Tuesday, April 29, 2014

वेलकम टु `झोल' नाका!

...गार हवेच्या सपकार्याने आम्ही अचानक जागे झालो आणि पाहतो तो काय! आम्ही एका शोफर ड्रिव्हन झुळझुळीत मोटारीत ऐटीत बसलेलो होतो आणि मोटार पोटातलं पाणीही न डुचमळवणार्या एका चौपदरी रस्त्यावरून वेगाने चालली होती... आम्ही चमकलोच. आमच्या बुडाखाली मऊशार आसनाची गारेगार मोटार. आरशात पाहिलं तर चेहरा आमचाच. अरेच्चा, हा काय चिमित्कार, असा विचार मनात येतो ना येतो, तोच भल्या सकाळी सहय़ाद्री गेस्ट हाऊसात झालेली, आमचे आदरणीय परममित्र आणि महाराष्ट्राचे मामु म्हणजे माननीय मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबाजी चव्हाण यांच्याबरोबरची गुप्त भेट आठवली...
...भेट गुप्त असल्याने आम्ही दरवाजा न वाजवतात दालनात शिरून फायलींवर सहय़ा करीत बसलेल्या बाबाजींच्या जवळ गेलो. फायलींच्या ढिगाभोवती तीन नवीकोरी पेनं कोरडी होऊन उताणी पडली होती आणि चौथे बाबाजी झटकून पाहात होते, त्याचीही शाई बहुदा संपली होती. तिचा शिंतोडा आम्ही चुकवताना धडपडलो आणि आवाजाने ते तिकडे दचकले. ``काय हे, नॉक करायचं ना येण्यापूर्वी! तुम्हीही अगदी दादांसारखे...'' यांच्या आयुष्यातल्या दोन्ही (एक राष्ट्रवादी आणि दुसरे स्वपक्षीय कोकणसम्राट) दादा आठवून आम्ही सहानुभूतीपूर्वक हसलो.
विषय बदलून ते म्हणाले, ``जरा फोटोबिटो काढा. निर्णय घेत नाही, घेत नाही, म्हणून दोन वर्षं ओरडत होतात ना! आता वीस वर्षांचे निर्णय एकदमच घेतले, तेव्हा का नाही दखल घेत. चौथं पेन आहे हे निव्वळ सहय़ांनी संपलेलं. आहात कुठे?''
``आधी कल्पना दिली असतीत, तर गिनीज बुकवाल्यांना सोबत घेऊन आलो असतो. `ते' किंवा `हे', कोणतं तरी वर्ल्ड रेकॉर्ड झालंच असतं तुमच्या नावावर,'' आम्ही खिंकाळलो.
``करा, करा, चेष्टा करा. मित्र म्हणून बोलावून घेतलं गुप्त कामगिरीसाठी आणि हे खिल्ली उडवतायत...''
`गुप्त कामगिरी', `मसलत', `खलबत', `कारस्थान' वगैरे शब्द ऐकले की आम्हाला फार स्फुरण चढतं. (हा लहानपणी भालजी पेंढारकरांचे सिनेमे पाहिल्याचा परिणाम की आता मर्द उद्धोजींची भाषणं ऐकल्याचा परिणाम हे कोडं आम्हाला आणि आमच्या मनोचिकित्सकालाही अजून उलगडलेलं नाही.) आम्ही ताबडतोबीने `अटेन्शन'मध्ये उभं राहून प्रयत्नपूर्वक चेहरा गंभीर केला.
``हे पाहा. चार-सहा पेनं झिजवून आम्ही महाराष्ट्रावर निर्णयांचा पाऊस पाडलेला आहे. आता महाराष्ट्रात सगळीकडे आनंदीआनंद, आबादीआबाद आणि निवडणुकीत काँग्रेस झिंदाबाद... (चेहरा कसनुसा करून) काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी झिंदाबाद! असं आमचं गणित आहे. तुम्ही गुप्तपणे राज्यात फिरा आणि दोनचार दिवसांत आम्हाला रिपोर्ट दय़ा की आमचं गणित किती यशस्वी होतंय...''
निघता निघता बाबाजींनी दोन किलोचा एक गठ्ठा हातात कोंबला होता... ही नुकत्याच केलेल्या निर्णयांची यादी होती म्हणे...
...त्यानंतर आम्ही थेट इथे होतो... या शोफर ड्रिव्हन मोटारीत... गाडीचा वेग मंदावल्याने आमची विचारतंद्री भंग पावली, समोर निरखून पाहिलं तर टोलनाका.
