Sunday, February 13, 2011

जगाची मुंबई


न्यू यॉर्क...
हे नाव उच्चारलं की डोळय़ांसमोर काय येतं?
`वर्ल्ड ट्रेड सेंटर'च्या जुळय़ा इमारती ज्या घोळक्यात उभ्या दिसायच्या, तो असंख्य गगनचुंबी इमारतींचा झगमगता परिसर... रूपेरी पडद्यावर `मुंबई' हा शब्द उमटल्यावर त्यापाठोपाठ जशी छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि त्या परिसरातली धावती गर्दी दिसतेच दिसते, `युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका' म्हणताच जशी मशाल उंचावलेली स्वातंत्र्यदेवी दिसणे मस्ट, तसेच न्यू यॉर्क हे नाव उच्चारताच मनाच्या पडद्यावर या इमारतींचेच दृश्य उमटते... ही खरेतर मॅनहॅटनची स्कायलाइन. मॅनहॅटन हा खरेतर न्यू यॉर्कच्या पाच परगण्यांपैकी एक परगणा. एक बरो. पण, आपल्यासाठी तोच `न्यू यॉर्क' आहे. आपणच कशाला, सगळय़ा जगाच्या मनःपटलावर न्यू यॉर्क म्हणताच मॅनहॅटनचंच चित्र उमटतं.
मॅनहॅटन हा न्यू यॉर्कचा बिझनेस डिस्ट्रिक्ट. म्हणजे मुंबईच्या परिभाषेत फोर्ट, नरीमन पॉइन्ट आणि गिरगावालगतचे असंख्य बाजार असा परिसर. अर्थातच तो मुंबईची आठवण करून देतो, पण, `न्यू यॉर्क अगदी आपल्या मुंबईसारखेच' असे आनंदून, साभिमान म्हणणे फारतरफार भारतप्रेमाची किंवा मुंबईप्रेमाची साक्ष म्हणून खपून जाईल. वस्तुस्थिती तशी नाही. कारण संपूर्ण अमेरिकेत असते तशी न्यू यॉर्कमध्येही `वस्तुस्थिती' अतिप्रचंड आहे. उदाहरणार्थ, मॅनहॅटनची स्कायलाइन पाहिल्यावर आपल्याला नरीमन पॉइन्टच्या स्कायलाइनची आठवण होते. दोन्हीचे आकारमान एक भासते. प्रत्यक्षात मॅनहॅटनची स्कायलाइन अनेकपटींनी मोठी आहे कारण बहुतेक इमारती 60-70-80 मजली. त्यांची लांबीरुंदीही तशीच भक्कम. त्यापुढे मुंबई फारच `छोटी' म्हणावी लागेल.
न्यू यॉर्क आणि मुंबई यांच्यातला फरक हा फक्त आकारमानापुरता नाही. दोन्ही शहरे `सिटी दॅट नेव्हर स्लीप्स' अशा बिरुदाने ओळखल्या जातात. दोन्ही शहरे अहोरात्र जागी असतात, हे खरेच. पण, दिवसा-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी न्यू यॉर्क टकटकीत जागे असते. माणसे तरतरीत असतात. मुंबईतही दिवसा-रात्रीच्या कोणत्याही प्रहरी माणसे जागी असतात, पण अनेकदा ती अर्धजागृतावस्थेत असतात. म्हणजे, दिवसाच्या कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी डुलक्या काढत असतात. सकाळी कामावर जातानाच पेंगुळलेली असतात. वैतागलेली, चिडचिडलेली असतात. मुंबईच्या `सिटी दॅट नेव्हर स्लीप्स' या वर्णनापुढे `बट ऑल्वेज नॅपिंग' असा जोड द्यावा लागेल. दोष मुंबईच्या माणसांचा नाही, इथल्या जीवनमानाचा, शहराच्या जीवनशैलीचा आहे. त्या दोहोंमध्ये तुलना होऊ शकत नाही. इथले सकाळचे काम कधी सकाळी सुरू होत नाही. संध्याकाळी ठरल्यावेळी संपत नाही. त्यानंतरचा वेळ कुटुंबकबिल्यासाठी द्यायचा, तर घरी पोहोचण्यात दोन तास खर्च होतात. ज्यापुढे नरकयातना सुखकर वाटाव्यात अशा भयंकर रेल्वेप्रवासात जगण्याचा आनंद घेण्याची ऊर्मी चेंबून, कोंदून मरून जाते आणि मांस जडवलेले सापळे जड पावलांनी, पडलेल्या खांद्यांनी घरी परततात. इकडचीच कर्मकथा इतक्या विस्ताराने सांगण्याचे कारण म्हणजे इकडे आपण घडय़ाळाच्या काटय़ावर जीवतोड धावत असतो, तेव्हा तिकडे दिवसाच्या कोणत्याही वेळी जॉगिंग करणारी माणसे दिसतात. आपापले `वर्किंग अवर्स' संपल्यानंतर जो तो आयुष्य आपल्यापरीने एन्जॉय करायला मोकळा आणि एन्जॉय करण्यासारखे भरभरून आयुष्य प्रत्येक रस्त्यावरून आनंदाने उसळत वाहात असते.
