आजकाल आमचा मूळचा
दृष्टीदोष बळावलेला आहे, यात शंकाच नाही.
``डोळय़ांच्या खाचा
आधीच झालेल्या होत्या, आता डोळे उघडले, एवढाच याचा अर्थ,'' असा आवाज मागून आला, तो
बायकोचा तरी असणार किंवा एखादय़ा फेसबुक फ्रेंडचा, यातही काही शंका नाही.
इतरांबद्दल इतकी खात्री इतर कोणाला असत नाही. असो.
ज्याला पाच नंबरचा
चष्मा आहे आणि ज्याचे त्या चष्म्याआडचे डोळे पाहिल्यावर अधूनमधून त्याची भार्याही
घाबरते, अशा माणसाने दृष्टीदोषाबद्दल जरा जपूनच बोलायला हवं. (लगेच चेहरा पाडू नका
हो, तुम्हाला एवढा मोठा नंबर लागला आणि तुमचे डोळेही असे बटाटय़ासारखे दिसायला
लागले, तर घाबरेल की तुमचीही बायको- तेवढय़ासाठी डोळय़ांच्या खाचा करून घेणं परवडतं
का, ते बघा म्हणजे झालं.) म्हणूनच आम्ही आधी आमच्या दोषाची खातरजमा करून घेतली आणि
नंतरच या विषयाला हात घातला. आम्हाला अत्र-तत्र-सर्वत्र मोदीच दिसून राहिले आहेत,
हा आमचा नवा दृष्टीदोष. तुम्ही म्हणाल, यात नवेही काही नाही आणि दृष्टीदोषही काही
नाही. आनंदी आनंद गडे, या गाण्यातही मुळात `इकडे तिकडे मोदी भरे' अशीच ओळ होती की
काय, असं वाटण्याजोगं मोदीमय वातावरण खास निर्माणच करण्यात आलेलं आहे, तर तुम्हाला
सर्वत्र मोदी दिसतात, यात आश्चर्य काय! तुम्हाला चुकून कुठे राहुल गांधी किंवा
सोनिया गांधी दिसले असते, तर मात्र डोळय़ांची तातडीने तपासणी करून घ्यायला लागली
असती. तुमचंही हे म्हणणं बरोबरच आहे. पण, आमच्या चित्तचक्षुंना जे मोदी दिसतायत ते
वेगळेच आहेत. निवडणुकीच्या आधी आम्हाला मोदी-मुखवटे घातलेल्या माणसांच्या
झुंडीच्या झुंडी फक्त सभास्थानी दिसायच्या. आता निवडणुकीनंतर हे मो-मु घातलेली
इतकी माणसं इतक्या ठिकाणी दिसतायत की हे खरोखरचे मुखवटे आहेत की आमचा भास, हेही
कळेनासं झालंय. सर्वात वाईट भाग असा की या गदारोळात खरे मोदी समोरून गेले तरी आम्हाला
पत्ता लागायचा नाही आणि आम्ही `हेर मोदी' अशी सलामी दय़ायला विसरायचो आणि भलताच
गंभीर प्रसंग ओढवायचा. (गेली वर्ष-दोन वर्षं देशाच्या पंतप्रधानांची यथेच्छ
निंदानालस्ती करणारी मंडळी एकदम आता किती संवेदनशील झाली आहेत आणि जनमताचा आदर
शिकवू लागली आहेत, ते आठवा जरा!)
आपल्या दृष्टीचं आणि
या जिथे तिथे दिसणार्या मोदींचं समीकरण दुरुस्त करण्यासाठी विश्वसनीय `चेहरा'च
गाठायला हवा, या भावनेने आम्ही आमचे (दादर-शिवाजी पार्क भागातील) एकमेव मार्गदर्शक
राजराजेश्वर राजजींकडे कृष्णभुवनात पातलो. (कंपोझिटर, `त'वर लक्ष ठेवा, नाहीतर...
असो.) कृष्णकुंज असे काही अडाणी लोक या इमारतीला म्हणतात. आम्ही `कृष्णभुवन'वाले
असल्यामुळे थेट आत प्रवेश मिळाला.
``केम छो,'' हे
मान्यवर नरेंद्रभाईंच्या मुखातील मधाळ शब्द इथे कानी पडल्यानंतर आम्ही उडालोच.
``सारू... सारू छू''
असं प्रत्युत्तर देऊन आम्ही आमच्या भाषापांडित्याचं दर्शन घडवत असतानाच एकुलत्या
एका कोटाच्या त्यातल्या त्यात धडक्या कोपर्याच्या- हिंदी च्यानेलांच्या भाषेत-
धज्जिया- उडाल्याचे आमच्या लक्षात आले आणि कशीबशी पाटलोण सावरत आम्ही पळू लागलो.
आम्हाला केम छो असे वाटलेले शब्द हे बहुधा `जेम्स छू' असे असावेत. थोडय़ाच काळात
आम्ही सपाट आडवे, विक्राळ दंतपंक्ती दाखवणारा कुत्रा- आमच्या चष्म्याआडच्या बटाटय़ा
डोळय़ांमुळे मंत्रमुग्ध होऊन - आमच्या छाताडावर पाय रोवून स्तब्धावस्थेत उभा अशा
स्थितीत कानावर शब्द आले, ``किती दचकवलंत त्याला? केवढा घाबरलाय तो!''
आवाजाच्या दिशेने मान
फिरवून पाहिलं तर साक्षात मोदी उभे! अरेच्चा, हे बडोदय़ाच्या बाहेरही मराठीत
बोलतात? पण, आवाज का असा सर्द वाटतोय... मग हाफ बाहय़ांचा रणबीर कपूर छाप स्वेटर
पाहिल्यावर लक्षात आलं, हे तर खुद्द राजराजेश्वर... त्यांच्या चेहर्यावरचा मोदींचा
मुखवटा मात्र संसदेत ढसढसा रडणार्या मोदींसारखा होता. त्यांनी हाताच्या खुणेनेच
कुत्र्याला हटवलं, आम्ही बोलण्याच्या स्थितीत नसल्यामुळे मुखवटय़ाकडे निर्देश करून
हाताच्या खुणांनीच विचारलं, ``हे काय आणि हे असं कसं?''
``तुमच्यामुळे झालंय
हे सगळं!'' रडक्या मुखवटय़ातून चिडका आवाज काढत राजराजेश्वर म्हणाले, ``च्यायला,
आम्हीही येडबंबूच! (त्यांच्या ओठांवर आलेले मूळ शब्द परतवून त्याजागी सभ्य
शब्दप्रयोग करताना त्यांच्या ओठांचा झालेला चंबू आमच्या नजरेतून निसटला नाही.)
नाहीतरी लोक आपल्याला काकाची झेरॉक्स कॉपीच मानतात, तर ऍक्शन रिप्लेच करू, म्हणून
सुरुवातीची काही वर्षं त्यांचा मुखवटा चढवला. तुम्ही लोक साले असे हरामी,
त्यांच्या सभांनाही लाखालाखांची गर्दी करून फुकटचा टाइमपास करून हसत-खिदळत घरी
जायचात आणि शिक्का गायवासरावरच मारायचात. माझ्याही सभांना गर्दी करून,
टीव्हीवाल्यांचा टीआरपी वाढवून शिक्का मारायचात तो हातावर नाहीतर घडय़ाळावर! आता
माझा प्रिंटर बिघडलाय आणि ब्लूप्रिंट बाहेर पडता पडत नाहीये, हा काय माझा दोष! जरा
धीर नाही तुम्हा लोकांना! आत्ताच्या आत्ताच करा नवनिर्माण! अरे काय पाणीपुरी आहे
का ती भय्याची? (भय्या हा शब्द उच्चारताच त्यांना भय्या आणि भाऊ या दोघांची आठवण
झाली असावी. चेहरा भलताच आंबट झाला होता.) शेवटी म्हटलं यांना विकासच हवाय तर
मोदींचा मुखवटा चढवूयात. दादिटल्याच्या आधी मी हा मुखवटा चढवला. तरी तुम्ही माझ्या
मुखवटय़ाची ही अवस्था केलीत आणि त्याच्या मुखवटय़ाला गोंजारलंत, त्यांना निदान गायीबरोबर
गोचिडाचा प्रवास घडतोय... आमचं इंजीन डायरेक्ट भंगारात? एकही मारा, लेकिन क्या
सॉलिड मारा, हा माझाच डायलॉग माझ्यावरच उलटवलात... कुठे फेडाल हे पाप?...''
राजराजेश्वर पुढेही
बरंच काही बोलत राहिले असणार. पण, ते ऐकायला थांबण्याइतके आम्ही वेडे थोडेच आहोत.
नाशकात सत्ता दिली, तिथे काय केलं? मुंबईतल्या नगरसेवकांनी काय दिवे लावले? याला
कानफटव आणि त्याला चोप, याच्यापलीकडे यांच्या आमदारांनी काय केलं? हे सगळे प्रश्न
विचारण्याची ती वेळ नव्हती. सगळं बिल आमच्यावर फाडून (वर यांच्या कुत्र्याने कोट
फाडला तो वेगळाच) आमच्याकडून साडेपाच फुटी बुकेचे पैसे वसूल करण्याचा त्यांचा कावा
आमच्या लक्षात आला आणि आम्ही तडक वांद्रय़ाच्या दिशेने धूम ठोकली.
वांद्रे पूर्वेतील
आमचे एकमेव आदरस्थान उद्धोबाळाजी आणि एकमेव आशास्थान आदित्यराजे यांच्या दरबारात
आम्ही प्रवेश केला आणि छद्मीपणाने हसणार्या कुत्सित आवाजात सिंहासनाकडून शब्द आले,
``आले आले, चालते बोलते बुके आले.'' आता आमच्या उंचीचा (म्हणजे तिच्या अभावाचा)
असा उपमर्द करण्याचं काही कारण नव्हतं. पण, मर्द-उपमर्दाचं त्यांना भारी आकर्षण.
आम्हीही लगेच संधी साधून ``आज सिंहासनात खुद्द तुम्हीच आहात वाटतं, एरवी हरहमेश
मिलिंदनारोजीच बसलेले दिसतात, पुसता पुसता बसून घेतात,'' असा टोला हसत हसत लगावला
आणि सिंहासनाकडे पाहिलं तो झटकाच बसला. उद्धोबाळाजींच्या चेहर्यावर डबल मुखवटा! एक
पुढे- एक मागे! पुढे दिवंगत शिसेप्रहिंहृस थोरले बाळाजी आणि मागे नम्मोजी! हा काय
चमत्कार! बाहेर शिवबंधनात बद्ध सैनिक उद्धोबाळाजींचा मुखवटा चढवून उभे आहेत आणि आत
हे!
``हा काय प्रकार?''
आम्ही पृच्छा केली.
``ही सगळी तुमची
कृपा,'' उद्धोबाळाजींनी हात जोडले आणि म्हणाले, ``आता महाराष्ट्रात ही बाजू आणि
बाहेर ती बाजू, अशी कसरत करणं आलं. तुम्हीही काय खट लोक आहात. थोरल्या साहेबांना
जागा कमी दिल्यात, पण परिस्थिती अशी निर्माण केली की त्यांनी इथून आवाज दिला, तरी
दिल्लीचं तख्त हललं पाहिजे, तिथला मोठय़ात मोठा सिंहासनाधीश्वर झक्कत उठून, मागे
हात बांधून इथे बोंबलत आला पाहिजे. इथला-तिथला दोन्हीकडचा रिमोट कंट्रोल त्यांनी
झोकात बाळगला. आमचं नशीब असं फुटकं की त्यांनी स्वप्नातही पाहिल्या नव्हत्या एवढय़ा
जागा आम्हाला दिल्यात मात्र दिल्लीत विचारतो कोण? महाराष्ट्र सदनाचा शिपाई!
त्यालाही लखोबाची ओळख सांगायला लागते, तेव्हा तो रजिस्टर उघडते. इथून आम्ही मारे
डरकाळय़ा फोडतो, उग्रलेख लिहितो. पण, ते लागली सवय जात नाही म्हणून. आता आदेशाचे
दिवस गेले, `संदेश'चे दिवस आले. दात विचकत उभे का आहात? आवजो.''
नम्मोजींमुळे आम्हाला
`आवजो'चा अर्थ `या' असा नसून `जा' असाच आहे, याची माहिती होती, त्यामुळे आम्ही
तात्काळ निघालो. एन्रॉन बुडणार होती, दाऊद फरपटत येणार होता, त्याचं काय झालं?
प्रभूकाकांनी आणलेला जैतापूर प्रकल्प घातक कधी झाला आणि आता तो अचानक पावन कसा काय
ठरला? ज्यांच्याविरुद्धच्या आंदोलनात सेनेच्या रणरागिणीचा डोळा फुटतो, त्यांची
जाहिरात तिसर्या दिवशी मुखमार्जनपत्रात कशी झळकते? ज्या शाखाशाखांवर लोक
विश्वासाने आपली गार्हाणी घेऊन यायचे, तिथे मांडवली कशा सुरू झाल्या, ज्यांना दोन
वेळचं अन्न मिळत नव्हतं, ते पेटय़ा-खोक्यांची भाषा कशी बोलायला लागले, वगैरे प्रश्न
विचारण्याची ती वेळ नव्हती. त्यामुळे आम्ही तात्काळ पडत्या फळाची आज्ञा घेतली आणि
थेट मंत्रालयाचीच बस पकडली.
कमळपक्षाचे गलितगात्र
लोह-पितळ-कथीलपुरुष (हा धातूबदलाचा अनुक्रम आहे) लालकृष्णजींनीही जिथे
नरेंद्रभाईंची कृपा मान्य करून या वयात नम्मोजींचा मुखवटा चढवून घेणं मान्य केलं,
तिथे बाकीच्यांची काय कथा असणार, हे आम्हाला ठाऊक होतं. तिथे असेही `चेहरे' सापडतच
नाहीत. त्यामुळे आम्ही तिकडे वेळ न दवडता थेट मंत्रालयात शिरलो. आघाडीवीरांकडे
मुळात तोंड दाखवायला जागा नाही, तिथे मुखवटा दाखवायला जागा कुठून असणार, असा आमचा
होरा होता. दारापासूनच चेहरा उतरलेल्या काकाश्रींच्या आणि मातोश्री-बेटाश्रींच्या
मुखवटय़ांचा खच पडलेला होता. काम संपलं किंवा काम झालं नाही तर राजकारणात लोक
बापालाही बाप म्हणत नाहीत. काका-अम्मा-ताई-दादा-पप्पूभय्या ही तर फार लांबची नाती
झाली. नाही म्हणायला एका कोपर्यात दोनचार टाळकी दादा-मुखवटा चढवून पाहताना दिसली.
``हाच आता तरुण-तडफदार
मुखवटा आपला.'' एकजण उसासून म्हणाला.
``बंद थोडे सैलच ठेवा.
हवा बघून निर्णय घ्यायला सोपं,'' दुसर्याने व्यवहारज्ञान सांगितलं.
दुसर्या कोपर्यात
बहना-मुखवटा चढवण्याच्या तयारीत तीन-चार टकली दिसली.
``आता प्रियंका
मुखवटाच आपली लाज वाचवू शकतो,'' त्यांच्यातला एकजण म्हणाला.
``बच्चा, नया है तू!
प्रियंकाचं आडनाव काय आहे? गांधी-वड्रा! हा वड्राच आपली लाज काढू शकतो... जरा
जपून,'' दुसर्याने पोक्त सल्ला दिला.
शिमग्याचे मुखवटे
घातलेले कोकणसम्राट, मफलरीआड चेहरा झाकलेले टक्कामंत्री, गप्प पोपट, कटी पतंग या
सगळय़ांना पालांडून आम्ही मामुमंच्या म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या दालनात शिरलो.
``या या या,'' भरघोस
स्वागत झालं. उत्साही आवाजामुळे आम्ही चमकलो आणि खुर्चीत नम्मोजींना पाहून दचकलो.
आम्हाला `भॉक्' करून पृथ्वीपतींनी मोदी-मुखवटा उतरवला. आम्ही भौंचक्के होऊन हे
काय, अशी हातानेच पृच्छा केली.
ते म्हणाले, ``तुम्हीच
ही वेळ आणलीत. अहो, आम्ही घसा कोरडा करून तुम्हाला सांगत होतो, सगळय़ात नंबर वन
आपणच आहोत. ते फेकतायत, नुसती बंडलं मारतायत. पण, तुम्ही कुठले ऐकायला. तुम्हाला
याच तोंडातून सगळं ऐकायला आवडतं तर तेच दाखवतो.''
आम्ही कपाळावर हात
मारून घेतला आणि चालते झालो. गेल्या दहा वर्षांत यांनी राज्याची काय स्थिती
केलीये, याबद्दल बोलण्याची ती वेळ नव्हती. आता आम्हाला पडलेल्या प्रश्नांचा उलगडा
देशातल्या एकमेव चेहर्याशिवाय म्हणजे `मी न मोजी कुणाला' अशा नमवीत भूमी ऐटीत
चालणार्या साक्षात नम्मोजींशिवाय केणीही करू शकणार नाही, हे लक्षात घेऊन आम्ही तडक
दिल्लीकडे कूच केली आणि गुजराथ भवन गाठले. बडोदय़ाहून आलोय, असं सांगितल्यानंतर
कोणाची टाप झाली नाही अडवायची. तडक नमोजींसमोर जाऊन उभे राहिलो. त्यांना काही
विचारणार, तेवढय़ात समोरचं दृश्य पाहून घेरीच यायची बाकी राहिली...
आमचे आखिल भारतातील
एकमेव आदर-प्रेरणा-गर्वस्थान असलेले विकासपुरुष नम्मोजीच एका मुखवटय़ाशी झटापट करत
होते...
``नम्मोजी, तुम्हाला
मुखवटय़ाची काय गरज?'' आम्ही जवळपास किंचाळलोच.
``मित्रों, या देशावर
राज्य करायचं असेल, तर कोणत्याही पक्षाला काँग्रेस बनावंच लागतं आणि बहुमताने
सत्ता मिळाली तरी हा मुखवटा चढवायलाच लागतो...''
नम्मोजींनी तो प्रेमळ,
आश्वासक, ऊबदार, दिलदार मुखवटा चढवला आणि आपण अब की बारीही (संवेदनशील, कविमनाचे,
पाकिस्तानप्रेमी) अटलबिहारीच निवडून दिले आहेत, हा अद्भुत साक्षात्कार आम्हाला
झाला!
No comments:
Post a Comment