Sunday, February 13, 2011

अबाबाबा वॉशिंग्टन


मंडळी अंमळ वैतागलेलीच आहेत...
सगळे हार्डकोअर पर्यटक... अमेरिका पाहून चकित व्हायला आणि जमेल तेवढी मौजमजा करायला आलेले... त्यात एकदम अमेरिकेच्या स्थापनेचा इतिहास, यादवी युद्ध, अमेरिकेची राजकीय धोरणे वगैरे भानगडी जरा पचायला जड. पण, कॅरोलायना तरी काय करणार? स्थळ वॉशिंग्टन डीसी आहे आणि ती पर्यटकांसाठीच्या टूरची गाइड आहे... आपल्या विषयाचा चौफेर अभ्यास असलेली टुणटुणीत, तुडतुडीत लालगोरी म्हातारी. भारतीय पर्यटकांसोबत जायचंय म्हणून ती कृष्णराधेची चित्रे असलेली छान छत्री घेऊन आली आहे. ती तिच्या डोक्यावर धरण्याची जबाबदारी ग्रूपमधील एकाने आनंदाने स्वीकारली आहे (कारण हिच्या हातात मेगाफोन आणि त्याचा स्पीकर). मग, `व्हेअर इज माय छॅट्रपटी (म्हणजे `छत्रपती')?' असे विचारून ती कडक उन्हात एका ठिकाणाहून दुसऱया ठिकाणाकडे वेगाने निघते... तिच्या मागून `ऑल मराठीज्'ची फौज.
अमेरिकेला जाण्याआधी अनेकजण `स्थळे' सुचवतात. तुमच्या यादीत वॉशिंग्टन डीसी आहे म्हटलं की नाक मुरडतात. ``डीसी? डीसीमध्ये काय आहे पाहायला. इट्स ड्राय सिटी,'' असं वॉशिंग्टनची (आपल्याप्रमाणेच) अर्ध्या दिवसाची टूर केलेले तज्ञ सांगतात. आपण ते ऐकायचं आणि वॉशिंग्टनला जायचं. जगातल्या सगळय़ात शक्तिमान देशाची सगळी राजकीय सूत्रं जिथून हलतात, जिथे जगातील सर्वात सामर्थ्यवान राष्ट्राध्यक्ष निवास करतात, ते शहर पाहायला नको!
वॉशिंग्टनमध्ये खास चटपटीत पर्यटकी मनोरंजन करणारं काही फारसं नाही. `नासा'ची याने, नाना प्रकारची विमाने आणि स्कायलॅब वगैरे मांडलेलं अतिप्रचंड `स्मिथ्सोनियन एअरोस्पेस' आहे. फोटो-व्हिडिओ काढणे, चार-पाच मजली भव्य दालनात मांडलेली याने-विमाने पाहून `अबाबाबाबा!' म्हणणे, विमानाच्या कॉकपिटच्या किंवा सूर्यमालेच्या सत्याभासी (सिम्युलेटेड) राइडवर जाणे आणि मग यानाच्या आकाराचे पेन, की-चेन वगैरे सुवेनियर खरेदी करणे हे सगळे पर्यटकी उद्योग तिथे पार पाडता येतात. (कॅरोलायना सांगते की याच परिसरात वेगवेगळय़ा विषयांना वाहिलेली 18 स्मिथ्सोनियन म्युझियम्स आहेत. पण, त्यातली बहुतेक गंभीर विषयांवरची. त्यामुळे टुरिस्ट फक्त इथेच येतात. अभ्यासू तिकडे जातात. `अभ्यासू टुरिस्टां'ची झाली का पंचाईत!) नंतरची कॅपिटल हिल, व्हाइट हाऊस, लिंकन मेमोरियल, व्हिएतनाम मेमोरियल वगैरे फेरी मात्र इतिहासात, राज्यशास्त्रात गम्य नसलेल्यासाठी `मी चक्क इथे आलोय' या आत्मसंतुष्ट खुशीचा भाग संपला की बोअरिंग होऊ शकते.
