``नेक्स्ट।़।़।़''
आम्ही पुकारा केला आणि
बेलवर हात मारला. बेलवरची धूळ उडून आम्हाला चार शिंका येण्यापलीकडे काहीही घडलं
नाही. शिवाय शेजारी बसलेले हायकमांडचे निरीक्षक जागे झाले, त्रासून त्यांनी
आमच्याकडे पाहिलं आणि बसल्याजागी कूस वळवून, म्हणजे मान वळवून ते पुन्हा झोपी
गेले.
आम्हीही खरंतर नेक्स्ट
असं म्हणण्याचं कारण नव्हतं. कारण आधीच कुणी आलं नव्हतं मुलाखतीला, तर पुढे कोण
येणार होतं? पण, आपल्यालाही डुलकी लागू नये म्हणून आम्ही मधूनमधून `नेक्स्ट' म्हणत
होतो, दाराबाहेर रेंगाळणारा एक भटका कुत्रा तेवढा आत येत होता आणि आम्ही हाड् म्हटलं
की पुन्हा बाहेर जात होता. तो माणूस नसल्यामुळे आता इथे `खायला' काही नाहीये, हे
त्याच्या लक्षात आलं नसावं.
अरेरे, बापूजींच्या,
पंडितजींच्या, इंदिराजींच्या, राजीवजींच्या, सोनियाजींच्या, राहुलजींच्या या
देदीप्यमान इतिहास लाभलेल्या पक्षाच्या नशिबात असा सन्नाटा यावा!
आता आम्ही- जै की
निर्भीड, निष्पक्ष (आणि त्यामुळे `निःनोकरी') असे पोटावळे पत्रकारू असताना एका
पक्षाच्या मुलाखतप्रसंगी नेमके काय करत होतो, असा प्रश्न कैकांना पडेल. आमचे
सर्वपक्षीय स्नेहसंबंध आणि संचार ज्ञात नसलेल्या अज्ञांची संख्या मराठी मुलखात कमी
नाही. तर त्यांना सांगायला हरकत नाही की आम्ही वार्तांकनासाठी (कोणी छापो ना छापो,
आम्ही वार्तांकन करून ठेवतो- कोण रे तो `तेवढाच चहा-नाश्ता सुटतो' म्हणतोय?)
काँग्रेसच्या कचेरीत गेलो असताना आधी आम्हाला उमेदवारीचा इच्छुक समजून खुर्चीत
बसवण्यात आलं. `खोकी-पेटय़ा' वगैरे ऐकल्यावर आम्ही `आंब्याचा सीझन गेला, आता कसल्या
पेटय़ा?' असं बोलल्यानंतर आमची झडती घेण्यात आली आणि आमच्या खिशात मोजून साडेबारा
रुपये निघाल्यावर आमची `खर्च करण्याची' ऐपत लक्षात आली आणि आम्ही उमेदवार व्हायला
आलो नसणार, याची खात्री पटून आमची सुटका करण्यात आली. तेवढय़ात मान्नीय
प्रचारप्रमुखांना आमची ओळख पटली आणि आता जरा मुलाखती घेण्यात आम्हाला मदत करा, असं
सांगून ते निसटले, आम्ही अडकलो.
अर्धा दिवस होत आला
तरी एकही उमेदवारीचा इच्छुक इकडे फिरकताना दिसला नाही. काय हा बाबाजींच्या स्वच्छ
कारभाराचा प्रताप, असे म्हणून आम्ही कपाळावर हात मारून घेणार इतक्यात एक चेहरा
डोकावला. आम्ही ताबडतोब शिपायांना खुणा केल्या (तेही पेंगत होते, त्यामुळे `धरा
धरा' असे कोकलावेच लागले.) शिपायांनी त्या इसमाला पकडून आणताक्षणी निरीक्षकही जागे
झाले आणि त्यांनी विचारलं, ``बोलो, किधर से चाहिए?''
तो म्हणाला, ``इधर से
चाहिए.''
अरे व्वा! पक्षाचं
मुख्यालय असलेल्या ठिकाणी (तरी) पक्षाचं अस्तित्व आहे.
निरीक्षकांनी विचारलं,
``काम किया है क्या?''
तो म्हणाला, ``बहुत
काम किया है?''
``स्वतःसाठी नाही,
इतरांसाठी काम केलंय का, असं विचारतायत ते!'' आम्ही मध्ये तोंड घातलं.
तो म्हणाला,
``इतरांसाठीच भरपूर काम केलंय. पक्षासाठी पण भरपूर काम केलंय.''
कमाल झाली. सत्ताधारी
पक्षाचा कार्यकर्ता असूनही लोकांचं काम करतो म्हणजे आश्चर्यच नाही का!
निरीक्षक म्हणाले,
``खर्चा करना पडेगा.''
तो म्हणाला, ``उस के
लिए तो आया हूँ. आप पैसा दोगे, तो खर्चा करूँगा ना!''
आम्ही पुन्हा मध्ये
तोंड घातलं, ``भारतीय लोकशाहीच्या उज्वल परंपरेची काहीच कल्पना नाही की काय
तुम्हाला? तुम्ही पक्षाला पैसे दय़ायचे, तर वर पक्षाकडे पैसे मागताय? अशी कशी
उमेदवारी मिळणार?''
तो निर्विकारपणे
म्हणाला, ``पण इथे कुणाला उमेदवारी पाहिजे?''
आम्ही च्याट, निरीक्षक
च्याट. दोघेही एकसमयावच्छेदेकरून ``मग काय पाहिजे?''
``अहो, माझं बिल
पाहिजे. त्या मशाली पेटवल्या ना विजयाच्या. त्या मी दिल्या होत्या. तिकडे ते
सेनावाले कोकलून राहिलेत आमचं पर्मनंट बुकिंग असताना मशाली का नेल्यात तिकडं
म्हणून?''
त्याच्या खुलाशाने
आम्ही डबल च्याट पडलो. शेवटी आमच्या साडेबारा रुपयांतले दहा आणि निरीक्षकांकडचे
990 (त्यांनाही खिशात रोकड ठेवण्याची सवय नाही- गरजच पडत नाही) अशी भरपाई करून
त्याचं बिल चुकतं केलं आणि पुढचे देणेकरी यायच्या आत आम्ही धूम बाहेर पळालो...
पण, आम्ही पळून पळून
पळणार किती? पुढच्याच वळणावर आमच्या कानाजवळून `सूं' करून बाण गेला आणि जिथे पाऊल
टाकणार तिथेच घुसला. ब्रेक लावून, एका पायावर थबकून आम्ही वळून पाहतो, तो चि.
आदित्यराजे धनुर्धराच्या वेषात दिसले. `खबरदार, पुढे पाऊल टाकाल तर! तिकडे तात
मलनसीत आय मीन मतलबीत... व्हॉट अ डिफिकल्ट वर्ड...'
``मसलतीत आहेत
म्हणायचंय का तुम्हाला?'' `रामराज्य मीट्स शिवशाही मीट्स हाइक' अशा सिच्युएशनमध्ये
अडकलेली बाळे आम्हाला सतत भेटत असतात. आम्ही त्यांच्या साहय़ाला तत्पर असतोच.
``करेक्ट, त्यात आहेत.
कोणालाही खलबत्त्यात प्रवेश नाही.''
``अहो, स्वतःहून
आलं-लसूण-मिरची तरी जाईल का खलबत्त्यात?'' आम्ही मनोमन म्हणालो, पुढे लगेच उघडपणे
जोड दिली, ``बाळराजे, आम्हालाही खलबत्त्यात जाण्याची हौस नाहीच. खलबतखान्यात
अमितभाईंनी दिलेली एक चिठी पाठवायची आहे, म्हणून आलोय.''
अमितभाईंचं नाव निघताच
बाळराजेंचा चेहरा शक्य तेवढा (विदिन द लिमिट्स ऑफ पॉसिबिलिटीज) नम्र झाला, थोडासा
कसनुसाही झाला आणि आमच्या हातातली वाणसामानाची तीन महिन्यांपूर्वीची यादी वापरून
आम्ही प्रांगणात शिरकाव करून घेतला.
पण, आमची धाव
तिथपर्यंतच राहिली. आतल्या मुलाखत कक्षापर्यंत तर मुंगीलाही घुसणं शक्य नव्हतं.
आम्हालाच आठदहा मुंग्या बाहेर तिष्ठत असलेल्या भेटल्या. झुंबडच झुंबड उडाली होती.
गंमत म्हणजे मुलाखत कक्षात कुणालाच प्रवेश नव्हता. बाहेरची मंडळी एकेका चिटोर्यावर
आपलं नाव, मतदारसंघ आणि खाली एक आकडा टाकून चिठ्ठय़ा आत पाठवत होती आणि त्यांच्या
चिठ्ठय़ा वाढीव आकडय़ांसह बाहेर येत होत्या. मग काही लोक चेहरे पाडून निघून जात
होते. बाकीचे नव्याने आकडे टाकून त्याच चिठ्ठय़ा आत पाठवत होते आणि मग
त्यांच्यातल्या एकीवर साहेबांचा टिळा लागून ती बाहेर आली की जल्लोष सुरू होत
होता...
इथे ही परिस्थिती, तर
कमळकुंजात काय स्थिती असेल, असा विचार करून आम्ही त्या दिशेने कूच केली. वाटेत
नवनिर्माणाच्या यार्डात शुकशुकाट दिसला. तिथे तुरळक गर्दी होती, पण ती सैरावैरा
पळत होती. त्यांचाही काही इलाज नव्हता. यार्डात ठेवलेलं शोभेचं इंजीन बेभान होऊन
इकडे तिकडे धावत होतं, आपल्याच माणसांच्या अंगावर चालून जात होतं, कधी इकडे तर कधी
तिकडे... रूळांवरून तर ते कधीच घसरलेलं होतं... प्रस्तुत वृत्तांत मत्प्रिय
वाचकाच्या हाती ठेवण्यासाठी कुडीत जीव शिल्लक राहायला हवा, हे लक्षात घेऊन आम्ही
तिथून इंजिनाला गुंगारा देत निसटलो आणि कमळकुंजाच्या दाराशी येऊन ठेपलो. इथे
गर्दीचा उच्चांक झालेला होता. इथे प्रांगणात शिरणंही शक्य नव्हतं, 173 मुंग्या
आम्हाला दारातच भेटल्या, त्यांनाही शिरायला जागा नव्हती. दाराबाहेर हातात कमळफुलं
घेतलेल्यांची गर्दी तिष्ठत होती. पण, ज्यांच्या हातात कमळांच्या जागी घडय़ाळं होती,
त्यांच्यासाठीच दरवाजे उघडत होते. पुन्हा बंद होत होते. कमळकुंजाबाहेर कमळफुलं
कोमेजत होती.
आता हे गुपित
उलगडण्यासाठी आम्हाला राष्ट्रवादी मुख्यालय गाठावं लागलं. तिथे पोहोचल्यावर
आम्हाला राहून राहून एका गोष्टीचं आश्चर्य वाटत होतं. दीडशे वर्षांची परंपरा असलेल्या
मूळ गंगोत्रीवर पाणी प्यायला सोडा, पाणी पाजायला कोणी नाही- आणि या प्रादेशिक
झर्यावर पजेरो, फॉर्च्युनर, एक्स्यूव्ही, अशा देशी-विदेशी `गाईगुरां'ची झुंबड.
आमची शंका आम्ही आमचे परममित्र आराराबांकडे बोलून दाखवली. त्यांनी आमच्या
डोसक्यावर टांगलेल्या बोर्डाकडे बोट दाखवलं. त्यावर लिहिलं होतं, `इनकमिंग फ्री,
आउटगोइंग फ्री'. मुलाखतीसाठी एकेक दांडगे गडी येत होते. लोकसेवेचं तेज अंगावर
चढलेलं, गळाभर, हातभर चढवलेल्या सोन्याच्या दिव्य प्रभेने कांती उजळलेली,
चेहर्यावर उन्नत (कंपोझिटर, `उन्मत्त' लिहू नका, तुम्हालाही हातपाय आहेत आणि ते
ब्रेकेबल आहेत, याचं भान ठेवा) भाव असे एकेक शंभर किलो वजनी गटातले इच्छुक उमेदवार
आत येत होते. दोन-पाच प्रश्नांनंतर काहींची रवानगी बाहेर, तर काहींची आतल्या
कक्षात होत होती. आता हा काय प्रकार? आतल्या कक्षात नेमकं काय सुरू आहे? हे जाणून
घेण्यासाठी आम्ही करंगळी वर उचलली (हा देहधर्म वार्ताहरधर्माच्या फार उपयोगी येतो)
आणि प्रसाधनगृहाकडे जाण्याच्या मिषाने निघून कोणाचे लक्ष नाही हे पाहून चटकन्
आतल्या खोलीत डोकावलो आणि जागेपणी बेशुद्धच पडलो...
...मुलाखतीत यशस्वी
झालेल्या उमेदवारांना तिथे भारतीय जनता पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचे फॉर्म
वाटणं सुरू होतं आणि थोरले साहेब जातीने इच्छुकांकडून ते भरून घेत होते...
No comments:
Post a Comment