Friday, February 11, 2011

ओम भवति रिक्षांदेही!

आपण घाईघाईने घरातून निघालो. वाटेत हात दाखवून रिक्षा थांबवली. रिक्षात बसलो आणि ठरल्या ठिकाणी पोहोचताना मनात विचार आला, ‘‘देव भले करो या रिक्षावाल्याचे.. रिक्षा हे वाहन बनविणा-यांचे आणि तिला परवानगी देणा-यांचे. इथून तिथे जाण्याची केवढी मोठी सोय झाली. तीही इतक्या परवडणा-या दरांत..’’
..समजा असं झालंच तर त्याचा अर्थ काय घ्यायचा?
 अगदीच सोप्पं उत्तर आहे. रिक्षाप्रवासात रिक्षावाल्याविषयी प्रेम, करुणा, ममता किंवा कृतज्ञभाव दाटून आला तर बिनदिक्कत समजायचं की आपण स्वप्नात आहोत!! वास्तवात असं घडलं तर आपल्याला इतर कुणी मेंटल हॉस्पिटलात दाखल करण्याची गरज नाही, आपणच रिक्षावाल्याला रिक्षा तिकडे घ्यायला सांगू.
कारण आपल्याला रिक्षात बसून काय वाट्टेल ते वाटू शकतं, पण रिक्षावाल्याविषयी वरीलपैकी किंवा वरीलव्यतिरिक्त कोणतीही चांगली भावना मनात येण्याची शक्यता नसते.
 बरं, ही भावना एकतर्फी नसते. रिक्षावाल्याचे आपण ग्राहक.. तरी ग्राहक देवो भव, वगैरे गांधीवादी विचार त्याच्या मनात कधीच येत नाहीत. हा माणूस आपल्या रिक्षात बसल्यामुळे आपल्याला पैसे मिळणार आहेत, आपलं पोट चालणार आहे, अशी त्याची भावना नसते. त्याच्याही चेह-यावर आपल्याविषयी तेवढेच तुसडे भाव असतात आणि एकदाचे कुठेतरी उतरून, पैसे टेकवून माझी ही सुंदरशी रिक्षा रिकामी करतील तर बरंअसंच त्याच्या चेह-यावर लिहिलेलं असतं..
खरं तर उभयपक्षी हीच भावना होण्याचं काही कारण नाही..
 
..कारण, रिक्षावाला आणि रिक्षात बसणारा माणूस म्हणजे आपण यांच्यात काही पुरातन खानदानी दुष्मनी वगैरे असण्याची शक्यता फारच कमी असते. आपला पुनर्जन्मावर विश्वास असेल, तर पूर्वजन्मीचं काही वैर असावं, हेच एक स्पष्टीकरण संभवतं.. पण मग ते सगळ्याच रिक्षावाल्यांशी आणि त्यांचं सगळ्याच प्रवाशांशी कसं काय असतं? आपण आणि ते कौरव-पांडव किंवा मुघल-मराठे होतो की काय पूर्वजन्मीचे?
 
नीट विचार केला तर आपल्या लक्षात येईल, आपली सामाजिक व्यवस्था इतकी पद्धतशीरपणे किडलेली आणि सडलेली आहे की प्रत्येक सेवा पुरवठादार (सव्‍‌र्हिस प्रोव्हायडर) किंवा उत्पादक आणि प्रत्येक ग्राहक यांच्यात असाच परस्पर-अविश्वासाचा समान बंध असतो.. विशेषत: सार्वजनिक क्षेत्रात. रद्दीवाला, पिठाची गिरणीवाला, किराणा दुकानदार यांच्यापासून ते घर देणाऱ्या बिल्डपर्यंत कोणत्याही सव्‍‌र्हिस प्रोव्हायडरकडून आपल्याला चोख सेवा किंवा दिलेल्या पैशाची चोख किंमत (व्हॅल्यू फॉर मनी) मिळते आहे, असं आपल्याला वाटतं का? यातला प्रत्येक जण आपल्याला ग्राहककमी आणि गि-हाईकच जास्त मानतो, अशीच आपली भावना होते की नाही?
 गंमत म्हणजे, यातले आपण (पक्षी : गि-हाईक) हे दुस-या कुठल्या तरी क्षेत्रात सेवा पुरवठादार असतो. तिथे आपण तस्सेच वागतो. म्हणजे एकमेकांशी शक्य तेवढय़ा तुसडेपणाने वागणं हाच आपला मूळ धर्म आहे. आपण वाटतो तेवढे सामाजिकनाही, ती मूल्यं आपल्यात रुजलेली नाहीत. ती रुजवण्याचाची जबाबदारी ज्या यंत्रणांवर आणि धुरीणांवर होती त्यांनीच आपल्यामध्ये ही अव्यक्त फाळणी घडवून आणली आहे..कशी?
चला, पुन्हा रिक्षात बसूयात. पुन्हा रिक्षावाल्याकडे पाहूयात. आपल्या परस्परांविषयीच्या नफरतीचा आढावा घेऊयात.
 आपल्याला रिक्षावाल्याचा राग येतो कारण
  •  तो जवळचं भाडं नाकारतो.
  •  तो मीटर फास्ट करतो.
  •  तो शेअर रिक्षामध्ये जास्त भाडं आकारतो.
  •  अडीअडचणीच्या प्रसंगी तो अडवणूक करतो.
  •  तो बेदरकारपणे असुरक्षित पद्धतीने रिक्षा चालवतो.
  •  तुम्ही पुण्यात प्रवास करीत असाल, तर तो हे सगळं करतोच; शिवाय लांबच्या रस्त्याने मुक्कामी नेतो आणि वर अतीव उर्मटपणाही करतो.
आता रिक्षावाल्याला तुमच्याबद्दल नफरत वाटते कारण
  •  तुम्ही त्याच्या रिक्षात बसता आणि ती आपलीच असल्याप्रमाणे त्याच्यावर डाफरता.
  • तुम्हाला लांब कुठे जायचंच नसतं?
  • तुम्ही भाडय़ाच्या पैशांवरून जाम कटकट करता.
  • तुम्ही पुरेसे सुटे पैसे जवळ बाळगत नाही, राऊण्ड फिगरवरही तुमचा विश्वास नसतो.
  •  तुम्ही त्याच्याकडे अकारण रागाने पाहता.
  •  तुम्ही पुण्यात प्रवास करीत असलात, तर वरीलपैकी सगळं करताच आणि वर त्याच्याशी त्याच्याइतक्याच उर्मटपणाने बोलता.
यातला गंमतीचा आणि फुटकळ भाग वजा केला, तर उरणारा मुख्य गाभा काय तर आपल्याला योग्य भाडं आकारलं जात नाही आणि हवी तशी सेवा मिळत नाही, ही आपली तक्रार आणि रात्रंदिवस काम करूनही आपल्याला म्हणावं तसं उत्पन्न मिळत नाही, ही रिक्षावाल्याची तक्रार.
 
रिक्षावाल्याचे सगळे दोष मान्य करूनही आपण असं म्हणू शकत नाही की आपल्याला लुबाडून रिक्षावाला गबर होतोय. आजवर एकाही बंगल्यावर रिक्षाकृपाकिंवा ऑटोची पुण्याईअसं नाव वाचलेलं नाही आणि डय़ुटी संपल्यावर रिक्षावाला आपल्या मालकीच्या दुचाकीला टांग मारून किंवा चारचाकीत बसून गेल्याचंही कुणी पाहिलेलं नाही. अनेक रिक्षावाले या वर्णनाच्याही अनेक पटींमध्ये आश्चर्यकारकरित्या श्रीमंत झाल्याचं दृश्य फक्त ठाणेकरांनी पाहिलेलं आहे.. तेही ते सगळे रिक्षा चालवणं सोडून शहर चालवण्याच्या धंद्यात म्हणजे राजकारणात उतरले त्यानंतर.
 
