Tuesday, April 29, 2014

बोला बोला, तुम्ही जाता का व्होटिंगला?

नमस्कार,
मी महापत्रकार शिरीष सर्वज्ञ माझ्या या कार्यक्रमात माझं... आय मीन तुम्हा सर्वांचं स्वागत करतोय... तुम्ही पाहता आहात टीव्हीच्या जगतातला सगळय़ात लोकप्रिय कार्यक्रम, माझा कार्यक्रम, माझ्यासाठी पाहिला जाणारा कार्यक्रम `सवाल माझा'... या कार्यक्रमातून आपल्या `आय-माय' वाहिनीने जगच काय, पण मंगळावरच्या रहिवाशांनाही जिंकून घेतलेलं आहे, असं मला गेल्या मंगळवारीच समजलं. माझ्यामुळे हा कार्यक्रम लोकप्रिय झालेला आहे, तुम्ही मला पाहण्यासाठी टीव्हीला खिळून राहाता, तरी मी तुमचा हिरमोड करून मी या कार्यक्रमात काही इतर माणसंही दाखवतो आणि त्यांना मधून मधून अडीच ते साडेतीन वाक्यंही बोलायची संधी देतो... त्यांची वाक्यं मी अर्धवट तोडतो त्यामुळे अडीच किंवा साडेतीन असाच हिशोब करावा लागतो. रोज मी माझ्या मते सर्वात महत्त्वाचा असलेला प्रश्न जगातल्या जनतेच्या वतीने कोणालाही विचारतो. कितीही मोठा माणूस असला तरी त्याच्या तोंडासमोर चाकू नाचवल्यासारखी पेन्सिल नाचवत `सगळं जग तुमच्याकडे उत्तर मागतंय' असं ओरडून सांगून मी त्यांचा शक्य तेवढा अपमान करतो. तुम्हा सर्वांना कोणाही मोठय़ा माणसाचा `लाइव्ह' अपमान झालेला पाहायला भयंकर आवडतं, तुम्ही खूष होता. कधीकधी तो माणूस डब्बल चेवाने माझा अपमान करतो, तेव्हाही तुम्ही टाळय़ा वाजवता. मग मी संधी साधून तुमचा अपमान करतो आणि मी टाळय़ा वाजवतो, मग मी खूष होतो. माझा शब्द अंतिम असतो, अंतिम विजय माझा असतो. कारण हा कार्यक्रम माझा आहे, सवाल माझा.
आता वळूयात आजच्या प्रश्नाकडे? आज मतदानाचा दिवस होता, त्यामुळे आजचा प्रश्न थेट आहे, तुम्ही मतदान केलंत का? केलं असेल, तर का केलंत, केलं नसेल, तर का केलं नाही? या माझ्या भेदक, मार्मिक आणि बिनतोड प्रश्नाला उत्तर देण्यासाठी मी इथे वेगवेगळय़ा क्षेत्रातल्या माणसांना बोलावलेलं आहे. आपण एकेका माणसाकडे वळूयात आणि त्यांना हा प्रश्न विचारून बोलतं करूयात. काळजी करू नका, मी त्यांना बोलू देणार नाहीच्चै. मीच बोलणार आहे, कारण हा आहे सवाल माझा!
या आहेत हिराबाई हरळे. या एका झोपडपट्टीत राहतात. मला सांगा, तुम्ही आज मतदान केलंत का?
हिराबाई ः हो! क्येलं की! (कॅमेर्याला बोटावरची शाईची खूण दाखवतात.)
पाहा पाहा, या बाईंकडे पाहा. या झोपडपट्टीत राहतात, पण त्यांना लोकशाहीचा चाड आहे. लोकशाहीतलं आपलं कर्तव्य त्यांना माहिती आहे, आपल्याला लोकशाहीने दिलेला अधिकार आपण बजावायला हवा, याचं भान त्यांना आहे. मी सलाम करतो त्यांना, त्यांच्या सजगतेला. तुम्हीही सलाम करा. मला सांगा हिराबाई. तुमी का मतदान केलंत?
