Tuesday, July 29, 2014

मुन्ना, बापू आणि आपू!

बापूंच्या तसबिरीला नमस्कार करून मुन्नाने खादीच्या कुर्त्यांचा गठ्ठा उचलला आणि स्कूटरच्या साइडकारमध्ये बसलेल्या सर्किटच्या हातात आणून ठेवला. किक मारून दोघे निघाले. रस्त्यात काहीतरी लोचा असल्याची जाणीव त्यांना झाली. नेहमीची वाहतूक कमी झाली होती. दुकानं बंद झाली होती. अचानक मागून कसले कसले ध्वज घेतलेल्या मोटरसायकलस्वार तरुणांचा एक जथ्था अर्वाच्य घोषणाबाजी करत गेला. त्यांच्यातल्या दोनचारजणांनी मुन्नाची स्कूटर साइडला दाबली आणि तोंड उचकटशील तर फोडून टाकू, अशा आशयाच्या खुणाही केल्या. मुन्ना हा जुना मुन्ना असता तर त्याने अशा पोरांना तोंड रिपेअर करण्याच्या पलीकडे कसं फोडायचं, याचं प्रात्यक्षिक त्यांच्याच तोंडावर करून दाखवलं असतं. पण...
...सण्णकन् दोन दगड आले आणि मुन्ना-सर्किटच्या डोक्यात बसले, तेव्हा मुन्नाची तंद्री भंग पावली. एका हाताने रक्ताळलेली जखम दाबत त्याने गाडी साइडला केली न केली, तोच वाँव वाँव करत पोलिसांची गाडी आली आणि त्यांनी या दोघांनाच उचललं.
``अरे साहेब, आप का कुछ मिसअंडरस्टँडिंग हो रैला है... आम्ही दंगा केलेला नाही... उलट आम्हालाच दगड लागलाय, हे बघा...'' मुन्नाने भळभळती जखम दाखवली.
पांडू हवालदार म्हणाला, ``ए, ज्यादा शानपना करशील तर...'' पुढचं वाक्य त्याने हातातल्या दांडूच्या साहय़ाने ऍक्शन करून सांगितलं. मुन्नाला ती भाषा पूर्वेतिहासामुळे अवगत होतीच. तो गप्प बसला. पोलिसांना सर्वसामान्य माणसांशी याच भाषेत बोलण्याचं खास शिक्षण दिलं जातं, त्यामुळेच या खात्याविषयी लोकांच्या मनात खास ममत्व आहे, याची त्याला कल्पना होती. दंगलीच्या ठिकाणी पळून गेलेल्या दंगलखोरांच्या मागे लागून कोण डोक्यात दगड खाईल? त्यापेक्षा पडले-झडलेले जखमी लोक दंगेखोर म्हणून पकडले की संख्या भरते आणि पोलिसांनी समाजकंटकांना ताब्यात घेतल्यामुळे किती वेगाने दंगल आटोक्यात आली, हे दुसर्या दिवशीच्या पेपरात छापून येण्याची सोय होते. त्यामुळे आता आजची रात्र लॉकअपमध्येच, हे दोघांनाही कळलं. त्यात पोलिस स्टेशनातला इन्स्पेक्टर जुन्या `ओळखी'चा निघाला, ``क्या यार मुन्ना, बापू का नाम बदनाम करता है तू?'' छद्मीपणे हसत इन्स्पेक्टर म्हणाला, ``खादी का कपडा पहनताय और ये दंगाफसाद करता है, मुझे लगा था तू सुधर गया, लाइनपे आ गया, पण, कुत्र्याचं शेपूट सहा महिने नळीत ठेवलं तरी वाकडंच.''
खर्रखटॅक आवाज करत लॉकअपचा दरवाजा बंद झाला. संतापलेला सर्किट मुन्नाला म्हणाला, ``क्या भाय, कितना इन्सल्ट किया वो इन्स्पेक्टर. तुम्ही ऐकून घेतलंत? खरीखोटी सुनवून टाकायची ना. साला अच्छा आदमी बनने को जाओ, तो भी लॉकअप छूटता नहीं है.'' मुन्ना शांतपणे म्हणाला, ``अरे यार, तू भी क्यूं इतना टेन्शन लेता है. कल सुबह तो अपुन बाहर रहेगा. आपल्याला तर वैसेभी आदत आहे इथे राहण्याची. बर्याच दिवसांत जेल बघितलं नव्हतं. ये देख, दीवारों पे नया रंग निकालेला दिखता है...''
