Tuesday, October 18, 2011

लम्हें नही तोडा करते

जगजितचं बोट नेमकं कधी हातात आलं, ते सांगणं कठीण आहे..
 
एक नक्की की ते ज्या वयात हातात आलं असावं, ते वय खरं तर कोणतंही वडीलधारं बोट सोडण्याचं होतं..
 
लहानपणापासून हातात दिली गेलेली, विश्वासानं धरलेली बोटं सोडून देऊन धावण्याची ऊर्मी आतून धडका देण्याचं वय.. त्यात बोटंच नव्हेत, तर हातही झिडकारले जात होते.. शिंगं फुटत होती.. तीच अक्कल आल्याची खूण वाटत होती..
 
हाडं मजबूत होण्याचा, स्नायूंना पीळ बसण्याचा, मिसरुडांच्या मिश्या बनण्याचा, सगळे वडीलधारे शत्रू वाटण्याचा तो ऊग्र, खरखरीत, रगेल, आक्रमक काळ.. अभ्यास, एकाग्रता, सखोलता तद्दन बोअरिंग वाटण्याचा, उथळ खळखळाटी ‘झंकार बीट्स’वर झुलण्याचा काळ.. अशात जगजितच्या घनगंभीर, खर्जदार आवाजावर स्वार होऊन गजलेसारखी खानदानी, संथ लयीची चीज आत कधी आणि कशी वस्तीला आली, हे आश्चर्यच. ही बया (कोणत्याही बयेसारखी) समजायला कठीण, संपूर्ण अवधान मागणारी आणि घटकेघटकेला कौतुकाची दाद चाहणारी.
 
खरं तर याचं एवढंही आश्चर्य वाटायला नको.. कारण, त्या वयाचं काटेरी आवरण जरा नखलून पाहिलं तर आत सगळी कोवळी तगमग.. जराजराशा विफलतेनं आत काहीतरी कायमचं तुटून गेल्यासारखं वाटण्याचा, मैत्रीच्या-नात्यांच्या आणाभाकांचा, नाजुक नात्यांच्या ओल्या शपथांचा, उमाळय़ा-उसाश्यांचा, उशीत तोंड दाबून रडण्याचा आणि वर्षातून किमान चारआठदा तरी संपूर्णपणे उद्ध्वस्त वगैरे होऊन जाण्याचाही हाच तर काळ होता..अशा काळात

दिल ही तो है न संगोखिश्त
दर्द से भर न आए क्यूं
रोएंगे हम हजार बार

कोई हमें सताए क्यूं
 
असं विचारणारा जगजित हमसफर न बनता तरच नवल.. जगजितचा खर्ज आणि जगजितची तर्ज यांच्या काँबिनेशनची एक गंमत होती.. त्याची गज़्‍ाल वडीलकीचा बडेजाव न मिरवता आश्वस्त करायची आणि गळ्यात न पडता दोस्तीचा आधारही द्यायची.. एखाद्या मित्रानं नुसतं शेजारी बसून राहावं आणि त्याच्याशी काही न बोलतासुद्धा छान वाटावं तसा..
इक शाम की दहलीज पर
बैठे रहे वो देर तक
आँखोसे की बाते बहुत
हमने कहा कुछ भी नही
 
जगजितला त्या वयातल्या सगळ्या तगमगी कशा कोण जाणे, पण ठाऊक होत्या..
सोचा नहीं अच्छा बुरा
देखा सुना कुछ भी नही
मांगा खुदा से रात दिन
तेरे सिवा कुछ भी नही
 
अशी हुळहुळी गुप्त जागाही त्याला माहिती आणि
जब कभी तेरा नाम लेते है
दिल से हम इंतकाम लेते है
मेरी बरबादीयोंके अफसाने
मेरे यारों के नाम लेते है
 
ही विस्कटलेल्या नात्यांची पुस्तकांच्या पानांत दडवलेली हिरव्या पानांची जाळीही त्याच्या हाती बरोब्बर लागायची.
ऐ खुदा रेत के सेहरा को
समंदर कर दे
या छलकती हुई आंखों को भी
पत्थर कर दे
 
अशी भयावह असोशीही तो परफेक्ट पकडायचा.
गम्म बढे आते है क़ातिल की निगाहों की तरह
तुम छुपा लो मुझे ऐ दोस्त गुनाहों की तरह
 
ही कातर हुरहूरही त्याला ठाऊक असायची.
दैरोहरममे चैन जो मिलता
क्यूं जाते मैखाने लोग
 
असा त्या वयाला साजेसा उद्धट सवाल तो आपल्यावतीनं करून टाकायचा. जोडीला गालिब असला की विचारूच नका..
ग़ालिब छुटी शराब, पर अब भी कभी कभी
पीता हूं रोजे अब्र, शबे माहताब में
 
इथे मनातलं आकाश अर्धा वेळ ढगाळलेलं आणि अर्धा वेळ चांदण्यात न्हाऊन निघालेलं.. म्हणजे रोजचीच ‘सोय’ करून टाकली की!
सरकती जाए है रुख से नकाब
आहिस्ता आहिस्ता
 
किंवा
हँस के बोला करो बुलाया करो
आप का घर है आया जाया करो
 
अशी खटय़ाळ छेडछाड अवचितच कधी व्हायची.
 
या गृहस्थांचा मेन बिझनेस आतल्या गाठींचा गुंता उकलण्याचा किंवा खरं तर आणखी गाठी मारून ठेवण्याचा. तो कधी बेसावध गाठून फरपटत खेचून न्यायचा आणि थेट आरशासमोर उभं करायचा..
मेरी जिंदगी किसी और की
मेरे नाम का कोई और है
मेरा अक्स है सरे आइना
पसे आइना कोई और है
 
घ्या, म्हणजे आरशासमोर आहे तेच आपलं प्रतिबिंब आहे आणि आरशात आहे तो दुसराच कुणीतरी, मग ‘आपण’ कोण?.. ही पंचाईत परवडली, असं विश्वरूपदर्शनही तो घडवायचा..
न था कुछ तो खुदा था
कुछ न होता तो खुदा होता
डुबोया मुझ को होने ने
न होता मै तो क्या होता?
 
स्वत:च स्वत:ला अंतर्बाह्य सोलवटून काढण्याच्या काळातली आपल्या अस्तित्वाचीच ही क्रूर झाडाझडती! हाच जगजितचा डाव होता तर!
 
गजल मुळात गजालीसारखी गप्पिष्ट. यारदोस्तांची मैफल जमवणारी. प्रत्येक शेराला वाहवाहीची धमाल उडवून देणारी. स्वघोषित अभिजनांनी तिचं अपहरण करून तिला सारंगीच्या सुरात पिळवटून ‘शास्त्रीय’ गायनाच्या वृद्धाश्रमात नेऊन ठेवलं होतं.. जगजितनं गिटारबिटारच्या साथीनं झुलवत तिला आधी घराघरात नेलं आणि मग चक्क कॉलेजकट्टय़ावर आणलं.. नाक्यावर टाइमपास करत बसलेल्या पोरांना कतील शिफाई, कफील अजहर, बशीर बद्र यांच्या सोप्या सोप्या शब्दांत गुंतवत नंतर थेट गमलिबचा ‘दीवान’च आणून आदळला समोर आणि म्हणाला, ‘‘मोठं तर व्हावंच लागणाराय तुम्हाला दोस्तहो! पुढे काय काय वाढून ठेवलंय ते समजून तरी घ्या.’’  मग काय
बाजीचा-ए-अतफाल है
दुनिया मेरे आगे
होता है शबोरोज
तमाशा मेरे आगे
 
मध्ये शोधा ‘बाजीचा ए अतफाल’ म्हणजे बालोद्यान. ‘शबोरोज’ म्हणजे रात्रंदिवस.
गमे हस्ती का असद किस से हो
जुज-मर्ग इलाज
शमा हर रंग मे जलती है
सहर होने तक
 
जगण्याच्या आजारावर मर्ग म्हणजे मृत्यूशिवाय इलाज कोण करणार? सकाळ झाली की मेणबत्तीलाही विझायचंच असतं (आणि सकाळपर्यंत जळायचंच असतं.)
सब कहाँ कुछ लाला ओ गुल मे
नुमाया हो गयी
खाक मे क्या सूरते होगी
जो पिनहा हो गयी
 
ही तर जणू ज्ञानेश्वरीतली कूट ओवी.. अभ्यासक अजून अर्थ लावतायत.. त्याच पापुद्रे उलगडतायत..
मोठं होण्यातल्या असह्य कळांवर फुंकर मारत तगमग थोडीशी सुस केली जगजितनं आणि बोट धरून पुढच्या टप्प्यावर कधी आणून सोडलं, ते कळलंच नाही..
यथावकाश नौका स्थिरावली.. 
वादळ संपलंय की नौकेचा नांगर तळात रुतून बसल्यामुळे ती हलत नाहीये, हे कळू नये आणि समजून घेण्याची गरज वाटू नये, अशी स्थिरावली.. आजूबाजूचं पाणी डचमळतंय म्हणजे प्रवास चालू असावा, असं वाटवणारं शेवाळी स्थैर्य आलं.. जगजितलाही ते आलं की काय?.. नंतर त्याच्या आवाजात ‘हे राम’ची एकसुरी भजनी आवर्तनंच ऐकू येऊ लागली.. हरे राम!
 
साहजिकच जगजितचं बोट सुटून गेलं हातातून..
 
निदान परवा-परवापर्यंत तरी तसं वाटत होतं..
 
पण परवा जेव्हा त्यानं खरोखरचं ‘राम’ म्हटलं, तेव्हा घशात आवंढा आणणारा साक्षात्कार झाला..अजूनही नौका डळमळते तेव्हा
अपनी मर्जी से कहाँ अपने सफर के हम है
रुख हवाओं का जिधर का है उधर के हम है 
अशी ‘हवेच्या प्रवासा’ निघालेल्या सुकल्या पानाशी नातं जोडून देणारी कोण गुणगुणतं कानात?
 
बोट कधी सुटलंच नव्हतं की काय जगजित?.. ते हातात इतक्या विश्वासानं विसावलं होतं की आता बहुतेक अभिन्नच होऊन बसलंय..
हाथ छूटे भी तो रिश्ते नहीं छोडा करते
वक्त की शाख से लम्हें नहीं तोडा करते     

 

No comments:

Post a Comment