रिक्षावाल्याच्या दैनंदिन उत्पन्नाचा अंदाज घेतला, तर त्यानं दर भाडय़ामागे पाच दहा रुपयांचाही फांदा मारला, तरी तो गडगंज श्रीमंत होण्याची शक्यता नसते.
शिवाय, यातले सगळे पैसे त्याच्या हातात राहतात, असंही नाही.
 त्यात अनेक वाटेकरी असतात.. रिक्षामालक, पोलिस, वाहतूक पोलिस, युनियनवाले, निरनिराळ्या पक्षांचे नेते, गुंड, गुंड नेते, वाटमारी करणारे अन्य सरकारी पेंढारी. या रिक्षा चालवणे आणि रिक्षात बसणे, यापैकी कोणत्याही गोष्टीशी संबंध नसलेल्या या सगळ्या अनुत्पादक मंडळींचा भार रिक्षावाल्याच्या मार्फत आपल्या खिशांवर पडतो आणि आपण रिक्षावाल्यावर- तोच समोर दिसत असल्याने कातावतो.. कारण, कायदेशीर वाटमारी करताना पेटवला गेलेला हवालदार आपल्याला दिसतो. पण, ‘मालदारपोस्टिंगसाठी त्याला नेमून दिलेला दैनिक वसुलीचा आकडा आपल्याला दिसत नाही.. ही साखळी पुढे स्थानिक पुढाऱ्यांपासून बडय़ा अधिकाऱ्यांपर्यंत जाऊन पोहोचते.
लक्षात घ्या, वर उल्लेखलेल्या सगळ्या यंत्रणांचं कर्तव्य- म्हणजे त्यांच्या पगाराचं काम काय आहे, तर शहराची, गावाची वाहतुकीची गरज नेमकी किती आहे, कशा प्रकारची आहे, इथे सार्वजनिक वाहतुकीचे कोणकोणते पर्याय चालतील, कोणता सर्वात जास्त आवश्यक आहे, याचा आढावा घेणं. तशी कायदेशीर वाहतूक व्यवस्था आखणं. त्यांचे नियम ठरवणं. त्यांचं पालन करवून घेणं. ग्राहकांना योग्य सुविधा मिळते आहे, हे डोळ्यात तेल घालून पाहणं. हे सगळे काय करतात, तर नियम पाळताच येणार नाहीत अशी व्यवस्था करतात आणि ते तोडण्याची मुभा देण्याचा मोबदला वसूल करत फिरतात..
 
..आपल्याला रिक्षावाला जेव्हा लुबाडतअसतो, तेव्हा तो या सर्व मंडळींकडून तेवढय़ाच प्रमाणात लुबाडला जात असतो, म्हणजे तो या सर्वाच्या वतीने आपल्याला लुबाडत असतो, म्हणजे आपल्याला तेच लुबाडत असतात.. रिक्षावाला हे फक्त एक साधन. विचार केलात, तर हे कमीअधिक फरकानं सगळ्याच सेवा-उत्पादनांच्या बाबतीत खरं आहे, हे लक्षात येईल आणि आपल्याला लुबाडणारे नेमके कोण आहेत, हेही समजेल..
 
..अर्थातच आपण त्यांना कधीही काहीही करू शकणार नाही.. आपण फक्त रिक्षावाल्यावर डाफरू शकतो.. तेच आपण करत राहू..
 .. त्यामुळेच, यापुढेही आपण घाईघाईने घरातून निघालो, वाटेत हात दाखवून रिक्षा थांबवली, रिक्षात बसलो आणि ठरल्या ठिकाणी पोहोचताना रिक्षावाल्याविषयी मनात सद्भावना दाटून आली, असं होणं अशक्यच.. पण, निदान- वुई आर सेलिंग इन द सेम बोटच्या चालीवर- तो आणि आपण एकाच रिक्षाचे प्रवासी आहोत, याचं भान ठेवलं तरी पुष्कळ!

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(21/11/10)

No comments:

Post a Comment