``क्या भाय, तुमको तो कोई भी सिच्युएशन मे मजाक सूझता है,'' सर्किटचा पारा जरा उतरला, ``लेकिन भाय ये शहर मे बवाल किस चीज पे हो रैला है?''
``अरे, वो इंटरनेटपे कोई कुछ किसी महापुरुष के बारे मे गलत लिख दिया, तो इनका सर खिसक जाता है, शुरू हो जाता है दंगा!''
``बोले तो अजीब येडे लोग है भाय ये तो. जो लिखा वो सहीसलामत और इधर ये एकदूसरे के सर फोड रैले है?'' सर्किटला आपलं नाव इतरच माणसं सार्थ करतायत, याचं फार आश्चर्य वाटलं, ``लेकिन भाय, एक चीज मेरे समझ मे नहीं आयी,'' सर्किटच्या डोक्यात भुंगा पोखरत होता, ``ये अपने बापू पे कभी बवाल नही होता है, वो क्यू? बापू का फॉल्ट क्या है? हमलोग तो खालीपिली उसको बडा मानते है. आजकल के जमाने मे उसका कोई व्हॅल्यूही नहीं है...''
मुन्ना हसून म्हणाला, ``ए सर्किट, ये इतना बडा बडा सवाल का जवाब देने के लिए भेजा मंगताय रे! वो अपुन के पास होता तो अपुन आज इधर होता क्या? तू सीधा बापूसेच पूछ ना! वो देख कोने मे खडा कब से मुस्करा रहेला है.''
सर्किटने डोळे चोळून पाहिलं. खरोखरच एका कोपर्यात बापू शांतपणे हसत उभे होते.
``बापू, इसमे हसनेवाली कोई बातही नही है, साला अपुन का कोई प्रेस्टिजही नही है दुनिया मे. आम्हाला कधीच असं ऐकायला मिळत नाही की बापूंच्या तसबिरीची विटंबना झाली, शंभर बस फोडल्या, 200 टॅक्सी तोडल्या, शहर बंद, नाके नाके पे कर्फ्यू, साला अभी तो यही नौबत आ गयी है के बापू के साथ कोई खिलवाड ही नही करता... हर किसी को मालूम है इंडिया मे इसका कोई व्हॅल्यू ही नही है...''
बापूंच्या चेहर्यावरचं स्मित मावळलं नाही. ते पुढे आले, सर्किटच्या पाठीवर हात ठेवून, त्याला शेजारी बसवून घेत म्हणाले, ``कोई मुझे माने या न माने, इससे मुझे कोई फर्क नहीं पडता बेटा. आता हा मुन्ना बघ. याने कधी माझं नावही ऐकलं नव्हतं. त्याला कधीतरी मला हाक मारावीशी वाटली. मी त्याच्या मदतीला धावलो. माझ्याकडून जमेल तशी मदत केली. त्याला माझा मार्ग सांगितला. तो त्याने आपखुशीने पत्करलाय. माझं काम असंच चालतं. कोणी हाक मारली, तरच मी जातो.''
``बापू, लेकिन तुम्हारा व्हॅल्यू ऐसा कम होते जाएगा, तो एक टाइम ऐसा आयेगा के कोई तुमको पुकारेगा नही. फिर क्या करोगे?''
``चरखा चलाऊंगा. सफाई करूंगा, कोई भी छोटा मोटा काम करते रहूंगा. मला सतत कोणीतरी हाक मारलीच पाहिजे, असाही माझा आग्रह नाही. उलट माणसांनी आतून इतकं ताकदवान व्हावं की त्यांना मलाच काय, कुणालाही हाक मारायची गरज भासू नये, अशी माझी इच्छा आहे. या जगात जे जे जन्माला येतं ते ते मरण पावतं. मग मी आणि माझं तत्त्वज्ञान तसं असावं, असा माझा आग्रह कशाला असेल? कधी ना कधी एखादा माणूस माझ्यापेक्षा मोठं तत्त्वज्ञान सांगेल आणि मला अडगळीत टाकेल. तेव्हा मी आनंदाने अडगळीत जाईन.''
``येहीच प्रॉब्लेम है तुम्हारा बापू. तुम खुद ऐसी बात करते हो तो तुम्हारे नाम पे कोई पत्थर कैसे उठायेगा, कोई किसी की माँ-भैन कैसे एक करेगा, कैसे सब की वाट लगा डालेगा? तुम्हारे प्रेस्टिज के वास्ते कैसे लडेगा?''