फरक फक्त आर्थिक श्रीमंतीमधला नाही, तो सांस्कृतिक श्रीमंतीमधला फरक आहे. एक साधे उदाहरण घ्या. जेथे जागेला सोन्याचा भाव आहे, त्या मॅनहॅटनमध्ये साडे तीन चौरस किलोमीटर पसरलेले हिरवेकंच सेंट्रल पार्क आहे. एकीकडे टोलेजंग हा शब्द सार्थ करणाऱया इमारतींचे जंगल. (एम्पायर स्टेट बिल्डिंगच्या 86व्या मजल्यावरून ह्या अवाढव्य जंगलाचे स्तिमित करणारे दर्शन घडते.) त्या जंगलाच्या मधोमध अगदी सुखनैव वसलेले हे खरेखुरे जंगल. शांत-निवांत, तरीही अनेकानेक उपक्रमांनी गजबजलेले. त्या जंगलातली झाडे तोडून तेथे `विकास' करण्याची कल्पना कोणाच्या मनाला शिवत नाही. अख्ख्याच्या अख्ख्या टेकडय़ाच भूतलावरून आणि सातबाऱयांवरून नष्ट करण्याची कला अवगत झालेले विकासक नामक `भकासक' त्या मातीत निर्माण झालेले दिसत नाहीत. `शहराची फुप्फुसे जगवा हो' अशी हाक देण्याची वेळ तिथे येत नाही.
मुंबई हे आंतरराष्ट्रीय नकाशावरचे शहर आहे. ते आंतरराष्ट्रीय दर्जाचे नाही. तशा सोयी-सुविधा इथे नाहीत. इथले भयंकर किचाट पाहता आणखी शंभर वर्षांत इथे त्या निर्माण होण्याची शक्यता नाही. पण, फरक तेवढाच नाही. मुळात मुंबई हे आंतरराष्ट्रीय सोडा, `राष्ट्रीय' मनोवृत्तीचे तरी शहर आहे का? तसे ते असते, तर राष्ट्रीयत्वाच्या व्यापक कल्पनेला थेट आव्हान देणारी संकुचित प्रादेशिकवादाची चळवळ इथे रुजली आणि फोफावली असती का? त्या चळवळीचे प्रणेते शहराचे राज्यकर्ते असताना हे शहर तथाकथित परक्यांच्या आणि उपऱयांच्या कह्यात चालले आहे हा सर्वात विनोदी भाग आहे. आता या चर्चेचा न्यू यॉर्कशी काय संबंध? तर न्यू यॉर्क ही (फक्त एवढय़ाच अर्थाने) जगाची मुंबई आहे. मुंबईत फक्त भारतभरातून लोक येतात. न्यू यॉर्कमध्ये संपूर्ण जगातून लोक येतात. न्यू यॉर्क शहरामध्ये न्यू यॉर्क राज्याच्या (न्यू यॉर्क या राज्यातलेच न्यू यॉर्क सिटी हे एक शहर आहे) बाहेरून आलेले किती `उपरे' आहेत, याची अधिकृत आकडेवारी मिळत नाही (तिकडे सगळे `अमेरिकन' एक मानले जात असावेत), पण, `युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका' या देशाच्याही बाहेरच ज्यांचा जन्म झाला आहे, अशांची संख्या न्यू यॉर्कमध्ये 36 टक्के एवढी प्रचंड