Friday, February 11, 2011

बाय बाय, फुटबॉल..

आज रात्री सगळं संपेल..
 
मध्यरात्रीच्या ठोक्याला स्पेन-हॉलंड एकमेकांना भिडतील..
 
90 मिनिटांत काय तो निकाल लागेल.. तेवढय़ा वेळात एकाही टीमनं गोल केला नाही, तरी आणखी अर्धा-पाऊण तासात तुकडा पडेल आणि फुटबॉलचा अध्याय समाप्त होईल..
 ..म्हणजे भारतातला फुटबॉलचा अध्याय समाप्त होईल.. गल्लोगल्लीचे व्हिया, काका (हे फुटबॉलपटूचं नाव आहे, महाराष्ट्रातील फेमस काकांच्या फेमस पुतण्यांना राग यायला नको), रोनाल्डो, तेवेझ, क्लोसा आपापल्या जर्सी उतरवून कपाटबंद करतील, फुटबॉल पोटमाळ्यावर फेकला जाईल आणि सर्वाचे आवडते बॅट-बॉल-स्टंप बाहेर पडतील.. पुन्हा गल्लोगल्ली क्रिकेटच्या मॅचेस रंगू लागतील.. तेंडुलकर, ढोणी, सेहवाग, भज्जी, श्रीशांत (माणूस आणि नाव यांचा परस्परसंबंध असावाच, अशी गरज नसते, हे स्पष्ट करणारा अशांत इसम) ही सगळी नावं पुन्हा क्रिकेटभक्तांच्या ओठांवर खेळू लागतील.. भारतात क्रिकेट एवढं लोकप्रिय का आहे?
खरंतर क्रिकेट हा श्रीमंतांचा खेळ. एकदम सरंजामशाही ताठय़ाचा. गोल मैदानात पाच-पाच दिवस रेंगाळणारा.. ऊप्स, आय मीन.. रंगणारा! फुटबॉलसाठी एक बॉल लागतो आणि कोणताही आडवा मैदानाचा, रस्त्याचा, गल्लीचा पट्टा फुटबॉलचं ग्राऊंड बनू शकतो. फुटबॉलला फार महान प्रशिक्षणाची गरज नसते. कोणीही चेंडू लाथाडू शकतो. फुटबॉलमध्ये शारीरिक क्षमतेचा कस लागतो. या टोकापासून त्या टोकापर्यंत धावून घामटं निघतं. सर्वागाला व्यायाम मिळतो. पुन्हा पाऊण तासात खेळ खलास. म्हणूनच जगभरातल्या श्रमिकांनी हा खेळ आपलासा केला. अनेक ठिकाणी तो पारतंत्र्यात खितपत पडलेल्यांच्या स्वातंत्र्याकांक्षेचा ज्वलंत उद्गार झाला. क्रिकेटमय ‘लगान’ची प्रेरणा असलेला ‘टू हाफटाइम्स इन हेल’ हा फुटबॉलवर आधारलेला चित्रपट होता.
 
म्हणजे सोपा असूनही फुटबॉल भारतात प्रिय नाही आणि किचकट, वेळखाऊ, ‘वन डे’- ‘टी-ट्वेंटी’च्या रूपाने बॅट्समनच्या बाजूला अधिकाधिक झुकत चाललेला क्रिकेटसारखा महागडा खेळ मात्र तुफान लोकप्रिय का?
 या प्रश्नाचा सखोल आणि व्यापक अभ्यास केल्यानंतर याची काही कारणं दृष्टोत्पत्तीस (वा! काय भारदस्त शब्द) आली आहेत.. म्हणजे नजरेस पडतात. ती येणेप्रमाणे-
1. फुटबॉलचा खेळ पाहावा लागतो, क्रिकेटमध्ये ते बंधन नाही.
 मॅचचा निम्मा वेळ हा फील्डिंग, गोलंदाजाचं बोलिंग मार्कवर परतणं, फील्ड सेटिंग वगैरेमध्ये वाया जात असतो. बॉल पडणे आणि बॅट्समनने तो खेळणे, या मुख्य अ‍ॅक्शनचा वेळ फारच कमी असतो. त्यामुळे, क्रिकेटची मॅच टीव्हीवर पाहात पाहात काय वाट्टेल, ते करता येतं. शिवाय विकेट पडली, सिक्सर वा फोर बसली की जल्लोष, खेळाडूंचं जाणं-येणं यात इतका वेळ जातो की त्यात अ‍ॅक्शन रिप्ले पाहायला मिळतोच. तो क्षण टिपण्यासाठी डोळे लावून बसायची गरज नाही. क्रिकेटची मॅच स्टेडियममध्ये बसून पाहिलीत, तर लक्षात येतं की अनेक ठिकाणांहून मैदानात काय चाललंय हे दिसतच नाही आणि तरी कोणाची अडचण होत नाही. कारण, मैदानात काय चाललंय हे पाहण्यापेक्षा तोंडं रंगवणे, चीत्कारणे, वाद्ये वाजवणे, हात उंचावून उठत-बसत लाटा तयार करणे, हा सगळा ‘खेळ’ जास्त मनोरंजक असतो.
ही गंमत फुटबॉलमध्ये नाही. तो सतत पाहात बसावं लागतं. गोल कोणत्याही क्षणी होऊ शकतो. त्यापुढचा खेळ लगेच सुरू होत असल्याने रिप्लेला फार वेळ मिळेलच याची गॅरंटी नाही. त्यामुळे, सगळी 90 मिनिटं अ‍ॅलर्ट राहावं लागतं. हाऊ बोअरिंग!
 
2. फुटबॉलपटूंची नावं फार जिव्हावळवळवक (‘टंगट्विस्टर’ला मराठी प्रतिशब्द देण्याचा नम्र प्रयत्न) असतात. स्मेल्त्झ, फोर्लान, हिग्युएन, डोनोवॅन, श्नायडर, फॅबियानो, कोमान कुलीबाली ही नावं उच्चारता येण्यासारखी नाहीत आणि ती उच्चारताना तोंडाचं जे काही होतं, ते पाहता ती चारचौघांत उच्चारण्यासारखी नाहीत. शिवाय स्पेलिंग व्हिला आणि उच्चारायचं ‘व्हिया’, स्पेलिंग क्लोज आणि उच्चारायचं ‘क्लोसा’ असले अवघड प्रकारही खूप. आपले मराठी पेपर सविनय कायदेभंग करण्यात पटाईत असल्यामुळे व्हिला आणि क्लोज हेच छापून येतं, ते सोडा.. पण, आपल्या लाडक्या स्टारचं नाव उच्चारतानाच बोबडी वळणार असेल, तर तो खेळ लोकप्रिय कसा होईल?
 
3. फुटबॉलमध्ये चर्चेला फारसा वाव नाही.
 क्रिकेट हा आपल्या रक्तात भिनलेला खेळ आहे. 90 टक्के माणसं हातात कधीही बॅट धरलेली नसताना क्रिकेटबद्दल तास न् तास बोलू शकतात. बोलबच्चनगिरी जमली, तर क्रिकेटवर एकपात्री कार्यक्रमही सादर करू शकतात. क्रिकेटमध्ये एक बॉल टाकल्यानंतर बॅट्समन काय काय करू शकत होता, याचे 273 पर्याय असू शकतात. बोलरने बॉल कसा टाकावा, याचे 187 प्रकार असू शकतात. सरळसोट फुटबॉलमध्ये तो स्कोप नाही. त्यावर फार बोलता येत नाही. आपले द्वैवार्षिक- वर्ल्ड कप टु वर्ल्ड कप- कट्टर फुटबॉलचाहतेही ‘काय साला गोल मारला, अमेझिंग!’ आणि ‘काय साला सेव्ह केला, अमेझिंग!’ फार तर फार ‘काय साला पास दिला, अमेझिंग!’ यापलीकडे फारशा एक्स्पर्ट कॉमेंट करू शकत नाही. सतत बोलायला आवडणा-या ‘चर्चिलां’च्या देशात हे तोंडाला कुलूप कसं चालायचं?
4. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फुटबॉल हा अतीव सांघिक खेळ आहे.. तिथे व्यक्तिस्तोमाला- मैदानात तरी- फारसा थारा नाही. एक माणूस एका गोलपोस्टपासून दुस-या गोलपोस्टपर्यंत एकटय़ाने बॉल घेऊन गेला आणि त्याने गोल केला, असली भानगड तिथे नाही. सगळा खेळ पासिंगचा. चेंडू आपल्याच ताब्यात राहावा, असा चंग ज्याने बांधला, तो संपला. गोल करणारे पाय कोणाचे आहेत, हे महत्त्वाचं नाही. ज्याला संधी मिळेल, त्याने ती घ्यायची, इतरांनी त्याच्या सोलो गायनात झिलकरी बनून साथ द्यायची, मिजास नाही.
 त्याउलट, आपला देश एकाकी हीरोंचा.. आपला अमिताभ एकटय़ाने 25 गुंडांना लोळवतो.. आपला तेंडुलकर, युवराज, ढोणी किंवा लक्ष्मण हा संघाने गमावलेली मॅच एकहाती खेचून देतो.. सगळे डब्यात गेलेत आणि कोणीतरी हात देऊन आपल्याला बाहेर काढतोय, ही आपली राष्ट्रीय सरंजामी फॅण्टसी आहे.. आपल्याला प्रजा असायला बेहद्द आवडतं.. आपल्या मनांवर राज्य करायला एक राजा किंवा एक सम्राट असला की आपण खूष.. फुटबॉल लेकाचा आपल्यालाच कामाला लावतो.. सगळय़ांनी मिळून जिंकू म्हणतो.. सांघिक विजयापुढे व्यक्तिगत आकांक्षा गौण मानतो.. असला खेळ भारतात (पोर्तुगीज-प्रभावित गोव्याचा अपवाद वगळता) फक्त कम्युनिस्ट राज्यांमध्येच लोकप्रिय आहे, यात नवल ते काय?

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(11/7/10)

No comments:

Post a Comment