``बेटा सर्किट, लेकिन मुझे ऐसा प्रेस्टिज चाहिएही क्यूँ? तुला काय वाटतं? माझ्या बदनामीचे प्रयत्न होत नाहीत? खूप होतात. बनावट फोटो तयार करून मला मुलींबरोबर नाचताना दाखवतात, शिव्या देतात, टकल्या म्हणतात, थेरडा म्हणतात, अचकट पाचकट विनोद करतात. पण, जो मला खरोखर मानतो, तो माणूस असलं काही वाचून बिथरत नाही. ज्यांनी हे केलं, ते आजारी आहेत, त्यांना उपचारांची गरज आहे, हे त्या माणसाला माहिती असतं. काही माणसांचा आजार तर क्रॉनिक असतो, संस्कृतीचा जप करत ते आयुष्यभर ते या द्वेषाच्या विकृतीने पछाडलेले राहणार असतात. पण, त्यांच्याशी लढण्याचा एकच मार्ग असतो. प्रेमाचा. माझ्या नावाने कधी कोणी कोणाचं डोकं फोडलं तर मला जास्त वाईट वाटेल सर्किट. त्यापेक्षा घालूदेत की मला शिव्या, होऊन जाऊदेत त्यांचाही निचरा. त्याने काही माझ्या अंगाला भोकं पडत नाहीत की मी खोटा ठरत नाही आणि मी खोटा ठरायला घाबरतही नाही. अरे, मी स्वतःच स्वतःची इतकी चिकित्सा केलेली आहे की इतरांनी केलेल्या चिकित्सेला मी कशाला घाबरेन?''
``अभी एक बात मेरे समझ मे आयी बापू, तुम्हारा आयडिया मैने पैचान लिया,'' सर्किटचे डोळे चमकत होते, ``साला कोणाचा पण अपमान करायला मजा कधी येते, जेव्हा सामनेवाला गरम होतो, तेव्हा. तू तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर घेतलेला माणूस. तुझी मस्करी करून तू गरमच होत नाहीस, चिडत नाहीस, म्हणजे समोरच्याचा सगळा मजा किरकिरा. बोले तो सॉलिड आयडिया बापू! मान गये तेरेकू.'' सर्किटने दिलेली टाळी स्वीकारून बापू गायब झाले. तोवर मध्यरात्र होऊन गेली होती, मुन्ना आणि सर्किट- दोघांच्याही डोळय़ांवर झापड आली होती...
....................
``ए सर्किट, उठ ना रे सर्किट, अरे, ये देख ये असली केमिकल लोच्या, ये कौन आ गया देख'' सर्किटला मुन्नाने हलवून हलवून जागं केलं. मुन्नाच्या बोटाच्या दिशेने सर्किटने पाहिलं तर त्याचीही झोप उडाली. कोठडीमध्ये हुबेहूब बापू होता, पण तरुणपणातला. तसाच चेहरा, तशीच मिशी, तसाच चष्मा, डोळय़ांत तसेच भाव. बापूला या रूपात आपल्याला भेटायची काय गरज आहे, असा प्रश्न दोघांनाही पडला. एकदम डोक्यात प्रकाश पडून सर्किट म्हणाला, ``भाय भाय, ये बापू नही, आपू है...''
``आपू... मतलब?''
``अरे भाय ये आप का बापू है...''
``ए सर्किट, तू क्या पावशेर मार के आया है क्या? मेरा बापू तो एकही है, वो तो तेरा भी बापू है, पूरे देश का बापू है...''
``अरे भाय, ये वैसे आप का बापू नहीं है, आप का मतलब आम आदमी पार्टी का बापू है, अरविंद बापू. आप का बापू है इसलिए इसका शॉर्टफॉर्म है आपू.''
 ``तेरेकू क्या मालूम? तू कैसे पहचानता है इसको?''
``भाय पूरा देश पैचानताय इसको. टीव्ही देखा करो तुम. जितना अपना नरेंदरभाय छाया रहताय टीव्हीपे उतनाच ये अरविंद भाय भी दिखता रहता है.''
``ये रात दिन टीव्हीपे रहता है तो काम कब करता है?''
``अच्छा सवाल है भाय. उसी से पूछते है ना! ए चिरकुट, इधर आ. डरने का नै. भाय अभी सुधर गयेले है. बोल ना, ये क्या पूछ रहे है.''
