Friday, February 11, 2011

आमच्या खड्डयाच्या 'बड्डे'ला यायचं हं!

माणसांचे असोत की खड्ड्यांचे..
दिवस कसे भराभर जातात किनई!

हा हा म्हणता दोन वर्ष कशी उलटून गेली कळलंच नाही. आमचा छोटुकला खड्डा आता चांगला दोन वर्षाचा झालाय, यावर विश्वासच बसत नाही.
त्याचा जन्म म्हणजे अगदी कालपरवाचीच गोष्ट वाटते..

..कितीतरी वर्ष आमच्या रस्त्याच्या मनात एकच खंत होती. एवढी वर्ष झाली, तरी आपल्याला एकही खड्डा नाही. बाकीच्या रस्त्यांना एक-दोन वर्षात चांगले गोल गरगरीत खड्डे पडले. काही रस्त्यांच्या नशिबात ते सुख नव्हतं, पण त्यांना निदान काही दिवसांत चांगल्या लांबरूंद भेगा तरी पडल्या.

आमचा रस्ता मात्र कमनशिबी.. डांबरीकरण होऊन बारा वर्ष होऊन गेली तरी तस्साच्या तस्सा.. गुळगुळीत!

त्याला येऊन मिळणारे इतर रस्ते टोमणे मारायचे. फुटकळ गल्ल्यासुद्धा त्याला आधी आडून आणि नंतर नंतर सरळ तोंडावर नावं ठेवू लागल्या.

 डांबरीकरणाला इतकी वर्ष झाली याच्या, तरी अजून एकही खड्डा नाही.. वांझोटा कुठचा!

 अंगावरून जाणारे मोठे ट्रक मोठमोठ्याने घरघराटी हसून चिडवायचे.. रिक्षा खी खी करून हसायच्या, मोटरसायकलींची तरफटफटीच चालायची या रस्त्यावर आणि सायकली घंटी वाजवत खिदळायच्या.

 अगं हा रस्ता आहे की रस्ती? असा कसा पावडर लावल्यासारखा गुळगुळीत! शॉक अ‍ॅब्जॉर्बरला झटका देत नाही तो रस्ता कसला? एखादी शेंबडी मोटार खिडकीतून आपल्या मताची पिंक टाकायची आणि रस्ता शरमेनं लालेलाल व्हायचा.

एक नाही, दोन नाही, बारा र्वष झाली, तेव्हा सगळं गाव बोलू लागलं.

 रस्त्यांच्या कुळावर बट्टा आहे हा रस्ता?

 कोणत्या मुहूर्तावर बांधलाय हेच कळत नाही!

 ‘‘इतर गावांमध्ये तोंड दाखवायला जागा उरली नाही आपल्याला. कुठेही गेलं की लोक विचारतात, तुम्ही त्या गुळगुळीत रस्तावाल्या गावाचे ना.

‘‘आयाबायासुद्धा आपल्याकडे बघून पदरात तोंड खुपसून फिदीफिदी हसतात.’’

‘‘कोण होता तरी कोण तो कंत्राटदार? शोधा त्याला.’’

असला बिनखड्ड्यांचा, गुळगुळीत रस्ता बांधणा-या त्या कंत्राटदाराला शोधून गावच्या गणंगांनी त्याच्या तोंडाला काळं फासलं. त्याला गाढवावर उलटा बसवून, ळ्यात चपलांच्या माळा अडकवून त्याच गुळगुळीत रस्त्यावरून कंत्राटदाराची धिंड काढण्यात आली. त्याला ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात आलं. तो देशोधडीलाच लागला.

आपल्यावरून एवढा तमाशा झाला म्हणजे आता गाव आपल्यावर बहिष्कारच टाकणार अशी भीती रस्त्याला वाटू लागली आणि झालंही तसंच. गावातला मुख्य रस्ता असूनही काळं कुत्रंही तिकडे फिरकेना. रस्ता बिचारा झुरू लागला.

आणि अशात एकदा धुवांधार पाऊस कोसळला. चार दिवस अशी संततधार धरली पावसानं की सगळं गाव पाण्याखाली गेलं. चार दिवसांनी पाणी ओसरलं, रस्ताही ओलेतं अंग कसंबसं झाकत पाण्याबाहेर आला आणि त्याला पाहून एका हवालदारानं शिट्टीच मारली..

