Tuesday, April 29, 2014

`आप' इफेक्ट

आप म्हणजे आम आदमी पार्टी.
सांप्रतकाळी या पक्षाचा फारच बोलबाला आहे. आजवर ज्या पक्षांनी आणि त्यांच्या `पक्ष'पाती राजकीय लेखकांनी, उंटपृष्ठावतारी मार्गदर्शक संपादकांनी आणि राजकारण हा क्रिकेटप्रमाणेच एक क्रीडाप्रकार मानून त्याची मौज लुटणार्या बघ्यांनी या पक्षाची, त्यांच्या कार्यकर्त्यांची टिंगल उडवली, त्यांना आता आपले शब्द गिळावे लागले आहेत. हे काय आंदोलन करणार, म्हटल्यावर त्यांनी आंदोलन केलं, हे काय राजकारण करणार, म्हटल्यावर त्यांनी निवडणुका लढवल्या, हे काय निवडून येणार म्हटल्यावर त्यांनी दणदणीत विजय मिळवले, हे काय सत्ता सांभाळणार म्हटल्यावर त्यांनी सरकारही स्थापन केले... इतके झाल्यानंतर उपरोल्लेखित महानुभावांनी हे काय राज्य करणार, हा प्रश्न काही काळाकरता स्थगित करायला हरकत नव्हती... पण, तोही प्रश्न आताच विचारला जातो आहे... यांची राज्य करण्याची पद्धत वेगळी असेल, याची कल्पना असतानाही जुन्या, मोडक्या फुटपट्टय़ांनी यांना मापण्याचे उदय़ोग चालले आहेत. हे काय राज्य करणार या प्रश्नाचं उत्तर जेव्हा मिळायचं तेव्हा मिळो, पण सध्या तरी हाती झाडू घेतलेल्या आणि डुईवर गांधी टोपी घातलेल्या आम आदमीने भल्या भल्या `खास आदमी पक्षां'ची झोप उडवून टाकली आहे, हे निश्चित. `आप'च्या उदयानंतर काही विशिष्ट उदय़ोगधंदय़ातल्या माणसांवर खूपच प्रभाव पडलेला आहे, त्यांच्या आयुष्यात बदल झाला आहे. चला, त्यांची भेट घेऊन जाणूयात त्यांच्यावर झालेले `आप इफेक्ट' त्यांच्याच तोंडून!
उचललास तू झाडू हातभर, साम्राज्याचा खचला पाया
झंपकलाल झाडूवाला, प्रोप्रायटर, डबलझेड झाडू सेंटर
हे पाहा, मी तुमच्याशी दोन मिनिटांच्यावर बोलणार नाही, टाइम नाही. आमच्या झाडून सगळय़ा पिढय़ा याच धंदय़ात आहेत, पण असा सेल आजवर कोणी बघितला नव्हता. आजवर आम्ही देशाच्या सफाईच्या कामात केवढं योगदान दिलं, याची कल्पना आजवर कोणालाही नव्हती. उलट सगळे आम्हाला हिणवायचे. मला रस्त्यावरचा कोणीही चायवालासुद्धा `झाडूवाला झाडूवाला' म्हणून टोचायचा. आता सांगा, झाडूच्या धंदय़ात काय वाईट आहे? आम्ही झाडू बनवले नसते, विकले नसते, तर तुम्ही घरदार स्वच्छ करू शकला असता का? आम्हाला तेव्हा चिडवणार्यांच्या हे लक्षात आलं नसेल की आम्ही एक दिवस अख्ख्या देशाच्या सफाईच्या कामाला येऊ. अरविंदभाईंनी आप पार्टीचं चिन्ह म्हणून खराटा निवडला आणि आमच्या धंदय़ाची गाडी झाडूवर बसलेल्या हॅरी पॉटरसारखी आकाशात उंच उंच उडायला लागलेली आहे. जिथे शेकडय़ांनी खप नव्हता, तिथे हजारांचे आकडे पार झालेले आहेत. आमच्या दोन ब्रँच ऑलरेडी ओपन झाल्यात, दोन लवकरच ओपन होतील. पूर्वी जंटलमन लोक आमच्या दुकानात फारसे यायचे नाहीत. त्यांच्याकडच्या कामवाल्याच झाडू घेऊन जायच्या. आता कामवाल्यांच्या घरासाठीही गॉगल घातलेल्या, सेंट मारलेल्या मॅडम लोक झाडू घेऊन जातात. एक आतली गोष्ट सांगतो. मी तर `आप'ची झाडू ब्रँच इथे आहे, असा बोर्डपण लावून टाकलाय आणि डोक्यावर गांधी टोपी घालून दुकानात बसतो. बाजारपेठेत हप्ता गोळा करणारे भाई लोक आणि पोलिसांचे पंटर आता आपल्या दुकानावरचा बोर्ड वाचून सुमडीमध्ये कल्टी मारतात. ज्यांना बोर्ड वाचता येत नाही, ते आत आले तर टोपी बघून पळ काढतात.
...
या टोपीखाली दडलेय डोके!
ना. य. डोके, मालक, स्वदेशी गांधी टोपी सेंटर
हसलात ना, माझ्या नावाला हसलात ना! हसा हसा! त्याने तुमचे अस्वच्छ दात दिसण्यापलीकडे काय होणार? तुमच्यावर कशाला रागावू? गेली 45 वर्षं डोक्यावर असलेल्या गांधी टोपीतून डोक्यात थोडा तरी अर्क पाझरला असेलच ना! तुमच्याप्रमाणेच आमच्या घरातलेही माझ्या नावाला हसत होते. गांधी टोपीच्या व्यवसायात मी आहे म्हणजे मला `डोके ना.य.' असंच त्यांना वाटत होतं. त्यांना हे ठाऊक नव्हतं की शहरांमधल्या, शिकल्या-सवरलेल्या मंडळींनी कितीही बोटं मोडली आणि बापूजींना कितीही नावं ठेवली तरी त्यांची ही टोपीच गोरगरिबांच्या डोक्याचं आजही उन्हापासून रक्षण करते. त्यातून आमची गाडी रुटुखुटू चालली होतीच. आम्ही पडलो सर्वोदयी. आमच्या गरजा फार नाहीत. आहेत त्या टोपीच्या धंदय़ातून भागत होत्या. बापूंची मात्र कमाल हो! पक्का बनिया. आयुष्यभरात आपण कधीच न घातलेली टोपी त्यांनी इतरांना घातली आणि तीच टोपी आमच्या अरविंदाने इथल्या सगळय़ा बनेल राजकारण्यांना घातली आहे. गांधीजींना गोळी घालून ते संपले नाहीत, तेव्हा त्यांच्याविषयी गरळ ओकून त्यांना संपवण्याचे प्रयत्न झाले. आम्हाला वाटलं तरुण पिढी याला बळी पडते की काय? पण, नाही हो! कसल्याबसल्या हंगेरियन टोप्या, फॅशनेबल माकडटोप्या वगैरे घालणार्या आजच्या पोरांनी हौसेने येऊन गांधी टोप्या खरेदी करायला सुरुवात केली, तेव्हा लक्षात आलं, अजून या देशाबद्दल आशा बाळगायला हरकत नाही. आपल्या अण्णांनी उपोषण केलं, तेव्हा `मैं अण्णा हूँ'च्या टोप्यांची चलती होती. पण, आम्हाला तेव्हाच लक्षात आलं होतं की या टोप्यांचा स्टॉक ठेवायचा नाही. बनवायच्या, विकायच्या, हे प्रकरण टिकणारं नाही. अण्णांनी स्वतःचा उदोउदो थांबवायला हवा होता. नंतर अरविंदाने पक्ष काढला तेव्हा आता `मैं अरविंद हूँ' अशा टोप्या बनवायला लागतात की काय! पण, अरविंदा शहाणा निघाला. त्याने `मैं आम आदमी हूँ'च्या टोप्या तयार करवल्या, तेव्हाच लक्षात आलं की या गडय़ाच्या टोपीखाली कच्चं मडकं नाही, पक्कं मडकं आहे. आता आमच्या सगळय़ा कारागिरांच्या हाताला उसंत नाही, इतक्या टोप्या बनताहेत, खपताहेत. आदिवासी गावातल्या पोरांच्या शिक्षणावर ही सगळी कमाई खर्च होणार आहे. एक गंमत सांगतो आणि मग काउंटरकडे जातो, गिर्हाइकं खोळंबलीत. आमच्याकडे रात्रीच्या अंधारात चोरून प्रस्थापित पक्षाचे काही पुढारी येतात. अमक्या रंगाची टोपी बनवा, तमक्या रंगाची टोपी बनवा, अशा ऑर्डरी घेऊन. काहींना जरीच्या, वेलबुट्टीच्या, इम्पोर्टेड कापडाच्या डिझायनर टोप्या हव्या होत्या. मी सांगितलं, बापूंनी बनवली तीच टोपी इथे बनणार. तुमचं डोकं कधी चुकून त्या मापाचं झालंच, तर या! आता सांगा, `हा. य. ना डोके'?
...
