Friday, February 11, 2011

डायरशाहीची डायरी

प्रसंग एक
स्थळ : वाघोली गाव, वसई
विजय.. गावातला एक सुस्थापित तरुण व्यावसायिक. स्वकष्टाने मोठा झालेला. सामान्य परिस्थितीतून नावारूपाला आलेला. अतिशय सुस्वभावी, कोणाच्याही अडीअडचणीत धावून जाणारा. गाव त्याला विजूशेठ म्हणून ओळखतं.
त्या दुपारी तो घरी जेवायला आलेला. गावाच्या मुख्य नाक्यावर काहीतरी गडबड सुरू आहे, याची खबर मिळाल्यावर तो काळजीने तेथे धावून जातो. पोलिस लोकांच्या घरांमध्ये घुसून त्यांना जेवत्या ताटावरून उठवून मारताहेत. घरातल्या वस्तू चोरताहेत. बायकांवर हात टाकताहेत, असं भयंकर वातावरण. मुख्य चौकात विजूशेठ पोहोचतो न पोहोचतो तेवढय़ात चहूबाजूंनी पोलिस धावून येतात आणि विजूची गचांडी पकडून लाठीने बडवायला सुरुवात करतात. ‘‘अहो, मी काय केलं? मी फक्त पाहायला आलोय काय झालं ते? मी कसलाही आंदोलक नाही,’’ हे त्याचं बोलणं पोलिसांच्या हेल्मेटांमध्ये शिरत नाही आणि त्याआतल्या डोक्यांमध्ये त्याचा प्रकाश पडण्याची तर सुतराम शक्यता नसते. भर नाक्यावर गावातल्या एका प्रतिष्ठित माणसाला कसलीही चौकशी न करता, कसलाही अपराध नसताना भुरटय़ा चोराप्रमाणे बडवण्याचा अधिकार या गुंडांना त्यांच्या खाकी वर्दीने दिलेला असतो. कर्तव्याच्या बाबतीत कधीही दक्ष नसलेले पोलिस हा अधिकार मात्र त्वेषाने बजावत असतात..
..हातावर लाठीचा फटका बसून बोट फ्रॅक्चर झालेल्या विजूशेठला पोलिस व्हॅनमध्ये कोंबतात आणि पोलिस चौकीत नेऊन बसवतात. तोपर्यंत विजूशेठच्या काही मित्रांना या प्रकाराची खबर मिळते. परिसरातील काही प्रतिष्ठित नागरिक चौकीत जाऊन विनंती करतात. झाल्या प्रकाराबद्दल पोलिसांविरुद्ध तक्रार कराल, तर पुढे प्रत्येक लफडय़ाच्या वेळी उचलू, अशी वर तंबी देऊन मागच्या दाराने विजूशेठची सुटका केली जाते..
..या घटनेला आठवडा उलटून गेला तरी विजूशेठचा फोन अजून बंदच आहे. कारण, पोलिस विजूशेठला गुराढोरांप्रमाणे मारत आहेत, हे दृष्य एका वृत्तवाहिनीवर अनेकदा दिसलं आहे. या दृष्याचा फोटो अनेक वर्तमानपत्रांमध्ये पहिल्या पानावर छापून आला आहे. ते दृष्य आणि तो फोटो पाहणारे बहुतेकजण विजूशेठना ओळखतदेखील नाहीत. पण, या सगळय़ा प्रकारामुळे गावात आणि एकंदर समाजात आपली कधीही भरून निघणार नाही, अशी बेअब्रू झाली, या खचविणाऱ्या भावनेने विजूशेठला ग्रासलंय. पोलिसांनी एखाद्याला मारझोड केल्याने त्याची अप्रतिष्ठा व्हावी, इतकी मुळात इथल्या पोलिसांची पत नाही, हे विजूशेठला कसं समजावायचं, असा प्रश्ना त्यांच्या मित्रांना पडलाय..
..बोटाचं फ्रॅक्चर कधी ना कधी बरं होईल. मात्र, कधी कोणावर साधे बोटही न उचललेल्या आपल्यासारख्या समाजातल्या तालेवार माणसाला आपल्याच गावात अशी जाहीर विटंबना सहन करावी लागू शकते आणि त्याबद्दल आपण काहीही करू शकत नाही, या असहाय्यतेचं मनाला झालेलं फ्रॅक्चर कधीही सांधलं जाणार नाही..
तात्पर्य : पोलिस आपल्या गावात किंवा घरात शिरून कोणालाही सकारण अथवा अकारण चोपत असतील, तर त्यांना त्यांचं कर्तव्य करू द्यावं. त्यांच्या आड येऊ नये. त्यांना प्रश्ना विचारून डिस्टर्ब करू नये. त्यांनी भरचौकात कोणाचा खून पाडला, तरी तो कायदेशीरच असेल, याची खूणगाठ बांधून अशा कारवाईपासून सुरक्षित अंतरावर पळून जावे.
प्रसंग दुसरा
स्थळ : परळ, मुंबई
वेळ : रात्रीची
एका गल्लीत काहीतरी गडबड सुरू आहे. पोलिसही आलेले दिसतायत. नाक्यावर पान खाऊन घराकडे निघालेल्या श्यामची पावलं आपसूक तिकडे वळतात. तो तिथे थबकतो ना थबकतो तेवढय़ात आतून दोन पोलिस धावत येतात. एक जण श्यामची गचांडी पकडतो आणि त्याला दंडुका हाणतो. ‘‘अहो, मी काय केलं? मला का मारताय? हे पाहा मी पत्रकार आहे.’’ श्याम ओळखपत्र काढून दाखवतो. बेभान झालेला दुसरा पोलिस, ‘‘पत्रकार आहेस म्हणून काय झालं?’’ असं बोलून आणखी एक दंडुका ओढतो. आता गल्लीतून श्यामला ओळखणारा तिसरा पोलिस येतो, तेव्हा हे दोघे भानावर येतात आणि चक्क पळून जातात..
