Thursday, September 29, 2011

बालकथा : वेडा काका!

ना नन न न न न ना ना ना
 
ता तत त त त त ता ता ता
 
शाळेत बाईंनी आजच शिकवलेल्या गाण्याची चाल गुणगुणत, ठेक्यात पावलं टाकत, नाचत नाचत मनू त्या वळणापाशी आली आणि एकदम गप्पच झाली. पावलं मंदावली. हा तिचा शाळेचा नेहमीचा रस्ता. आईचं बोट याच वर्षात सुटलं होतं. ‘‘आमची मनू आता मोठी झाली, शाळेत एकटी जाते,’’ असं आई कौतुकानं जो भेटेल त्याला सांगायची. गाव छोटं. रस्तेही पायवाटांसारखेच. शाळा जेमतेम दहा मिनिटांवर. सगळा रस्ता ओळखीचा. फक्त या एका वळणावर अनोळखी व्हायचा. इथल्या झाडाखाली वेडा काका राहायचा. काळीपांढरी दाढी वाढलेला, ऊग्र चेह-याचा, मोठय़ा डोळ्यांचा तो माणूस कधी स्वत:शीच बोलायचा, हसायचा, कधी स्वत:वरच संतापायचा. मूळचा गाववाला. छान संसार होता. छोटी चुणचुणीत मुलगी-बायको आणि तो. काहीतरी बिनसलं आणि त्याचा तोल ढळत गेला. बायको-मुलीला घेऊन माहेरी निघून गेली. हा घरातून रस्त्यावर आला. आता हे बोरासारख्या तुरट-गोड फळांनी भरलेलं झाड हेच त्याचं घर झालं. त्यानं गावातल्या कुणालाही आजवर काहीही त्रास दिला नव्हता. त्यामुळं लोक त्याच्या वेडय़ा चाळ्यांकडे दुर्लक्ष करायचे. त्याची अवस्था पाहून हळहळायचे. घरातलं उरलंसुरलं, उष्टंपाष्टं आणून झाडाशेजारच्या कोप-यात ठेवून जायचे. त्यातूनच त्याचं पोट भरायचं.
 
शाळेतून घरी जाताना मुक्त बागडणा-या पोरांचे हात आया या वळणावर मात्र घट्ट पकडून त्यांना घाईघाईनं चालवायच्या. ‘‘कितीही चांगला वागत असला तरी शेवटी वेडा तो वेडाच,’’ असं म्हणून झरझर वळण पार करायच्या. ‘‘मने, एकटी जा तू शाळेला, पण त्या वेडय़ा काकाच्या इथे रेंगाळायचं नाही हां. त्याच्याकडे बघायचंही नाही. चटकन पुढे यायचं.’’ ही आईची तंबी.
 
मनूची पावलं तिथं आपसूक थबकली. तिनं झाडाच्या दिशेनं पाहिलं. वेडा काका झाडाखाली बसून जमिनीवरच्या पानांच्या कच-यातून काहीतरी वेचून खात होता. ‘भूक लागलेली दिसतेय बिचा-याला,’ मनू मनोमन हळहळली. अचानक तिला आठवलं. आज डब्यात आईनं कोबीची भाजी दिल्यामुळं तिनं सुमीचा डबा खाल्ला होता. एक पोळी आणि भाजी शिल्लकच होती. ती ह्याला दिली तर? बापरे, पण, हा रागावून अंगावर धावून आला तर? छय़ा, भूक लागलीये त्याला कित्ती! ती बोरासारखी फळं वेचून खातोय अधाशासारखा. पोळीभाजी दिली तर त्याचंही पोट भरेल आणि आपल्यालाही आईचा ओरडा खावा लागणार नाही. ‘‘रोज रोज काय पंचपक्वान्नं द्यायची गं तुला डब्यातून? एक दिवस कोबीची भाजी खाऊ शकत नाहीस का? लहान मुलांनी पानात पडेल त्याचा फडशा पाडायला शिकलं पाहिजे. हे असे खाण्याचे नखरे आहेत ना म्हणून हाडाची काडं निघालीयेत तुझी.’’ आईचा ओरडा मनूच्या कानात घुमला.
 
तिनं ताबडतोब दप्तर उघडलं, डबा काढला, पोळीभाजीची गुंडाळी केली आणि वेडय़ा काकाच्या मळक्या चादरीच्या कोप-यावर ती ठेवून धूम ठोकली.
 