``मै कोई टीव्ही पे आने के लिए काम नहीं करता हूँ, मै जो करता हूँ वो टीव्ही पे आता है,'' आपूंनी बाणेदारपणे उत्तर दिलं. ते सकाळी दातही बाणेदारपणेच घासतात, सगळं बाणेदारपणेच करतात.
मुन्नाभाई हसला आणि म्हणाला, ``अरविंद भाय, तू अच्छा आदमी दिखता है. मैने इतने लोग देखे, जो दूसरे को टोपी पहनाते है. हमारे बापू ने भी सब को टोपी पहनाया, खुद के नाम का टोपी खुद नहीं पेहेना. पण, तू बापूची टोपी इतरांना घालताना स्वतःपण घातलीस. लेकिन भाय, तू ये हररोज लफडा क्यूं करता रहता है?''
``म्हणजे काय, मी सिस्टमच्या विरुद्ध लढतोय. लढतच राहणार. सगळा भ्रष्टाचार निपटून काढणार.''
``कैसे करेगा ये? जेल मे आके? भाषण दे के? अरे, पब्लिकने तुमपर भरौसा किया, तुमको दिल्ली मे चुन के दिया. तूने क्या किया? राज्य चालवून दाखवण्याऐवजी सत्ता सोडलीस आणि लोकसभेच्या रिंगणात उतरलास माती खायला. अब तुम को कौन वोट देगा? और किसलिए देगा?''
``गलती हो गयी वो हमसे. हर किसीसे होती है.''
``लेकिन जो हमेशा हर किसी की गलती दिखाते रहता है, उसकी गलती को लोग माफ नहीं करते है, समझ. अब भी सुधर जा. ये टीव्ही पे चमकते बैठेगा, तो पब्लिक टीव्हीस्टार बना देगी तेरे को! दो दिन की चांदनी, फिर जिंदगी भर का अंधेरा.''
``लेकिन सिस्टम से लडने मे क्या बुराई है, या देशातल्या जनतेला भ्रष्टाचाराचा कंटाळा आलाय, तिला बदल हवाय.''
``सही बोल रहा है भाई तू, लेकिन जनता ने वो बदलाव कर दिया है. तूने गाडी को धक्का तो दिया था, लेकिन स्टीअरिंग व्हील संभाला नही. उधर नरेंद्रभाईने चान्स मारा और अभी वो गाडी लेके फुर्रर्र हो गया है!''
``बेटा गांधी टोपी पहनने से कोई बापू नही बन जाता,'' सर्किट म्हणाला.
``लेकिन तुमको बापू नही, आपूही बननेका है,'' मुन्नाने त्याला जोड दिली, ``बापू तर विदेशी सत्तेविरुद्ध लढले होते. त्यांची लढाई सोपी होती. तुला तुझ्याच देशातल्या माणसांबरोबर लढायचंय. त्यांच्या वृत्तीबरोबर लढायचंय. यांना दुसर्याचा भ्रष्टाचार दिसतो आणि खुपतो, ते स्वतः त्याच यंत्रणेचा भाग असतात आणि त्यांच्या सोयीसाठी ती सिस्टम त्यांना हवी असते. तेरी लडाई भौत बडी है मेरे बाप, तू जेल मे टाइमपास मत कर और ये कॅमेरावालोंको अपने दिल-दिमाग से निकाल दे. भगा दे. बापू को याद कर, सोच तेरी जगह बापू होता, तो क्या करता. फिर जो केमिकल लोच्या होगा, उससे तुझे पता चलेगा क्या करना है, कहाँ जाना है.''
आपूच्या चेहर्यावरचे नेहमीचेच मख्ख भाव पाहून त्याला हे कळलंय का, पटलंय का, काही कळायला मार्ग नव्हता. तेवढय़ात लॉकअपचा दरवाजा खटखटवून हवालदाराने मुन्ना-सर्किट दोघांना बाहेर काढलं आणि आपूला म्हणाला, ``साब, आप की जमानत हो गयी है...''
``मी जामीन घेणार नाही. मी लढणार. मी आतच राहणार.'' आपूने निर्धाराने उत्तर दिलं.
मुन्ना-सर्किट दोघांनीही कपाळावर हात मारला आणि `ये कभी नही सुधरेगा' असं म्हणून दोघेही निघणार, तेवढय़ात मुन्नाचं लक्ष कोपर्यात गेलं...
...तिथे आपूकडे पाहात बापू शांतपणे हसत उभे होते.

No comments:

Post a Comment