सन : 3011
हा ‘बा.वन’ पृथ्वीवरच्या गॅलक्सी अपार्टमेंटच्या 737 व्या मजल्यावरच्या त्याच्या घराच्या खिडकीतून पॉवरफुल टेलिस्कोपच्या साह्याने चंद्रावरच्या ‘मूनशाइन अपार्टमेंट’च्या 1541 व्या मजल्यावर राहणा-या एका रोबोसुंदरीचा बॅटरी बदलण्याचा कार्यक्रम मिटक्या मारत न्याहाळत असतानाच चिरंजीव मोरू ऊर्फ ‘मो.वन’ याचं त्या स्थळी सूक्ष्मरूपात आगमन झालं. बिंदुरूपातला ‘मो.वन’ हवेत गर्र्र फिरता फिरता मनुष्यरूपात आला, तरी ‘बा.वन’चं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. मनोबलाचा वापर करून ‘मो.वन’नं तात्काळ ‘बा.वन’ला फिंगर मेसेज पाठवला. ‘बा.वन’च्या उजव्या हाताच्या मधल्या बोटात सूक्ष्म सुई टोचल्यासारखी कळ गेली, त्यानं बोट उचलून पाहिलं, त्यावर प्रकाशमान लेझर-अक्षरांत संदेश झळकला, ‘‘मी आलोय बा.वन. ‘पक्षीनिरीक्षण’ थांबवा जरा.’’
‘बा.वन’ चपापून दुर्बिणीपासून दूर होत म्हणाला, ‘‘अरे, आता म्हाता-या माणसाला काहीतरी विरंगुळा हवाच ना. कालच्या दस-याला 311 वर्ष पूर्ण केली. आता पन्नास-साठ वर्षाचंच आयुष्य उरलं.’’
‘‘चांगला विरंगुळा आहे,’’ डोळे मिचकावत ‘मो.वन’ म्हणाला, ‘‘इकडे जेमतेम पंचाहत्तरीत पोहोचलेले नवतरुण अभ्यास करून डोळे फोडून घेतायत आणि म्हातारे रोबोसुंदरींचं निरीक्षण करतायत..’’
‘‘एवढा कसला रे अभ्यास चालवलायस?’’
‘‘हजार वर्षापूर्वीच्या परंपरा, या
विषयावर एक छोटंसं प्रेझेन्टेशन करतोय. म्हटलं जिथे कुठे अडेल तिथे तुमची
मदत घ्यावी. तुम्ही या विषयातले मास्टर. तो दसरा की काय म्हणालात तोही
तुम्हाला ठाऊक आहे..’’
‘बा.वन’ जरासा फुशारला. पोरानं बापाचं कौतुक करण्याचा दुर्मीळ प्रसंग होता, ‘‘बोल बेटा, बोल. काय मदत पाहिजे तुला?’’
‘‘मी
ही त्यावेळच्या वर्तमानपत्रांच्या डिजिटल आवृत्त्यांची काही क्लिपिंग
आणलीयेत. त्यातले काही संदर्भ कळत नाहीत. ते जरा मला एक्स्प्लेन करा,’’ बोलता बोलता ‘मो.वन’ने बोट भिंतीवर रोखलं. त्यातून निघालेल्या प्रकाशझोतातून भिंतीवर चित्रं उमटू लागली, ‘‘त्या काळात नवरात्र, दसरा असा एक सण जोशात साजरा व्हायचा म्हणे!’’
‘‘हं. विजयादशमी म्हणायचे त्याला. एकेकाळी सुष्टांचा दुष्टांवर विजय म्हणून साजरा केला जायचा हा सण. पण, नंतरच्या संशोधनातून असं निष्पन्न व्हायला लागलं की हा संघर्ष दोन संस्कृतींमधला होता. बाहेरून आलेल्या संस्कृतीचा त्यात विजय झाला, त्यामुळे इतिहास त्यांच्या बाजूने लिहिला गेला. कृषीसंस्कृती विरुद्ध नागर संस्कृती, कष्ट करणारे विरुद्ध यज्ञ करणारे, मातृसत्ताक विरुद्ध पितृसत्ताक, असे अनेक पैलू पुढे आले आणि मग हे सगळे सणवार मागे पडत गेले.’’
बापाच्या या बोजड भाषणानं गांजलेला ‘मो.वन’ भिंतीकडे लक्ष वेधून म्हणाला, ‘‘पण ‘बा.वन’, तुम्ही सांगताय त्या सगळ्या संशोधनाचा या फोटोंशी काहीच संबंध दिसत नाही. इथे तर माणसं गोल फिरून नाच करताना दिसतायत, वेगवेगळ्या रंगांचा तो साडी नावाचा कपडा गुंडाळलेल्या आनंदी बायका दिसतायत..’’