नंतर हे नेहमीचंच झालं. आधी डब्यात काही आवडीचं नसलं, तर मनू वेडय़ा काकासाठी ते अन्न ठेवून जायची. एक दिवस ती तशीच पुढे जात होती, तेव्हा वेडय़ा काकानं त्याच्या जागेवरूनच तिला ‘शुक शुक’ करून खुणेनं विचारलं. ‘‘आज नाही आणला डबा,’’ असं सांगून मनूनं पळ काढला, पण तिला वाईट वाटलं. मग डबा पुरत नाही, असं सांगून तिनं एक पोळी जास्त न्यायला सुरुवात केली. ती पोळी आणि भाजीची गुंडाळी रोज वेडय़ा काकाच्या मुखी लागू लागली. काकाचा चेहरा हळूहळू मवाळ होऊ लागला. एकदोनदा तर तिच्याकडे पाहून तो ओळखीचं हसलासुद्धा. मनूला आता त्याची भीती वाटेनाशी झाली.
एके दिवशी मात्र वेगळाच प्रकार झाला. मनू डब्यातून पोळीभाजी काढत होती, तेवढय़ात तिला कुबट वास आला. पाहते तो काका थेट तिच्यासमोर. ‘देते हां खाऊ,’ म्हणून मनूनं पोळीभाजीची गुंडाळी केली, तेवढ्यात काकानं डबाच काढून घेतला तिच्या हातातून. ‘अरे, देते मी तुला पोळीभाजी, डबा काय करायचाय तुला?’ म्हणत मनूनं डबा काढून घ्यायचा प्रयत्न केला; पण काका ऐकेना. काहीतरी अगम्य बोलत, विक्षिप्त हातवारे करत तो तिला हुसकावत होता. शेवटी शेवटी तर तो चिडलाच. त्याचं ते ऊग्र रूप पाहून मनू घाबरली. तिनं घरची वाट धरली.
 
बाप रे! आता आई डबा धुवायला मागेल, तेव्हा काय करायचं? तिला काय सांगायचं? मनूला मोठा प्रश्न पडला. ‘‘अगं, माझा डबा शिल्लक होता. सोनल म्हणाली, मी खाते. तिच्याकडेच राहिला,’’ असं सांगून तिनं वेळ मारून नेली.
 
पण संध्याकाळी सोनलच घरी आली खेळायला. आईनं विचारलं, ‘‘डबा का नाही आणलास?’’ झालं, मनूचं बिंग फुटलं. आईला वाटलं मनूनं डबा हरवलाय, म्हणून ती खोटं बोलतेय. शेवटी मनूनं सांगितलंच, ‘‘अगं, त्या वेडय़ा काकानं काढून घेतला माझ्या हातातून.’’ पुढचं काही ऐकायला आई होतीच कुठे घरात. ती शेजारच्या नाथाकाकाच्या दुकानात जाऊन पोहोचली. नाथाकाकानं सोबतीला आणखी दोन गडी घेतले आणि सगळे निघाले वेडय़ा काकाच्या झाडाकडे. पाठोपाठ आई आणि तिच्यापाठी धावत मनू.
 
‘‘आजवर कुणाला काही त्रास दिला नाही म्हणून गावानं सांभाळलं या येडय़ाला.’’
 
‘‘आता लहान पोरींच्या हातातले डबे हिसकतो म्हणजे काय?’’
 
‘‘नंतर काय करील?’’
 
‘‘अरे, पण जाऊन तर बघूयात आधी डबा आहे का त्याच्याकडे?’’
 
तावातावानं चर्चा करत मंडळी झाडापाशी पोहोचली.
 
वेडा काका मनूचा डबा घट्ट छातीशी धरून बसला होता. एवढी सगळी माणसं बघून तो गांगरला. मनूला पाहून त्याचा चेहरा उजळला. तो तिला त्याच्या अगम्य भाषेत काही सांगू पाहणार तेवढय़ात नाथाकाकानं काडकन त्याच्या मुस्कटात लगावली. ‘‘ल्हान पोरींचे डबे पळवतोस व्हय रं सुक्काळीच्या.’’
 
‘अँ अँ अँ अँ ऊँ ऊँ ऊँ ऊँ’ असं काहीतरी बोलत काका मार चुकवत होता आणि संतापलेले लोक त्याच्या कानाखाली मारत होते, कुणी गुद्दे घालून डबा काढून घेऊ पाहात होते. त्याचं तोंड सुजलं होतं, एक जखमही झाली होती. रक्त ठिबकत होतं. पण, डबा सोडत नव्हता. त्याचं सगळं लक्ष मनूवर होतं. तो सगळ्यांना चुकवत चुकवत धावत मनूपाशी आला आणि त्यानं डबा मनूच्या हातात ठेवला आणि तो काहीतरी खूण करू लागला. आजवर काकाची भाषा न कळलेल्या मनूला आता मात्र त्याच्या पाणावल्या डोळ्यांतून त्याची भाषा समजली. सुजल्या चेह-यानं हसण्याचा कसनुसा प्रयत्न करत तो तिला डबा उघडायला सांगत होता. हा प्रकार पाहून थबकलेल्या लोकांसमोरच तिनं तो डबा उघडला. त्यात काका रोज वेचायचा ती बोरांसारखी तुरट-गोड फळं होती, वेडय़ा काकानं काळजीपूर्वक मनूसाठी वेचलेली. टपोरी. रसाळ.
 ..फाटल्या ओठांतून रक्त ठिबकत होतं तरी काका हसत होता आणि मनू मात्र रडत होती.. वेडय़ासारखी रडत होती!

(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 

(प्रहार, २३ सप्टेंबर, २०११)

No comments:

Post a Comment