..‘‘आता मी तुमची नोकरीच घालवतो’’ अशा ईरेला पेटलेला श्याम थेट पोलिस कमिशनरांना फोन लावतो. ते जॉइंट कमिशनरशी बोलतात. पोलिस ठाण्यात ट्रान्स्फर सीन दिसतो. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्यामच्या मिनतवा-या करतात, ‘‘अहो, मी किती कष्टातून वर आलोय, किती गरिबीतून पोलिस झालोय. माझ्या नावावर एकही बट्टा नाही. कमिशनरसाहेबांनी अ‍ॅक्शन घेतली, तर माझं रेकॉर्ड खराब होईल.’’
स्थानिक समाजसेवक श्यामची समजूत काढायचा प्रयत्न करतोय, ‘‘अरे, मला ओळखतोस ना तू! माझं ऐक. साहेब चांगले आहेत. आपले मित्र आहेत. आमच्या साहेबांच्या सर्व राजकीय-सामाजिक उपक्रमांना खूप सहकार्य करतात ते. माफी मागताहेत ना ते? मोठय़ा मनानं त्यांना माफ कर.’’
समाजसेवकाच्या साहेबांचा श्यामला फोन, ‘‘श्यामराव, अहो, हवं तर आम्ही माफी मागतो तुमची पोलिसांच्या वतीने. या साहेबांवर राग धरू नका. कमिशनर साहेबांकडे जाऊ नका. गेलात तर झाला प्रकार गैरसमजातून झाला, असं कमिशनर साहेबांना सांगून मिटवून टाका. ही आमची विनंती आहे.’’
श्याम मात्र ठाम. ‘‘अहो, या सगळय़ाशी माझं काय घेणंदेणं? माझा सरळसाधा प्रश्ना आहे की माझा काय गुन्हा होता, म्हणून तुमच्या पोलिसांनी मला भररस्त्यात मारलं? त्यांनी माझ्या अंगाला हातच कसा लावला? तुम्ही भरवस्तीत काही कारवाई करीत होता. कोणाही माणसाला हे काय चाललंय, अशी उत्सुकता वाटू शकते. अशा कोणत्याही माणसाला तुम्ही थेट मारझोड करणार? म्हणजे तुमच्यासमोर आमची काहीच किंमत नाही. ही वर्दी अंगात चढली की इतकी मस्ती येते? ही वर्दी नसेल ना तुमच्या अंगात, तर लोक कुत्र्यासारखे चोपतील तुम्हाला. मी पत्रकार आहे म्हणून तुम्हाला नडू तरी शकतो. माझ्या जागी दुसरा कुणी असता, तर त्याचं काय केलं असतं तुम्ही? आयुष्यातून उठवाल तुम्ही अशा एखाद्या सामान्य माणसाला..’’
..त्या दोन्ही पोलिसांनी श्यामची माफी मागितली आहे. एकाचे ब्लड प्रेशर, दुस-याच्या कौटुंबिक विवंचना आणि एकूणच पोलिसांवरचा कामाचा विलक्षण ताण या सर्वाचा श्यामने विचार करावा, यासाठी इतक्या माणसांनी इतक्या प्रकारांनी दबाव आणला की आता त्यांच्यावरील कारवाईच्या मागणीबाबत श्याम तेवढा आग्रही राहिलेला दिसत नाही.
तात्पर्य : पोलिसांच्या लाठय़ा झेलताना किंवा त्यांच्या पिस्तुलाची गोळी झेलताना निरपराध व्यक्तीने असीम करुणेने त्यांच्या चेह-याकडे पाहावे. या बिचा-यांवर कामाचा किती ताण आहे, खाणे-पिणे बिघडल्याने सगळय़ांचे चेहरे कसे सुजले आहेत, पोटे किती सुटली आहेत, याचा विचार करावा आणि बेशुद्ध पडताना किंवा मरताना मोठय़ा मनाने त्यांची छोटी आगळीक माफ करावी.
प्रसंग तिसरा
स्थळ : कोणताही नक्षलवादग्रस्त भाग
वेळ : कोणतीही.. फॉर अ चेंज पोलिसांवर आलेली
पोलिसांचे वाहन स्फोटात उडवले जाते..
पोलिसांना घेरून नृशंसपणे मारले जाते..
अन्नालाही मोताद असलेले अतिसामान्य आदिवासी स्त्रीपुरुष इतके क्रूर झाले आहेत की नक्षलवाद्यांपासून त्यांची सुटका करण्यासाठी आलेल्या पोलिसांना दगडांनी ठेचून ठार मारताहेत, त्यांचे हातपाय तोडताहेत..
प्रसंग चौथा
स्थळ : ज्या परिसरात लाठीमार झाला तोच.
वेळ : उत्तररात्रीची
अज्ञात लोकांचा जमाव पोलिसांच्या चौक्या जाळून टाकण्याचा प्रयत्न करतो.. योगायोगाने या वेळी चौक्यांमध्ये फक्त कागदपत्रे, टीव्ही, टेबल-खुच्र्याच असतात.. पोलिस नसतात..
..निव्वळ योगायोगाने.
तात्पर्य : असे सुदैवी योगायोग यापुढे वारंवार येतीलच, याची आता गॅरंटी नाही.

(14/3/10)

No comments:

Post a Comment