाग अधिक होता.. अंधाराबद्दलची, त्यात दडलेल्या क्रूर श्वापदांविषयीची भीती हे त्या आवाजाचं मूळ होतं.
 
..आता आपण एवढा आवाज करतो तो कोणाच्या भीतीतून? आपल्या मनाच्या तळाशी एकमेकांविषयीच एवढी भीती दडली आहे का? की आपल्या शारीरिक अवकाशापेक्षा (स्पेस) अधिक अवकाश व्यापण्याचा आणि ‘मी एवढा मोठ्ठा आहे’ असं दाखवण्याचा हा बालिश अट्टहास?
 
दर दिवाळीला आवाज आणि धुरापासून बचाव करण्यासाठी दारं-खिडक्या बंद करून घेताना हमखास प्रवीणची आठवण येते.
 
एका वर्षी त्याने जोरदार वाद घातला होता. ‘सगळ्या समाजसुधारकां’चा रोष ‘आपल्या’ धर्मावरच कसा असतो? हिंमत असेल तर ‘त्यांना’ जाऊन सांगा, त्यांचा आवाज बंद करा, वर्षातून एक दिवस ‘आम्ही’ही आवाज केला, तर त्यात काय एवढं, असं त्याचं आग्र्युमेंट होतं. ही एक गंमतच आहे. म्हणजे समोरचा फास लावून घेतोय, तर आपण त्याच्याच मापाचा दोर माझ्याही गळ्यात हवा, असा हट्ट धरण्यातलीच ही गत.
 
तर ते असो. मोठ्ठ्या आवाजात वाद संपवून विजयी मुद्रेने तो रवाना झाला.
 
नंतर लक्ष्मीपूजनाच्या मध्यरात्रीनंतर त्याचा फोन आला.. रडवेल्या, थरथरत्या आवाजात तो म्हणाला, ‘‘मी चुकलो.. भयंकर चुकलो.. आजची सगळी संध्याकाळ आणि अर्धी रात्र मी माझ्या सहा महिन्याच्या बछड्याच्या कानांवर हात ठेवून काढली आहे. वाजणा-या प्रत्येक फटाक्याच्या आवाजानिशी त्याचं दचकणं, भयव्याकुळ होऊन रडणं, मला पाहावत नाहीये आणि या हालांमधून त्याची मी सोडवणूक करू शकत नाहीये.. तळहातांवर त्याचं मुटकुळं घेऊन मी घरभर फे-या मारतोय आणि मनोमन स्वत:च्या थोबाडीत मारून घेतोय..
 
मी ठरवलंय, यापुढे एकही फटाका  वाजवायचा नाही..’’
 ..या दिवाळीत त्याचा मुलगा चार वर्षाचा झाला असेल आणि शंभर टक्के खात्री आहे की याच दिवाळीत त्याने त्याच्या आयुष्यातला पहिला फटाकाही वाजवला असेल.


(25/10/09)

No comments:

Post a Comment