Friday, February 11, 2011

आधुनिक भारताची आधुनिक उपकरणे

हा मजकूर वाचण्यासाठी वाचक बहुश्रुत असला पाहिजे.. बहुश्रुतचा चालू अर्थ टीव्हीवर दिवसरात्र जी काही दळणे सुरू असतात ती डोळां देखिली नाहीत, तरी किमान ज्याच्या कानावरून तरी जातात, असा कोणीही इसम. टीव्हीवरील ‘टेलिशॉपिंग’ कार्यक्रमांमध्ये इंग्रजीभाषक पाश्चात्त्य मंडळी जे डबिंगजन्य ‘मराठी’ बोलतात, त्या मराठीत हा मजकूर वाचू शकलात, तर त्याची मजा- मुदलात असलीच तर- वाढेल.)
सुशी मोबाइल्स
 
सादर करीत आहोत
 
जपानच्या प्रसिद्ध सुशी कंपनीचे सुशी मोबाइल
 
खास भारतीयांसाठी बनवलेले
 
भारतात मोबाइल्सची संख्या जास्त आहे आणि तुलनेने स्वच्छतागृहे अर्थात टॉयलेट्स कमी आहेत
 
पण आता चिंता नको
 
आता सुशी मोबाइल्स वापरा
 
आणि सू-शीचा आनंद उपभोगा
 
मोबाइल आणि सू-शी?
 
हे काय गौडबंगाल आहे?
 
चक्रावलात ना?
 
असे भांबावू नका. आजच आपली ऑर्डर नोंदवा आणि सुशी मोबाइल खरेदी करा.
 
सू-शी करायला तुम्ही कुठेही जात असाल-
 
रस्त्याच्या कडेला
 
रेल्वेच्या रुळांवर
 
गटाराच्या काठावर
 
शेताच्या बांधावर
 
डोंगराच्या पायथ्याशी
 
किंवा कुठेही
 
सोबत ठेवा सुशी मोबाइल
 
या मोबाइलमध्ये आहे जबरदस्त पॉवरचा टॉर्च.. जो अर्धा किलोमीटर परिसरातली प्रत्येक गोष्ट उजळवू शकतो..
 
रात्रीच्या किर्र अंधारातही तुम्ही तब्बल अर्धा किलोमीटर अंतरातली प्रत्येक गोष्ट अगदी सूर्यप्रकाशात पाहात असल्यासारखी स्पष्ट पाहू शकता.
 
आता कुठेही सू-शीला बसा बिनधास्त
 
ना ट्रेनने उडवण्याचा धोका
 
ना साप-विंचू चावण्याचे भय
 
सुशी मोबाइलचा पॉवरफुल टॉर्च मारा
 
सुरक्षिततेची खात्री करून घ्या
 
आणि मग आरामात गाणी ऐकत बसा
 
सुशी मोबाइलच्या एफएम रेडिओवर
 
किंवा म्युझिक प्लेयरवर
 
त्याचा आवाजही अर्धा किलोमीटपर्यंत
 
स्पष्ट आणि कर्कश्श ऐकायला जातो
 
आता सत्यनारायणाच्या पूजेलाही स्पीकरवर खर्च करण्याची गरज नाही.
 
असा बहुगुणी, बहुउपयोगी सुशी मोबाइल जपानच्या आघाडीच्या कंपनीने खास भारतासाठी बनवला आहे
 
मग वाट कसली पाहाताय
 
उचला फोन, फिरवा नंबर आणि आपली ऑर्डर नोंदवा
 
आता!
 
नक्षलाइट टीव्ही
 
भारत देशात अनेक समस्या आहेत. सध्या जी समस्या देशाला सर्वात जास्त भेडसावते आहे, ती आहे नक्षलवादाची. देशातील जंगलांमध्ये आणि दुर्गम डोंगरी भागांमध्ये राहणा-या आदिवासींमध्ये नक्षलवादाचा फैलाव झाला आहे. नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये शेकडो जवान बळी पडले आहेत. या सगळय़ा हिंसेवर एक क्रांतिकारक उपाय. चीनमधील कंपनीचा नक्षलाइट टीव्ही.
 
आदिवासी नक्षलवादी का होतात?
 
कारण ते गरीब असतात. त्यांना चांगले अन्न, चांगले शिक्षण, चांगल्या सुखसुविधा मिळत नाहीत. त्यामुळे ते संतापतात आणि बंदूक उचलतात.
 
