Tuesday, February 15, 2011

नवकारूण्य!


कारूण्य नाहीतर काय हो!
तसं पाहिलं तर माणसाची सगळी लाइफस्टोरीच करूण आहे. त्याचा वांधा हा आहे की त्याला वारशाने बुध्दी मिळालीये... तिचा वापर करण्याची बुध्दी मात्र वारशात मिळत नाही... तिच्यासाठी ज्याचा त्याने विचार करावा लागतो.
माणसाची सगळयात मोठी खोड म्हणजे त्याच्यापाशी जे असेल, ते त्याला नको असतं. जे नसेल, ते त्याला हवं असतं. लहानपणी पायाखाली स्टूल घेऊनही लाडवाच्या डब्यापर्यंत हात पोहोचत नाहीत, म्हणून तो लवकरात लवकर मोठं व्हायची स्वप्नं पाहतो. मोठा झाल्यावर हात लाडवापर्यंत पोहोचू लागलेले असतात, पण मन आणखी अप्राप्य अशा इतर कशाभोवती तरी भिरभिरायला लागतं. झालं, आता लहान मुलासारखं स्वच्छंदी (म्हणजे काय कोण जाणे! एका तरी पोराला 'स्वच्छंदी' जगण्याचं स्वातंत्र्य आहे का या अडाणी मोठया माणसांनी भरलेल्या जगात?) जगता येत नाही म्हणून मग तो 'लहानपण देगा देवा'चं रडगाणं गात बसतो.
पण त्याला सर्वात जास्त ओढ लागलेली असते ती तारूण्याची. लहानपणी 'मोठं' व्हावंसं वाटत होतं, तेव्हाचा काळ आठवा. 'मोठं' म्हणजे आपलं चाळिशीनंतरचं रूप नव्हतं येत तेव्हा नजरेसमोर. यायची ती (फक्त) विशीपंचविशी. माणसाला खरंतर तेवढंच मोठं व्हायचं असतं. काळानं, वयानं त्या टप्प्यावरच फ्रीझ व्हावं, असंच त्याला वाटत असतं.
त्यामुळेच पंचविशीतिशी उलटत जाते, चाळिशी येते, तसतसा त्याच्या तारुण्याला जोर येऊ लागतो... आता आपण तरूणच आहोत, हे ठसवण्याच्या भरात आपण अनेकदा टीनएजिशबालिश वागतो आहोत, याचंही भान सुटतं बिचाऱ्याचं. स्वप्न नवतारुण्याचं असतं, पण त्याचं रूपांतर नवकारूण्यात होत जातं.
प्रसिध्दीच्या झोतातल्या माणसांना तर तरूण राहण्याची शिक्षाच फर्मावलेली असते. म्हणूनच पडद्यावर चपळ, तरतरीत दिसावं म्हणून प्रसिध्द माणसं कदान्न खाऊन बारीक राहण्याचा प्रयत्न करतात. विचित्र व्यायाम आणि औषधोपचार करून 'सिक्स पॅक ऍब' वगैरे कमावतात.  पडद्यावर ती ओंगळ दिसतात आणि प्रत्यक्ष आयुष्यात असाध्य रोग झाल्यासारखी फिकुटलेली, निस्तेज. एखादी नटी इतकी बारीक होते, इतकी बारीक होते की पुढच्या सिनेमात ती हमखास अदृश्य मुलीची भूमिका करणार, याची आपल्याला खात्रीच पटते. प्रकाशझोतात सतत तरूणच दिसायच्या अट्टहासाने कुणी झोपतानाही विग घालून झोपतो. तो विग नंतर स्मशानभूमीपर्यंत सोबत करतो. कुणी ती झंझट नको म्हणून वीव्हिंग करून केसांचे पुंजकेच कायमचे चिकटवून घेतो. कुणाची दाढी शुभ्र पांढरी आणि केस मात्र नॅचरल काळया रंगात (अर्थातच रंगवलेले), असा अद्भुत नजारा. चेहऱ्यावर आणि शरीरावर असंख्य अत्याचारांचा मारा सुरूच असतो.
सामान्य माणसं सहसा या फंदात पडत नाहीत. पण, चुकून कधीतरी त्यांनाही टीव्हीवर झळकण्याची संधी मिळते आणि मग हटकून मेकओव्हर करून घ्यावा लागतो. मग काय विचारता महाराजा! अहाहा! सोन्यासारख्या मध्यमवयीन माणसाचं पोरकट पोर होऊन जातं पार. चित्रविचित्र हेअरकट करून घ्यावे लागतात. ते पुरेसे विचित्र दिसावेत म्हणून जेलबिल लावावं लागतं. बायका चेहऱ्यावर रोगण फासून फासून खोटी तकाकी आणतात आणि दातांना तेवढीच खोटी शुभ्र लकाकी. इतक्याने भागत नाही. स्पर्धेत त्यांच्या तोंडी वयाला न शोभणारी थिल्लर भाषा आणि अंगात विशोभित ट्रेण्डी कपडे हेही मस्ट.
हे सगळं तारूण्य आहे, अशी भाबडी समजूत करून दिलेली असते बापडयांची. खरोखरची तरूण पोरटी मात्र यांना पाहून थक्क होऊन फिदीफिदी हसत असतात...
...देव करो नि यांचं पाहून सगळं जग असं 'तरूण' न बनो.
ते जाम करूण दिसेल.


(थर्ड आय, महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment