Saturday, May 9, 2020

आये कुछ अब्र, कुछ शराब आये...बाहेर पावसाची हलकीशी झिम्मड असावी किंवा आसमंत थरथरवणारी जोरदार सर... पावसाचा घनगंभीर संततसूर लागलेला असावा आणि सरींनी बंदिशीनुसार मंद-द्रुत लयीत साथ धरलेली असावी... हवेतल्या उष्म्याची जागा हलक्याशा गारव्याने घेतलेली असावी... अगदी आता गरम कपडे चढवून बसावं किंवा जाड ब्लँकेटात शिरून झोपावं असं वाटायला लावणारी थंडी नव्हे, अंगावर रोमांचक शिरशिरी आणणारा, सौमित्र आणि मिलिंद इंगळे यांच्या पाण्यावर सर सर सर काजवाची आठवण करून देणारा गारवा... म्हणजे थोडक्यात कालचा पाऊस आपल्या गावात आलेला आहे आणि आता सदर्हू रात्र आपण आसवांवर वगैरे काढायची गरज नाही, असा दिलासा देणारा, ट्रंक कोपऱ्यात ठेवून वळकटी उघडून, मानेमागे हात धरून निवांत पाठीवर पहुडलेला पाऊस...

फैज अहमद फैजसाहेबांनी म्हटलंय (म्हणजे त्यांनी लिहिलंय आणि मेहदी हसन साहेबांनी ते वारुणीत भिजलेल्या स्वरात बेहतरीन गायलंय)...
आये कुछ अब्र, कुछ शराब आये
उसके बाद आये, जो अजाब आये
(थोडे मेघ दाटोत, थोडी सुरा येवो, त्यानंतर जी यायची विपदा येवो...)

...फैजसाहेबांना हवे होते ते ढग तर मुक्कामी आलेले आहेतच, आता फक्त शराबचा इंतजार आहे, अशी ही कातर हुरहुरीची स्थिती...

माणसांची किती गंमत असते... प्रसंग हाच, पाऊसही असाच; पण, वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या वृत्तीच्या माणसांना लागलेली हुरहूर किती वेगवेगळी असू शकते...

...याच मोसमात अहाहा, मस्त पाऊस लागलाय, आता गरमागरम कांदाभजी आणि फक्कडशी मसाळावाली चाय (गुजराती मसाल्याचा चहा) मिळाली की मनुष्यजन्माचं सार्थक झालं,’ असं वाटणारे लोक असतात...

...अरे देवा, लागली का ढगाला कळ?... आता सांधेदुखी बळावणार, नाक चोंदणार, अशा आरोग्यविषयक तक्रारींचे पाढे वाचणारे लोक असतात...

...बोंबला, आता लोकलची पुरती वाट लागणार, मुंबई बंद पडणार, मेट्रोच्या कामांनी रस्त्यांचा आधीच सत्यानाश केलाय, हिंदमाताला तळं साचलं असेल एव्हाना, हीच पावसातली पहिली प्रतिक्रिया ज्यांच्या मनात उमटते, असे तुंबईग्रस्त मुंबईकर असणार...

...पत्र्याच्या छपराला डांबर लावायच्या आधीच पाऊस आला... म्हणजे आता दहा बाय दहाच्या घरात १७ ठिकाणी गळणारं पाणी गोळा करायला भांडी लावावी लागणार आणि पोरांना एका कोरड्या कोपऱ्यात झोपवून आपण जागे राहून रात्रभर भांडी ओतत राहण्याची कसरत करावी लागणार, याची चिंता लागलेले गोरगरीब चाळकरी, झोपडपट्टीवासी असतात...

...रोमँटिक थंडाव्याच्या झुळका सुरू झाल्याबरोब्बर आतल्या खोलीकडे सूचक कटाक्ष टाकून अजून आठवे ती रात्र पावसाळीअसं गुणगुणत त्या यादगार रात्रीच्या पुनरावृत्तीच्या अपेक्षेची सूचना देणारे रंगेल जवाँदिल लोकही असतात... 