कॅपिटल हिल हे अमेरिकेच्या काँग्रेसचे स्थान. सत्तेचे केंद्र. तिथल्या शुभ्र धवल भव्य इमारती, समोरचे विस्तीर्ण नॅशनल मॉल हे मैदान, राजधानीतून कोठूनही दिसणारा वॉशिंग्टन मॉन्युमेंटचा आकाशात घुसलेला सुळका आणि आसपासच्या इमारती हा सगळा भाग आपल्या राजधानीची, नवी दिल्लीची आठवण करून देणारा. आपली रायसीना हिल, राष्ट्रपती भवन, संसद भवन, राजपथ हा सगळा परिसर आठवून पाहा. त्याला मनातल्या मनात 10 ने गुणा. तेवढा या परिसराचा आकार आहे. अंगावर येणाऱया या भव्यतेत दाटून राहिलेला तसाच अलिप्त कोरडेपणाही. इथल्या बागांमध्ये आपल्या राजधानीतल्याप्रमाणे लंचटाइममध्ये लवंडलेले बाबूलोक दिसत नाहीत, एवढाच काय तो फरक.
तसा आणखीही एक फरक दिसतो. तो आधी जाणवतही नाही. जेव्हा जाणवतो, तेव्हा थरारून जायला होतं. जगातल्या घातक दहशतवाद्यांच्या हिट लिस्टवर असलेला हा देश. त्यातला हा परिसर तर सर्वाधिक संवेदनक्षम. 9/11च्या हल्ल्यात पेनसिल्वेनियातील शेतात कोसळलेले विमान या दिशेने, कॅपिटल हिल उद्ध्वस्त करायला निघालेले होते. तरीही कॅपिटल हिलवर मनसोक्त बागडता येते. व्हाइट हाऊसच्या दारात उभे राहून फोटो काढता येतात. व्हाइट हाऊसच्या समोर तंबू ठोकून लोक कसकसल्या विषयांवर निदर्शने, उपोषणे करीत असतात. व्हाइट हाऊसमध्ये धाकटे जॉर्ज बुश महोदय राहात असताना `बुशला जोडे हाणा' आंदोलन व्हाइट हाऊसच्या दारातच झाले होते. येणारा जाणारा कोणीही बुश यांच्या प्रतिमेला जोडा हाणून जात होता. कॅपिटल हिलवर, व्हाइट हाऊसला कडेकोट सुरक्षा व्यवस्था असणारच. पण तिचा बाऊ करण्याची, ती पर्यटकांच्या, नागरिकांच्या चलनवलनाआड, आनंदाआड येण्याची व्यवस्था त्याहून ग्रेट.
वॉशिंग्टनमध्ये (कोणत्याही राजधानीत असतात त्याप्रमाणे) जागोजाग अश्वारूढ वीरांचे आणि नेत्यांचे पुतळे दिसतात. कॅरोलायना काहींची माहिती सांगते. नंतर म्हणते, `इथल्या प्रत्येक पुतळय़ाची माहिती मला नाही. तशी मला आणि तुम्हाला गरजही नाही. पुतळा दिसला की त्याने यादवी युद्धात काहीतरी महान कामगिरी बजावलेली आहे, एवढे लक्षात ठेवा. बाकी तपशीलाची आता गरज काय आणि प्रयोजन काय?' वर्तमानकाळातच जगणे या लोकांनी जरा जास्तच अंगी बाणवलेले आहे. सामान्य अमेरिकन नागरिकांना जेवढा पुतळय़ांचा कंटाळा तेवढाच स्मारकबाजीचा वीट आहे.  