हिराबाई ः का क्येलं म्हंजे? सकाळधरनं चार येळेला टेम्पो आलता, त्यो पंजावाला संभ्या आन् कमळवाला इज्या दोगंबी मानसं भरून भरून न्हेत हुते. घरटी किती ते मोजत होते. नाय गेलं शिक्का माराय आन् पक्या दादाला खबर लागली म्हंजी मग झोपडं र्हाईल का जाग्यावर माजं?
म्हणजे तुम्हाला मतदान करण्यासाठी धमकावलं गेलं? बळजबरीने मतदान केलंत तुम्ही?
हिराबाई ः आवो, जिबरदस्ती कसली त्यात. आता जो पेजेला दय़ेतो, तो शेजेला घेतोच की! यवडी चांगली साडी, येक ग्रमचं फस्क्लास मंगळसूत्र, वर वाटखर्चाला दोन गांधीजी देनार आसल कोनी शेट, तर त्याच्यासाठनं मिशिनीतलं येक बटन दाबाय काय जड हाय का आपल्याला?
बापरे! तुम्ही चक्क लाच घेऊन मत दिलंत आणि ते इथे माझ्या कार्यक्रमात माझ्यासमोर कबूल करताय. मला सांगा कोणी दिली लाच, कोणी दिली. ही ब्रेकिंग न्यूज आहे. या निवडणुकीत चक्क मतदारांना लाच दिली गेली आहे. मला सांगा. मला सांगा.
हिराबाई ः ये बाबा, काय याडबिड लागलं का तुला? लाचबिच काय नाय? फुकाट काय मिळतं का आजच्या जगात. कापल्या किरंगळीवर मूत म्हनलं तर मुततं तं का कोनी आसंच! आमी येवडं मत दय़ेयाचं, त्या बाब्याला निवडून दय़ेयाचं. त्या पाच साल पैसं खानार, माडी बांधनार, गाडी घेनार, तर त्येला खरच कराय नको का थोडाफार!
हिराबाई नुसतीच लाच घेत नाहीयेत, तर तिचं समर्थनही करतायत. मी हतबुद्ध झालोय. असं झालं की मी नेहमी जे करतो, तेच आता करणार आहे. मी घेणार आहे एक बेक.
( बेकनंतर) आता आपण वळूयात गंगाराम गोंदिवरेकरांकडे. हे एका चाळीत राहात होते, आता तिथे बिल्डिंग झालेली आहे. ते कनिष्ठ मध्यमवर्गातून वरिष्ठ मध्यमवर्गात आलेले आहेत. मला सांगा गंगारामभाऊ, तुम्ही मतदान केलं का?
गं. गो. ः हो केलं. (कॅमेर्याला बोटावरची शाईची खूण दाखवतात.)
का केलंत?
गं. गो. ः म्हणजे काय? लोकशाहीत सगळय़ा जन्तेचं कर्तव्य आहे ते, आपला अधिकार आहे. तो वाजवायलाच- आपलं ते हे- बजावायलाच हवा. आपण...
थांबा थांबा थांबा, इथे हे असे शब्दांचे फुगे फक्त मी उडवतो, मीच भाषण करतो, मीच तोंडची वाफ दवडतो, कारण हा माझा कार्यक्रम आहे, मी याचा सूत्रधार आहे, हा सवाल माझा आहे. तुम्ही भाषण देऊ नका. माझं काम करू नका. खरं कारण सांगा...
गं. गो. ः सिंपल आहे शिरीषभाऊ, जो लोकप्रतिनिधी आपल्यासाठी काम करतो, दिवसरात्र झटतो, त्याला आपण मत तर दय़ायलाच पायजे का नाय! ते तर आपलं कर्तव्यच आहे.
म्हणजे तुमच्या भागातले लोकप्रतिनिधी खरोखरच लोकांच्या साठी काम करतात? अहो, ही स्वातंत्र्योत्तर काळातली सगळय़ात मोठी ब्रेकिंग न्यूज आहे. ही तुम्ही माझ्या कार्यक्रमात पाहताय. मी तुम्हाला ती देतोय. गंगारामभाऊ, उगाच अफवा पसरवू नका. काय कामं तरी काय करतात तुमचे लोकप्रतिनिधी सांगा तरी आमच्या प्रेक्षकांना?