शेरोशायरीचा शौक असलेला एखादा प्रियतमेला सबा इकराम यांच्या शेर ऐकवून सलज्ज नजरेतूनच तिची वाहवाही बटोरत असेल. सबासाहेब म्हणतात,
छुप जाएं कहीं कि बहुत तेज़ है बारिश
ये मेरे तिरे जिस्म तो मिट्टी के बने हैं।
(प्रियकर प्रेयसीला म्हणतोय, ये लपू कुठेतरी, पावसाचा जोर खूप आहे... हे तुझे माझे देह तर मातीचे बनले आहेत...) हे खरंतर पावसाची भीती घालून एकमेकांमध्ये विरघळण्याचं आवतण...

परवीन शाकिर म्हणतात त्याप्रमाणे,
अब भी बरसात की रातों में बदन टूटता है
जाग उठती हैं अजब ख़्वाहिशें अंगड़ाई की।

असे, ‘अब दिल में यही बात इधर भी है उधर भीवाले हालात तिकडेही असतीलच की...

...आषाढसरी कोसळू लागल्यावर इतर काही रसिकांनाहीरात्र पावसाळीआठवतेच, पण, वेगळी. त्या रात्रीतली मने धुंद वेडी, भिजून चिंब झालेलीअसतात ती वेगळ्याच सुवर्णद्रवात... अशाच एखाद्या पावसाळी रात्री एकट्याने किंवा यारदोस्तांसोबत रंगवलेल्या खास पावसाळी मद्यमैफलीच्या आठवणींत...

...पावसाळा आणि वारुणी हे आपल्याकडचं एक अतिशय आकर्षक काँबिनेशन आहे, जणू एक कॉकटेल...

उन्हाळ्याची तल्खली जोरात असते काळात हार्ड ड्रिंक्स हार्ड पडतात म्हणून घेतली जात नाहीत... बियर कितीही ढोसली तरी ते फसफसलेलं पाणीच भासतं... उन्हाळ्याच्या अखेरीला आकाशात ढगांची दाटी होते, जिवाची तगमग करणारी गदमद हवेत दाटते, त्यावर बियरचीही मात्रा चालत नाही... एक दिवस दाटलेले मेघ बरसू लागतात... उन्हाळ्यात शुष्क कोरडे पडलेले माळ जसे पावसाच्या वर्षावाने चिंबहिरवे होत जातात, त्याचप्रमाणे उन्हाळ्यात सुकून आक्रसून गेलेलं मनही आता ताजं टवटवीत होतं... अंगात भरलेल्या शिरशिरीचं आमंत्रण काही वेगळंच असतं... आता ते फयफय पानीकोण पिणार? आता घशातून किंचित चरचरत खाली उतरणाऱ्या आणि तनमनात ऊब भरत मेंदूला झिणझिण्या आणणाऱ्या पेयांचे वेध लागतात... सोबतीला चमचमीत, झणझणीत, चटकदार असं काही हवंच असतं... हसरत मोहानी साहेबांच्या शब्दांत सांगायचं तर हा काळ असा जिथे,
बरसात के आते ही तौबा रही बाक़ी
बादल जो नज़र आए बदली मेरी नीयत भी। 

(ज्याने मदिरेला स्पर्शही न करण्याची शपथ घेतलेली असते, त्याची ती शपथ आकाशात मेघांची दाटी दिसताच सुटते आणि नीयतच बदलते...)

जिथे बारा महिने तेरा काळ पावसाळाच असतो, अशा युरोपीय हवामानात प्रत्येक अपेय पावसाळीच. त्यांना त्याचं स्वतंत्रपणे काय कौतुक? पावसाची झिमझिम आणि मदिरेची झिंगझिंग यांचं कॉकटेल आपल्याच हवामानात खऱ्या अर्थाने जमून येतं... सगळा परिसर हिरवागार झालेला असतो, कालपर्यंतचे बोडके डोंगर आज नयनमनोहर सौंदर्याने डोळ्यांचं पारणं फेडू लागलेले असतात... उन्हाच्या तल्खलीत काम आणि घर यापलीकडे पाऊल न पडलेले, कोमेजलेले जीव पावसाळ्यात गवतावरची फुलं उमलावीत तशी खुललेली असतात आणि त्यांना पावसाळी सहलीचं आवतण देत असतात... जिथे घरातच बसून उघड्या बाल्कनीतून, काचेच्या मोठ्या खिडकीतून झाडं, पानं, फुलं, पाणी न्याहाळत पावसाळ्याचा आनंद लुटण्याची संधी असते, अशा घरातून बाहेरही कुठे जाण्याची गरज नसते... फक्त मनातलं कामाचं, रूटीनचं बटण बंद करायचं आणि पाऊस झेलण्याचं बटण ऑन करायचं... बास्स!... या हवेतच उत्तम दर्जाच्या मदिरापानाचं आवतण असतं...  
परवाज जालंधरी म्हणतात,
मय बरसती है फजाओंमें नशा तरी है!
मेरे साकीने कई जाम उछाले होंगे!!

(आसमंतात मदिरेचीच बारिश सुरू आहे, सगळं वातावरण नशिलं होऊन गेलं आहे, माझ्या साकीने, म्हणजे मदिरा प्याल्यात ओतून देणाऱ्या सुंदरीने बरेच जाम उडवलेले दिसतायत इकडेतिकडे...)

पण, पावसाळा आणि मधुशाळा हे अतिशय रिस्की कॉकटेल आहे... कोणत्याही कॉकटेलमध्ये मद्यापासून इतर घटकांपर्यंत सगळ्यांचं प्रमाण जुळून आलं तरच त्याची मजा येते... जरा प्रमाण चुकलं की कॉकटेलचा पदर ढळलाच म्हणून समजा... स्वर्गसुख देण्याची क्षमता असलेली अप्सरा एकदम माडीवरच्या खिडकीत दिसावी, तशी गत होते त्या कॉकटेलची... कुठल्याही काळाप्रमाणे पावसातल्या मदिरापानातही प्रमाण चुकलं, गणित हुकलं की तोल ढळतो, आनंदाचा चुथडा होतो आणि भलतीच नशा हँगओव्हरसारखी डोक्यात भिनून धुंद पावसाळा कुंद, रोगट करून टाकते...

या कॉकटेलचा विचका करून टाकणारी पहिली जमात म्हणजे पावसाळी पिकनिक-पियक्कड. पावसाळी पेयपानाचा आनंद लुटणे म्हणजे निसर्गरम्य ठिकाणी, शिवरायांच्या गडांवर कुठेही बसून दारू ढोसणे, अभक्ष्यभक्षण करणे, दारूच्या बाटल्या नाचवत धबधब्यांमध्ये घुसून गोंधळ घालणे, सहलीला आलेल्या आयाबहिणींकडे पाहून अचकटविचकट हावभाव करणे, कौटुंबिक सहलीवर आलेल्यांच्या मनात पावसाळी पिकनिकविषयी दहशत निर्माण करणे ही कल्पना असलेले लोक म्हणजे पावसाळी पेयपानाविषयी गैरसमज निर्माण करणारी गलिच्छ जमात... हे लोक म्हणजे पावसाळ्यात उच्छाद मांडणाऱ्या साथीच्या रोगांपैकी एक रोगच आहेत... यांना ना पावसाची गंमत समजते ना मद्याची खरी मजा चाखायची मानसिक प्रौढता यांच्यात आलेली असते... ती कधी येण्याची शक्यताही नसते... यांच्या हातात ताकाचा प्यालाही ताडीच्या प्याल्यासारखा... तिथे मद्याचा चषक म्हणजे तर माकडाच्या हातात कोलीतच.