त्यांना या सगळय़ा गोष्टी तर आपण देऊ शकत नाही.
 
मग निदान चांगले मनोरंजन दिले तर?
 
कल्पना करा. तुम्ही जंगलात राहणारे, कंदमुळे खाणारे, उंदराचे मांस खाणारे आदिवासी आहात. अचानक तुमच्या घरी- म्हणजे तुमच्या झोपडीत किंवा झाडावर टीव्ही येतो..
 
टीव्हीवर कार्टून सुरू झाले की घरातले बच्चे खूश.
 
सास-बहूच्या मालिका किंवा पाककृतीचे कार्यक्रम सुरू झाले की बायका खूश.
 
आयपीएलची मॅच सुरू झाली की घरातले पुरुष खूश.
 
झाला ना एक सुखी परिवार?
 
अशा सुखी परिवारातील कोण बनेल नक्षलवादी?
 
विश्वास नाही बसत?
 
मग जरा मुंबईच्या झोपडपट्टय़ांमध्ये डोकावून पाहा.
 
जंगलांमधल्या आदिवासींपेक्षा वाईट अवस्थेत लोक राहातात येथे.
 
सांडपाण्याच्या गटारांवर घरे असतात त्यांची.
 
त्यांनाही चांगले अन्न, चांगले शिक्षण, चांगली वाहतूक व्यवस्था, चांगला मोबदला, चांगले वातावरण, चांगल्या सुखसुविधा यांच्यातले काहीही मिळत नाही.
 
तरीही त्यांच्यातून कोणीही नक्षलवादी बनत नाही..
 
.. का?
 
कारण, ते सगळे टीव्ही पाहतात.
 
बारा महिने, तेरा काळ, चोवीस तास टीव्ही पाहतात.
 
टीव्ही पाहताना त्यावरच्या खोटय़ा खोटय़ा जगात
 
रमून जातात.
 
त्याच कचकडय़ाच्या जगात आपण राहतो आहोत, असा भास त्यांना होतो. तो भास वास्तवाचा विसर पाडतो आणि त्यांचे जगणे सुसह्य करतो.
 
तोच उपाय आपण नक्षलवादाने प्रभावित झालेल्या क्षेत्रात केला तर?
 
पण त्या दुर्गम भागांत वीजच नाही, तर टीव्ही कुठून चालणार?
 
असाच विचार आला ना तुमच्या मनात?
 
त्यावर एकच उत्तर
 
चीनच्या प्रसिद्ध चांग ली अफू कंपनीचा नक्षलाइट टीव्ही.
 
या चमत्कारी टीव्हीला ना लाइट लागत ना केबल
 
ना डिश लागत ना अँटेना.
 
हा टीव्ही फक्त दिवसभर उन्हात ठेवायचा.
 
त्याच्या बॅट-यांमध्ये सौरऊर्जा साठते आणि दिवसरात्र टीव्ही चालू राहतो.
 
यातील अद्भुत चिनी तंत्रज्ञानाने बनवलेला डिकोडर सॅटेलाइटचे सगळे सिग्नल ग्रहण करतो आणि डिश टीव्हीच्या दर्जाचे चित्र दाखवतो.. सगळे चॅनल एकदम सुस्पष्ट दिसतात.
 
तुमच्या नक्षलाइट टीव्हीसोबत एक खास चार्जर मोफत.
 
पावसाळय़ाच्या दिवसात हा चार्जर कोणत्याही झाडामध्ये खुपसायचा आणि झाडाच्या ऊर्जेवर टीव्ही चार्ज करून घ्यायचा.
 
आहे ना सोपी पद्धत.
 
तेव्हा देशातील नक्षलवाद संपुष्टात आणण्याची शपथ घ्या आजच.
 
आजच नक्षलाइट टीव्हीची ऑर्डर नोंदवा आणि देशाची सुरक्षा मजबूत करा.
 
आत्महत्या करू इच्छिणा-या शेतक-यांना नक्षलाइट टीव्हीवर विशेष आणि भरघोस सवलत
 
आजच सक्षम अधिकाऱ्याकडून साक्षांकित केलेले आत्महत्या करीत असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करा आणि 50 टक्के सूट मिळवा.
 
वाट कसली पाहताय
 
फेका ती बेन्झीनची बाटली
 
मोडून टाका ती बंदूक
 
आणि फोन उचला, नंबर फिरवा, ऑर्डर नोंदवा
 
आता!

(18/4/10)

No comments:

Post a Comment