Sunday, October 23, 2011

बाळ इंदर यास,

ज्येष्ठ विधिज्ञ आणि ‘टीम अण्णा’चे सदस्य प्रशांत भूषण यांनी काश्मीरमध्ये सार्वमत घेण्याचा पुरस्कार केला आणि त्यांना श्रीराम सेना नावाच्या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिका-यांनी मारहाण केली. मारहाणीची चित्तथरारक दृश्यं वृत्तवाहिन्यांवर दिवसभर दाखवली गेल्यानं त्यांत ठळकपणे झळकलेला इंदर वर्मा हा मारहाणप्रमुख कट्टर हिंसावाद्यांचा हीरोच बनून गेला. त्याच्या पत्रपेटीवर आम्ही खास लक्ष ठेवलं होतं. त्याला आलेली ही निवडक पत्रं..
बाळ इंदर यास,
 
त्या वाकडतोंडय़ा गांधीच्या टीममधल्या पिरपिर पोपटाला ठोकल्याबद्दल तुझं त्रिवार अभिनंदन आणि तुला लाख लाख धन्यवाद.
 
मुळात कोणी कोणाला ठोकलं की आम्हाला भयंकर आनंद होतो. आमचा स्वभावच हातात रिमोट कंट्रोल घेऊन टीव्हीवर गेम खेळणा-या पंधरा वर्षाच्या पोरासारखा आहे. कॉलेजकुमार नातू आता जाहीरपणे शीला, जलेबीबाइं यांना नाचवायच्या वयाचा झालाय, पण, आम्ही मात्र याच्याकडून त्याला परस्पर कानफटवून आनंदानं टाळय़ा पिटण्याच्या गेममध्ये रमतो.. बीअरतोअसं म्हणणार होतो, पण, टीव्हीवरचा तुझा आवेश पाहता आणि तुझ्या संघटनेचा पूर्वेतिहास पाहता तुला विनोद कितपत कळेल, याची शंका आहे. असो.
 
तर मुळात कोणीही कोणालाही चोपत असला की ते पाहायला आम्हाला जाम आवडतं. त्यात चोपला जाणारा कोणी पाकडा-वाकडा-भय्युडा-बांगडा असला की आमच्या आनंदाला उकळय़ाच फुटतात. कोण तो प्रशांत भूषण! (दचकू नकोस. तो कोण आहे ते आम्हाला व्यवस्थित ठाऊक आहे. आम्ही कोणाचाही कचरा करायचा असला की असं बोलतो. कोण तो बराक ओबामा असंही आम्ही म्हणू शकतो. काय फरक पडतो? तुझ्या भाषेत सांगायचं तर की फर्क पैंदा? आपण त्याला ओळखतो की न ओळखतो यानं त्याचं काहीच वाकडं होत नाही आणि आमच्या सैनिकांना आपले साहेब कुणालाही ललकारू शकतात, काय टेरर आहे त्यांची, असं वाटतं. असो.)
 
तर तो प्रशांत भूषण म्हणतो काश्मिरात सार्वमत घ्यायला हरकत काय! अरे, काश्मीर काय तुझ्या बापाचा आहे काय? (असे रागाने डोळे वटारून पाहू नकोस.. तुझ्याम्हणजे त्याच्यारे बाबा!) खरं सांगू का काश्मिरशी तुझ्याप्रमाणेच आमचाही काहीएक थेट संबंध नाही. पण, आमच्या महाराष्ट्रात काही खास प्रजातींमध्ये अशी पद्धत आहे की आपला कशाशीही संबंध असो-नसो; आपण त्याबद्दल बिनधास्त बोलायचं. तिथल्या परिस्थितीची गुंतागुंत समजून न घेता शाळकरी पोराच्या आकलनानं बोलायचं. आमचा फाळणीशी काहीही संबंध आला नाही. तरीही त्याबद्दल आमची स्ट्राँग मतं असतात. काश्मीरमध्ये आम्ही (म्हणजे मी नव्हे, मराठी माणसं- मी कुठेच जात नाही. आदेश देण्यातून, फर्मानं सोडण्यातून, विचारांचं सोनं वाटण्यातून, टिंगलटवाळी करण्यातून फुरसतच मिळत नाही रे!) राजाराणी ट्रॅव्हलबरोबर शांततेच्या काळात फिरायला जातो फक्त. पण, तेवढय़ावर आम्हाला काश्मीरच्या समस्येवर काहीही बोलायचा हक्क आहे.
 
मी तर काश्मीर जास्तकरून सिनेमातच पाहिलाय- आमच्या शम्मी, राजेंद्रकुमार, देव आनंद यांच्या सिनेमांत. पण, म्हणून काय झालं. काश्मिरी जनतेचं मत काहीही असो, काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि राहणार, हेच आमचं ठाम मत आहे आणि आम्ही म्हणू ती पूर्व-पश्चिम-उत्तर-दक्षिण हे तर सूर्यप्रकाशाइतकं स्पष्ट आहे. त्यामुळे प्रशांत भूषणचं आमच्या मताविरुद्ध वटवट करणारं थोबाड तू फोडलंस, याचा मला फार फार आनंद झाला.
 
तुझ्या श्रीराम सेनेचं नाव लगेच ब्रेक झालं म्हणून- नाहीतर मी ठोकून देणार होतो बिनधास्त की हा माझ्याच सेनेचा आहे आणि त्याचा मला अभिमान आहे.
 
अभिमान कशाचाही बाळगता येतो आणि त्यासाठी कसलाही विचार करायची गरज नसते, या मताचा कोणताही सैनिकहा आपलाच सैनिक मानणारा,
 
तुझाच,
 
हिंहृस
 
इन शॉर्ट हिंस्त्रसम्राट
-----------------------------------------------------------------
अप्रिय इंदर यास,
 
निषेध निषेध, त्रिवार निषेध!
 
तू प्रशांत भूषण यांना केलेल्या मारहाणीचा त्रिवार निषेध.
 
गैरसमज नको. प्रशांत भूषण यांना- काही वेगळय़ा कारणांसाठी- चोपायलाच हवं होतं असं माझं स्पष्ट मत आहे. माझं स्पष्ट मत हे माझ्या पक्षाचं अस्पष्ट आणि अनधिकृत मत असतं, हे आतापर्यंत स्पष्ट झालेलं आहेच. मात्र, तू ती मारहाण केल्यामुळे तुला आमच्या पक्षानेच सुपारी दिली होती, असा सर्वाचा ग्रह झाला होता. (आमच्या पक्षाचा तू सक्रिय कार्यकर्ता असूच शकत नाहीस, हे तर आपोआपच स्पष्ट आहे. कारण, आमच्या पक्षाचा सक्रिय कार्यकर्ता बनण्यासाठी अंतर्बाह्य निष्क्रिय असणं हेच प्रमुख क्वालिफिकेशन आहे.) तर हा गैरसमज निर्माण करणारं कृत्य केल्याबद्दल तुझा निषेध.
 
मात्र, याच कृत्याबद्दल तुझं अभिनंदन.
 
कारण, तू केलेल्या मारहाणीची दृश्यं ज्यांनी पाहिली असतील, त्यांना हे कळलं असेल की प्रशांत भूषण हे बेगडी गांधीवादी आहेत. ज्याला साधे फटकेसुद्धा शांतपणे खाऊन घेता येत नाहीत, जो प्रतिकार करतो, एवढंच नव्हे, तर हल्लेखोर एकटा सापडल्यावर त्याला चोप चोप चोपतो, तो कसला गांधीवादी.
फार लागलं नाही ना रे तुला! कडक हाड आहे त्या प्रशांत भूषणचं.
 
तुझा,
 
दिग्गीराजा
-------------------------------------------------------------------------------
बाळ इंदर,
 
तुझा निषेध.
 
तू केलेलं कृत्य आपल्या संघटनेच्या तत्त्वात बसत नाही.
 
गांधीजी हे आपले प्रात:स्मरणीय पुढारी आहेत आणि त्यांच्या अहिंसेवर आपल्या संघटनेचा ठाम विश्वास आहे.
 
असे असताना तू एक हिंसक हल्ला चढवून संघटनेच्या नावाला काळिमा फासण्याचं कृत्य केलं आहेस, त्याची आम्हाला शरम वाटते.
 
तुझा नसलेला,
 
रास्वसं
 
(अतिशय बारीक अक्षरांतली तळटीप : संघटनेच्या पद्धतीप्रमाणे सगळा मजकूर उलट अर्थाने वाचावा.)
 
------------------------------------------------------------------
मा. इंदर वर्मा यांस,
 
टीव्हीवर आपले फायटिंग सीन पाहिले.
 
माँ कसमक्या स्टाइल है आपकी.
 
आमच्या संघटनेतर्फे तुम्हाला मानद सदस्यत्व देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. आपला होकार कळवल्यास समारंभाची तारीख ठरवता येईल.
 
कळावे,
 
आपल्या फायटिंग स्टाइलवर फिदा,
 
बॉलिवुड फाइटमास्टर असोसिएशन
--------------------------------------------------------------------------------
आदरणीय इंदर वर्मासाहेब,
 
लहान तोंडी मोठा घास घेत असल्याबद्दल क्षमस्व.
 
टीव्हीवर आपली मारामारीची दृष्ये बघितली. आपण प्रशांत भूषण यांना पायाने तुडवत असल्याचे दृश्य तर वारंवार रिवाइंड करून बघितले. आमच्या धंद्यात तुमच्यासारखं कौशल्य असलेला कारागीर वर्षानुवर्षात एखादाच तयार होतो. तुमच्याकडे उपजतच ते कौशल्य आहे, यात आम्हाला तरी शंका नाही.
 आमच्या भट्टीवर रोज सकाळी पावाची कणीक तुडवायला यावे, अशी आग्रहाची आणि नम्र विनंती. योग्य मेहनताना दिला जाईल, याची खात्री बाळगा.
आपले नम्र,
 इंदूर बेकरी ओनर्स असोसिएशन


(चित्र : प्रदीप म्हापसेकर) 


(प्रहार, २३ ऑक्टोबर, २०११)

1 comment: