Sunday, October 2, 2011

वय इथले उलटत नाही

समजा, एखादा मध्यमवयाचा माणूस एखाददिवशी शाळेचा गणवेश घालून, आईकडून चप्पट भांग पाडून घेऊन, पाटीदप्तर घेऊन शाळेतल्या बाकावर जाऊन बसला, तर ते बरं दिसेल का?
 
किंवा त्याहीपुढे जाऊन एखाद्यानं शाळकरी वयातच असं ठरवलं की, कितीही वय झालं तरी शाळेतून बाहेर पडायचंच नाही आणि मग तो मध्यमवयातही उपरोल्लेखित वेषभूषा करून रोज शाळेत जाऊन बालवाडीतल्या बाकावर जाऊन बसू लागला, तर त्याला आपण कौतुकानं चिरशिशुम्हणू काय?
 
मग 88व्या वर्षी, वय झाकण्याचे केविलवाणे आणि भेसूर उपद्व्याप करून आपल्याला न जमणारी आणि न शोभणारी कामं वयाला न शोभणा-या उत्साहात (कोणत्याही वयात उत्साह चांगलाच पण त्याचा उल्हासझाला, तर तो शोभेनासा होतो) करणा-या माणसाला चिरतरुणका म्हणायचं?.. खासकरून त्याचं सध्याचं रूप आणि वर्तन हे चिरकरुणया विशेषणाला अधिक शोभत असताना?
 
कधीकाळी त्याच्यासारखाच कोंबडा काढून त्याच्यासारखीच अर्धांगवात झाल्यासारखे हात लोंबवण्याची अदाआत्मसात केलेल्या मंडळींना आणि या अदेवर मनोमन फिदा झालेल्या मंडळींना त्याच्यासारखी वयाबरोबर न वाढण्याची मुभा मिळालेली नसते. त्यांना टकलं पडतात, नाही पडली तर केस पिकतात, दात पडतात, चेहरे सुरकुततात, हात-पाय थकतात, डोळे-कान निकामी होत जातात. अशावेळी, त्यांच्या तारुण्याचा तो सुगंधी, सुमधुर काळच जणू एखाद्या कुपीत बंद केल्यासारखा या चिरतरुण वृद्धाच्या तारुण्यात बंदिस्त होऊन जातो. पडद्यावर 88 वर्षाचा तो जेव्हा स्वत:च्या एकेकाळच्या तरुण राजबिंडय़ा रूपाची भ्रष्ट नक्कल करत असतो, तेव्हा यांना आताचा तो दिसत नसतोच; त्यांना जुनाच तो दिसत असतो आणि नकळत समोर बसलेले तेही आताचे ते उरत नाहीत, तेव्हाचे ते होऊन जातात.. म्हणजे परस्परसंमतीने हा गंडवागंडवीचा खेळ चालतो. या खेळाकडे बाहेरून पाहणा-याच्या मनात आधी हसू आणि नंतर करुणा दाटते.
 
कुणी सत्तरीतही चिरतरुण गायिका आपल्या म्हाता-या, बोजड, थरथरत्या आवाजात चाळीस वर्षापूर्वीची फडकती, नशिली गाणी आळवण्याचं बेसूर धाडस करते. त्याचे शब्द मध्येमध्ये विसरते. त्या गाण्यांच्या जोडीला तिनं घर कसं सोडलं, धाकटय़ा भावाला कसं सांभाळलं, दीदी हेच तिचंही श्रद्धास्थान कसं आहे, याची सातशे सत्त्याहत्तर वेळा वाजलेली टेप असते, पाचशे पंच्याहत्तर वेळा करून झालेल्या त्याच त्याच नकला असतात. गंमत म्हणजे काहीजणांसाठी हा भयंकर उद्वेगजनक प्रकार असतो, तर बहुतेकांसाठी मात्र डोळय़ांत-कानामनांत साठवून ठेवावा, असा अनुपम सोहळा. तिचं गाणं अजूनही भक्तिभावानं (असल्या आचरट धाडसासाठी भक्ती किंवा श्रद्धाच हवी) ऐकणा-यांची श्रवणयंत्रं सगळी थरथर गाळून स्वत:च सूर लावून घेऊन गाणी ऐकवतात की काय?.. की यांच्याही मनात ती साठच्या दशकातली चरचरीततबकडीच वाजत असते, वर्षानुवर्ष कानांत घोळलेलं ते रेकॉर्डेड गाणंच त्यातून ऐकू येत असतं आणि समोर तीच थोर गायिका जणू आपल्याच जुन्या गाण्याला लिपसिंक करताना दिसत असते.. धन्य ते गायनी कळा, असं यालाच म्हणतात की काय?
 
एका निडर विदुषीला जराजर्जर अवस्थेत एका कार्यक्रमात प्रमुख वक्त्या म्हणून ऐकण्याचा दुर्दैवी प्रसंग ओढवला होता. बाईंच्या जिभेच्या आणि बुद्धीच्या धारेने अवघडातला अवघड विषयही गाभ्यापर्यंत सोलला जायचा, सोपा व्हायचा, असा त्यांचा लौकिक. त्या दिवशीच्या भाषणात मात्र त्यांना आपल्याला इथं का बोलावलंय,’ हेही ठाऊक नसल्याचं किंवा ते त्यांच्या लक्षात न राहिल्याचं दिसत होतं. त्या अर्धा तास बोलल्या. मागच्या वाक्याची पुढच्या वाक्याशी काहीही संगती नाही, असं. सुन्न झालेलं सभागृह केवळ बाईंवरच्या प्रेमापोटी ती विस्कळीत भरकटलेली बडबड ऐकत होतं. संयोजकांनी बाईंना अशा अवस्थेत का आणलं, का त्यांचं हसू केलं, असा संताप व्यक्त होत होता. पण, अतिशय प्रॅक्टिकल आणि परखड म्हणून ओळखल्या जाणा-या बाई तरी का आल्या, बोलायला का उभ्या राहिल्या, हे प्रश्न आजतागायत अनुत्तरितच आहेत.
 तारुण्यात संगीत नाटय़रसिकांच्या मनांवर अधिराज्य गाजवलेल्या एखाद्या गंधर्वाच्या पन्नाशीत बोजड, स्थूल झालेल्या देहावर तारुण्याचे साज चढवून सुकुमार तरुणीच्या रूपात उभे केल्यानंतर ते ध्यान पाहणा-या (की साहणा-या) आणि ऐकणा-या रसिकांना समोर नेमकं काय दिसत असतं? काय ऐकू येत असतं?
वय नाकारतात तेव्हा माणसं काय नाकारतात? आपण मृत्यू नावाच्या शाश्वत सत्याच्या अधिक जवळ जात चाललो आहोत, या भयंकर वास्तवापासून पळ काढण्यासाठी माणसांची ही वय नाकारण्याची धडपड सुरू असते की काय? जिकडे पाहावं तिकडे अशा कलपलेपित उसन्या आणि खोटय़ा तारुण्याचं करुण दर्शन घडवणा-या माणसांचा बुजबुजाट दिसतो. कर्तृत्वाच्या शिखरावरून योग्य वेळी हसतमुखानं, उमद्या मनानं पायउतार होणा-यांची संख्या एका हाताच्या बोटावर मोजता येईल. शिखरावर पोहोचताच तिथे लगेच तंबू ठोकून कडेला कुंपण घालणा-यांची संख्या जास्त. शिखरही न गाठता, मनातल्या मनात ते सर करून (मनातल्या मनात) तिथेच मुक्काम ठोकलेल्या मनोरुग्णांची संख्या सर्वाधिक.
 
ही एखाद्या क्षेत्रात किमान काही कर्तृत्व गाजवलेल्या नामवंतांची स्थिती असेल, तर सामान्य माणसांचं काय?
 
वानप्रस्थासारखी सुंदर आणि प्रगल्भ कल्पना जन्माला घालणा-या देशात संध्येच्या हृदयाला भिववणा-या छायाच का असतात? हळुहळू मावळणारा, शांतवत नेणारा संधिप्रकाश का नसतो? वार्धक्य इतकं करुण कधी आणि का झालं की ते स्वीकारण्याची हिंमतच होऊ नये?
 माणसं जेव्हा डोळे मिटून मनाच्या पडद्यावर सिनेमा पाहतात, गाणं ऐकतात, आठवणी उजळवतात, तोवर सगळं ठीक. पण, डोळे उघडे असतानाही जेव्हा माणसं मनाच्या पडद्यावरच गतकाळ जगू पाहतात, बंदिस्त कुप्यांच्या आणि चरचरीत तबकडय़ांच्या आधारानं दिवस ढकलू पाहतात, तेव्हा समजायला हवं की त्यांच्या उघडय़ा डोळय़ांसमोरच्या चित्रात काहीतरी बिघाड आहे.. खूप मोठा बिघाड आहे.

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, २ ऑक्टोबर, २०११)

2 comments:

  1. लेख फार छान आहे. like!!

    ReplyDelete
  2. mala watate ki hatachi mendi dokyavarun utratach nahi....kiva pandhrya kesani anubhavi asnar chehara ya lokani kadhi arshat pahilach nahi... ani kadhi kali pahila tar tyanchech ek bhakas chitra tyana diste...ani te swikarne mushikl hote...

    ReplyDelete