Thursday, February 10, 2011

यांचा वर्तमान खंक!

मोरूच्या बापाने मोरूच्या कमरेत लाथ घालण्यासाठी लडखडते पाऊल उचलण्याचा सातवा अयशस्वी प्रयत्न केला आणि तोच भेलकांडला. तो खाली आपटणार तेवढय़ात त्याच्यासमोर घोरत पडलेला मोरू जागा झाला आणि त्यानं चपळाईनं बापाला सावरलं. डोळे चोळत त्यानं विचारलं, ‘‘हे डॅड, व्हॉट द हेल आर यू डुइंग?’’  
कसाबसा सावरून बसत कष्टाने जीभ वळवत मोरूचा बाप म्हणाला, ‘‘बाबा रे, मराठी सारस्वताने दिलेली जबाबदारी पार पाडतोय.’’ 
‘‘म्हणजे ते बँकवाले? हप्ते थकवणा-यांकडून ते असे वसूल करतात?’’ 
‘‘नाही रे बाबा, ही जबाबदारी माझ्यावर मराठी सारस्वतांनी म्हणजे साहित्यिकांनी सोपवलीये..’’  
‘‘ओह, नो वंडर!’’ मोरू डोक्यात प्रकाश पडून म्हणाला, ‘‘ते आपल्या जबाबदा-या दुस-यावर ढकलण्यात एक्स्पर्टच आहेत नाहीतरी. परवाच्या वार्षिक उरसातली भाषणं आणि ठराव ऐकलेत की नाही? लोकांना ब्रह्मज्ञान सांगणारे पाषाण लेकाचे. त्यांनी टाकलेली जबाबदारी तुम्ही इतकी सिरीयसली घेताय?’’ 
बाप म्हणाला, ‘‘का नको घेऊ? अरे, मी दर वर्षाच्या पहिल्या दिवशी, दस-याच्या पहाटेला, अधूनमधून गुढीपाडव्याला तुझ्या कंबरडय़ात लाथ घालून तुला उठवून तुझं आणि तुझ्या निमित्तानं महाराष्ट्राचं थोडं प्रबोधन करावं, अशी ही थोर परंपरा आहे.’’ 
‘‘बंद करा ही यूसलेस परंपरा ताबडतोब’’ मोरू तडकला, ‘‘एक तर महाराष्ट्रात प्रबोधन करणा-यांच्याच घरात भगवी छाटी घालून हातात रुद्राक्षं खेळवणारे बुवा पैदा होतात. अँड सेकंडली, माझ्या कंबरडय़ात लाथा घालून घालून हल्ली तुमचे पाय दुखतायत, आर्थयटिसचा त्रास होतो, असं तुम्हीच सांगितलं होतं ना मला?’’  
‘‘बरोबर आहे तुझं पण.. आता इतक्या वर्षाची सवय झालीये..’’  
‘‘ती सवय तुम्ही सोडलीच पाहिजेत याचं आणखी एक कारण मी तुम्हाला सांगतो.. आज किती तारीख आहे सांगा?’’ 
‘‘काय प्रश्न तरी विचारलास.. एक जानेवारी!’’ 
‘‘यू आर राँग डॅड, आज फर्स्ट नाही, सेकंड जॅन आहे.’’ 
‘‘काहीतरीच काय बरळतोस. कालची उतरली नाही का अजून?’’  
‘‘माझी उतरली, तुमचीच परवाची उतरलेली दिसत नाहीये अजून.’’  
‘‘म्हणजे काय?’’  
‘‘डॅड, परवा रात्री मी नेहमीप्रमाणे थर्टी फर्स्ट जोरात साजरा केला. पहाटे घरी आलो आणि झोपलो. फर्स्ट जॅनला तुम्ही माझ्या कंबरडय़ात लाथ घालून मला उठवाल म्हणून दुपापर्यंत वाट पाहिली. पण, तुम्हीच घोरत पडलेले. शेवटी मीच उठून बाहेर पडलो. थोडा उतारा घेतला. पुन्हा रात्री येऊन झोपलो. आज सकाळी तुम्ही जागे झालात म्हणून बरं. नाहीतर मीच तुमच्या कंबरडय़ात लाथ घालून तुम्हाला उठवलं असतं. अहो दारू पिऊन पडणं हे माझं काम आहे, ते तुम्हीच करून टाकलंत?’’ 
‘‘काय करणार बेटा?’’ बाप भिजल्या स्वरात म्हणाला, ‘‘गेल्या वर्षातल्या सगळ्या आदर्श घडामोडींनी जीव उबला होता. नको नको ते 2010  साल असं झालं होतं जिवाला. त्यात वर्षअखेरीस पुण्यपत्तनात ज्या घडामोडी घडल्या त्यामुळे जिवाला हजारो इंगळ्या डसू लागल्या. म्हणून बुडवून टाकलं स्वत:ला मदिरेत.’’ 
‘‘वा डॅड, द्या टाळी!’’ आनंदून हात पुढे करत मोरू म्हणाला.  
‘‘कशाबद्दल?’’ 
