(उद्ध्वस्त, ओकाबोका, उदासवाणा महाल. रंग उडालेलं
सिंहासन. पोपडे आलेल्या भिंती. खिळखिळे झालेले खांब. सिंहासनाच्या मागे भिंतीवर
धनुष्यबाण टांगलेलं आहे. आता चमक हरवलेल्या धनुष्याची प्रत्यंचा तुटलेली आहे आणि
बाण उडून सिंहासनाच्याच पाठीत घुसलेला आहे. मागे एक पुतळा आहे. तो वाघाचा असावा.
पण, त्याचाही रंग उडालाय. शेपटी तुटलेली आहे आणि चेहरा मांजरासारखा दिसू लागलेला
आहे. खूप वर्षं पडून असलेल्या एखादय़ा-एकेकाळच्या सुपरहिट ऐतिहासिक नाटकाच्या धूळ
खात पडलेल्या सेटसारखी कुबट अवकळा पसरलेल्या त्या वातावरणात अचानक सेनाकार्यपती
उद्धोबल्लाळ प्रवेश करतात. त्यांचे कपडेही त्याच नाटकातल्या रंगपटासारखे दिसतायत.
मुळात अंगात घातलेला वेश त्यांच्या मापाचा नाही. छोटय़ा मुलाने मोठय़ा माणसाचे कपडे
चढवून मोठय़ा माणसाचं सोंग आणल्यासारखा अवतार. बोलणं-वागणंही तसंच. कमरेला तलवार
लावलेली आहे ती त्यांच्या छातीपाशी बांधली गेली आहे आणि तरीही तिचं टोक जमिनीला
लागतंय आणि त्यात उद्धोबल्लाळ अधूनमधून अडखळतायत. मधूनच तोंडावर आपटी खातील की काय
अशी भीती वाटते. आत येताच ऐटीत टाळय़ा वाजवण्याची स्टाइल मारून...)
उद्धोबल्लाळ : (तोर्यात) कोण आहे रे तिकडे? (संतापून)
कोण आहे रे तिकडे? (आणखी संतापून, बेंबीच्या देठापासून ओरडत) कोण आहे रे तिकडे?
सगळे मेलेत का काय? (या ओरडय़ामुळेही महाल थरथर कापतो, कुठेतरी एक भांडं पडल्याचा
आवाज येतो, मग एक मांजर म्याँव करून जातं. अंधारातल्या प्रकाशयोजनेमुळे एखादा वाघ
निघून गेल्यासारखी सावली पडते. उद्धोजी घाबरून एका खांबावर टुणकन उडी घेऊन त्याला
हाता-पायांची मिठी मारतात. थरथर कापत आता घाबरून करुणार्त स्वरात) कोणी आहे का रे
तिकडे? मी एकटा आहे रे इकडे... मला भीती वाटतेय.
(मागून जरबदार आवाज येतो.) च्यायला, येता-जाता
टरकायला होतं, तर येरझार्या घालायच्या कशाला? गप बसून राहायचं ना एका जागी. मी आहे
इथे. घाबरू नका.
उद्धोबल्लाळ (खांब सोडून, एकदम सावरण्याचा अभिनय करत
आणि जणू आपण घाबरलोच नव्हतो अशा आविर्भावात) : त..त..तेच तर म्हणत होतो मी
मिलिंदनारोजी... तुम्ही तर माझे डावा हात... (मागून जरबदार आवाज : शी शी शी, डावा
नाही, उजवा म्हणा) तेच ते, तुम्ही तर माझा उजवा हात... मला सोडून कसे जाल... मी
आपला अधूनमधून ओरडून खात्री करून घेत असतो, तुम्ही तरी आहात ना? की गेलात उडून?
मिलिंदनारोजी : (अदय़ाप नुसतं आवाजी अस्तित्त्व,
आवेशपूर्ण स्वरात) अरे हट्, उडाले ते मावळे... (चुकचुकून) नेहमी गोंधळ होतो माझा.
उडाले ते कावळे, आता सगळे घट्ट शिवबंधनाने बांधले गेलेले मावळेच आहेत उरलेले.
उद्धोबल्लाळ : असं आहे काय? मला कधी कधी असं वाटतं की
थोरल्या साहेबांनी नेमकी कोणाची सेना बांधली होती... इतके सगळे कावळेच उडून जातायत
म्हणून प्रश्न पडलाय मला.
मिलिंदनारोजी : डोन्ट वरी, आम्ही दोनचार अवली नग आहोत
ना शिल्लक तुम्हाला पोहोचवायला.
उद्धोबल्लाळ (संताप+भीती यांच्या मिश्रणाने घडलेल्या
आवाजात) : काय?
मिलिंदनारोजी : अहो, म्हणजे महाराष्ट्रगडावर भ ग
वा फ ड क वा य ला... (हे शब्द जपून, जोर देत, सावकाश उच्चारतो, नंतर खासगी
आवाजात) हे वाक्य नेहमी दगा देतं आणि नेमकं तेच नेहमी उच्चारायला लागतं...
तिथपर्यंत तुम्हाला पोहोचवायला हो!
उद्धोबल्लाळ : तुम्हाला खात्री आहे ना यंदा आपण तो गड
जिंकू याची?
मिलिंदनारोजी : म्हणजे काय, सिंह गेला तरी हरकत नाही,
पण गड जिंकायचाच.
उद्धोबल्लाळ : अहो काय बोलताय काय, तुम्ही मला
घालवायलाच निघालायत.
मिलिंदनारोजी : तुम्हाला? अहो तुम्ही काय सिंह आहात
का?
उद्धोबल्लाळ (म्यानातून तलवार उपसण्याची आटोकाट कोशिश
करत) : खामोश, काय बोलताय काय आणि कुणाशी बोलताय? तुमची जीभ छाटून टाकीन आत्ताच्या
आत्ता.
मिलिंदनारोजी : साहेब, त्या तलवारीने साधी कोथिंबीर
चिरली जात नाही, असं कालच आपला आचारी सांगत होता. ते एक जाऊदय़ात. चिडू नका. मी
म्हणत होतो, तुम्ही सिंह नाही आहात, वाघ आहात.
उद्धोबल्लाळ (अजून घुश्शातच) : मग ठीक आहे. पण,
मघापासून मी इथे तापात बडबड करत असल्यासारखा एकटाच फिरतोय आणि तुम्ही दिसतच नाही
आहात. आहात तरी कुठे?
मिलिंदनारोजी : हा काय इथे? सिंहासनावर...
(सिंहासनावर प्रकाश पडतो. अव्वल टग्यासारखा दिसणारा
मिलिंदनारोजी सिंहासनात सैलसरपणे पडून दात कोरतोय आरामात. तो थू थू करत दातातला
कचरा थुंकत असताना उद्धोबल्लाळांच्या संतापाचा कडेलोट होतो- हा काही मनावर
घेण्यासारखा प्रकार नाही, दिवसातून 17 वेळा असा कडेलोट होतच असतो आणि त्याचा काही
उपयोगही नसतो. आव मात्र राणा भीमदेवी...)
उद्धोबल्लाळ (कडाडून तलवार उपसण्याचा अतीव करुण
प्रयत्न करीत) : अरे कोण आहे रे तिकडे? आत या इकडे. या हरामखोराच्या मुसक्या बांधा
आणि त्याला टकमक टोकावरून लोटून मग हत्तीच्या पायी दय़ा आणि नंतर तेलात तळून
काढा...
मिलिंदनारोजी (विक्राळ हसत) : अहो साहेब मी म्हणजे
काय शिववडापाव आहे का तेलात तळून काढायला. आपलं दिलंय तोंड म्हणून काहीही गर्जना
करायला ही काही आपली जाहीर सभा नाहीये. शिवाय तुमचं वागणं म्हणजे ज्याचं करावं भलं
तो म्हणतो माझंच खरं.
उद्धोबल्लाळ (अर्धवट उपसलेली तलवार आत ढकलण्याची
अतोनात पराकाष्ठा करत) : माझ्या सिंहासनावर बसून तुम्ही माझं काय भलं करताय?
मिलिंदनारोजी (सिंहासनावरून उतरून खाली येत) : त्याची
लाज राखतोय थोडीफार जमेल तशी. गैरसमज करून घेऊ नका. आजकालचा काळ कठीण आलेला आहे.
गनीम कुठे आणि कसा दबा धरून बसलेला आहे, ते सांगता येत नाही. कुठून कसला दगाफटका
होईल याची गॅरंटी देता येत नाही. त्यामुळे कदम कदम फूंक के रखना पडता है...
उद्धोबल्लाळ : हा कदम कोण, सोमदास की काय? त्याला
कुठे फुंकायचा?
मिलिंदनारोजी : मध्ये मध्ये फालतू शंका काढून लिंक
तोडू नका बरं! (उद्धोबल्लाळही आपण कोण, हा कोण हे विसरून सॉरी म्हणतात आणि आपण या
नोकराला सॉरी म्हणालो म्हणून परत स्वतःलाही सॉरी म्हणतात.) हां, तर सांगत काय
होतो, तुम्हाला कुठूनही दगाफटका होऊ शकतो. तुम्हाला काही झालं तर आमची लेव्हलच
लागली ना! (उद्धोजी टवकारून `क्काय' असं विचारतात, पण तो हातानेच त्यांना शांत
करून) म्हणजे, मी, संजाबा राऊ, निळाक्का, एकोजी शिंदा असे आमच्यासारखे कावळे... आय
मीन मावळे... पैशाला पासरी आहेत हो! आम्ही मेलो तर काही फरक पडत नाही. लाख मेले
तरी चालतात, लाखांचा पोशिंदा मरता कामा नये. (हे वाक्य उच्चारतानाच याला नेमकं काय
म्हणायचं आहे, ते राजशेखर छाप हास्यातून स्पष्ट होतं. उद्धोबल्लाळ भाबडय़ा
सूर्यकांतसारखे खूष होतात.) त्यामुळेच तुम्ही जे जे करणार असता, ते मी आधी करतो.
तुम्ही जे खाता ते मी आधी चाखून पाहतो. तुम्ही जे पिता ते मी आधी पितो. तुम्ही
सिंहासनावर बसण्याच्या आधी मी चेक करून पाहतो. कारण, ते तुमच्यापेक्षा जास्त
खिळखिळं झालंय.
उद्धोबल्लाळ (सद्गतित होऊन) : अरे कोण आहे रे तिकडे?
आमचा मोत्याचा कंठा आणून यांच्या गळय़ात घाला. (मिलिंदनारोजी : साडे सात
वर्षांपासून तोच एक कंठा सारखा माझ्या गळय़ात घालतायत.) यांना बारा गावं इनाम दय़ा.
(मिंना : माझ्याकडे 1250 गावं ऑलरेडी आहेत, यांच्याकडे 12 आहेत का?) यांचा शिवतीर्थावर
जाहीर सत्कार करा. (मिंना : गर्दी कोण जमवणार? स्वतःला रसिकराज समजतायत की काय?)
असे जिवाला जीव देणारे सहकारी असले आणि जीव ओवाळून टाकणारे मावळे असले की ग डा व र
भ ग वा फ ड क णा र च. (`गडावर'पासून हेही स्लो मोशनमध्ये जातात. उगाच `ग'चा `ड'
करणारी गडबड नको.)
मिलिंदनारोजी : काय लॉटरी लागली का बैलकर भेटायला आले
होते की टिंबानींच्या बंगल्यावरून आलायत... महापालिकेचा अर्थसंकल्पही बराच दूर
आहे... एकदम उदार झालायत ते.
उद्धोबल्लाळ : अहो तुम्ही माझ्यासाठी जिवावर उदार
होता, मी इतकंही उदार होऊ नये! बरं मला सांगा युवराज आदिबल्लाळ कुठे गेले आहेत?
मिलिंदनारोजी : डायपर बदलायला.
उद्धोबल्लाळ : काय? युनिव्हर्सिटीत जातात आणि डायपर
वापरतात.
मिलिंदनारोजी : ते युनिव्हर्सिटीत फक्त हवा टाइट
करायलाच जातात लोकांची आणि हो, ते अजूनही डायपर वापरतात. गैरसमज करून घेऊ नका.
आत्ताच त्यांना एक कविता झाली. म्हणजे त्यासाठी डायपर नाही वापरला. पण, त्यांना
इंग्रजीतनं कविता होते ना. त्या कवितेत त्यांनी मीटरमध्ये बसतो म्हणून डायपर हा
शब्द वापरला आणि तो बरा दिसणार नाही म्हणून तो बदलायला गेलेत ते.
उद्धोबल्लाळ : वायपर वापरायला सांग त्याला! असो. आणि
आता सांग पट्टराणी कमलादेवी कुठे गेल्यात?
(या पृच्छेनंतर मिलिंदनारोजीचा सगळा नूर बदलतो. खांदे
पडतात, सूर पिचतो, टाळाटाळीची देहबोली दिसू लागते. जणू आपण हा सवाल ऐकलाच नाही,
अशा आविर्भावात मिलिंदनारोजी कल्टी मारण्याच्या बेतात असताना उद्धोबल्लाळ
कडाडतात.)
आम्ही काय विचारतो आहोत, तुम्हाला मिलिंदनारोजी?
कमलादेवी कुठे आहेत.
मिलिंदनारोजी : काय कल्पना नाही. बाहेर गेल्या असतील,
येतीलच आता. त्यांना हल्ली दिल्लीपासून गल्लीपर्यंत बरीच कामं लागलेली आहेत ना.
उद्धोबल्लाळ : तुम्ही आमच्यापासून काहीतरी लपवताय
मिलिंदनारोजी. एरवी तुम्ही राजे आणि आम्ही चाकर असल्यासारखे डाफरत असता आमच्यावर.
आता ही विचारणा केल्यावर इतका सूर मवाळ झाला तुमचा.
मिलिंदनारोजी : मी माहिती घेऊन सांगतो ना तुम्हाला की
त्या दादरला कशाला गेल्याहेत...
उद्धोबल्लाळ : अच्छा, म्हणजे त्या दादरला गेल्या
आहेत, हे तुम्हाला माहिती आहे तर. दादरला आपल्या सेनासदनात त्या गेलेल्या नाहीत,
हे तर स्पष्टच आहे. आम्ही तिकडूनच आलो आहोत. मग त्या गेल्यात तरी कुठे?
(मिलिंदनारोजीचे कान पडतात. गोगलगायीसारखा तो मलूल पडतो. ते पाहून एकदम डोळे गरगरा
फिरवत उद्धोबल्लाळ बोलू लागतात) अरे देवा, असं आहे तर... म्हणून तुम्ही गप्प
आहात... बोला बोला... पण, आता आम्हाला असं सांगू नका की त्या तिकडे गेल्या आहेत...
(`त्या तिकडे'वर योग्य जोर.)
मिलिंदनारोजी : घ्या आता! तुम्ही नेहमी असंच म्हणता
की त्या तिकडे गेल्या आहेत असं मला सांगू नका. म्हणून सांगितलंच नाही तर म्हणता
काही बोलत नाही. आम्ही करायचं तरी काय?
उद्धोजीबल्लाळ (हतबल होऊन गलितगात्र अवस्थेत) : भला
उसकी कमीज मेरी कमीज से भगवी कैसे? हा कालचा पोरगा, आमच्या मांडीवर- आय मीन-
आबासाहेबांच्या मांडीवर वाढलेला आज रसिकराज बनून आमच्या राणीवशाला भुरळ घालतो आहे.
असं काय आहे तरी काय त्याच्यात?
मिलिंदनारोजी : टाइमपास!
उद्धोजीबल्लाळ : सुपरहिट पिक्चर होता ना? आपले मराठी
लोकच फार बालिश...
मिलिंदनारोजी : त्या भरोशावर तर आपली दुकानं चालली
आहेत साहेब. असो. मी टाइमपास म्हणालो ते रसिकराजांच्या संदर्भात. रसिकराज म्हणजे
अवघ्या महाराष्ट्राचा मूर्तिमंत टाइमपास. लोक त्यांची भाषणं ऐकायला जातात. टाइमपास
करतात. मतं वेगळय़ांनाच देतात. विचारा का?
उद्धोबल्लाळ : का?
मिलिंदनारोजी : कारण यांना मतं दिली की यांचे सदस्य
सदनात काय करतात? टाइमपास! फक्त टाइमपास!
उद्धोबल्लाळ : म्हणजे तुमचं म्हणणं असं की कमळाबाई
आम्हाला थुका लावून रसिकराजाकडे जातात त्यात सिरीयस काही नाही? नुसता टाइमपास आहे?
मिलिंदनारोजी : अहो, लोक न्यूज चॅनेल का बघतात?
टाइमपाससाठी. न्यूज चॅनेलवर सगळय़ात जास्त वेळा कोण असतं? रसिकराज. आता दोन अधिक
दोन करा पाहू.
उद्धोबल्लाळ : अरे, पण मग जन्मोजन्माचं,
देवाब्राह्मणांच्या साक्षीने स्वीकारलेलं नातं तोडून गरत्या बायका अशा उथळ
टाइमपाससाठी जातात? काय भयंकर आहे रे हे! पण, का, का, का?
मिलिंदनारोजी (आधी धूम ठोकण्याची ऍक्शन घेऊन) : कारण
फारच सिंपल आहे. एकेकाळी आपला टाइम होता तेव्हा आपण सगळय़ा पब्लिकला विदाउट तिकीट
फुल टाइमपास देत होतो, आता आपली टाइमपासचीही कुवत राहिलेली नाही.
(धूम ठोकतो. मागोमाग उद्धोबल्लाळ पिसाटून धावतात.
पळापळ, धावाधाव, लपाछपी, पडझड असं सगळं सुरू असतानाच पडदा पडतो.)
No comments:
Post a Comment