Tuesday, February 15, 2011

वाचवा!


दरवर्षी नेहमीप्रमाणे पर्यावरण दिन येतो.
सगळीकडे एकदम सगळयांना (एका दिवसापुरतं का होईना) जागच आल्यासारखं होतं.
टीव्हीवर, पेप्रांत, भाषणांमध्ये, परिसंवादांत पब्लिक घसा फोडून फोडून सांगायला लागतं, ''वाचवा वाचवा, पर्यावरण वाचवा.''
कोणी सांगतं, झाडं वाचवा.
कोणी सांगतं, नद्या वाचवा.
कोणी सांगतं, पेट्रोल वाचवा.
कोणी सांगतं, पाणी वाचवा.
कोणी सांगतं, वाघ वाचवा.
कोणी सांगतं, शार्क वाचवा.
कोणी सांगतं, निसर्ग वाचवा.
कोणी सांगतं, पृथ्वी वाचवा.
कोणी सांगतं, विश्व वाचवा.
हे सगळं वाचूनऐकूनपाहून जाम हसायला येतं. माणूस नावाचा पाचसहासात फुटांचा टिंपुरडा जो निसर्गाच्या, विश्वाच्या हिशोबात डेढफुटयासुध्दा नाही, तो स्वत:ला केवढा मोठा मानून छाती फुगवून चालतो नाही?
तो या सगळयांना 'वाचवायला' निघालाय?
कमाल आहे!
कशाला वाचवतोयस बाबा या सगळयांना! नको करूस इतका इतरांचा विचार. (तुला झेपायचं नाही ते. आजवरचा तुझा इतिहास इतका स्वार्थाने बरबटलेला आहे, तो काय उगाच!) कशाला शिणवतोयस डोकं. नको वाचवूस काही. तुला ओरबाडायची सवय आहे ना, हौस आहे ना, मग ओरबाड हवं तेवढं.
नासव नासव. धो धो पाणी नासव.
नद्यांची गटारं कर.
वाळू उपसून खोल विवरं कर.
तोड, हवी तेवढी झाडं तोड.
कर जमीन मोकळी.
उठव शेकडो मजल्यांच्या इमारती.
संपवून टाक पृथ्वीच्या टाकीतलं एकूणएक पेट्रोल.
मार, मासे मार.
खाण्यासाठी मार.
समुद्रात घाण सोडून मार.
मार बिनधास्त.
वाघ मारून पर्सा बनव.
लैंगिक शक्ती वाढव.
हवी तेवढी हरणं मारून खा चवीचवीने.
फेक फेक. प्लास्टिक फेक.
सब भूमी तेरे बाप की!
वाट्टेल तिथे वाट्टेल ते फेक.
आख्खं शहर तुंबव.

निसर्गाचं काय बिघडणार आहे?
पृथ्वीचं काय बिघडणार आहे?
विश्वाचं काय बिघडणार आहे?
माणूस नावाच्या प्राण्याने आकार घेण्याच्या आधीही पृथ्वी होती, निसर्ग होता, विश्व होतंच. माणसानं उद्या जंगलं तोडून वाळवंटं केली, तर निसर्गाचं काय जाणार? तो तर वाळवंटातही असतोच की!
समजा या टिंपुरडयानं उद्या संपूर्ण पृथ्वीवरची स्वत:सकट सगळी जीवसृष्टी नष्ट केली तरी निसर्गाचं किंवा पृथ्वीचं काय बिघडणार? ती निर्मनुष्य, निर्जीवनही फिरत राहील सूर्याभोवती तिच्याच गतीने.
माणूस नावाचा बुडबुडा तरल्याने किंवा फुटल्याने ना पृथ्वीचे काही बिघडत, ना पृथ्वीचे काही बिघडत, विश्वाची तर बातच सोडा.
सगळे उत्मात करून हा टिंपुरडा नष्ट करेल ती फक्त मानवजात.
कशाला निसर्ग, पर्यावरण वगैरे वाचवण्याच्या वल्गना करताय यार!
जस्ट सेव्ह युअरसेल्फ!

(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment