‘‘भाय, भाय, उठो भाय, देखो..’’
भल्या दुपारी दीड वाजताची साखरझोप सर्किटच्या ओरड्याने मोडली, तेव्हा मुन्नाभायचा भेजाच आउट झाला होता. पण, सर्किट एवढा ‘एस्काइट’ झालाय म्हंजे मॅटर तसाच ‘इम्पोर्टन’ असणार, हे जाणून त्याने सर्किटला झापडलं नाही.. फक्त त्रासिक मुद्रेनं त्याच्याकडे पाहात तो करवादला, ‘‘तेरेकू कुच कामधंदा नई क्या रे? सुबै सुबै पकवायला आलास तो.’’
‘‘अरे भाय पकाने नई आया हूं, ही न्यूज दाखवायला आलोय,’’ हातातला पेपर फडकावत सर्किट म्हणाला, ‘‘हे वाच ना. ‘मुंबई का बर्ड कौन?..’’
‘‘बर्ड बोले तो पक्षी ना? हे काय नाटक आहे?’’
‘‘वो ऐसा है भाय की, हरएक गावाचा, शहराचा, कंट्रीचा आपला एक जनावर असतो, झाड असतो, पक्षी असतो.. अपने इंडिया का कैसे टायगर है.. तसाच मुंबईचा पक्षी निवडणार आहेत..’’
‘‘इत्ता बडा इलेक्शन आया आणि आपल्याला साधी खबर नाही. बुलाव सब पंटर लोग को.’’
‘‘भाय भाय, चिडायचं नाय. ये पेटी, खोकावाला इलेक्शन नही है.’’
‘‘फिर तू कायको लेके आया ये लुख्खा मॅटर?’’ मुन्नाभायने परत पांघरूण डोक्यावर ओढून घेतलं. सर्किटने ते पुन्हा खेचलं.
‘‘अरे भाय, अपने शहर का पंछी कोई दूसरा चुनेगा तो तुम को चलेगा क्या? विलेक्शन कोई भी असो, अपनाही कॅंडिटेड जीतना चाहिए की नहीं?’’
‘‘अरे हो रे, नाही तर आपल्या इज्जतचा फालुदा!’’
‘‘म्हणूनच सांगतो, तू फक्त पंछी फायनल कर भाय, आपल्या सगळय़ा पंटरांना बसवतो रपारप वोटिंग करायला.’’
‘‘ठीक आहे. पढ पढ तू आगे पढ.’’
सर्किट वाचू लागला, ‘‘या निवडणुकीत कावळा, तांबट, फ्लेमिंगो आणि दयाळ पक्षी उमेदवार आहेत.’’
‘‘अरे बापरे, हे काय मॅटर घेऊन आलास तू,’’ अंगावरचं पांघरूण उडवून हातातला घोडा सज्ज करीत मुन्नाभाई ताडकन उठून उभा राहात ओरडला.
‘‘क्या हुआ भाय?’’ सर्किट भांबावलाच.
‘‘ये दयाळका मॅटर लेके आया तू? दयाळ कोण आहे हे ठाऊक नाही तुला? अरे, वो सब भाई लोग का बडा भाई है.. मुंबई का पुलिस कमिशनर.’’
पोट धरधरून हसत सर्किट कसाबसा म्हणाला, ‘‘अरे भाय, हा तो दयाळ नाही.. दयाळ नावाचा पक्षी आहे.’’
‘‘दुसरं काय नाव नाय सापडलं काय त्याच्या मम्मी-डॅडीला? असल्या मनहूस नावाचा पक्षी आपल्याला या इलेक्शनमध्ये नाय पायजे.’’
‘‘ओके. कट. वैसे भी मुंबईमे इतनी चिडिया देखी, पण, हा दयाळ कोण काळा का गोरा कधी बघितल्याचं आठवत नाय.’’
‘‘उसको छोड. दुसरा कोन कँडिटेड आहे, ते बोल.’’
‘‘हा तांबट नावाचा पक्षी पण कधी पायलेला नाय.’’
‘‘अरे सर्किट, या मुंबईमध्ये खडी होणारी एकेक बिल्डिंग आसमान छू रही है.. त्यांच्या गर्दीतून दिवसा सूर्य आणि रात्री चांद दिसणं मुश्कील झालंय आणि तुला पक्ष्याची पडलीये.’’
‘‘वो भी सही है भाय, लेकिन ये तांबट..’’
अचानक मुन्ना गालातल्या गालात हसू लागला, ‘‘क्या क्या नाम है साला ये पंछी लोगका भी. एक का पुलिस कमिशनर का नाम है, तो दुसरा लगता है की किसी गँग का टपोरी.. तांबट.. मुन्ना गँगचा खतरनाक शार्पशूटर पक्या तांबट..’’ मुन्नाभाई गदगदून हसत म्हणाला, ‘‘हटा इस तांबट को भी, कल्टी मार. अब बचा कौन?’’‘‘फेल्मिंगो या ऐसाही कुछ उल्टासीधा नाम है..’’
‘‘कमाल है, एक मुंबईकर ज्याचं नीट नाव घेऊ शकत नाही, तो मुंबईचा पक्षी बनणार? है कौन ये आयटम? कोई फॉरेनर है क्या?’’
‘‘व्वा भाय! क्या सही पैचाना. वो सिवडी का खाडी है ना, तिकडे येतो हा पक्षी फॉरेनवरून.’’
‘‘फॉरेनवरून उडून येतो इतक्या लांब. साला पंखात काय ताकद असेल रे याच्या आणि जिगर केवढी!’’
‘‘तो इसको फायनल करे?’’
‘‘नाय रे. याला सिलेक्ट केला तर राज ठाकरेला आयता मॅटर मिळेल ना परप्रांतीय पक्षी निवडला म्हणून.’’
‘‘मग आता राहिला कावळाच.’’
‘‘हां, ये कौव्वा मुंबई का पंछी हो सकता है..’’ मुन्नाची कळी खुलली, ‘‘तो सगळीकडे दिसतो. मुंबईकरांसारखाच विनातक्रार कितीपण घाणीत राहतो. ती साफसुद्धा करतो. मेहनती आहे बिचारा.’’
‘‘मग याला फायनल करू?’’
‘‘नही यार सर्किट! 20-25 वर्षापूर्वीच्या सीध्यासाध्या मुंबईचा पक्षी म्हणून बरोबर होता तो. आताची मुंबई फार बनेल झालीये, एकदम चालू आयटम. कौव्वा बहुत सीधा है.’’
‘‘भाय, बुरा ना मानो तो मीच एक सजेशन देऊ का?’’
‘‘बोल ना, बोल.’’
‘‘मुंबईचा पक्षी म्हणून अॅक्चुअली कोंबडीला निवडलं पायजेल.’’
‘‘वो क्यूं?’’
‘‘अरे भाय, हर संडे-वेन्सडे-फ्रायडेला या शहरात सगळय़ांच्या तोंडात फक्त एकच नाव असतं.. कोंबडी. लाखो मुर्गी कटती है एकेक दिन में. जी मुंबईकराचं पोट भरते, जिचे एवढे टेस्टी आयटम बनतात, त्या कोंबडीलाच का नाय निवडून द्यायचं?’’
‘‘बात तो सही है, वैसेभी मुंबई ही पण सगळय़ा पॉलिटिशन लोकांसाठी कोंबडीच तर आहे सोने के अंडे देनेवाली. पण सर्किट, पब्लिकला असे सस्त्यात कटणारे पंछी आवडत नाहीत. जिंदा पंछीच आवडतात.’’
‘‘फिर तो कबूतर ही बचा.’’
‘‘अरे, नाव नको घेऊ त्या नामुरादचं. साला नुसता घुमत बसणारा, आयते फेकलेले दाणे खाणारा, जिकडे तिकडे घाण करून ठेवणारा पक्षी. त्याला बघितलं की मला सरकारी बाबूच आठवतात.’’
‘‘मग आता तूच बोल भाई मुंबईचा पक्षी कोण?’’
विचारमग्न मुन्नाभाई आपल्याच तंद्रीत उठून पुढे निघाला.. टेकडीवरून खाली सगळी मुंबई दिसत होती.. उन्हात सोन्यासारखी चमचमणारी. अचानक आकाशातून अवकाळी काळे ढग झेपावले आणि मुंबईची झळाळी काजळली.. तिकडे पाहात मुन्ना ओरडला, ‘‘वो देख सर्किट, मुंबई का पंछी?..’’
सर्किटने डोळे ताणून आकाशात पाहिलं.. ढगांचा आकार थेट गिधाडासारखा दिसत होता.. जणू त्यांनाही माहिती होतं की ही मुंबई आतून कधीच मेली आहे.. तिच्या छाताडावर बिल्डिंगी उभ्या राहतायत, पूल बनतायत, ट्रेना धावतायत, माणसं लोंढय़ांनी येऊन वसतायत.. पण, या शहराचा आत्मा कधीच उडून गेलाय.. एखाद्या पाखरासारखा..
..विस्फारल्या आणि ओलावल्या डोळ्यांची पापणीही न लववता भयकंपित सर्किट मुंबईवर झेपावणारा मुंबईचा पक्षी पाहात जागीच खिळून थरथरत राहिला.(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(प्रहार, २७ फेब्रुवारी, २०११)
मुंबईवर मनापासून प्रेम करणाऱ्या कुणाही वाचकाला आवडेल, पटेल आणि विचारही करायला लावेल असा लेख! अभिनंदन मुकेश! लिखाणाची शैली नेहमीप्रमाणे खुसखुशीत...गालावर फुंकर मारून कानाखाली आवाज काढणारी!! हा लेख ब्लॉगवर येईपर्यंत 'मुन्ना Gang चा खतरनाक शार्पशूटर पक्या 'तांबट'' मुंबईचा पक्षी झाल्याची वार्ता येऊन थडकली आहे...सूचकच आहे हेही!
ReplyDelete