Sunday, February 13, 2011

अमेरिका नावाचे प्रकरण...


अमेरिका नावाचे प्रकरण भारतातच सुरू होते... अमेरिकन कॉन्सुलेटच्या दाराबाहेर लागलेल्या मैलभर लांबीच्या रांगेत.
अमेरिकेचा व्हिसा मिळवण्याची उस्तवार ज्याने केली असेल, त्यालाच हे कळेल. अमेरिकेला जाण्यापेक्षा चंद्रावर जाणे सोपे. ज्याला अमेरिकेचा व्हिसा मिळाला, त्याला काय मुंबईत पहिल्या मीटरच्या अंतरासाठी रिक्षा-टॅक्सीही मिळेल. हा व्हिसा अमेरिकेचा, पण, तो मिळतो अगदी `भारतीय' पद्धतीने. म्हणजे, आपल्या पुराणकथांमध्ये एखाद्याला देव का प्रसन्न होतो, याची जशी तार्किक कारणमीमांसा करता येत नाही, त्याप्रमाणेच कोणाला अमेरिकन व्हिसा का मिळाला, याचीही करता येत नाही. ज्याला व्हिसा मिळाला, त्याला तो का मिळाला, हे समजत नाही.  ज्याला नाकारला गेला, त्याचा नेमका अपराध काय, हे उमजत नाही. आले (वकिलातीत काचेपल्याड बसलेल्या) `व्हिसाजी'च्या मना, तेथे कोणाचे चालेना. अमेरिकेचा व्हिसा मिळणे हे पूर्वजन्मीच्या पाप-पुण्यावरच आधारलेले असते, असे मानायला वाव आहे. त्यामुळेच की काय, वकिलातीचे कर्मचारीही स्वर्गाच्या प्रवेशद्वारावरील द्वारपाल असल्यासारखे वावरतात आणि आपण अमेरिकेचे कर्मचारी नव्हे, तर अमेरिकेचे नागरिकच असल्यासारखे वागतात. अर्थात, त्यात त्यांचाही फार काही दोष नाही म्हणा. बाहेर ताठ मानेने, छाती पुढे काढून चालणारे, अरेरावीने वागणारे, सदैव नियम मोडण्यात, वेळा न पाळण्यात धन्यता मानणारे लोक अमेरिकेचा व्हिसा मिळवण्यासाठी कसे गोगलगायीसारखे बुळबुळीत होऊन जातात, कशी लोटांगणे घालतात, हे पाहिले की अमेरिकेचे `सामर्थ्य' तिथे जाण्याआधीच समजू लागते. पूर्वपुण्याईने व्हिसाकृपा झालीच आणि अमेरिकेत पाऊल पडलेच, तर मग पुढच्या प्रवासात या सामर्थ्याच्या खुणा जागोजाग दिसत राहतात.
अमेरिका नजरेत मावणार नाही, अशी अवाढव्य, अतिभव्य आहे. भलेमोठे रस्ते. अगणित लेन्समधून शिस्तीने चाललेली वाहतूक. सर्वत्र चकाचक स्वच्छता. टॉयलेटमध्ये हात धरला की गरम-गार पाण्याची धार आपोआप सोडणारे नळ. जागोजागी हात पुसायला पेपर नॅपकिन्सची चंगळ. हे सगळे वर्णन अमेरिकेविषयीच्या लेखांमधून, प्रवासवर्णनांमधून आणि पुस्तकांमधून वाचून पाठ असते आपल्याला. पण, तरीही अमेरिकेत पहिले पाऊल पडल्यावर हे सगळे प्रत्यक्षात दिसते, अंगावर येते आणि भारून टाकते. त्या गारुडातून सुटका होणे कठीण. माणूस भानावर येतो ते एतद्देशात परतल्यानंतर पावसात डबके झालेल्या रस्त्यात पाऊल पडून अंगावर चिखल उडतो, तेव्हा. आपण असे काय पाप केले होते की दरसाल दुरुस्ती करूनही ज्यांच्यावर खड्डे पडणे चुकत नाही, अशा रस्त्यांच्या आणि ते बांधणाऱया नादान ओरबाडखाऊंच्या देशात जन्माला आलो, ही भावना शरमेने मन काळेठिक्कर करून जाते. मग, सदासर्वदा `हेमामालिनीच्या गालांपेक्षाही' गुळगुळीत रस्त्यांवर फिरणाऱया अमेरिकनांचे `पुण्य' अधिक ठळक होत जाते.
`अमेरिकेकडे प्रचंड पैसा आहे. एवढा मोठा देश आणि लोकसंख्या किती कमी! त्यामुळे परवडत असेल त्यांना ही चंगळ. आपला देश वेगळा. किती मोठा. किती माणसे. एवढय़ांचे एवढे भले व्हायला वेळ लागणारच ना! अमेरिकनांचे आयुष्य भौतिक सुखसुविधांनी भरलेले असले तरी त्यांच्याकडे आपल्यासारखी आध्यात्मिक श्रीमंती कोठे आहे.' अशी अनेक आर्ग्युमेंट करून भारत-अमेरिका तुलनाच होऊ शकत नाही, असा दावा केला जातो. कधी कधी त्याला `भारताच्या सांस्कृतिक-आध्यात्मिक श्रीमंतीपुढे अमेरिकेचा काय पाडाव?' असा वास असतो. पण, आपण ज्यात जगतो, त्या ऐहिकात आणि भौतिकात चित्र काय? या दोन्ही देशांत तोच सूर्य उगवतो. दोन्हीकडे माती वेगळी असली, तरी धरती तीच. दोन्ही देश एकाच युगात, एकाच काळात अवघ्या साडेबारा तासांच्या अंतराने जगत आहेत. तरीही तेथे दिसणाऱया काही साध्या साध्या गोष्टी आपल्याकडे का नाहीत आणि त्या नसताना आपण महानतेच्या गप्पा का मारतो, असा अस्वस्थ करणारा प्रश्ना पडतो.
अमेरिकेत वावरताना सामान्य नागरिक हा सर्व यंत्रणांच्या केंद्रस्थानी आहे, अशी भावना होते. सगळय़ा यंत्रणा, सगळय़ा सोयी, सगळय़ा सुविधा या त्या वापरणाऱया माणसांचे जगणे सुसह्य करण्याच्या उद्देशाने बनवलेल्या आहेत. त्या तशाच चालवल्या जातात आणि तेवढय़ाच जबाबदारीने वापरल्या जातात. एवढय़ा मोठय़ा देशाच्या कोणत्याही कोपऱयात घाण-गदळ-कचरा-ढिगारे-खड्डे-उघडी गटारे-पान-तंबाखू-गुटख्याच्या पिचकाऱया-थुंकीचे बेडके कुठेच कसे नाहीत? रस्त्यावरून सुसाट धावणारी वाहने पादचाऱयाच्या रस्ता ओलांडण्याच्या हक्कासाठी क्षणार्धात कशी थबकतात? बिल्कुल बिनगर्दीच्या मेट्रोच्या दारासमोर चढणाऱया प्रवाशांची रांग कशी लागते? आतले उतरल्याशिवाय कोणीही डब्यात कसे घुसत नाहीत? हे दर्शन अगदीच वरवरचे आणि बाळबोध असले, तरी ते अस्वस्थकारी आहेच. कारण, आपल्या देशात रांग लावून गाडीत चढायचे ठरवले, तर जागाच मिळणार नाही, कोणीच रांगेची शिस्त पाळणार नाही, न्यायाने-शिस्तीने वागून कसलेही भले होणार नाही, असा `संस्कार'च झाला आहे आपल्या मनावर. त्याच्या पगडय़ाखाली सदासर्वकाळ घाबरत घाबरत आपण आयुष्यभर वावरतो आणि जमेल तेव्हा जमेल तशा आपापल्या वकुबाप्रमाणे सुखसोयी ओरबाडतो. `मांगने से कुछ भी नही मिलता, छीनना पडता है' हा आपला फंडा आहे. समष्टीच्या भल्यातून व्यक्तीचा उत्कर्ष साधण्याचे तत्त्वज्ञान येथे कसे नाही रुजले? माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांनी लिहिलेले एक पत्र यासंदर्भात आठवते. `परदेशस्थ किंवा परदेशांत फिरायला गेलेले सगळे भारतीय तेथील सार्वजनिक शिस्तीचे, स्वच्छतेचे कौतुक करीत असतात. तेथे सगळी शिस्त पाळतात आणि भारतात आल्यावर मात्र बरोब्बर उलट का वागतात? आपल्या देशात असे व्हावे, अशी त्यांचीही इच्छा असतेच, पण, त्यासाठी पहिले पाऊल उचलण्याची, आपला वाटा उचलण्याची कोणाचीच तयारी का नसते?' असा प्रश्ना कलामांना पडला होता. मुळात हे मूलभूत शिकण्यासाठी किंवा अंगी बाणवण्यासाठी परदेशांत जाण्याची गरज काय? आपल्या महान संस्कृतीत आणि परंपरेत हे उपजत कसे नाही? कोणत्याही पक्षाला, नेत्याला, सद्गुरूला यासाठी काही करावेसे का वाटत नाही?
सद्गुरूंवरून आठवण झाली. भौतिक सुखसुविधांनी इहलोकीचेच आयुष्य संपन्न बनविलेल्या अमेरिकनांच्या आयुष्यात काही आध्यात्मिक पोकळी वगैरे आहे, असे तेथे फिरताना जाणवत नाही. माणसे मस्त मजेत जगत असतात. येणाऱया प्रत्येक क्षणाचा आसुसून आनंद घेत असतात. जी काही पोकळी जाणवते, ती येथून तेथे गेलेल्या मूळ भारतीयांना. तीही खरी किती आणि घोकंबाज संस्कारांच्या कंडिशनिंगमधून आलेली किती, हा संशोधनाचा विषय आहे. अशी मंडळी भारतातून आयात केलेल्या बुवाबापूंची प्रवचने आयोजित करतात. अमेरिकेतले त्यांचे संपन्न आयुष्य हे धर्माचरणाविना कसे नरकसमानच आहे, असे डोस बुवा पाजत असतात आणि हे माना डोलावत असतात, तेव्हा त्यांची `अमेरिकन' मुले बाहेर मस्त मजा करत बागडत असतात.
