Tuesday, February 15, 2011

प्रेम

'टिंग्या' सिनेमा फार जोरात चालला होता म्हणे...
साहजिक आहे... माणूस आणि जनावर यांच्यातल्या प्रेमाची हृद्य कहाणी आहे ती... चितंग्या नावाचा बैल आजारी पडल्याने जेव्हा कसायाला विकण्याची पाळी येते, तेव्हा त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारा टिंग्या आपल्या आईबापांना शोकसंतप्त सवाल करतो, ''शेजारची म्हातारी आजारी पडलीये, तर तिला पाहायला डॉक्टर येतो, तिच्यावर औषधोपचार केले जातात. तिला का नाही कापायला पाठवत? आणि चितंग्या जर घरच्यासारखा असेल, तर त्याच्यावर का नाही औषधोपचार करत?''
त्या सवालाने प्रेक्षक हादरून जातात. अंतर्मुख वगैरे होतात. एका मुक्या प्राण्यावर इतकं प्रेम करणाऱ्या मनुष्यजातीत आपण जन्माला आलो आहोत, याबद्दल धन्यता वाटते...
...पण, नंतर मनात प्रश् येतो की अशी कहाणी बैल आणि मुलगा यांची असते किंवा मांजर आणि मुलगा किंवा कुत्रा आणि मुलगा यांची... म्हणजे असं की मनुष्यजात ज्या प्राण्याला आपल्या कामांसाठी किंवा वापरासाठी जिवंत ठेवते, असा प्राणी आणि माणूस यांचीच 'प्रेम'कहाणी असते. ज्याला कापायचाच असतो, तो बोकड आणि मुलगा किंवा कोंबडा आणि मुलगा यांच्यातली हळवी प्रेमकहाणी वाचलीयेत तुम्ही कधी?
काही समाजांमध्ये बैलही 'खाद्य' आहे, तर काहींमध्ये डुकराचं मांस खातात. त्या त्या संस्कृतींमध्ये मुलांना त्या त्या प्राण्यांचा लळा लागल्याच्या गोष्टी असतात? ईशान्येकडच्या अनेक राज्यांमध्ये कुत्राही मारून खातात. तिथे कुत्र्याच्या इमानीपणापेक्षा चविष्टपणाचीच चर्चा अधिक होत असेल ना? कोळयाच्या मुलाला एखाद्या पापलेटाचा लळा लागल्याचं ऐकलंयत कधी?
घोडा घास से दोस्ती करेगा तो खाएगा क्या?
टिंग्याच्या वयाची मुलं घरचा कोंबडा मारला जाताना निर्विकारपणे पाहतात. गरम पाण्यात टाकून त्याची पिसं काढायला मदत करतात. कोंबडयाचं आरडणं, रक्ताच्या चिळकांडया वगैरेंची भीती किंवा किळस वाटत असेल कुणाला. पण 'इतके दिवस आपल्या घरात वाढला तो कोंबडा कापायचा कसा?' असा हळवा प्रश् काही त्यांना पडत नाही. तो मारला जाण्यासाठीच आहे, हे किती सहजगत्या भिनतं किती लहानपणी.
जिवंतपणी उपयुक्त प्राण्यापक्ष्यांसारख्याच आंब्याच्या, वडाच्या, पिंपळासारख्या झाडांच्याही गहिऱ्या आठवणी सांगतात लोक. गदगदून पुस्तकंच्या पुस्तकं लिहितात त्यांवर. कधी मुळापासून उपटायच्या मेथीच्या, कोथिंबिरीच्या प्रेमात पडलेला पाहिलाय कुणी. 'नका उपटू माझ्या लाडक्या भुईमुगाचं रोप' किंवा 'माझ्या लाडक्या उसाच्या दांडक्याला नका लोटू चरकात', असा गळा कुणी काढत नाही.
उपयुक्ततेनुसार प्रेम करायला किती लहानपणापासून शिकवतो आपण मुलांना...
...मग ती आईबाप म्हातारे झाल्यावर त्यांना वृध्दाश्रमात तरी ठेवतात, हीही त्यांची 'माणुसकी'च मानायला हवी ना!(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment