Friday, February 11, 2011

आय लव्ह यू *

कोणाच्याही अंगावर गोड रोमांच आणणारे ते तीन अजरामर गोड शब्द.. आय लव्ह यू..
 
..‘आय हेट यू’ किंवा ‘दादाला नाव सांगेन’ किंवा ‘वुई आर जस्ट फ्रेण्ड्स’ किंवा ‘ए सुमन, फ्रेंडशिप देते का’ किंवा ‘ए रंजू, पिच्चरला येते का’ अशा वेगवेगळ्या वाक्यांपासून सुरू होणारा थरथरीचा, हुरहुरीचा, भांगेचा, झिंगेचा, सळसळीचा, खळबळीचा, तळतळीचा, तळमळीचा, हळहळीचा, आशेचा, निराशेचा प्रवास या तीन शब्दांच्या किना-यावर येऊन पोहोचण्याचं भाग्य ज्याला (किमान एकवार तरी) लाभलं, त्यालाच कळेल, हे तीन शब्द नेमकं काय घडवतात.. तोपर्यंत तापत्या कढईत तळून, लालजर्द निखा-यांवर पोळून, हत्तीच्या पायी देऊन, पुन्हा तापत्या कढईत सोडला जातोय अशी होरपळ होत असलेला जीव कुणीतरी जाहिरातीतल्या आइस्क्रीमच्या गोळ्याप्रमाणे अलगद आल्हाददायक रंगाच्या थंडगार ज्यूसच्या किंवा मिल्कशेकच्या काचेच्या स्टायलिश ग्लासात सोडावा, तसं अद्भुत गारेगार वाटतं हो जिवाला! सगळं जग हालचाल करायचं थांबलंय, जागीच फ्रीझ झालंय, जगातला सर्वात मोठ्ठा आवाज म्हणजे आपल्या हृदयाची धडधड आणि आपल्या जिवंत असण्याची दुसरी सर्वात मोठी खूण म्हणजे कानातून निघत असलेल्या वाफा, अशी उन्मनी अवस्था करणारा सुवर्णक्षण म्हणजे ‘इष्टपात्रा’च्या तोंडून निघणारे हे तीन शब्द.. आय लव्ह यू!
 
आता हे इतके महत्त्वाचे शब्द इंग्रजीतच का, असा ‘सैनिकी’ प्रश्न विचारून मूड खराब मत करो यार! आपल्या मराठी बाण्याची ही एक गंमतच आहे. अतिशय महत्त्वाचं किंवा एकदम फ्रीकआऊट असं काहीही बोलायचं असलं की आपल्याला इंग्रजी नाहीतर हिंदीचा आधार घ्यावाच लागतो. ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे’, ‘मला तू आवडते/तोस’मध्ये ‘इलू इलू’ची ‘ती’ गंमत नाही? व्हॉट से?
 
आय लव्ह यूया शीर्षकाच्या पुढे एक छोटासा स्टार आहे आणि कॉलमच्या खाली त्या स्टारचं स्पष्टीकरण दिलेलं आहे.. अटी आणि शर्ती लागू’, ते तुम्ही वाचलंत का?
 आय लव्ह यूवाचताना आपल्या चाणाक्ष नजरेला हा स्टार दिसला असेल, पण, कानात प्राण आणून आपण ज्याची वाट पाहात होतो, ते हे गोड, हवेहवेसे शब्द जेव्हा कानावर पडले होते, तेव्हा त्यांच्यासोबत हा स्टार किणकिणला होता का कानात?
 
थिंक ओव्हर इट!
 
या प्रश्नाचं उत्तर नाही, असंच असणार आहे.
 
आपलं प्रेम व्यक्त करताना किंवा आपल्यावर प्रेम व्यक्त केलं जात असताना ‘अटी व शर्ती लागू’ असा रुक्ष व्यावहारिक ठोका कोण वाजवेल आणि कोण ऐकेल? हे म्हणजे लताबाईंच्या नाजुक ‘ओ सजना, बरखा बहार आयी’मध्ये गाँग वाजवून ‘आला पावसाळा आला, आणा हरीण छाप छत्रीच आणा’ अशी जाहिरात टाकल्यासारखं आहे.
 
पण.. पण.. पण..
 