 खड्डा.. तो बघा खड्डा!

 ‘‘खड्डा’’ म्हणताच अख्खं गाव गोळा झालं. रस्त्यावर एका ठिकाणी अगदी मध्यभागीच छोटासा टवका उडाला होता. त्या सगळ्या गुळगुळीत आरशासारख्या रस्त्यावर तो टवका इतका सुंदर दिसत होता.

‘‘मुख्य रस्त्याला खड्डा पडला’’ असं समजताच सगळय़ा गावाची वाहतूक त्या रस्त्यावरून सुरू झाली. त्याला भेटणारे सगळे रस्ते आता त्याच्याविषयी आदरानं बोलू लागले. सगळय़ा गल्ल्या काळजीने बोलू लागल्या. खड्डा कसा जपायचा, याचे सल्ले देऊ लागल्या. गाडय़ांची वाहतूक सुरू झाली, तसा खड्डाही वाढू लागला. पण, वाढीचा वेग म्हणावा तेवढा दिसत नव्हता.

शेवटी महानगरपालिकेनं मोठ्या शहरातून खड्डे स्पेशालिस्ट कंत्राटदाराला बोलावलं. त्याने वेगवेगळी यंत्र आणून नाना टेस्ट केल्या. अखेरीस दु:खाने मान हलवून ते म्हणाले, ‘‘अहो, याला काही खायला प्यायला नाही घातलं, तर हा खड्डा कसा टिकेल. लवकरच भरून निघेल तो. चांगला कंत्राटदार पाहा. दरसाल खड्डा भरण्याचं कंत्राट त्याला द्या. तो जसजसा खड्डा भरत जाईल, तसतसा खड्डा मोठा होत जाईल.’’

ते कंत्राट त्याच डॉक्टरला मिळालं आणि त्याने आपला शब्द पाळला. दर महिना दोन महिन्यातून तो खड्डा भरण्याचे सगळे सोपस्कार करायचा आणि दोन दिवसांत पुन्हा खड्डा दिसू लागायचा. आधीपेक्षा मोठा व्हायचा. त्याच्या औषधांचा एवढा गुण आला की पहिल्या खड्डय़ाशेजारी छोटुकले छोटुकले आणखी काही खड्डे पडले. तेही हळूहळू मोठे होऊ लागले.

आता तर दर वीकेण्डला संध्याकाळी रस्त्यावर मोठी गर्दी जमते. लोक मुलांना उंटाची आणि घोड्यांची स्वारी करण्यासाठी या रस्त्यावर घेऊन येतात. ज्यांना उंटाची स्वारी केल्याचा आनंद घ्यायचाय, ते मुलांना गाडीवर मागे बसवून या खडय़ांमधून हळुवारपणे ती चालवतात. ज्यांना घोडेस्वारीचा आनंद घ्यायचाय ते मुलांना गाडीवर मागे बसवून जोरात घेऊन जातात खड्डय़ातून.

खड्डय़ाच्या एका कोप-यात एक हाडवैद्य बसतात. हाडं निखळलेल्या माणसाला ते एका बाबागाडीत बसवून रस्त्यावरून जोरात घेऊन जातात. खड्डे पार होईपर्यंत सगळी हाडं सांध्यांमध्ये फिट होतात.

ज्या खड्डय़ामुळे आमच्या रस्त्याला रस्तेपण आलं, त्याला आता दोन र्वष पूर्ण होतील..

आमचा खड्डा आता चांगलाच मोठा झाला आहे..

त्याची वाढ खूपच छान आहे..

परवाच त्यात एक अख्खी स्कूटर पडली होती..

काही दिवसांनी बसही पडू शकेल..

हळूहळू आमचा गाव खड्ड्यात गडप होईल..

मग राज्य.. मग देश..

..आमच्या या खड्डय़ाला दीर्घायुरारोग्य चिंतण्यासाठी येताय ना!

आम्ही (त्यातच) वाट पाहतोय!     


(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(5/9/10)

No comments:

Post a Comment