झाडून सार्याजणी!
हौसाबाई, भागूबाई आणि गुणाबाई (रस्ता झाडणार्या झाडूवाल्या)
आत्ता गं बया! मुलाखत आन् आमची? हय़ो येक तापच होऊन बसलाय बगा आमाला! त्या केजरीवाल बाबाला नव्हता धंदा! त्यानी आमचा झाडू उचलला आणि रोज स्वच्छ रस्त्यावरून फिरणार्यांना पयल्यांदाच आमची आटवन झाली. खरं सांग बावा, तू बी रोज हय़ा रस्त्यानं जात असशील. फाटे फाटे कधी जाताना आमी बायामान्सं झाडू मारताना, कचरा गोळा करून रस्त्याकडेला लोटताना, पाचोळा गोळा करताना आमास्नी बघत असशील, तुला आजपत्तूर कदी वाटलं होतं का आमच्याशी दोन शब्द बोलावंसं? आज तुला आमची मुलाखत घ्यावीशी वाटायला लागलीये. परवा ती टीव्हीवाली बाय बी आलीवती. मुकादम तर बोलला आता हितून पुडं कोन आला तर मुलाखतीचे शेपाश्शे रुपये मागून घ्या. येकदा त्या केजरीवाल बावावरून राजकारनाचा झाडू फिरला की आपल्या झाडूला परत कोनी इचारायचं नाही. आताच कमाई करून घ्या. तू किती देतोस बोल! अरं, आजकाल आमच्याकडं लई जंटलमन लोकं आनि बाया शिकवनीला येत्यात सांजच्याला. कायाची शिकवनी? झाडू धरन्याची, झाडू मारन्याची. परवा तर त्या लांब दांडय़ाच्या झाडूसारक्या दिसनार्या शेलाटय़ा माडेलनीबी आल्यावत्या, झाडू घ्येऊन फ्याशन शो करायचाय म्हनं त्यास्नी! म्या म्हटलं आदी कापडं तर घाला अंगभर. अशी बोटभर चिंदी गुंडाळाल तर लोक झाडूकडं काहून बघतील! काय काय लोक आपोजिट पार्टीचे पन येतात. झाडूची तपासनी करायला. या झाडूत अशी काय जादू हाय ते काय कळंना झालंय त्यांना. आप्रेशन करून बगनार म्हन्त्यात झाडूचं. येक तुला सांगून ठेवते बाबा! आमच्या कामातलं गुपित हाय. जिथं चिवट कचरा जमा हुतो ना, तितं नाजुक केरसुनीनं धुरळाबी उडत नाय, तिथं जाड हिराचा खराटाच लागतो खरखरीत. खराटा हातात घ्यायची पाळी येऊ दय़ाची नसेल, तर शान्या मानसांनी कचराबी येळच्या येळी झटकून टाकावा, साठवून ठेवू नये. काड शंबर रुपये!
वाचकहो, या झाडू आणि टोपीमाहात्म्याचा प्रचलित राजकारणावर काय परिणाम झाला आहे, हे पाहण्यासाठी आम्ही आमचे स्फूर्तिस्थान असलेले आदरणीय नेते आबादादा बाबाजी यांच्या बंगल्याकडे मोर्चा वळवला. मात्र काही अपरिहार्य कारणामुळे त्यांची मुलाखत या अंकात देणे शक्य झालेले नाही. कारण, आम्ही बंगल्याची पायरी चढत असताना आतून सौ. वहिनींचा सुपरिचित सुमधुर स्वर कानांमध्ये शिरला, त्या आदरणीय आबादादा बाबाजी यांच्यावर खेकसत होत्या, ``ती मेली गांधी टोपी डोक्यावर बसवण्याचा उदय़ोग थांबवा आणि आधी बाजारात जाऊन एक चांगलासा झाडू घेऊन या.'
``का?'' तेजतर्रार आदरणीय बाबाजींचा इतका मवाळ स्वर प्रथमच ऐकला.
``का काय विचारताय,'' वहिनींचा पारा आणखी चढला, ``त्या झाडूवाल्याने तुमचं राजकारण साफ करून टाकलंय पार. आता पक्षकार्यालयात चकाटय़ा पिटायला जाण्याच्या ऐवजी मला घर झाडून घ्यायला मदत करा! आधीपासून प्रॅक्टिस केली असती तर ही टोपीसुद्धा वेळेवर फिट बसली असती तुमच्या डोक्याला.''
आम्ही हातातला झाडू दडवण्याची कोशिश करत ताबडतोब तिथून पळ काढला, हे सांगणे न लगे! 

No comments:

Post a Comment