असे बहुतेक टगे वीकेण्डला ग्रूप करून निसर्गरम्य ठिकाणी भिजायला जायला निघतात... मुळात ते कुठेही जायला का निघतात, हाच प्रश्न असतो... कारण, गाडीत बसल्यापासून कोल्ड्रिंकच्या बाटल्यांमध्ये मिक्स केली दारू घटाघटा प्यायला सुरुवात होते... सोबत पाकीटबंद डाळी, शेंगदाणे, वेफर्स, असला चखणा फक्त जिभेला तिखट, खारट झटका देण्यापुरता असतो... अचकट-विचकट गप्पा करत इच्छित स्थळी पोहोचेपर्यंतच यांचे मेंदू आउट झालेले असतात... निसर्गरम्य ठिकाणी रम्य काय आहे, हे त्या मेंदूंमध्ये पोहोचत नाही, पावसाची गंमत त्यांच्या मनाला चिंब करत नाही, फक्त विद्रट प्रकार करून उपद्रवातून लोकांचं लक्ष वेधून घेणं, ही यांची आनंदाची कल्पना... हे लोक काहीही पितात, कितीही पितात, कशातही काहीही मिक्स करून पितात, कोणत्याही वेळी पितात, ते पावसाळ्याच्या, मद्यपानाच्या आनंदासाठी पीत नाहीत, तर बेफाम पिऊन टाइट होण्यासाठी पितात, त्याबरोबर तेलकट, तिखट, खारट असं काहीही, कितीही वचावचा खातात, चिकन-मटण रावड्यासारखं हाणतात... जिथे कुठे लुढकतील, तिथे दुसऱ्या दिवशी जागे झाल्यावर काल आपण किती सुंदर उपद्रव निर्माण केला, या आनंदात चिंब होऊन नव्याने बाटली तोंडाला लावतात... ‘फुल खंबा ढकलला तरी आपल्याला चढत नाही,’ ही यांची अत्युच्च शौर्याची कल्पना आणि आपण कच्चीच मारतोहा अभिमानबिंदू! शिवाय रपारप मारतो’, हे तर आपण ख्रिस गेल किंवा किरॉन पोलार्ड असल्यासारखं कौतुकाने सांगतात. अरे गड्या, एवढी पिऊन चढत नाही, तर मग दारूवर पैसे कशाला खर्च करतोस, पाणीच पी की! अशीही तुला नशा दारूची चढत नाहीच, आपण पितो आहोत, याचीच चढते.

या मंडळींची मद्याविषयीच कल्पना अतिशय बेसिक अशी आहे. किती पैशात किती चढते, हा हिशोब. त्यामुळे हे बियरची चव, गंध यांची खुमारी न समजून घेता स्ट्राँग बियर पितात. वाइन हा प्रकार तर त्यांच्या समजुतीपलीकडचा असतो. एवढे पैसे मोजून असलं पातळ फुळकवणी काय प्यायचं? त्यापेक्षा पोर्ट वाइनचा खंबा (इंडियन व्हिस्कीच्या क्वार्टरच्या रेटला पडतो म्हणून) रिचवून टाइट होणं बेस्ट! वाइन ग्लासात गोल फिरवून तिचा कसा गंध घ्यायचा असतो, मग दोन थेंब वाइन तोंडात घोळवून सगळ्या तोंडातल्या टेस्ट बड्सना कशी तिची चव चाखवायची असते, तिच्या फ्लेवरच्या फ्रेग्रन्सच्या नोट्स कशा कशा टप्प्याटप्प्याने समजत जातात, असं सगळं शास्त्र यांना कोणी सांगितलं तर जॉनी लिव्हरची किंवा जॉनी रावतची कॅसेट ऐकत असल्यासारखे खदखदा हसतील (यांची विनोदबुद्धीची कॅसेटतिथेच अडकलेली असते). बरं समजा हे शास्त्र यांनी कधी समजून घेतलंच तरी आरारूटच्या पिठात तळलेले तिखट शेंगदाणे, भजी, चिकन लॉलिपॉप, शेझवान स्टिक्स वगैरे जिव्हा बधीर करणाऱ्या चाखण्यानंतर वाइनची चव पाण्यापेक्षा किती वेगळी लागू शकेल? ती चढणारनाही, हा विषय तर आणखी वेगळा.

रोजची ढोरमेहनत, ढोरमेहनतीसारखाच वाटावा असा लोकलचा, बस-एसटी-वडापचा भयंकर प्रवास, दिवसभर मरमर कष्टांनंतर हातात येणारी तुटपुंजी रक्कम, तिच्यात भागवायच्या गरजांचा डोंगर आणि या सगळ्याचा विसर पाडणारी झिंग चढवणारी आणि शांत झोपेसाठी पेनकिलरसारखी आवश्यक असलेली दारू, हीच ज्यांची कर्मकहाणी आहे, त्या कष्टकरी मजूर वर्गाला इज्जतीत वारुणीची लज्जत चाखायला सांगणं म्हणजे आपल्या पाच ट्रिलियन डॉलरकडे झेपावणाऱ्या रामराज्यातही पाण्यासाठी मैलोनमैलांची तंगडतोड रोज करणाऱ्या आयाबायांना रँपवॉकवरची नाजुक, डौलदार चाल कशी असते, हे सांगण्यासारखंच आहे... क्रूर आणि फजूल.

मात्र, सुदैवाने ज्यांना वेगवेगळ्या ऋतूंची गंमत खुलवणारं उत्तम प्रतीचं मद्य आस्वादण्याची संधी आहे, ऐपत आहे, त्यांनीही निव्वळपिऊन टाइट होणेहा दारूचा धडधडीत अपमान का करावा? या वर्गातही रात्री सात-आठ वाजता ज्यांचे हातपाय थरथरायला लागतात, डोक्यात घंटी वाजायला लागते, जिभेवरून शब्द (पिण्याआधीच आणि वेळ झाली तरी अजून न प्यायल्यामुळे) घरंगळायला लागतात, कोणत्याही कामात मनच लागत नाही आणि क्वार्टर-दीड क्वार्टर रिचवल्याशिवाय रात्री झोप लागणंच अशक्य असतं, अशा अल्कोहोलिक बनून गेलेल्या पियक्कडांसाठी सगळे ऋतू सारखेच. या मंडळींचं पेयही ठरलेलं असतं, त्याबरोबरची संगतही ठरलेली असते आणि एखादा धार्मिक परिपाठ असल्यासारखा सगळा परिपाठ ठरलेला असतो... मौसम कोणताही असो, उन्हाची खाई पेटलेली असो, पाऊस बदाबदा (यांच्याबाबतीत तो याहून वेगळ्या पद्धतीने कोसळण्याची शक्यता नसते) कोसळत असो की थंडीचा कडाका असो- हे ठरलेल्या वेळेला घरात किंवा ठरलेल्या बारमध्ये ठरलेल्या टेबलावर ठरलेल्या पेयाची क्वार्टर किंवा बॉटल किंवा जे काही असेल ते उघडणार. तेच रोजचे चणेफुटाणे, पापड, भेळमिक्स, चनागार्लिक, बॉइल चना, ग्रीनपीज (काही मंडळी चीजचे तुकडे, सॉसेजेस, फ्राय मासे खातात, पण तेही चणेफुटाण्यांसारख्याच रटाळ पद्धतीने) वगैरे तोंडात टाकत, टीव्हीवर कसलीतरी मॅच, पॅनेल चर्चा नावाच्या नूरा कुस्त्या किंवा बायांची सोंग काढलेले केसाळ बाप्ये दाखवणारे हशिवनारे कारेक्रमपाहात अर्ध्या-पाऊण तासात पेय संपवतात आणि ठरलेल्या जेवणाकडे वळतात किंवा बारमध्ये असतील तर बाहेर पडतात. यांच्यातले काही रसिक संगीतही ऐकतात... पंकज उधास ते अल्ताफ राजा अशी यांची साधारण रेंज असते... एकटेच असतील तर या काळजाला पीळ की काय तो पाडणाऱ्या गजला आणि बालवाडी छाप शेरोशायरी ऐकून त्यांनाही नेमकी बालवाडीतली किंवा तिसरी डमधली एक वर्गमैत्रीण आठवते आणि डोळे पाणावतात वगैरे. रोज प्यायचं, तेच प्यायचं, तसंच प्यायचं आणि पिऊन रोज आठवते ती तिसरी ड! हाऊ बोअरिंग!

आता गुलजारसाहेबही म्हणतात,
मैं चुप कराता हूं हर शब उमड़ती बारिश को
मगर ये रोज़ गई बात छेड़ देती है। 


पण त्यांची ही रोज रात्री उसळणाऱ्या बरसातीत आठवणारी गई बातआणि तिसरी डयांची काही तुलना होऊ शकते का?

सांगायची गोष्ट म्हणजे वारुणीला आयुष्यावर स्वार होऊ न देता जे वारुणीचे वारू करून जे तिच्यावर स्वार होतात आणि वारू उधळून तारू बुडण्याच्या आत जे परफेक्ट किनाऱ्याला पोहोचतात, त्यांच्यासाठी पावसाळ्यातलं पेयपान हा विषय आहे...

मिर्झा गालिबसारखा मद्यावर आयुष्यभर रसिकतेने प्रेम केलेला शायर एका टप्प्यावर म्हणतो, गालिब छुटी शराब, पर अब भी कभी कभी, पीता हूँ रोजे अब्रो, शब--माहताब में... (वारुणीची संगत सुटली, पण अजूनही आकाश मेघांनी आच्छादलं जातं, अशा एखाद्या दिवशी किंवा चंद्रप्रकाशाने, चांदण्याने उजळलेल्या रात्री तिचा थोडा आस्वाद घेतो...) अगदी रोजच्या रोज मदिरापान केल्यानंतरही जो नजाकतीने आणि अलवारपणे शराबची लज्जत घेणं जाणतो, त्यालाच या दोन दिवसांचं पानमाहात्म्यसमजू शकेल... हे दोन दिवसच का? ढग दाटून येतात, तेव्हा काय होतं, ते आपल्या शहरी बांधवांनाही समजू शकतं... पण, चांदणी रात्र काही त्यांच्या नशिबात नाही... त्यांच्यासाठी शहरभर उजळलेल्या दिव्यांनी रोजच बाजारू पौर्णिमा उजळून ठेवलेली असते... अमावस्या आणि पौर्णिमा यांच्यातला फरक त्यांना सणावारांमुळेच कळतो.

पावसाळ्यात कधीतरी कृत्रिम दिव्यांचा फारसा संसर्ग नसलेल्या ठिकाणी जा, एखाद्या समुद्रकिनाऱ्यावर, जंगलाच्या मधोमध, धबधब्याच्या काठावर किंवा अगदी आपल्या गावच्या घराच्या अंगणात बसून ढगांची दाटी होताना किंवा रात्रीच्या टिपूर चांदण्यात काय अनुभूती होते, ते अनुभवा... तुम्ही गालिबसाहेबांना साष्टांग दंडवत घालाल, यावर बेट आपली!

यारो, पावसाळ्यात जमवायचाच तर असा दिलखुश माहौल जमवा... बारिशच ग्लासात उतरवण्याची ख्वाईश ठेवा... तसा साज जमवा... ‘पेव्वी तर चांगली पेव्वीहे नेमाडेगुर्जींनी आखून दिलेलं सूत्र लक्षात ठेवा... आपण एखाद्याला मान दिला, तर तोही आपल्याला मान देतो, हे मदिरादेवीच्या बाबतीतही तेवढंच खरं आहे... भसाभस पाणी ओतून, सोडा घालून, कोल्ड्रिंकचा मारा करून पेग गोडगिट्ट करून तिचा अपमान करू नका... ती प्रसन्न होणार नाही, उलट अप्रसन्न होईल... पावसाळ्यात शरीरात ऊब निर्माण करण्याकरता थोडी घेतो, वगैरे भाकड कल्पना ठेवून पिऊ नका... 

पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात पिणारे अनेकजण या कारणाने भाविकतेने मद्यपान करतात... शून्य अंश सेल्सिअसजवळच्या तापमानात तर ते फार घातक...  मद्यामुळे शरीरात ऊब निर्माण होत नाही, रक्तवाहिन्या प्रसरण पावतात, त्यातून छान ऊबदार वाटतंय अशी भावना तयार होते, घामही येऊ लागतो... प्रत्यक्षात त्वचेच्या, तापमान जाणून घेण्याच्या संवेदना बधीर झालेल्या असतात... वास्तवात शरीराचं तापमान तेवढंच असतं किंवा बाहेर थंडी असेल तर ऊबदार वाटू लागतंय म्हणून तुम्ही गरम कपडे कमी केलेत तर ते आणखी कमी होऊ शकतं, हिमाच्छादित भागात फ्रॉस्टबाइट किंवा हायपोथर्मिया होण्याची शक्यता वाढते... तेव्हा फिल्मी कल्पनांमध्ये रमू नका... खरोखरच ऊबदार असं काही प्यायचं असेल आणि कॅलरींची चिंता करायची नसेल, तर पेरी मेसनला शरण जा, तो आणि त्याचा गुप्तहेर मित्र पॉल ड्रेक हे थंडगार रात्रींमध्ये काही अवघड गुन्ह्यांची कोडी सोडवण्यासाठी हॉट बटर्ड रम पितात... तुम्ही दहा अंशाच्या आतल्या तापमानात, पावसाच्या धुँवाधार झडीत सापडले असाल, तर परमेश्वराचे आभार माना... गरम पाण्याने ग्लास गरम करून घ्या... पाणी फेकून ग्लासात चमचा-दीड चमचा ब्राउन शुगर किंवा गुळाची पावडर घाला... थोडं गरम पाणी घालून साखर विरघळवून घ्या... लवंगा, दालचिनी किंवा ऑल स्पाइसची पूड करून ती चमचाभर मिसळा... त्यात डार्क रमचा एक पेग घाला... वरून गरम पाणी ओता... मग वरून बटरचा एक लपका टाका, संत्र्याची किंवा लिंबाची साल पिळवटून टाका आणि बटर वितळवून वरून जायफळ किसा... खरोखरचं हॉट ड्रिंक तयार...