याचा अर्थ अमेरिकेत सगळे आलबेल आहे, अमेरिकन जीवनशैली परिपूर्ण आहे, असा नव्हे. तशी ती कोणत्याच देशाची, कोणत्याच धर्म-संस्कृतीची असू शकत नाही. पण, तसा दावाही तेथे कोणी करीत नाही. जन्मासारख्या निखळ योगायोगाचाही `गर्व' बाळगण्याची `परंपरा' तेथे दिसत नाही आणि मृत्यूपरांतच्या स्वर्गसुखासाठी भूतलावरच्या छोटय़ा छोटय़ा आनंदांकडे पाठ फिरवण्याचाही उल्लूपणा कोणी करीत नाही. तिथले `आज'मधले जगणे आणि तेच सुंदर करण्यासाठी झटणे मोहवून टाकते. तेथे श्रमाला कमीपणाची वागणूक दिली जात नाही. उलट श्रमाचे मोल इतके मोठे आहे की ते मोजण्यापेक्षा आपणच श्रम केलेले बरे, असा विचार प्रत्येकाला करावा लागतो आणि स्वतः श्रम करावे लागतात.
या देशाचा मुळात इतिहास छोटा. तोही सांस्कृतिक सरमिसळीचा. त्यामुळे, एकाच एका सांस्कृतिक परंपरेचा खोडा पायात पडलेला नाही. सर्वसामान्य माणसांचे जमिनीवरचे आयुष्य जमिनीवरच राहून आसुसून जगण्याचा, ते सुसह्य करण्याचा त्यांचा सोपा फंडा आहे. या अतिसोपेपणातून आणि संपन्नतेतून उद्भवलेली मेदवृद्धी (अमेरिका `विशाल' आहे, हे कळण्यासाठी देश फिरावा लागत नाही, नुसती माणसे पाहिली तरी समजते), कागदासारख्या साधनसंपत्तीच्या अतिवापरातून ओढवलेला पर्यावरणनाश, यांत्रिक सुखासीनतेतून आणि सदैव `आज'मध्ये जगण्याच्या कलंदरीतून ओढवणारे सामाजिक प्रश्ना अमेरिकेत आहेतच. पण, त्यांचे स्वरूप सामान्य माणसाचे नेहमीचे जगणेच दुष्कर करणारे नाही. त्यांच्यावर उपाय शोधले जातात आणि ते सर्वमान्य झाल्यास त्यांची काटेकोर अमलबजावणी केली जाते. काटेकोर सार्वजनिक नियमांच्या चौकटीत राहा आणि मुक्त व्यक्तिस्वातंत्र्य अनुभवा, असे इथले, वरवर पाहता विरोधाभासी वाटणारे जीवनसूत्र आहे.
पण, त्यात ज्ञानाचा मान आहे. कलेला दाद आहे. नवे शिकण्याची, समजून घेण्याची उर्मी आहे. ज्येष्ठांचा आदर आहे. अपंगांच्या अडचणींचे (त्यांच्या आत्मसन्मानाला ठेच न लावणारे) भान आहे. सार्वजनिक जीवनात मागे पडणाऱयांना पुढे आणण्याची सभ्यता आहे...
...अमेरिकेच्या भारतातील कॉन्सुलेटबाहेरच्या व्हिसाइच्छुंच्या रांगेचे नियोजन करणारे कठोर चेहऱयाचे सुरक्षा अधिकारी अधूनमधून सगळय़ा रांगेचे निरीक्षण करतात आणि त्या रांगेतील वयोवृद्ध स्त्राe-पुरुष, छोटी बाळे घेऊन आलेल्या महिला आणि अपंग यांना सर्वात पुढे घेऊन जातात... अमेरिका नावाचे प्रकरण भारतातच सुरू होते, ते असे.

(प्रहार, 2009)

1 comment:

  1. Fantastic - I liked the article. I am not familiar with the author but I would request him to start some actions of his own and lead by the example than just writing about it. Some practical suggestions - 1. Start donating to a charity which helps poor and the needy not donate to a temple with millions. 2. Organize small groups in your society/locality of like minded people who will act on such projects.
    Articles like these are plenty and unfortunately add to the fascination about America. What is the point then - just a entertaining article?

    ReplyDelete