क्लिपिंगवरची तारीख पाहून सुस्कारा सोडत ‘बा.वन’ म्हणाला, ‘‘अरे, हा काळच ऱ्हासकाळ म्हणून ओळखला जातो. यात वेगळं काय होणार होतं? ‘खाओ, पिओ, मजा करो’ आणि ‘मी माझा’ ही या काळातली जीवनसूत्रं होती. तुला आष्टद्धr(155)र्य वाटेल, पण आवाज हे या काळातलं, या प्रांतातलं शक्तिमापनाचं एकक होतं.’’
‘‘हं, या क्लिपिंगमध्ये काहीतरी ‘आवाजवरून तंबी’ वगैरे लिहिलंय. हा प्रचंड गर्दीचाही फोटो सुमारे 40 वर्षाच्या काळात दरवर्षी दिसतो. हा काय प्रकार आहे?’’
‘‘हा ‘घसरा मेळावा’ होता त्या काळातला. एक माणूस वर्षातून एकदा या ठिकाणी यायचा आणि याच्यावर घसर, त्याच्यावर घसर अशी घसरगुंडी खेळायचा. ते पाहायला हे लोक जमा व्हायचे.’’
‘‘एवढे लोक घसरगुंडी पाहायला गोळा व्हायचे? त्यांना दुसरी कामं नव्हती का?’’
‘‘होती ना. दम देणे. खंडण्या गोळा करणे. कामगारांना देशोधडीला लावणे. बिल्डरांसाठी जागा खाली करून देणे. परधर्माच्या, परप्रांतीयांच्या नावाने बोंबा ठोकणे. विरोधी मताच्या माणसाला काळं फासणे. अरेरावी करणे. मारामा-या करणे. अशी बरीच कामं असायची. पण, मनोरंजनाचं साधन हे एकच होतं.’’
‘‘अहो, पण त्या काळात सिनेमा, टीव्ही, इंटरनेट वगैरे सगळी प्राथमिक साधनं विकसित झाली होती ना मनोरंजनाची?’’
‘‘पण, या मनोरंजनाची सर दुस-या कशाला नव्हती. नकला, द्वयर्थी संवाद, हशा-टाळ्यांची एकदम बहार. गंमत म्हणजे, चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ एकच भाषण फिरवून फिरवून केलं गेलं. दरवर्षी तेच मुद्दे. तीच भीती घालायची. इतरांच्या मागे जाल, तर नामर्द आणि आमच्या मागे याल तरच मर्द, अशी सोपी मांडणी.’’
‘‘आणि हे ऐकायला लोक गोळा व्हायचे?’’
‘‘नुसते गोळा व्हायचे नाहीत, तर त्याला ‘विचारांचं सोनं’ वगैरेही म्हणायचे. ज्वलंत विचार तिथून घेऊन जायचे म्हणे!’’
‘‘का बुवा? त्यांना स्वत:चा विचार स्वत: करता येत नव्हता का?’’
‘‘अरे, माणसं विचार करत असती, तर -हासकाळ आला असता का?’’
‘‘अच्छा, मग पुढे काय झालं?’’
‘‘काय होणार? लोक सदासर्वकाळ आदिमानव बनून नाही राहू शकत. हळूहळू समाज बदलतो. सुधारतो. तसा हाही सुधारला. माणसं स्वत:चा स्वत: विचार करू लागली. ‘घसरा मेळावा’च्या जागी ‘फोटो प्रदर्शन’ आणि ‘शाळकरी स्नेहसंमेलन’ सुरू झाल्यानंतर गर्दीही हटली आणि आवाजही घटला.’’
‘‘ओह ग्रेट! थँक्स डॅड फॉर युअर हेल्प,’’ प्रेझेंटेशन आटोपतं घेत ‘मो.वन’ म्हणाला आणि एकदम त्याला काहीतरी आठवलं, ‘‘अँड डॅड गेस व्हॉट, जुन्या काळातल्या दस-याची माहिती वाचून मी तुमच्यासाठी सोनं आणलंय.’’ हातातलं पान त्यानं ‘बा.वन’च्या हातावर ठेवलं.
‘‘अरे गधडय़ा, हे तुळशीचं पान आहे..’’ (चित्र : प्रदीप म्हापसेकर)
(प्रहार, ९ ऑक्टोबर, २०११)
No comments:
Post a Comment