Friday, February 11, 2011

आता वाजली की गाणी!

‘‘सॉलिड म्हणजे सॉलिडच काम झालं..’’
 
‘‘सगळ्या एफएम रेडिओवाल्यांना साहेबांनी एका फटक्यात सरळ करून दाखवलं..’’
 
‘‘लेकाचे महाराष्ट्रात राहतात, महाराष्ट्रात धंदा करतात आणि मराठीचाच दुस्वास करतात?’’
 
‘‘ते काय नाय, रेडिओवर मराठी गाणी वाजवायची म्हणजे वाजवायची..’’
 
‘‘नाहीतर आम्ही वाजवू’..’’
 
‘‘आम्ही कसे वाजवतोते ठाऊकाय ना! नसेल तर
 
त्या कन्नड वेदिकेवाल्याला विचारा.. भयंकर शूर आहोत आम्ही.. एकेकटय़ा माणसाला गाठून चाळीस चाळीस जण
 
तुटून पडतो..’’
 
मुंबईतल्या एफएम रेडिओ चॅनल्सवर मराठी गाणी वाजवलीच पाहिजेत, असा फतवा निघाला, काही चॅनल्सनी त्याला रुकार दर्शवून मराठी गाणी वाजवायची तयारी दर्शवली, त्यावर बहुतेक मराठी माणसांची प्रतिक्रिया हीच असणार, यात शंका नाही. कारण असं काही झालं की आपल्या भाबडय़ा मनाला फार बरं वाटतं. आपला फार मोठ्ठा विजय झालाय आणि आता मराठीचा झेंडा त्रिलोकात फडकू लागलाय, असा भास होतो. असल्या प्रतीकात्मक गोष्टींमधून ठोस असं काही साध्य होतं का? त्यातून भाषेचं, भाषकांचं काही भलं होतं का? असले आभासी विजय मिळवून देणा-या दिव्यांखाली केवढा मोठा अंधार आहे? हे प्रश्न आपल्याला पडत नाहीत.
 
मराठी गाणी वाजवण्याची सक्ती करणं, हे एखाद्यानं आपल्या तयार कपडय़ांच्या दुकानात लंगोट विक्रीला ठेवलेच पाहिजेत, असा आग्रह धरण्यासारखं किंवा पंचतारांकित हॉटेलच्या मेन्यूमध्ये वडापाव असलाच पाहिजे, असा आग्रह धरण्यासारखं आहे.
 
अरे, त्याचं दुकान आहे, त्याचं हॉटेल आहे. तो ठरवेल ना त्याला काय विकायचंय ते. लंगोट हाच आपला अस्मितानिदर्शक पारंपरिक पोशाख आहे, असं समजा कुणाचं मत असेल, तर त्याने स्वत: लंगोटाचं दुकान काढावं. तेच वडापावाचं. त्याची दुस-यावर सक्ती कशी करता येईल.
 आपण जास्तीत जास्त काय करू शकतो, तर तुमच्या दुकानात अमुक वस्तू मिळत नाही का, अशी चौकशी करू शकतो. ती वस्तू ठेवा, तिला खूप मार्केट आहे, असा सल्ला देऊ शकतो. एखादी वस्तू अनेक ग्राहकांना हवी आहे, याचा अर्थ ती दुकानात ठेवण्यात आपला फायदा आहे, असं दुकानदाराला वाटलं, तर तो ती ठेवेलच ना! त्याला ग्राहक आणि नफा नको आहे की काय?
पण, आपल्याला हा सनदशीर आणि थेट व्यावहारिक मार्ग बहुधा पसंतच नाही.
 आम्ही खरेदी करू ना करू, तू मात्र ही वस्तू ठेवलीच पाहिजे, असा आपला खाक्या आहे.
तो अगदी भयाण स्वरूपात दिसला तो मल्टिप्लेक्सेसमध्ये मराठी सिनेमाची सक्ती केली गेली तेव्हा. तो नियम बहुतेक मल्टिप्लेक्सेसनी धुडकावूनच लावला होता. ज्यांनी तो पाळला, तिथे चित्र काय होतं? मारून मुटकून मराठी सिनेमा लावल्यानंतर तो पाहायला कोणीच नाही म्हणून ते शो रद्द करावे लागले. म्हणजे, ही सक्ती यशस्वी करण्यासाठी प्रेक्षकांवर मराठी सिनेमा पाहण्याची सक्ती करावी लागली असती. आता भिकार सिनेमा किंवा चांगला सिनेमा पाहण्याची अशी सक्ती करता येते का? तो ज्याचा त्याचा चॉइस असतो. जेव्हा मराठीत उत्तम दर्जाची चित्रनिर्मिती व्हायला लागली आहे, अशी प्रेक्षकांची समजूत झाली तेव्हा त्या सिनेमांची चांगली हवा झाली. ते पाहायला प्रेक्षकांची झुंबड उडाली. मग, मल्टिप्लेक्सेसनी ते सिनेमे आपणहून लावलेच की!
 
हा व्यापाराचा सिद्धांतही एफएमवाल्यांना लागू होत नाही, असा अनेकांचा दावा आहे. अनेक मराठी माणसांनी अनेकदा सांगितलं, तरी ते मराठी गाणी लावत नाहीत, अशी त्यांची तक्रार आहे. हा अनुभव मुंबईतला आहे. इथे मराठी माणूसच जेमतेम 25 टक्के उरलाय. राज्यातल्या इतर शहरांमध्ये हिंदी गाणी लावणाऱ्या चॅनल्सचे आरजेही हिंदी-इंग्रजी-मराठी या तिन्ही भाषांच्या मिश्रणातून तयार झालेली भेसळभाषा बोलतात. ते मराठी टाळत नाहीत. मुंबईत तसं करण्याची गरज का भासत नाही, याचा नीट विचार करायचा की दमदाटय़ा करून दुपारच्या वेळात झटपट दोन मराठी गाणी आम्ही वाजवायला लावली, म्हणून नाच करायचा? मराठीतल्या अवधूत गुप्ते, वैशाली सामंत यांची गाणी, अलीकडे अजय-अतुल यांची गाणी- खासकरून नटरंगची गाणी सगळय़ा वाहिन्यांवर या सक्तीच्या आधीही ऐकू येतच होती. अजय-अतुल यांची काही गाणी अगदी हिप हॉप डिस्कोथेक्समध्येही वाजतात. त्यांची कुणी कुणावर सक्ती केली नाही. सर्वाना अपील होईल, असं लोकप्रियतेचं एलिमेंट कशात आहे, हे त्या त्या ठिकाणच्या माणसांना कळतंच. एकेकाळी तामिळचा शब्दही न कळणा-या ठिकाणी ए. आर. रहमानच्या तामिळ गाण्यांनी धुमाकूळ घातला होता.पुण्याचा एक संपूर्ण गणेशोत्सव आर्यामधल्या आ अण्टे अमलापुरमच्या ठेक्याने संपन्न झाला होता. कोंबडी पळालीहे मराठी गाणं देशाच्या पार टोकाला असलेल्या ईशान्य भारतातल्या ड्रायव्हरांच्याही उत्तम परिचयाचं आहे.
 
सगळे एफएमवाले सज्जन, सालस आहेत आणि केवळ व्यावसायिक कारणांसाठीच मराठी गाणी टाळतात, असा भ्रम बाळगण्याचं कारण नाही. मराठीद्वेष्टय़ांची मुंबईत कमतरता नाही. मुंबईतलं एक प्रमुख इंग्रजी दैनिक आपल्या अहमदाबाद आवृत्तीत गुजरात राज्याचा सुवर्णमहोत्सव पहिल्या पानावर भरभरून साजरा करतं आणि महाराष्ट्राचा सुवर्णमहोत्सव मात्र त्यांच्या गावीही नसतो, हा केवळ योगायोग नाही. पुरीच्या जगन्नाथ यात्रेची     स-फोटो कोडकौतुकं छापणाऱ्या या वर्तमानपत्रात या राज्यातल्या वारीला कवडीचंही स्थान नाही. पण, त्यावर सनदशीर मार्गानी किती मराठी वाचकांनी नाराजी व्यक्त केली? आमची भाषा, आमचं राज्य यांना तुमच्याकडे किंमत नसेल, तर गेलात उडत, असं मराठी ग्राहकराजाका नाही सांगत.
 
एखादं उत्पादन नाकारणं, हा त्यात बदल घडवून आणण्याचा एकच योग्य मार्ग असतो. ते नाकारणाऱ्यांची संख्या उत्पादकाला तोटा घडवून आणण्याइतकी वाढते, तेव्हाच उत्पादक त्या उत्पादनात बदल घडवतो.
 
हे काहीच न करता नुसतीच बखोटी धरून काय सिद्ध होणार?
 
सक्ती हा मार्ग नव्हे, हे अजूनही पटत नसेल, तर पुढील उदाहरणांची खरीखुरी उत्तरं मनातल्या मनात द्या आणि अंतिम निर्णय घ्या.
 
  •  एखाद्या मराठीभाषक चित्रपट निर्मातीवर तुम्ही हिंदी चित्रपटच का काढता, मराठीत चित्रपट काढलाच पाहिजे,’ अशी सक्ती करता येईल का?
  •  एखाद्या मराठीभाषक घरात जन्मलेल्या परंतु इंग्रजीत कविता करणाऱ्या पोरसवदा कवीवर तू मराठीत कविता केल्याच पाहिजेस’, अशी सक्ती करता येईल का?
  •  एखाद्या मराठीभाषक घरात जन्मलेल्या शाळकरी विद्यार्थ्यांवर तू ऑप्शनल भाषा म्हणून जर्मन हा विषय का घेतलास, मराठीच घेतली पाहिजेस’, अशी सक्ती करता
  • येईल का?
 
उत्तरं सांगण्याची गरज नाही.
  ती सर्वानाच ठाऊक आहेत आणि पटण्यासारखी तर आहेतच आहेत. नाही का?

(25/7/10)

No comments:

Post a Comment