सदू दादूच्या घराची बेल वाजवतो. दादू दार उघडतो आणि खेकसून विचारतो, ‘‘काय आहे?’’
‘‘पेढे!’’ सदूच्या चेह-यावर विलक्षण आनंद दाटलेला, ‘‘मला दहावीला 90 टक्के मार्क मिळाले!’’
‘‘तुला.. आणि एवढे टक्के?.. तोंड बघ आरशात!’’ दादूचा चेहरा संतापाने वेडावाकडा झालेला..
‘‘आता तूच स्वत:चं तोंड बघ आरशात. साफ पडलेलं दिसेल. मोठा आयसीएसईचा स्टुडण्ट आहेस ना! खिरापतीसारखे मार्क वाटतात तुमच्या शाळा आणि तुम्ही आमच्या चांगल्या कॉलेजांमध्ये घुसखोरी करता. आता हे चालणार नाही. आमच्यासाठी सरकारने ‘बेस्ट फाइव्ह’चा नियम काढलाय. आता माझेही पाचच विषयांचे गुण धरून हा रिझल्ट लागलाय. आता बघू तुझ्या ९० टक्क्यांवर तू कशी चांगल्या कॉलेजात अॅडमिशन मिळवतोस ते!’’
* * *
एका आठवड्यानंतर.
दादू बेल वाजवतो. समोर सदू. त्याचा चेहरा पडलेला. दु:खमिश्रित संतापाने विचारतो, ‘‘काय आहे?’’
‘‘पेढे!’’ दादूच्या चेहऱ्यावर कुत्सित भाव, ‘‘मला चांगल्या कॉलेजात अॅडमिशन मिळाली! तुझं काय झालं?’’
‘‘प्रयत्न सुरू आहेत.. मिळेल लवकरच,’’ सदूचा चेहरा रडवेला.
‘‘उगाच थापा मारू नकोस. तुमच्या त्या ‘बेस्ट फाइव्ह’चे थ्री-थर्टीन म्हणजे तीन तेरा वाजलेले आहेत, हे सगळ्या जगाला ठाऊक आहे. आता तुझे मार्क 90 टक्क्यांवरून 85 टक्क्यांवर आलेले आहेत, हे मला ठाऊक आहे. तुला रेठरे बुद्रुकच्या एखाद्या कॉलेजमध्ये मिळाली तर मिळेल अॅडमिशन. मी मात्र मुंबईच्या बेस्टात बेस्ट कॉलेजात शिकणार. मग परदेशात जाणार. मोठा होणार. हा हा हा हा!’’
* * *
झरझर सरकती दृश्यमालिका.
दादूला उत्तम कॉलेजात प्रवेश मिळतो. तो भरपूर अभ्यास करतो. मित्रमैत्रिणींबरोबर मजा करतो. वर्षे झरझर जातात. दादू परीक्षा देतो. चांगल्या मार्कानी डिग्री मिळाली, हे आईवडिलांना सांगतो. सगळे आनंद व्यक्त करतात. आकाशात झेपावणारं विमान. डोळे पुसणारी आई. हात हलवणारे वडील.
* * *
सन : २०२०
त्याच आकाशातून परत येणारं विमान. सुटाबुटातला दादू एअरपोर्टवरून ऐटीत चालत बाहेर येतो आणि टॅक्सीला हात करतो.
‘‘टॅक्सी, टॅक्सी..’’
दोन तीन टॅक्सी येतात. दादू पत्ता सांगतो. टॅक्सीवाले मेलेल्या झुरळाकडे पाहिल्यासारखे त्याच्याकडे पाहून निघून जातात. एकजण तर ‘इतना नजदीक जानेका है तो पैदल जा ना ए घोंचू’ असं ओरडतोदेखील. पाचवी टॅक्सी त्याच्याजवळ येऊन थांबते, पत्ता ऐकून टॅक्सीवाला खेकसून पुढे जातो, अचानक टॅक्सी मागे येते. टॅक्सीवाला दादूकडे नीट निरखून पाहतो आणि ‘बैठो’ म्हणून सांगतो.
‘‘व्हॉट द हेल इज धिस!’’ टॅक्सीत बसल्याबरोबर दादू फुणफुणायला लागतो, ‘‘आय विल लॉज अ कम्प्लेन्ट अगेन्स्ट ऑल दीज रूड अँड शेमलेस कॅबीज, खटला भरेन मी सगळ्यांवर. भाडं नाकारतात म्हणजे काय?’’
‘ब-याच वर्षानी भारतात आलायत वाटतं तुम्ही?’ टॅक्सीवाल्यानं विचारलं.
‘‘हो, बट हाऊ डिड यू गेस? तुम्हाला कसं कळलं?’’
‘‘इकडचे कायदे ठाऊक नाहीयेत तुम्हाला. त्यावरून अंदाज बांधला. खटला त्यांच्यावर नाही, तुमच्यावर भरला जाईल, टॅक्सीवाल्याला जवळचं भाडं सांगितलंत म्हणून.’’
‘‘म्हणजे?’’