‘‘आता तुम्ही आमच्यात आलात.’’ 
‘‘म्हणजे?’’ 
‘‘म्हणजे इतके दिवस आम्हाला म्हणायचात, पीनेवालोंको पीने का बहाना चाहिए. आता तुम्हीही आमच्यासारखीच वांझोटी कारणं सांगताय.’’  
‘‘खामोश!’’ मोरूच्या बापाने काल्पनिक तलवार उपसली, ‘‘जुबान को लगाम दो. अरे, तुमची कसली ती फुटकळ कारणं आणि दु:खं. काय तर म्हणे, बॉस घालून पाडून बोलला; कंपनीने साडे सत्तावीसच्या ऐवजी पावणे तेरा रुपयेच पगारवाढ दिली; अमकी पोरगी लाइनच देत नाही.. अरे आम्ही बघ, चिंता करितो विश्वाची.’’ 
‘‘असल्या असमर्थ बाता मारू नका डॅडू. आधी घरचा प्रपंच नेटका करा आणि नंतर विश्वाची चिंता वाहा. घोटाळे काय 2010 सालातच झाले? त्याच्या आधी तुमचा देश, तुमचं राज्य, तुमचं शहर आणि तुम्ही काय धुतल्या तांदळासारखे स्वच्छ होतात की काय? जमेल तिथे हात मारणारी आणि काही जमलं नाही तर हातावर हात ठेवून स्वस्थ बसणारी पिढी तुमची. तुमच्या पिढीनं नासवून टाकला हा देश आणि आता यातना होतायत म्हणून कळवळताय? अहो, 2010 मध्ये निदान काही घोटाळे उघडकीला तरी आले, म्हणून खरंतर आनंद साजरा केला पाहिजे तुम्ही डॅड.’’ 
बापाचा चेहरा हळूहळू पांढराफटक पडू लागला... मोरूची फटकेबाजी सुरूच होती, ‘‘पुण्यपत्तन कसलं अख्ख्या राज्याचं अध:पतन होऊन महाराष्ट्रपत्तन झालंय तुमच्यासारख्या नादानांमुळे. पुण्यात काय वेगळं होणाराय? ज्यांनी आयुष्यात पाठय़पुस्तकांच्या पुढे काहीच वाचलेलं नसतं, त्यांना पाठय़पुस्तकात शिकलेले भाबडे धडे हाच इतिहास वाटायला लागतो. शाहीराला इतिहासकार मानायचं आणि भाटांच्या बखरींना ऐतिहासिक दस्तावेज. इतिहास म्हणजे काही डबकं नसतं साचलेलं. नवनवीन साधनं उजेडात आली की आधीचा इतिहास खोडून त्याची नवीन मांडणी करावी लागते. नवी मांडणीही त्यापेक्षा वेगळी आणि विश्वासार्ह साधनं उजेडात आल्यावर जुनी होते आणि खोडावी लागते, याचं भान आहे का कुणाला? ज्याने त्याने उठून बडबड करत सुटायला इतिहास म्हणजे काही क्रिकेटची मॅच नाही. संशोधनाचं निष्कर्ष काढण्याचं, एकमेकांचे निष्कर्ष खोडण्याचं काम त्या विषयातल्या अभ्यासकांवर सोपवायला नको का? पण त्यासाठी त्या त्या काळातले निष्कर्ष समबुद्धीनं स्वीकारण्याची हिंमत संपूर्ण समाजात असली पाहिजे. ती नसते तेव्हा हे पुढाऱ्याच्या रूपातले पेंढारी इतिहासातले दाखले देऊन जातीपातींमध्ये लावालाव्या करत फिरतात आणि तुमच्यासारखे निष्क्रीय लोक नुसतेच सुस्कारे सोडत बसतात.’’ 
‘‘बास पोरा बास’’ आता मोरूच्या बापाचा चेहरा अंतर्मुख की काय म्हणतात तसा झाला होता, ‘‘या वर्षापासून आपण परंपरा बदलूयात. मी झोपून राहीन आणि तूच माझ्या कंबरडय़ात लाथ घालून उठवत जा आणि माझं प्रबोधन करत जा. आज तुझ्यामुळेच मला कळलं, की 
जे भांडत बसतात यावरून 
की इतिहासात कोण होता राव  
आणि कोण होता रंक 
त्यांना पाहून समजून घ्यावे की 
यांचा वर्तमान आहे खंक!’’ 
‘‘डॅडा, तुम्हाला कविता होऊ लागल्यात म्हणजे हीच ती वेळ आहे..’’  
‘‘कसली?’’ 
‘‘दोघांनी मिळून उतारा घेण्याची!’’

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)  

(2/1/11)

No comments:

Post a Comment