Wednesday, February 23, 2011

आबाभट्ट, बांधा पट्ट!


('चांदोबा' हे बालसाहित्याला वाहिलेले मासिक 60 वर्षांचे होत आहे. त्यानिमित्ताने 'चांदोबा'च्या अप्रकाशित अंकातली एक कथा.)
वेताळ म्हणाला, विक्रमा, राणा नारायणाप्रमाणे तू तुझा हट्ट काही सोडत नाहीस आणि मी हायकमांड असल्यासारखा माझा पाठलाग थांबवत नाहीस. आता प्रभाताईंप्रमाणे मला खांद्यावर घेऊन निघालाच आहेस, तर आता तुला एक गोष्ट सांगतो. गोष्टीच्या अखेरीस मी विचारलेल्या प्रश्ाचे योग्य उत्तर दिलेस, तर मी उडून जाईन. उत्तर चुकले, तर तुझ्या डोक्याची शंभर शकले होऊन तुझ्याच पायावर कोसळतील.
गोष्ट अशी... मरहट्टदेशाचा सरसेनापती आबाभट्ट मोठा प्रामाणिक, करारी आणि कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून ओळखला जात असे. एके दिवशी एका बैठकीत एका वरिष्ठ सुरक्षारक्षकाने थेट आबाभट्टालाच सवाल केला, ''या राज्याचे आपण उपस्वामी. विलासदत्तानंतर आपला अधिकार. प्रजा आपला आदर्श ठेवते. त्यामुळे आपण जबाबदारीने वर्तन करायला नको का?''
आबाभट्ट चक्रावला. त्याने सुरक्षारक्षकाला खुलासा करायला सांगितला. तो म्हणाला, ''महाराज, आपण स्वयंचलित वाहनातून प्रवास करताना चालकाशेजारी बसता. आपल्या सुरक्षिततेसाठी वाहनात पट्ट लावण्यात आला आहे. आपण तो कधीच बांधत नाही. मग आम्ही प्रजेला कोणत्या तोंडाने सांगणार की पट्ट बांधा?''
मंत्रीअधिकारीगण थरारले. एका कनिष्ठ अधिकाऱ्याची ही हिंमत. या उन्मत्त अधिकाऱ्याला काय शिक्षा फर्मावली जाते, हे ऐकण्यासाठी सर्वांचे कान आतुरले होते. पण, तसे झाले नाही. आबाभट्टाने हे वक्तव्य शांतपणे ऐकून घेतले आणि तो म्हणाला, ''वाहवा, बैजलभट्टा! तू माझे डोळे उघडलेस. उद्यापासून मी पट्ट बांधल्याविना कधीच प्रवास करणार नाही.''
त्या दिवसापासून आबाभट्ट रोज पट्ट बांधूनच प्रवास करू लागला.
विक्रमा, मला सांग, आबाभट्ट हा प्रथमपासून कर्तव्यदक्ष म्हणून प्रसिध्द होता. देशाचा उपस्वामी होता. त्याला वाहनात पट्ट बांधण्याचा साधा नियम माहिती नसेल, असे संभवत नाही. तरीही तो पट्ट बांधत नव्हता, याचे कारण काय असेल?
आपण राज्याचे उपस्वामी असल्याचा गर्व त्याला चढला होता की स्वामी विलासदत्ताबरोबर राज्यकारभार हाकताना त्याची सर्वांगी पट्ट बांधल्यासारखी स्थिती झाली होती. त्याने हा पट्ट नकोसा झाला असेल.
विक्रम उत्तरला, ''वेताळा, यापैकी कोणतेही कारण खरे नाही, हे तुला ठाऊक आहे. आबाभट्टाला जिथे तिथे तोंडाचा पट्ट सोडण्याची सवय होती. वाहनातला पट्ट तोंडावरून बांधला जाईल, अशा भयाने तो पट्ट बांधत नव्हता.''
वेताळ गडगडाटी हसून अदृश्य झाला.


(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment