Tuesday, July 29, 2014

हिरवळ, उरवळ आणि दरवळ

(टीव्हीवरच्या कार्यक्रमाच्या सुरुवातीचं एकदम हळुवार, पचपचीत, रटाळ, रेंगाळवाणं संगीत वाजतं. पाप्याचं पितरच दिसणारा एक अगदी पोरसवदा, भेदरलेल्या सशासारखा निवेदक डोळे चोळत पेंगुळल्या स्वरात जांभया देत निवेदन सुरू करतो.)
निवेदक ः नमस्कार, मी नितीन नवखे आजच्या या कार्यक्रमात आपलं स्वागत करतो आहे, आपल्या या कार्यक्रमाचं नाव आहे (जांभई देत) `उरवळ आणि दरवळ'! आता निवडणुकीच्या काळातली पेड न्यूजची हिरवळ संपून गेल्यामुळे आम्हाला हे असले कार्यक्रम करण्यावाचून गत्यंतर उरलेलं नाही. (चपापतो, कॅमेर्याकडे पाहतो, इकडे तिकडे पाहतो, तंत्रज्ञांना विचारतो) अर्रर्र, एडिट नाही का होणार हे? ओह, लाइव्ह आहे नाही का? असूदेत. दोनपाच महिने आपण इलेक्शनच्या बातम्यांचा रतीब घालून इतकं बधीर करून टाकलंय प्रेक्षकांना की आता त्यांना आपण काय ऐकतोय हे कळतही नसेल... असो (पुन्हा सावरून)... निवडणुका संपून निकालही लागलेले असल्यामुळे आता आमच्या सगळय़ा प्रमुख अँकरांना म्हणजे निवेदकांना ओरडून ओरडून बोलण्यासारखं आणि हातवारे करण्यासारखं काही उरलेलं नाही. त्यामुळे ते सगळे रजेवर गेले आहेत. निम्म्यांचे घसे सुजलेले आहेत आणि अर्ध्याजणांचे हात सांध्यांमधून निखळल्यामुळे प्लास्टरमध्ये ठेवलेले आहेत. तीन-चार चॅनेलवर चर्चेत तीच तीच तुणतुणी वाजवून वाजवून भ्रमिष्ट झालेल्या पॅनेलवरच्या पत्रकारांना आणि पक्षप्रवक्त्यांनाही सुटी मिळालेली आहे. त्यांच्यातल्या निम्म्याजणांना आपण नेमक्या कोणत्या पक्षाचे समर्थक आणि प्रवक्ते आहोत, हेच कळेनासं झाल्यामुळे त्यांच्यावर मानसोपचार सुरू आहेत. त्यांच्यावर उपचार करणार्या तीन डॉक्टरांना यांचं बोलणं ऐकून तेच भ्रमिष्ट झाल्यामुळे मनोरुग्णालयात भरती करावं लागलं आहे. शिवाय, नवीन सरकारने नवीन घोटाळे करेपर्यंत आमच्याकडे ब्रेकिंग न्यूज काय दय़ायची, हा प्रश्न आहेच. त्यामुळे लवकरच आम्ही तुम्हाला, एका कुत्रीने एका सशाला जन्म दिल्याची आणि अंतराळातून उडत्या तबकडय़ा येऊन कोकणातले पिकलेले हापूस चोरून नेत असल्याची ब्रेकिंग न्यूज देऊच. तोपर्यंत आम्ही सगळे शिकाऊ लोक मिळून तुम्हाला बोअर करण्याची जबाबदारी पार पाडणार आहोत. त्याच मालिकेतला आजचा हा कार्यक्रम आहे उरवळ आणि दरवळ. निवडणुकीची  फुलं कोमेजून गेल्यानंतर आता उरलाय तो दरवळ आणि मतदारांपासून वर्तमानपत्रं-चॅनलवाले आणि अन्य कोणाकोणाच्या पंक्ती उठून गेल्यानंतर भांडय़ांमध्ये उरली आहे ती उरवळ. `प्रतिभा आणि प्रतिमा'च्या चालीवर कार्यक्रमांना आकर्षक शीर्षकं देणारे आमचे इनपुटचे हेडही निवडणुकीच्या काळात भलभलतं काही पुटपुटू लागल्यामुळे रजेवर गेले आहेत आणि ट्रेनी मंडळींवरच शीर्षकं देण्याची जबाबदारी आली आहे, हे आपल्या लक्षात आलं असेलच.
आशा आहे की आजचा आपला कार्यक्रम आपण स्वतः पाहात असाल, एखादय़ा शिकाऊ प्रेक्षकाला त्यासाठी बसवलं नसेल.
असो, आजच्या आपल्या कार्यक्रमात आपण भेटणार आहोत, पडदय़ामागच्या कलावंतांना. अंहंहंहं, उठून टीव्ही बंद करायला येऊ नका. हा सिनेमा किंवा टीव्ही कार्यक्रमांच्या पडदय़ामागच्या कलावंतांबद्दलचा कार्यक्रम नाही. हा निवडणुकीशीच संबंधित कार्यक्रम आहे. बसलात ना लगेच? पक्के भारतीय प्रेक्षक आहात. ज्याच्यातून आपल्याला कसलाही बोध होणार नाही, ज्याचा आपल्याला काडीचाही फायदा नाही, असे कार्यक्रम पाहायला फार आवडतं तुम्हाला, नाही का? असो. आमचं काय, तुमची जी आवड असेल, तसे कार्यक्रम करून दाखवायचे, हे आमचं काम! आम्हाला टीआरपीशी मतलब. इथे चीअरलीडर दाखवण्याची पद्धत नाहीये म्हणून. नाहीतर आम्ही तुम्हाला तेही दाखवलं असतं मस्त चवीचवीने. काय म्हणालात? आम्ही सगळे कोण आहोत? (ओशाळं हसत) तेही बरोबरच आहे म्हणा तुमचं. आम्ही जो मतामतांचा नाच करून दाखवतो, तो त्या पोरींना साताजन्मात जमायचा नाही. असो. आता आजच्या कार्यक्रमाकडे पुन्हा एकदा वळूयात. आजचा कार्यक्रम आहे निवडणुकीच्या पडदय़ामागच्या कलावंतांची ओळख करून देणारा. त्यासाठी आपल्याकडे आले आहेत, प्रसिद्ध फेसबुकी विचारजंत (जीभ चावून) सॉरी, विचारवंत म्हणायचं होतं मला, पण एका सरसंघसंपादकांचे अग्रलेख वाचून वाचून माझी शब्दसंपदा नको तिथे संपन्न झालेली आहे, तर हे आहेत प्रख्यात फेसबुकी विचारवंत ना. ना. चेहरे. आपले आजचे दुसरे पाहुणे आहेत व्हॉट्सऍप कामगार स. दा. कष्टी आणि तिसरे पाहुणे आहेत माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातले तज्ञ आय. टी. तिरंदाज. नमस्कार.
(चेहरे लॅपटॉपमधून, कष्टी फोनमधून डोकं वर काढून नमस्कार करतात. तिरंदाज मात्र फोन आणि लॅपटॉपमधून डोकं वर काढतच नाहीत. त्यांना हलवून सांगितल्यानंतर ते कानातली इयरफोनची बोंडकं काढून नमस्कार करतात आणि पुन्हा डोकं खाली घालतात.)
नवखे ः अरे वा वा वा! आपण सगळे लोक अजूनही कार्यरत आहात, इथे या कार्यक्रमात आल्यानंतरही तुमचं काम थांबलेलं नाही, हे पाहून मला फार आनंद झाला. आज देशाला तुमच्यासारख्याच लोकांची गरज आहे.
नाना ः तुमचं हे बोलणं ऐकून मला फार गहिवरून आलं.
सदा ः हो ना, माझेही डोळे पाण्याने डबडबले.
नवखे ः का हो का?
नाना ः अहो, रिकामटेकडे आहोत, असाच सगळय़ांचा समज असतो. घरात तर आम्हाला फार हिडीसफिडीस केलं जातं.