‘‘देशातल्या नव्या कायद्यानुसार रिक्षा-टॅक्सीवाल्यांना किमान पाच किलोमीटरपेक्षा जास्तीचंच भाडं द्यावं लागतं. जवळ जाणाऱ्यांनी पायी जावं किंवा स्वत:च्या गाडीने जावं, असा रूल आहे. प्रवाशानं जवळचं भाडं सांगितलंच, तर रिक्षा-टॅक्सीचालकाच्या मन:स्वास्थ्याचा भंग केल्याबद्दल प्रवाशाची तक्रार करण्यासाठी टोल फ्री नंबरही दिला गेलाय आम्हाला.’’
‘‘माय गॉड! धिस इज रिडिक्युलस. अरे, रिक्षा-टॅक्सी प्रवाशांसाठी आहेत की प्रवासी रिक्षा-टॅक्सीसाठी?’’
‘‘अर्थातच प्रवासी रिक्षा-टॅक्सींसाठी आहेत. खरंतर आम्हा रिक्षा-टॅक्सीवाल्यांना प्रवाशांचीही गरज नाही. आपलं सरकार घरबसल्या पेट्रोल अलाउन्स, सीएनजी अलाउन्स, मीटर अलाउन्स, युनिफॉर्म अलाउन्स, ड्रायव्हिंग अलाउन्स, नॉन-ड्रायव्हिंग अलाउन्स देते. त्यांनी रिक्षा-टॅक्सी चालवल्या नाहीत, तरी त्यांचं आरामात भागू शकतं. ज्यांना ड्रायव्हिंगचा शौक आहे, असेच लोक हात साफ ठेवण्यासाठी रिक्षा-टॅक्सी बाहेर काढतात. तेही प्रवासी वाहतूक केली, तर वाढीव बोनस मिळतो म्हणून.’’
‘‘आणखी काय काय फॅसिलिटीज देतं गव्हर्न्मेंट तुम्हाला?’’
‘‘मुलांना मोफत शिक्षण, महागाई भत्ता, विमा संरक्षण, दर वर्षाला बोनस असे थोडेफार बेनिफिट देतं आपलं सरकार. पण, आणखी काही मागण्यांसाठी आमच्या नेत्यांच्या चर्चा सुरू आहेत सरकारबरोबर. त्या मान्य नाही झाल्या, तर आम्ही संपावर जाणार.’’
‘मुळात तुम्ही रस्त्यावर येतच नाही गाड्या घेऊन, तर तुमचा संप झालाय, हे कसं कळतं लोकांना?’
‘लोकांना कळून काय करायचंय? मागण्या गव्हर्न्मेंट मान्य करणार ना. आम्ही आमच्या दारातच उभ्या असलेल्या रिक्षा-टॅक्सींपैकी जुनाट दोनचार गाड्या फोडतो. चॅनेलवाले दिवसभर त्याचं शूटिंग दाखवतात. आपोआप सगळ्यांना कळतं की संप चालू आहे म्हणून. गाड्यांचे विम्याचे पैसेही क्लेम होतात. मागण्याही मान्य होतात.’
‘माय गुडनेस. हे काहीतरी अद्भुतच आहे रे! सॉलिड मिजास आहे तुमची.’’
‘‘याला समानीकरण म्हणतात, मिस्टर दादू!’’ करडय़ा आवाजात टॅक्सीवाला म्हणाला.
‘‘हाऊ डू यू नो माय नेम?’’ दादू आश्चर्यचकित.
मान वळवून टॅक्सीवाल्याने दादूच्या नजरेला नजर भिडवली आणि म्हणाला, ‘‘मी सदू. आठवलो का मी तुला? तू समानीकरणाच्या अजब न्यायाने चांगल्या कॉलेजात गेलास. माझं शिक्षणच खुंटलं. मग वडिलांनी टॅक्सी घेऊन दिली आणि..’’
वाक्य पूर्ण न करताच सदूने करकचून ब्रेक मारून रस्त्याच्या कडेला टॅक्सी लावली आणि म्हणाला, ‘‘उतरा दादूशेठ!’’
‘‘अरे, पण मला जिथं जायचं होतं ते ठिकाण अजून बरंच दूर आहे..’’
‘‘हो. पण, मला जिथं जायचं होतं ते ठिकाण हेच आहे आणि सरकारी रूलनुसार रिक्षा-टॅक्सीवाला त्याला जिथे जायचं असेल, तिथेच जातो. वाटेत जमलं तर पॅसेंजरला ड्रॉप करतो. चल, तुझं पाकीट आण इकडे.’’
सदूने दादूचं पैशाचं पाकीट जवळजवळ हिसकावूनच घेतलं आणि त्यातून करकरीत नोटा काढून आपल्या खिशात भरल्या. हसत हसत तो दादूला म्हणाला, ‘‘रिक्षा-टॅक्सीचं भाडं ड्रायव्हरने आपल्या मनाप्रमाणे पॅसेंजरच्या पाकिटातून काढून घ्यावं, असाही सरकारचा नियम आहे..’’
सदू आपल्या टॅक्सीतून उतरत असतानाच पलीकडून एक बीएमडब्ल्यू आली, तिच्या ड्रायव्हरने कडक सलाम ठोकून सदूसाठी दरवाजा उघडून धरला. सदू ऐटीत बीएमडब्ल्यूमध्ये बसला आणि ती झोकात निघाली..
तेव्हा दादू पाच बॅगा कशाबशा सांभाळत फुटपाथवरून चालू लागला होता..(चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(27/6/10)
No comments:
Post a Comment