लिंकन मेमोरियलसारखे आजच्या अमेरिकनांच्याही मनात सन्मानाचे स्थान असलेले स्मारक एखाददुसरे. अब्राहम लिंकन हे आजवरच्या सर्व राष्ट्राध्यक्षांमधले सर्वात लोकप्रिय अध्यक्ष आहेत, हे एक कारण. दुसरं कारण म्हणजे याच स्मारकाच्या पायरीवर उभे राहून मार्टिन ल्यूथर किंग ज्यु. यांनी `आय हॅव ड्रीम' हे जगप्रसिद्ध भाषण केलं होतं. कृष्णवर्णीयांच्या हक्कांच्या लढय़ाचा महत्त्वाचा टप्पा त्या वेळी सुरू झाला होता. `आय हॅव ड्रीम' असे लिहिलेली ती पायरी मनात थरार उमटवते. पण, हा झाला अपवाद. आज तिकडे अमुक गोष्टीचं स्मारक झालेच पाहिजे असा हट्टाग्रह करणाऱया गटांचं पेव फुटलंय. सरकारही त्यातल्या सोयीस्कर गटांच्या हट्टापुढे मान तुकवत जाते.
व्हिएतनाम वॉर मेमोरियलसमोरच या स्मारकबाजीचा उहापोह होतो. या युद्धावर पाठवण्यात आलेल्या कोवळय़ा अमेरिकन सैनिकांची अंगावर शहारे आणणारी कहाणी कॅरोलायना त्या मेमोरियलसमोरच सांगते. व्हिएतनाममध्ये अनपेक्षितपणे झुंजावे लागल्यानंतर आणि हार पत्करावी लागल्यानंतर जे सैनिक परतले, ते सार्वत्रिक कुचेष्टेचा विषय बनले. नंतर या सैनिकांचे शौर्य आणि त्यांना पाठवणाऱया पुढाऱयांचा अदूरदर्शी साहसवाद जेव्हा उघड झाला, तेव्हा अमेरिकेत या सैनिकांच्या प्रेमाचा उमाळा आला. त्यातून हे निव्वळ नावे लिहिलेल्या भिंतीचे स्मारक उभे राहिले. पाठोपाठ कोरियात युद्ध लढलेल्या सैनिकांनाही त्यांचे स्मारक हवेसे झाले. मग ते उभारले गेले. `आम्ही रोज नवनवीन स्मारकांच्या गोष्टी ऐकतो. आज काय इथे अमकं स्मारक उभं राहणार, उद्या तिथे स्मारक उभं राहणार? एवढय़ा स्मारकांची गरज काय? जे स्मारकाविना लक्षात राहतात, ते खरे मोठे लोक ना?'
`पण, तुम्ही जेवढा जागतिक पोलिसगिरी कराल, दादागिरी कराल, नको त्या देशांच्या भानगडींमध्ये लक्ष घालाल, तेवढे त्यात फटके खाल, तेवढे आपले सैनिक गमावाल आणि तेवढी स्मारके उभी राहतील. कशाला करता सगळय़ा जगात ढवळाढवळ? तुम्हाला कुणी ठेका दिलाय का?' समोर साक्षात बराक ओबामाच उभे असावेत, अशा थाटात आपला भारतीय बाण्याचा प्रश्न जातो. अमेरिकेच्या उद्दामपणाला वेसण घालण्याची जबाबदारी कुणीतरी पार पाडायला नको का?
कॅरोलायना विचारात पडते (जिंकलो आपण), भुवई खाजवते आणि उत्तरते, `बरोबर आहे तू म्हणतोस ते. मलाही तसंच वाटतं. आम्हा सर्व अमेरिकनांना असंच वाटतं. निदान यापुढच्या कोणत्याही युद्धात मी माझा मुलगा पाठवणार नाही, हे नक्की. पण मग मला एका गोष्टीचं उत्तर दे. कालच तिकडे व्हाइट हाऊसच्या दारात तुमच्या त्या श्रीलंकेतले तामिळ लोक गोळा होऊन ओरडत होते, `ओबामा, ओबामा, आम्हाला न्याय द्या ओबामा. आमच्यावरचा अत्याचार थांबवा ओबामा!' मला सांग, अशावेळी आम्ही काय करायचं? आम्ही शांत बसलो तर म्हणणार अनास्था. लक्ष घातलं तर म्हणणार ढवळाढवळ. व्हॉट शुड वुई डू?'
आपण निरुत्तर.

No comments:

Post a Comment