आहे. आंतरराष्ट्रीय `भय्यां'चे (त्यात भारतीयही आले) केवढे हे आक्रमण! न्यू यॉर्कमध्ये हजाराहून अधिक भारतीय रेस्तराँ आहेत, त्याहून अधिक चिनी असतील, जपानी असतील, थाय असतील, काँटिनेंटल तर असतीलच असतील. जगातला एकही असा पदार्थ नसेल, जो न्यू यॉर्कच्या कोणत्या ना कोणत्या कोपऱयात कधी शिजला नसेल. या महानगरात तब्बल 170 भाषा बोलल्या जातात. देशाच्या कानाकोपऱयातून जसे लोक रेल्वेत संडासाकडेच्या जागेत पथारी पसरून मुंबईत येतात, तसे जगाच्या कानाकोपऱयातून वैध-अवैध मार्गांनी कितीतरी स्थलांतरित नशीब काढायला न्यू यॉर्कमध्ये येतात. हे महानगर कायद्याने येणाऱयांच्या उत्कर्षाआड येत नाही, उलट गुणवंतांसाठी इथे आयुष्य उजळून टाकणारी संधी आहे. कारण, अशा `उपऱयां'च्या उत्कर्षातच शहराचा, देशाचा उत्कर्ष दडलेला आहे, याचे भान इथे आहे.
या उदार शहराचा गुण म्हणा की इथल्या पाण्याचा गुण ( इथले पाणी प्यायला मिळणे अवघडच म्हणा, जागोजागी नळ बसवल्यासारखा कोकच प्यावा लागतो. असो.) पण दोन दिवसांच्या टुरिस्ट छाप मुक्कामात स्वातंत्र्यदेवीच्या पुतळय़ापासून ब्रुकलिन ब्रिज, एम्पायर स्टेट बिल्डिंग, रॉकफेलर सेंटर, संयुक्त राष्ट्रांचे कार्यालय, हेल्स किचन, सेंट्रल पार्कचे `दूरदर्शन', वर्ल्ड ट्रेड सेंटरचे थडगे असलेल्या `ग्राऊंड झीरो'ची धावत्या बसमधून हृदयद्रावक सफर आणि `पार्क ऍव्हेन्यू'वर धावत्या बसमधूनच विंडो शॉपिंग असा भयंकर कार्यक्रम अक्षरशः उरकणे सुरू असतानाही हे शहर आपल्या आत भिनत जातं. आपल्याला स्वतःमध्ये विरघळवून टाकतं. इथे कुणी `उपरा' उरत नाही. सकाळी डोळे विस्फारून धडधडत्या छातीने लिंकन टनेल पार करणारे लोक संध्याकाळपर्यंत आजवरचे आयुष्य मॅनहॅटनमध्येच घालवलं असावं, अशा थाटात रस्त्यांवरून बागडू लागतात. आपापल्या ऐपतीनुसार मस्तपैकी शॉपिंग करू लागतात... रात्र होते, गोल गरगरीत फुटबॉलएवढा चंद्र सर्व इमारतींच्या बेचक्यात उगवतो... एका दिवसात आयुष्यभराचे न्यू यॉर्कर बनलेल्या टुरिस्टांची पावले फॉर्टी सेकण्ड स्ट्रीटच्या दिशेने पडू लगतात... तिथे टाइम्स स्क्वेअर नावाची वर्षाचे 365 दिवस सुरू असलेली अख्ख्या जगाची जत्रा भरलेली असते...

No comments:

Post a Comment