``अर्रर्रर्र, एखादय़ा बाजूच्या रस्त्याने घ्यायची ना रे गाडी! आजकाल महाराष्ट्रात पेट्रोलपेक्षा टोलचा खर्च जास्त होतो रे बाबा! तुला काय कळायची पगारदारांची दुःखं,'' असं म्हणे-म्हणेपर्यंत गाडी टोलनाक्यापाशी पोहोचली. आधी कळलं असतं तर पोतडीतून राज ठाकरेंचा फोटो आणि मनसेचं स्टिकर काढून चटकन् लावता आलं असतं... पण, आता काही उपयोग नव्हता, आता सदर्याचे खिसे चाचपण्याचा अभिनय तरी करणं आलंच... तेवढय़ात असे कडक शोफरच पैसे काढतात, असा आमचा (अर्थातच फुकट) प्रवासाचा दांडगा अनुभव सांगतो...
आम्ही जिवाच्या कराराने खिसे उलटेपालटे करत असताना गाडी नाक्यावरच्या बूथजवळ थांबली. ड्रायव्हरही पक्का बेरक्या. त्याने मागची बाजू बूथसमोर येईल अशीच गाडी उभी केली आणि आमच्याच बाजूची काच खाली केली. खिडकीतून अचानक हात आत आला आणि त्या हातात गुलाबाचं फूल!
...``आता या फुलाचेही दहा रुपये लावणार का टोलमध्ये?'' आम्ही जन्मजात खवटपणाला जागून बोललो, पण, पुढे त्याच हातातून पाचशे रुपयांची नोट डोळय़ांसमोर आल्यावर आमची बोलती बंद झाली.
टोलनाक्यावरचा कर्मचारी सुहास्यवदनाने आम्हाला 500 रुपयांची लाच देतो आहे! बाबाजींनी सोपवलेल्या गुप्त कामगिरीची खबर यांच्यापर्यंत पोहोचलीही! काय समजतात काय हे पत्रकारांना? (`काय चुकीचं समजतात?' आमचं खवचट मन आमच्याशीही तसंच वागतं.) असे संतप्त विचार मनात येऊन आम्ही त्याला झाडण्याच्या उद्देशाने दरवाजा उघडण्याच्या खटपटीला लागणार, तेवढय़ात आसपास लक्ष गेलं तर प्रत्येक बूथवर हाच प्रकार सुरू होता. चक्रावून आम्ही टोल कर्मचार्याला विचारलं, ``अरे बाबा, टोल नाकाच आहे ना हा?''
त्याने नाक्यावरच्या बोर्डाकडे बोट दाखवलं. त्यावर चक्क `झोल नाका' असं लिहिलेलं होतं. टोल नाक्यावर काय चालतं, ते थेट नावातूनच व्यक्त करण्याची ही आयडिया बेष्टच आहे, असं आमच्या मनात येतं ना येतं, तोच खाली त्याचा लाँगफॉर्म दिसला, `जन हित ओनामा लिमिटेड'.
``अरे, ही ओनाम्याची काय भानगड आहे?'' आमच्या पृच्छेवर तो सुहास्यवदन कर्मचारी उत्तरला, ``ओनामा म्हणजे श्रीगणेशा. जनहिताचा श्रीगणेशा.''
``अच्छा, म्हणजे पाच वर्षं एनिमा आणि निवडणूकवर्षात जनहिताचा ओनामा!'
आमच्या टिपणीकडे साफ दुर्लक्ष करून त्या सरकारी रोबोने पढवलेली पोपटपंची चालूच ठेवली,``हे महाराष्ट्र सरकार आणि इंटरनॅशनल टोल कलेक्टर्स म्हणजे आयटीसी यांचं जॉइंट व्हेंचर आहे. आता महाराष्ट्रात प्रत्येक टोल नाक्यावर वाहनचालकाने आम्हाला टोल दय़ायचा नाही, आम्हीच तुम्हाला झोल देणार... पेट्रोल भरण्यासाठी.''
``अहो, पण याने सरकारी तिजोरीवर ताण नाही का येणार?'' नको तिथे आमच्यातला इकॉनॉमिक टाइम्सपढिक अर्थजागरुक पत्रकार जागा होतो हो!
``छे छे, हा आयटीसीचा उपक्रम आहे. आम्ही गेल्या काही वर्षांत असा काही टोल ओरबाडला आहे की 27 विमानं, 72 हेलिकॉप्टरं, प्रत्येक लोकप्रतिनिधीवर कोटय़वधींचा वर्षाव, प्रत्येक पक्षाचा इलेक्शन फंड आणि आमच्या मालकांचे जगभरात 247 प्रासाद उभे राहिल्यानंतरही स्विस बँकेत आल्प्स पर्वताएवढे नोटांचे ढिगारे पडून आहेत, त्याने बँकेची बिल्डिंग पडायला आली. एकेकाळी रिक्षाने मुलं शाळेत ठेवणार्या आमच्या मालकांची मुलं आता हेलिकॉप्टरने शाळेत जातात आणि मधल्या सुटीत डबा खायला हेलिकॉप्टरनेच येतात. मालक म्हणाले, बास झालं! येणार्या दोन लाख पिढय़ांची सोय झाली. आता जनतेचा पैसा जनतेला परत करायला हवा.''
पाचशेची नोट लग्गेच दुमडून खिशात टाकत आम्ही डबडबलेल्या डोळय़ांनी पुढे येतो तो काय, टोलनाक्याला लागूनच मोठा मंडप आणि दोन बाजूला टाकलेल्या टेबलांमधूनच गाडी जाईल अशी व्यवस्था. रजिस्ट्रार ऑफिससारख्या फक्त नगदीवर चालणार्या सरकारी ऑफिसासारखी सगळीकडे कामाची लगबग. पहिल्या टेबलावर कोणीतरी खिशातून आमचं ओळखपत्र काढून घेतलं आणि समोरच्या कम्प्यूटरवर नाव टाइप करून `उत्तमराव उकिडवे' असा आमच्या नावाचा मोठय़ाने पुकारा केला. समोरच्या प्रिंटरमधून 15-20 गुलाबी कागदाच्या परफोरेटेड पावत्यांची चळत समोर आली. ती त्याने सुहास्यवदनाने आमच्या हातात कोंबली. पुढच्या टेबलावर गाडीच्या टपावर बारा सिलिंडरे चढली, आमचा हात खिशाकडे जायच्या आत, ``ते सबसिडी वगैरे आम्ही करून घेऊ परस्पर'' असं सांगून गाडी पुढे पिटाळली गेली. पुढच्या टेबलावर टोलेजंग इमारतींची मॉडेल्स होती... आमच्या गाडीची बनावट पाहून ``एचआयजी काढ रे एक'' असा आदेश गेला आणि उच्च उत्पन्न गटाच्या घरासाठीच्या अर्जावर आमच्या फोटोसह संपूर्ण भरलेला फॉर्म फक्त सहय़ा ठोकण्यासाठी समोर आला. ``अहो, पण माझं वांगणीला आहे एक घर...''
``साहेब, हे वरळीत आहे, सरकारी अधिकार्यांच्या, मंत्र्यांच्या डबल डबल झालेल्या घरांच्या सोसायटय़ा पाडून आता तुमच्यासाठी घरं बांधायला दिलीत हिरानंदानींना. घेऊन ठेवायला काय जातंय...''
पुढच्या टेबलांवर आमच्या पदरात दोन एकर शेतजमीन, तिला पाणी, बियाणं, मोफत वीजपुरवठा, विहिरीसाठीचं कर्ज अशा वेगवेगळय़ा कागदांवर सहय़ा झाल्या होत्या. गाडीच्या टपावर अनुदानस्वरूपात एक म्हैस, तीन शेळय़ा, नऊ कोंबडय़ा ठेवण्यात आल्या होत्या. आंतरजातीय विवाहाच्या टेबलापाशी पोहोचल्यावर मात्र आमचा धीर सुटलाच... समोर, कौटुंबिक वापराच्या टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन, कपाटं, भांडी अशा सगळय़ा सामानाचे ढिगारे गाडीच्या टपावर चढण्यासाठी वाट पाहात होते. समोर वरमाला घेऊन उभ्या असलेल्या विजातीय सलज्ज सुंदरींपैकी एकीची निवड करायची आणि रजिस्टरात सहय़ा ठोकायच्या की सगळं सामान गाडीवर, असा फटाफट कारभार. ``अहो, पण घरी आहे एक... आमचं लग्न झालंय...'' आमच्या कलत्राचा चेहरा डोळय़ांसमोर आल्याने पांढर्याफट्ट पडलेल्या चेहर्याने आम्ही वदलो, तेव्हा इतका वेळ रस्त्यावर स्थिर नजर ठेवलेले शोफरमहोदय वळून म्हणाले, ``आणखी एक करायला काय जातंय?...''
आँ!! हे तर दस्तुरखुद्द बाबाजी!! हेच आमचे शोफर!
...बराच वेळापासून दाबून ठेवलेली स्वतःला चिमटा काढण्याची ऊर्मी आता दाबण्यात अर्थ नव्हता... ओय ओय ओय असं किंचाळून आम्ही परळ-म्हसवडी येष्टीच्या दोन शिटांच्या मध्ये नावाला जागून उकिडव्या स्थितीत जागे झालो, तेव्हा आमची लाल डबा गाडी खडखडत टोलच्या लायनीत शिरत होती... गरम वार्याच्या झळा, डिझेल, धूर, प्रवाशांच्या बॅगा-पिशव्यांमधले जिन्नस यांचा एकत्रित गंध यामुळे डोकं भणाणलं होतं...
...पण, अशाही स्थितीत, सुखस्वप्न भंगून रखरखीत वास्तवात जागे झाल्यानंतरही आम्हाला हायसंच वाटत होतं.

No comments:

Post a Comment