गं. गो. ः अहो आमच्या सायबांचा कामांचा धडाकाच आहे. आमचे साहेब गोविंदा पथकाला टी शर्ट देतात, वर खर्ची देतात. आमच्या एरियातल्या ए टु झेड उत्सवांना देणग्या देतात. त्यांच्या प्रयत्नामुळे आमच्याकडचे सगळे दुकानवाले पण चुपचाप भंडार्याला, साई उत्सवाला, गणपतीला, दांडियाला हरी पत्ती ढिल्ली करतात...
म्हणजे तुमचे लोकप्रतिनिधी व्यावसायिकांना दम देऊन तुमच्या खंडण्यांची सोय करतात असं म्हणायचंय का तुम्हाला?
गं. गो. ः देवाच्या कामाला खंडणी म्हणता तुम्ही? अहो, सांस्कृतिक कार्य आहे हे. आमची अस्मिता आहे. गर्व आहे आम्हाला. तुम्ही असं बोलून आमच्या भावना दुखावता? हय़ाला एकदा खर्चापानी दिला पायजे, असं आमचे साहेब म्हणतात ते काय उगाच नाय!
तुमचे साहेब असं म्हणतात... ही तर मारहाणीची धमकी झाली. ती तुम्ही मला माझ्याच कार्यक्रमात येऊन देताय?
गं. गो. ः नाय वो, मिसअंडरस्टँडिंग करू नका. तुमचा हा जो काय पोगाम असतो, त्याचा खर्चापाणी देऊन एकदा तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाकू आणि सगळा मॅटर सेटल करून टाकू म्हणत होते आमचे साहेब. त्यांना भेटलात की तुमचं मतपरिवर्तन होईल. एकदम साधा माणूस वो. पाच वर्षांमागे रिक्षा चालवायचा. आज सोन्याचं घडय़ाळ वापरतो, गळय़ात सोन्याच्या चैनी आहेत आठ-दहा. फॉरच्युनर आणि पजेरोच्या खाली गाडी वापरत नाय, करोडोंमध्ये खेळतो, पण गल्लीत आला की गाडीतून उतरून पायाला हात लावणार आणि काका कशे आहात म्हणून विचारणार. काय अडीनडीला खिशात हात घालणार आणि जो बंडल निघेल तो हातात ठेवणार. माझ्या एका पोराला पण नोकरी दिलेली आहे बिल्डरकडे. दुसर्यालाही पाठवलाय साहेबांकडे ते सांगतील तिकडं दगड हाणायला.
थोडक्यात म्हणजे तुम्हाला ही सगळी लोकांची कामं वाटतात, समाजाची कामं वाटतात. ही लोकप्रतिनिधीची कामं वाटतात...
गं. गो. ः वाटतात म्हणजे? नायतर काय कामं असतात पब्लिकची? अभ्यासबिभ्यास करणार्या जंटलमन लोकांचा फायदा काय या कामात? पब्लिकची डिमांड समजली पायजे. आमच्या एरियात येऊन बघा. साहेबाला मत देणारे आम्ही सगळे येडे आणि हितं टीव्हीवर ज्ञान पाजळणारे तुम्ही शाणे, असं कधी असतं का राव.
गंगारामभाऊ, मला आता तुमच्याकडून पुढे वळावं लागतंय, आजच्या आपल्या शोच्या पुढच्या पाहुण्या आलेल्या आहेत. यांना तुम्ही इंग्रजी पेपरांच्या पेज थ्रीवर पाहात असता. या श्रीमंत वर्तुळातल्या पाटर्य़ांमध्ये वावरणार्या एक माजी मॉडेल आहेत. एका क्रिकेटपटूशी, दोन नटांशी आणि एका उदय़ोगपतींशी त्यांचा विवाह झाला होता. सध्या त्या एका तरुण, उगवत्या दिग्दर्शकासोबत सगळीकडे दिसतात. त्यांचं आपण या शोमध्ये स्वागत करूयात. वेलकम मिस छैला चैनसुखानी.
छैला ः हाय!
मला सांगा, तुम्ही मतदान केलं आहेत का?
छैला ः ओह माय गॉड! वॉज इट टुडे? तरीच मी लुलूला म्हणाले, बेबी, आज सगळीकडे इतके क्यू कसले दिसतायत अँड व्हाय सो मेनी पुलिस पीपल आर अराउंड. लुलू- माय स्वीट लिट्ल पूड्ल... अच्छा, ती व्होटिंगची गर्दी होती होय. आयम सॉरी मिस्टर सर्वग्य, आय मिस्ड इट ऑर रादर दि गाइज फायटिंग फॉर दि सीट मिस्ड मी.
अहो, तुम्ही इतक्या कॅज्युअली सांगताय मतदान न केल्याचं. मला भयंकर राग आलाय. संताप आलाय. मतदानासारखं पवित्र कर्तव्य तुम्ही चक्क विसरून जाता आणि वर हसत खेळत सांगता. कसा बदल होणार आपल्या देशात? कसं होणार परिवर्तन? कसा जाणार हा देश पुढे? उच्चवर्गीयांची ही अनास्था.
छैला ः ओह कमॉन मिस्टर सर्वग्य. कूल इट, कूल इट. टेक अ चिल पिल. व्हॉट्स द बिग डील इन व्होटिंग? मी व्होटिंग सेंटरला गेले असते, तरी त्यांनी मला अलाव केलं नसतं.
का?
छैला ः आय डोन्ट हॅव दॅट सिली व्होटर आयडी कार्ड. 
सिली?
छैला ः नाहीतर काय! इट इज सो ओल्ड फॅशन्ड. अ डिझाइन डिझास्टर. डु यू थिंक आय वुड कॅरी दॅट शॅबी थिंग ऑन माय पर्सोना. ओह नो, ओव्हर माय डेड बॉडी? अँड कोण तिकडे रांगा लावणार टु गेट दॅट कार्ड?
तुम्ही मतदार ओळखपत्र फॅशनेबल नाही म्हणून मतदान करणार नाही आणि ते घ्यायला रांगा लावायला लागतात, म्हणून ते काढणार नाही. अहो, लोकशाहीतल्या या मौलिक अधिकारासाठी थोडा वेळ दय़ायला काय हरकत आहे?
छैला ः व्हॉट रबिश! जग खूप पुढे गेलंय मिस्टर सर्वज्ञ. ऍक्चुअली त्यांनी फेसबुक, जीमेल, ट्विटर, व्हॉट्सऍपचा वापर करायला पाहिजे ही कार्ड डिलिव्हर करायला. गिव्ह मी अ कोड, मॅच इट अँड अलाव मी टु व्होट, इट इज सो सिंपल. ऍक्चुअली सगळं व्होटिंग सोशल नेटवर्किंगवर घेता येईल. आय कॅन व्होट फॉर एनी लूझर इन झुमरीतलय्या, फ्रॉम द कम्फर्ट ऑफ माय मर्क... मर्सिडीझ यू नो.
बाई, माझं डोकं भिंगून गेलं तुमचे हे थोर विचार ऐकून. या सगळय़ा सुधारणा झाल्या पाहिजेत, असं मलाही वाटतं. पण, त्या होईपर्यंत तुम्ही मतदानच करणार नाही आणि वय त्याचं समर्थन करणार, हे काही मला पटण्यासारखं नाही. प्रेक्षकांनाही पटण्यासारखं नाही. मतदान केलंच पाहिजे, त्याशिवाय देशातली लोकशाही परिपूर्ण होणार नाही, प्रत्येकाच्या बोटावर आजच्या दिवशी ही खूण असलीच पाहिजे आणि काही गर्वाने मिरवायचंच असेल, तर आपण ही खूण मिरवली पाहिजे...
(कॅमेर्याकडे बोट दाखवतो. त्यावर शाईची खूण...
टपाक्...
वरच्या एसीच्या व्हेंटमधून पाण्याचा एक थेंब बोटावर पडतो... शाई पुसट होते...
टपाक्
शाईचा बोटावर केलेला सगळा मेकअप पुसला जातो, तसा शिरीष सर्वज्ञच्या चेहर्यावरचा जग जिंकल्याचा भावही पुसला जातो. गडबडून... बोट मागे लपवत... पिचक्या आवाजात)
लोकशाहीतलं हे पवित्र कर्तव्य तुम्ही तरी पार पाडायला विसरू नका... तुम्ही पाहात होता, `सवाल माझा.' आता पाहा कलटी माझी.
(क्षणार्धात स्क्रीनवरून गायब होतो.)

No comments:

Post a Comment