सदा ः बरोबर आहे नानांचं. मला तर आता हेही आठवत नाहीये की घरात हिडीसफिडीस होते म्हणून मी व्हॉट्सऍपवर असतो की मी व्हॉट्सऍपवर असतो म्हणून मला हिडीसफिडीस होते.
नाना ः मलाही सगळे फेसबुकवर पडीक असतो म्हणून हिणवतात हो!
(या सगळय़ा भानगडीत आयटी मात्र डोकं वर काढत नाही. त्याला नवखे पुनःपुन्हा विचारतो, तेव्हा तो उत्तरतो.)
आयटी ः माझा हा पोटापाण्याचा धंदा आहे. हे घरातल्यांना माहिती आहे. बरं, मी कायम कुठेही गेलो तरी असाच असतो. लग्न झालं तेव्हा त्या अंतरपाटाच्या मागेही असाच उभा होतो. त्यामुळे मी काम कधी करतोय आणि टाइमपास कधी करतोय, हे कुणाला कळण्याची शक्यताच नसते.
नवखे ः आणि तुमचं बरचसं काम टाइमपाससारखंच असतं नाही का? (आपल्याच विनोदावर हहहह करत हसून) मला सांगा नाना, तुम्ही विचारजंत... आय मीन विचारवंत कधी झालात?
नाना ः विचारवंत होता येत नाही. जन्मच विचारवंत म्हणून व्हावा लागतो. ठाम आणि स्पष्टपणे मतं मांडता यावी लागतात. फेसबुकच्या जन्मानंतर मला एक माध्यम सापडलं, बस.
नवखे ः माणूस जन्मजातच विचारवंत असतो, असा एक नवा विचार तुम्ही दिलेला आहेतच नाना! पण, पुढे काही अभ्यास वगैरे तर करावा लागत असेल ना?
नाना ः अभ्यास? तो करून काय करायचंय? इथे काय दहावी-बारावीची परीक्षा दय़ायचीये अभ्यास करून? काहीतरीच काय! अभ्यास करण्यात वेळ घालवला तर मतं व्यक्त कधी करायची? असं आहे नवखे, मी मुळातच बुद्धिमान असल्यामुळे मला उपजतच काही मतं आहेत. ती माझी मतं आहेत, त्याअर्थी ती बरोबरच आहेत. ती मी फक्त मांडतो आणि त्यांचं समर्थन करत राहतो. जे त्या मतांच्या विरोधात बोलतो, विरोधी मत व्यक्त करतो तो मूर्ख आणि जो माझ्या हो ला हो करतो, तो हुशार असा सिंपल फंडा आहे.
नवखे ः फारच सुंदर सांगितलंत नाना! पण, निवडणुकीसारख्या विषयात आधीच्या निवडणुका, मतदानाचे ट्रेंड, जातपातीची समीकरणं वगैरे गोष्टींची थोडीफार माहिती तरी असावी लागत असेलच ना?
नाना ः नवखे तुम्ही भारतीय आहात की बांगलादेशी?
नवखे ः अर्थातच भारतीय. पण तुम्ही असं का विचारताय?
नाना ः माहिती, अभ्यास वगैरे काहीतरी भयंकर कुणी घुसवलंय तुमच्या डोक्यात? अहो, भारतात राहतो आपण. मला सांगा तुमचा आवडता खेळ कोणता?
नवखे ः अर्थातच क्रिकेट.
नाना ः तुम्ही कधी मैदानात पॅडबिड लावून क्रिकेट खेळला आहात, सीझन बॉल कधी हातात घेतलाय? हाफ व्हॉली, फुल लेंग्थ, गुड लेंग्थ, मिड ऑन, लाँग ऑन, शॉर्ट लेग वगैरेंमधला फरक तुम्हाला माहिती आहे का?
नवखे ः नाही.
नाना ः तरी काल संध्याकाळी तुम्ही याच वेळी विराट कोहलीने त्याच्या बॅटिंगचं तंत्र सुधारण्यासाठी काय करायला पाहिजे याच्या टिपा देतच होतात ना? तसंच असतं ते! मला ठेंगा पक्ष आवडतो. या पक्षाने सगळय़ा भारतवर्षाला गेली साठ वर्षं ठेंगा दाखवलाय, असं विरोधक म्हणतात. तो ठेंगा नसून ती प्रोत्साहनाची, प्रगतीची खूण आहे, असं मी म्हणतो. काही झालं तरी देशात ठेंग्याला पर्याय नाही, असं माझं मत आहे. तेच मी मांडतो, ठासून मांडतो. देशातल्या सगळय़ाच्या सगळय़ा जागा याच पक्षाला मिळतील, असं भाकीत करून मोकळा होतो.
नवखे ः नानांसारख्या विचारवंतांची विचारप्रक्रिया आपण पाहिली. आता वळूयात स. दा. कष्टी साहेबांकडे. तुम्ही सतत मोबाइल फोनला चिकटलेले असता. काय करत असता तुम्ही?
सदा ः मी सतत व्हॉट्सऍपवर असतो. आमच्या गुलाब पक्षाचा आणि जितेंद्रभाईंचा प्रचार करत असतो. 
नवखे ः म्हणजे तुम्हीही तेच करत असता, जे नाना करत असतात. पण, तुम्हाला लोक विचारवंत म्हणत नाहीत. तुम्हाला याचं वाईट नाही वाटत?
सदा ः कमाल झाली. तुम्ही मला असं विचारताय की नानांना लोक आईवरून शिवी देतात आणि मला देत नाहीत, तर मला वाईट नाही का वाटत? अहो, विचारवंत, सेक्युलर, समाजवादी, अंधश्रद्धा निर्मूलक या सगळय़ा शिव्या आहेत आजकालच्या काळातल्या. त्या लोक मला देत नाहीत, याचा मला आनंदच होतो. शिवाय, नाना डोकं वापरत असतील. मी ते वापरत नाही. मी एक सैनिक आहे. लढाई कुणाची आहे, तिच्यात फायदा कुणाचा होणार, मुळात लढाई करत बसण्यात काही अर्थ आहे का, या सगळय़ा भानगडींमध्ये मी पडत नाही. आदेश आला की काम करतो.
नवखे ः काय काम करता तुम्ही?
सदा ः शिवीगाळ, बदनामी, चारित्र्यहनन, खोटे दावे, खोटे आरोप, मस्करी, टिंगलटवाळी, शेरेबाजी, अश्लील टिप्पणी असं काहीही करून मी विरोधी पार्टीचं आणि विरोधी पार्टीच्या लोकांचं हसं उडवत असतो. प्रतिपक्षाच्या बायकांविषयी असभ्य उद्गार ही माझी स्पेशॅलिटी आहे.
नवखे ः अहो, पण, तुम्ही तर खूप संस्कारी संघटनेचे सदस्य आहात...
सदा ः म्हणजे काय? आमच्यावरचे संस्कारच आहेत तसे. आम्ही बोलू ते परखड आणि इतर करतील ती शिवीगाळ असा आमचा खाक्या आहे. आमच्या वेगवेगळय़ा शाखांचे लोक काय काय भारी प्रकार करतात, ते एकदा व्हॉट्सऍपवर पाहा. चक्रावून जाल. आमच्या प्रातःस्मरणीय यादीत खूप लोक आहेत. पण, आमचे खरे आदर्श दोनच. एक हिटलर आणि दुसरा गोबेल्स.
नवखे ः गोबेल्सच्या प्रचारतंत्राचे धडे तर आम्हीही शिकलेलो आहोतच सदाभाऊ. फक्त आम्ही तुमच्यासारखे नॉटपेड नाही, प्रिपेड, पोस्टपेड आहोत. असो. आता वळूयात आयटी तिरंदाज साहेबांकडे. नेहमीप्रमाणे त्यांची मान खालीच आहे. मला कुतूहल आहे, आत्ता तुम्ही नेमकं काय काम करताय या कार्यक्रमात बसून?
आयटी ः फेसबुकवर पोस्ट करत होतो, ट्वीट करत होतो, एसेमेस पाठवत होतो, व्हॉट्सऍपवर मेसेज पाठवत होतो...
नवखे ः तुम्ही लोक जे बोलताय त्याचे. नाना बोलले ते आमच्या एका क्लायंटसाठी चांगलं वाटलं. सदाभाऊ बोलले ते दुसर्या क्लायंटच्या उपयोगाचं होतं. तुम्ही बोलताय ते माझ्या उपयोगाचं होतं. फटाफट तुमच्या बोलण्याची स्टेटस झाली, ट्वीट झाली, एसेमेस बनले. आतापर्यंत काही लाख लोकांपर्यंत पोहोचलेसुद्धा असतील तुमचे विचार.
नाना ः एक्स्क्यूज मी, पण, तुमचं अकाउंट मी पाहिलेलं नाही फेसबुकवर. माझ्या फ्रेंडलिस्टमध्ये नाही आहात तुम्ही.
आयटी (हसून) ः मी? अहो मी कोण? माझं एक अकाउंट नाही आणि माझा एक नंबर नाही. माझी म्हणजे आमच्या टीमची हजारो फेक अकाउंट आहेत फेसबुकवर आणि व्हॉट्ऍप-ट्विटरवर. गरजेप्रमाणे आम्ही हवी तेवढी अकाउंट बनवू शकतो. या सगळय़ा अकाउंट्सचं काम हेच असतं. प्रचार, प्रचार आणि प्रचार. जी पार्टी पैसे देईल तिचा प्रचार.
नवखे ः पण मला सांगा तुमची विचारधारा कोणती?
आयटी  (हाताने नोटांची खूण करत) ः जी तुमची आहे तीच आमची विचारधारा. ये सब चोर है! यांच्यातला कोणीही सत्तेत आला तरी आपल्या आयुष्यात काही फरक पडत नाही. यांचे चेहरे बदलतात, बॅनर बदलतात, नावं बदलतात, पण सगळे शेवटी एकच आहेत. सगळे मिळून आपल्याला उल्लू बनवत असतात. मग पाच वर्षांतून एकदा यांना पिळून घेण्याची संधी का सोडायची? जो पैसे देईल त्याचा प्रचार करायचा. सिंपल.
नवखे ः अहो, पण ठेंगा पार्टीचाही प्रचार तुम्ही करणार आणि गुलाब पार्टीचाही प्रचार तुम्हीच करणार?
आयटी ः त्याने फरक काय पडतो? अहो इकडे लिहिलेला मजकूर चार शब्द फिरवून तिकडे जसाच्या तसा वापरता येतो. आपली पार्टी वेगळी आहे, आपले विचार वेगळे आहेत, हे नाना आणि सदाभाऊंना वाटतं. हा वेगळेपणा पाटर्य़ांमध्ये नाही, यांच्या डोक्यात आहे. यांच्या पाटर्य़ा म्हणजे पैसेवाल्यांच्या गळय़ातले टाय आहेत किंवा खिशातले नाक पुसायचे रूमाल- पाच वर्षं हा वापरला, कंटाळा आला की पाच वर्षांनी दुसरा वापरला.
नवखे (आपली जागा सोडून घाईघाईने आयटीकडे जातो आणि चक्क त्याचं तोंड दाबून कॅमेर्यापुढे वेगवेगळे हातवारे करून) ः हरे राम, याला कोणी बोलावला रे! हा आपलीही ट्रेड सिक्रेट फोडून टाकेल आता. तर प्रेक्षकहो, आपण पाहात होतात आमचा खास कार्यक्रम उरवळ आणि दरवळ. काही अपरिहार्य कारणामुळे तो आम्ही मध्येच बंद करत आहोत. पण, चिंता करू नका. हा चॅनेल सोडून कुठेही जाऊ नका. तुमच्यासाठी `अंधश्रद्धा निर्मूलन झालेच पाहिजे' हा कार्यक्रम थोडय़ाच वेळात सादर होणार आहे. त्याआधी पाहा ही सर्वसंकटनिवारक शनिमंत्राची जाहिरात.

No comments:

Post a Comment