पण, प्रेमात पडलेला आणि प्रेमात ‘पडलेला’ आणि प्रेमात ‘यशस्वी’ झालेला/ली/ले कोणीही सांगेल, की ‘आय लव्ह यू’ म्हणताना किंवा ऐकताना कानावर न आलेल्या ‘अटी आणि शर्ती लागू’चीच भुणभुण हेच नंतर संपूर्ण प्रेमजीवनाचं किंवा प्रेम ‘यशस्वी’ झाल्यास संपूर्ण आयुष्याचं बॅकग्राऊंड म्युझिक बनून जातं.
 
‘आय लव्ह यू’ म्हणताना ‘जन्मोजन्मीची साथ’, ‘तुझ्याशिवाय जगणं अशक्य’, ‘तूच माझी मधुबाला’, ‘तूच माझा हृतिक रोशन’, ‘तुझ सा हँसी दुनिया मे नहीं’, असा सगळा हळहळा हुळहुळा तलम धुक्याचा पडदा असतो डोळय़ासमोर. गंमतीची आणि दुर्दैवाची गोष्ट म्हणजे हा पडदा हटण्याची हीच वेळ असते. तो जो हृदयाचे ठोके हाच मोठा आवाज आणि कानातून निघणा-या गरम वाफांचा सीन पाहिला ना आपण सुरुवातीला, तसं काही घडण्याची (किमान त्या प्रकरणातली) ती शेवटची घटिका असते. त्यानंतर असं काही घडत नसतं, असं काही घडणार नसतं. तोवर आकाशात विहरत असलेलं प्रेम ‘आय लव्ह यू’च्या मांज्याने कटतं आणि हेलकावे खात जमिनीवर येतं.. कारण, ‘आय लव्ह यू’च्या क्षणापर्यंत समोरचा माणूस आपला व्हावा, म्हणून उभयतांकडून कळत नकळत सुरू असलेलं ‘मोरपिसारा नृत्य’ प्रेमाचा रुकार मिळताच थांबतं आणि मोरपिसारा गुंडाळून एका कोप-यात पडतो. भविष्यात त्याचा झाडू म्हणूनच वापर होण्याची शक्यता उरते. बिनपिसा-याचा मोर किती कुरूप दिसतो, पाहिलात कधी?
 
अडनिड्या ओढाळ वयातल्या हल्लकफुल्लक प्रेमाचा सगळा डोलारा एकमेकांपासूनच्या ‘अंतरा’वर उभारलेला असतो.. ‘आय लव्ह यू’ने अंतर संपतं.. खरी जवळीक सुरू होते आणि जवळ राहून प्रेम करणं, हा जगातला सर्वात अवघड प्रकार.. म्हणूनच बहुतेक प्रेमांचा अंत ‘आय लव्ह यू’च्या उच्चाराने घडून येतो.. काही प्रेमांच्या अंताची ती सुरुवात असते, इतकाच काय तो फरक?
 
खोटं वाटतंय?..
 
मग, एका मित्राने जगातली सर्वात श्रेष्ठ प्रेमकविता म्हणून सांगितलेल्या या दोन ओळी वाचा..
 ‘माझं तुझ्यावर प्रेम आहे.. तुझ्या नाकातल्या मेकडासकट’
इतकं स्पष्ट प्रेम भयंकर अभद्र वाटतं ना!
 
पण, मग साता जन्माच्या शपथा घेताना आपली मधुबाला भल्या सकाळी झोपेतून जागी झाल्यावर विस्कटलेल्या केसांनी आणि सुजलेल्या डोळ्यांनी, विदाऊट मेकअप गाऊनवर कशी दिसेल, याचं किंवा आपला हृतिक रोशन भल्या सकाळी चट्टेरीपट्टेरी चड्डीवर ब्रश करत उभा असलेला कसा दिसेल, याचं कल्पनाचित्र रंगवा.. त्यावरही त्याच क्षणी प्रेम करता आलं, तर जिंकलात..
 
..कारण, प्रेमाच्या, जिव्हाळ्याच्या सगळ्याच नात्यांना ‘अटी आणि शर्ती लागू’चा स्टार असतोच असतो, या साक्षात्कारी ब्रह्मज्ञानाचा तो क्षण असेल.
                
* अटी आणि शर्ती लागू

(14/2/10)

No comments:

Post a Comment