Thursday, February 10, 2011

शीला की जवानी आणि तवायफ की इज्जत

(संदर्भ : ‘तीसमारखाँ’ या फराह खान दिग्दर्शित आगामी हिंदी चित्रपटातील ‘शीला की जवानी’ हे नायिकेवर चित्रित झालेलं लोकप्रिय गीत आणि त्याच चित्रपटातील नायकाच्या तोंडी असलेला ‘तवायफ की लुटती इज्जत बचाना और तीसमारखाँ को पकडना, दोनो बेकार है’, हा लोकप्रिय संवाद.)
तसं पाहिलं तर, शीला आणि तवायफ यांच्यात वैरबिर काहीच नाही..
 
..दोघीजणी सं.ली. भन्साळीकृत ‘देवदास’च्या पारो आणि चंद्रमुखीप्रमाणे आपापल्या, एकमेकींपासून वेगळय़ा, असंबंधित, वॉटरटाइट कम्पार्टमेंटवजा जगांमध्ये बंदिवान आहेत.. अधूनमधून दोघींचा देवदास एकच निघाला तर त्यांच्यात होतो तेवढाच संघर्ष आणि तेवढाच एकमेकींशी संबंध. पण, दोन्ही (सासू-सून नसलेल्या) बायाच. त्यामुळे, संघर्षाची परिणती समजूतदार स्वीकारात होऊन जाते आणि एकमेकींमध्ये एक अदृश्य लक्ष्मणरेषा ओढून दोघीजणी आपापल्या जगात पुन्हा हवाबंद होऊन जातात..
 
..त्यातल्या त्यात शीला भाग्यवानच म्हणायची. तिला उफाडय़ाची जवानी मिरवण्याची संधी आहे. प्रेमपागल पुरुषाला चाळवणारं सर्वागझटक्क कामुक नृत्य करीत ‘तुला काय हवंय ते मला ठाऊक आहे, पण, ते तुला कधीच मिळणार नाही, आयम टू सेक्सी फॉर यू, मै तेरे हाथ ना आनी’ असा ठेंगा दाखवणारी मदनिका बनूनही ती तवायफच्या पातळीवर येत नाही. भविष्यात याच नायकाला ‘जे हवे ते देऊन’ वर (नंतर रोज नाश्त्याला गाजर का हलवा खाऊन एमएमध्ये फर्स्ट क्लास फर्स्ट येणारा) मुलगाही जन्माला घालणारी भावी गरती बाई आहे ती. हे काही फार थोर भवितव्य नाही म्हणा. पण, या देशातल्या शेकडा पंच्याण्णव बायकांच्या नशिबी तेच असतं आणि त्याहून अधिक बायकांना तेच हवं असतं.
 तवायफच्या नशिबात मात्र तेही नाही. प्रेमपागल पुरुषांना चाळवणारं सर्वागझटक्क कामुक नृत्य तीही करते.. पण, ते ती कोणावरच्या प्रेमाखातर करत नाही, तिला ते करावं लागतं, कारण तो तिचा पेशा आहे. ‘तुला काय हवंय ते मला ठाऊक आहे, पण, ते तुला कधीच मिळणार नाही,’ असा बाणेदार पवित्रा तिला घेता येत नाही. शरीर हेच तिचं दुकान आहे आणि ‘ग्राहक देवो भव’ हे तिचं ब्रीद. ज्याला जे हवं ते योग्य दामात त्याला देणं हेच तिचं काम. दारी आलेल्या गिऱ्हाइकाला ‘मै तेरे हाथ ना आनी’ म्हणून ठेंगा दाखवत राहिली, तर गिऱ्हाइकाचं काहीच जाणार नाही, तो दुस-या दारात जाईल आणि हिचेच दोन वेळचे खायचे वांधे होतील.
मुख्य म्हणजे हिरोला तवायफकडून असली नाटकं चालत नाहीत. 18 रिळांनंतरच्या भविष्यात आपल्या (‘गाजर-हलवा-एमए फर्स्ट पोरा’ची आई बनणा-या) भावी पत्नीचे ‘मै तेरे हाथ ना आनी’ हे खटय़ाळ नखरे नायक चालवून घेतो, तेच मुळी छावी आपल्या हातात आली आहे, या आत्मविश्वासाच्या बळावर. तवायफचे ते लाड नाहीत. तिनं दाम बोलायचं, जे मागू ते द्यायचं आणि कोणतीही भावनिकबिवनिक गुंतागुंत मागे न ठेवता फुटायचं..
 
..कधी कोणी हिरो थोडय़ा वेळासाठी गुंतलाच (तसा तो नायिकेनं नाकारल्यावर मधला टाइमपास म्हणून गुंततो अधूनमधून तवायफांमध्ये) तरी ‘देवदास’ अखेरीस मरणारसुद्धा पारोच्याच दारात, याचं भान चंद्रमुखीनं कधी सोडायचं नसतं. कोणी ‘मुकद्दर का सिकंदर’ भावनेच्या भरात (आणि दारूच्या नशेत) आपल्याला ‘मुहब्बत के मारों का मसीहा’ म्हणाला, तरी त्याच्या मोहब्बतीची हकदार आपण नाही, गोरी-गोमटी, सदासुगंधित, उच्चकुलीन ‘मेमसाब’ आहे, हे कोठीवरच्या जोहराबाईनं कधीच विसरायचं नसतं..
 
..असं सेकंडहँड का होईना, प्रेम जिला लाभेल, तीही तवायफ उप-भाग्यवानच म्हणायची.. कारण, दारूच्या नशेत, भावनेच्या भरात, प्रेमभंगाच्या दु:खात का होईना कोणीतरी तिला प्रेमास पात्र समजतं.. ही केवढी मोठी इज्जत! हे सुख तवायफसाठी दुर्मीळच. कारण सहसा, ‘शीला की जवानी’चा ट्वेंटी फोर अवर्स लाभ घेण्याची सोय झाल्यामुळे तवायफच्या कोठीची पायरी चढण्याची पाळीही न आलेला नायक अस्सल भारतीय पुरुषी वृत्तीनं बेदरकारपणे डरकाळी फोडतो, ‘तवायफ की लुटती इज्जत बचाना बेकार है’.. शीअर वेस्ट ऑफ टाइम. तवायफला का कुठे इज्जत असते? तिनं तिचं शील गावगन्ना वाटण्यासाठी दुकानात सजवून मांडलेलं असतं. तिच्यावर जबरदस्ती होणं शक्यच नाही. कारण, ग्राहकाची जबरदस्ती हाच तिचा परमसंतोष. तिला चॉइस नाही. कोणीही यावे टिकली लावून जावे. जिची इज्जत आधीच लुटली गेली आहे, तिची इज्जत नंतर लुटली कशी जाईल. समजा, एखादीनं बाणेदारपणा दाखवून अमुकची जबरदस्ती म्हणजे माझी इज्जत लुटली, अशी बोंब ठोकली आणि चुकून कुणा स्त्री-दाक्षिण्यपटूने ती वाचवलीच, तरी पुढे ती लुटली जाणारच आहे. मग हा सगळा खटाटोपच बेकार आहे..
 
..हे महान तत्त्व आपल्या थोर समाजाला पटलेलं आहे..
..म्हणून तर एक स्त्री ज्याची दिग्दर्शक आहे, अशा सिनेमात तवायफच्या इज्जतीचा फालुदा करणारा संवाद असा चवीचवीनं चघळला जातो..
..‘शीला की जवानी’ या गाण्यामुळे आपल्याला छेडछाडीचा त्रास होतो, म्हणून गावोगावच्या ‘शीला’ नावाच्या मुली आंदोलनाची भाषा करतात.. तवायफा हुँ की चुँ करीत नाहीत.. त्यांच्या वतीनंही कोणी बोंब ठोकत नाही..
 
..कल्पना करा, ‘तवायफ’च्या जागी एखाद्या जाती-धर्म-समुदायाचं नाव असतं किंवा कोणा महापुरुष-महामहिलेचं नाव असतं, तर आतापर्यंत केवढा राडा पडला असता..
 
..या सगळय़ांना इज्जत आहे, तवायफला मात्र नाही..
 
..तवायफला त्याचं दु:खही नाही, तिला फक्त याचीच खंत वाटते की या डायलॉगवर आपल्यासारखीच बाई असलेली शीला कशी खदखदा हसू शकते?..
 
..गे तवायफे, वाईट वाटून घेऊ नकोस. शीला अशी हसते कारण आपण सुपात आहोत, याची तिला कल्पना नसते. नायकाला हवं ते देऊन अनंतकाळची माता झालो, म्हणजे आपला फार मोठा सन्मान झाला, या गोड गैरसमजात ती आयुष्यभर राहते..
 
..तिला हे कुणीतरी सांगायला हवं की या देशात हरभजनसिंग कोणाला तरी ‘मंकी’ म्हणाला म्हणून तुफान वादळ उठतं आणि जेव्हा असा खुलासा केला जातो की तो तर त्याला ‘तेरी माँ की’ असं म्हणाला होता, तेव्हा ते वादळ शमतं!!!..
 
..तमाम मातृभक्त भारतीय पुरुष एकसुरात म्हणतात, ‘‘ओह, तेरी माँ की म्हणाला होय! मग काही हरकत नाही. एकमेकांची माँ-बहन तर आम्ही रोजच काढत असतो..’’
 
तात्पर्य : ‘शीला की जवानी’ही चारच दिवसांची आहे आणि तिची इज्जतही.     


(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(19/12/10)

No comments:

Post a Comment