आकाशात परमेश्वर आहे की नाही, ते कुणालाच माहिती नाही पक्कं कुणालाच, पण पृथ्वीवर गुगल आहे... त्यावर सर्च करून कशाबरोबर काय जातं, काय चांगलं लागतं, ते समजून घ्या... आपण जे पेय पिणार आहोत, ते काय आहे, हे समजून घ्या... आपण आयएमएफएल म्हणजे इंडियन मेड फॉरेन लिकर म्हणून जे व्हिस्कीचे प्रकार चाखतो, त्या खरंतर रम आहेत, हे समजून जातं... कोणती स्कॉच बर्फखड्यांवर घ्यायची, कोणती नीट पिण्यातच मजा आहे, हे समजून जातं... रममध्ये पाणी, बर्फ, सोडा किंवा कोला भरून पिण्याऐवजी ती ग्लासभर बर्फखड्यांवर ओतून वरून अर्धं लिंबू पिळून ती साल (सालीतली ऑइल्सही द्रवात उतरावीत म्हणून) ग्लासातच ठेवून वरून जेवढ्यास तेवढा कोला ओतला की क्युबा लिब्रेची काय बहार तयार होते, ते समजून घ्या... जिन-वाइन हे बायकांच्या दारवांचे प्रकार आहेत, असल्या अंधश्रद्धांमधून बाहेर या... वाइन गॉब्लेटमध्ये बर्फखडे टाकून तो गार करून घेऊन त्यात लिंबाची फाक पिळून (चिरण्याआधी हाताने दाब देऊन टेबलावर लिंबू फिरवणं मस्ट... कोश तुटून सगळा रस बाहेर येतो) वरून जिन आणि नंतर टॉनिक वॉटर टाकून, न पिळलेली एक फाक टाकून गॉब्लेट हलकासा फिरवून जे जिन-टॉनिक तयार होतं, ते घाईगर्दीच्या, कामाच्या दिवसानंतर तुम्हाला पुन्हा चार्ज करतं... अर्थात पावसाची मजा लुटत मदिरेने आसमंत नशीला करण्यासाठी...

मदिरा, सुरा, वारुणी ही तिची लज्जत चाखण्यासाठी, एकनिष्ठेने प्या... 

मुख्य गायिका ती आहे, हे लक्षात ठेवा... तिचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचायला हवा... चखण्याचे पदार्थ, कोल्ड्रिंक, सोडा आलं, लिंबू, चिवडा, लसूण वगैरे साथीदार आहेत, त्यांना मैफलीवर हावी होऊ देऊ नका... लज्जत दारूची चाखायची आहे, चकलीची नव्हे... पाश्चिमात्य देशांत बहुतेक ठिकाणी लोक सातच्या आत जेवतात आणि त्यानंतर नाइट कॅप म्हणून पेयपान करतात... त्यांना चखण्याच्या झंकार बीट्सची गरज भासत नाही... ते मूळ गाणं एंजॉय करतात... मुख्य म्हणजे, आपण दुष्काळी भागातली टाकी आहोत आणि मदिरेची बाटली हा महापालिकेने पाठवलेला टँकर आहे, अशा रीतीने पिऊ नका... स्कॉचला तर तशीच खास संगत नसेल आणि प्रयोजन नसेल तर दोन पेगनंतर तिसऱ्या पेगच्या सक्तमजुरीला कधीच लावू नका... तिला सोडा, कोला वगैरेंनी भ्रष्ट करू नका...

पावसाळ्याला अमुक मद्य चालत नाही, तमुक योग्य नाही, असं काही नाही... युरोपात शून्य अंशाजवळच्या तापमानातही लोक आइस्क्रीम आवडीने खातात आणि बियरही चवीने पितात, हे लक्षात घ्या...

पावसाचा, वारुणीचा योग्य मान ठेवून योग्य प्रमाणात योग्य संगतीत तिचं सेवन केलं तर फैजसाहेब जे सांगतात, तो दैवी साक्षात्कारी अनुभव येऊ शकतो... 

ते म्हणतात,
बाम--मीना से माहताब उतरे
दस्त--साकी में आफताब आये...

(मद्याच्या चषकातून चांदणं बरसो आणि साकीच्या हातांमध्ये सूर्यप्रकाश झळाळो)

यारों, अशा तब्येतीत पेयपान केलं, तर पुढे फैजसाहेबांनीच सांगितलेल्या आत्मज्ञानापर्यंत पोहोचता येतं...

ते म्हणतात,
फैज थी राह सर बसर मंझिल
हम जहाँ पहुचे कामयाब आये...

(फैज, रस्ता मंझिलच्या जवळच होता, पण आम्ही जिथे पोहोचलो, तिथेच यशस्वी होतो...)

चियर्स!!!

3 comments: