Tuesday, March 8, 2011

बळी... कट्टर (अन्ध)श्रद्धेचे!


देशप्रेम म्हणजे आपण ज्या भूभागात जन्मलो तो भूभाग- केवळ आपण तिथे जन्मलो म्हणून- जगातील सर्वश्रेष्ठ भूभाग मानण्याची प्रवृत्ती'...

...जॉर्ज बर्नार्ड शॉने केलेली ही देशप्रेमाची जळजळीत व्याख्या धर्मप्रेम, धर्मनेताप्रेम, समाजप्रेम, पक्षप्रेम, पुढारीप्रेम, जातिप्रेम, राज्यप्रेम, जिल्हाप्रेम, गावप्रेम, गल्लीप्रेम, मतप्रेम आणि विचारसरणीप्रेमालाही तंतोतंत लागू पडते... माणसांना स्वत:च्या प्रत्येक गोष्टीचं कौतुक तरी किती असतं पाहा. एखादी गोष्ट आपल्या पचनी पडली नाही, तर आपल्या पचनसंस्थेत काही बिघाड असू शकतो, ही शंकाही शिवत नाही त्यांना. त्यामुळेच एखाद्या सिनेमा- नाटकातल्या फुटकळ गोष्टीनं भावना दुखावल्याचं भांडवल करून लोक थिएटरं फोडायला, बाँबस्फोट करायला, पोस्टरं फाडायला तयारच असतात. इतक्या या भावना सदासर्वदा हळहळ्या हुळहुळ्या कशा?

त्यातही ही भावना धर्मभावना असली, तर शांतम् पापम्! कारण प्रत्येकाच्या मते त्याच्या त्याच्या धर्मातलं सर्वकाही सत्यम् शिवम् सुंदरम्! त्याला धक्का पोहोचवणारं काहीही घडलं की सामूहिक पित्तदोष उफाळून येतो आणि सामुदायिक गुंडगिरीला उधाण येतं. अलीकडच्या काळात 'सिन्स', 'ब्लॅक फ्रायडे', 'गर्लफ्रेंड', 'फायर', 'वॉटर', 'गदर', 'जो बोले सो निहाल' वगैरे सिनेमांवरून जो गदारोळ माजवला गेला आहे, त्यात नवं काही नाही. आपल्या परंपराप्रिय देशात ही परंपराही किती मोठी आहे, हे याच पानावर ज्येष्ठ चित्रपट अभ्यासक इसाक मुजावर यांच्या लेखातून समजून येईल. आणि तो वाचताना, किती फालतू गोष्टींवर इथे समाजाच्या भावना भडकतात, हे पाहून हसूही येईल. पण, पुढे जाऊन ज्या गोष्टीचं हमखास हसं होणार आहे, ती ती गोष्ट समाजातले स्वयंघोषित संस्कृतिरक्षक त्या त्या वेळी मात्र फार पोटतिडकीनं, तळमळीनं करत असतात, हे सर्वात विनोदी आहे.

या मंडळींना ना संस्कृतीची जाण असते, ना धर्मविचाराचा अभ्यास असतो ना कलेचं भान. त्यांना एकच कला अवगत असते, आपल्याला काही पटलं नाही की लगेच त्या गोष्टीचा विध्वंस करून मोकळं व्हायचं. हीच यांची 'संस्कृती' आणि हाच यांचा 'धर्म'. कशाचीही चिकित्सा नाकारणारा हा आंधळा, अवैज्ञानिक आविर्भाव असतो फक्त. प्रगत समाजांकडे आशाळभूतपणे पाहणारे, त्यांच्या जीवनशैलीची आंधळी नक्कल करणारे आतून असे अप्रगत असतात, म्हणून त्या प्रगतीची नक्कल काही, काहीकेल्या जमत नाही.

अमेरिकेसारख्या देशात राष्ट्रध्वजालाही पावित्र्याच्या सोवळ्यातून मुक्त ठेवण्यात आलं आहे. म्हणून तिथले, राष्ट्रध्वजाची अंतर्वस्त्रं करून पेहरणारे लोक राष्ट्रप्रेमीच नाहीत, असं काही सिद्ध झालेलं नाही किंवा तो देश 'उज्ज्वल परंपरां'ना मुकल्यामुळे त्याचं भौतिक-आधिभौतिक नुकसान झाल्याची नोंद नाही. आणि जागतिक अध्यात्म, संस्कृती, मूल्यं, पावित्र्य यांची स्वघोषित गंगोत्री असलेल्या देशांनी जीवनाच्या कोणत्याही क्षेत्रात अमेरिकेच्या वरताण कामगिरी केल्याचीही नोंद नाही. मग, उपयोग काय तुमच्या कट्टरपणाचा?

फ्रान्सचा राष्ट्रपुरुष असलेल्या नेपोलियनवर तिथे विनोदी सिनेमा निघू शकतो. त्याचा मनसोक्त आनंद लुटणाऱ्या फ्रंेच माणसाच्या नेपोलियनविषयीच्या आदरात काही उणीव निर्माण होत नाही. या दोन गोष्टी तो स्वतंत्र ठेवू शकतो. आपल्याकडे एखाद्या राष्ट्रपुरुषावर असा सिनेमा काढण्याचा विचार कुणी स्वप्नात तरी करू शकेल का? (अनेक राष्ट्रपुरुषांवरचे 'गंभीर' सिनेमेही मांडणीत 'विनोदी' ठरतात ते सोडा.) महात्मा गांधींना मात्र कुणीही 'कार्टून'छाप पद्धतीनं चित्रित करू शकतो, त्यावर फारसा गदारोळ होत नाही, हे लक्षणीय आहे. आणि समस्त राष्ट्रपुरुषांमध्ये तेच गांधी आजही आंतरराष्ट्रीय स्तरावर 'रेलेव्हंट' ठरतात, हा योगायोग नाही.

प्रगत देशांमध्ये माणसे कलासाक्षर आहेत, त्यांना व्यक्तिगत भावना बाजूला ठेवून निखळ कलास्वाद घेता येतो. आपल्या देशात माणसे अजून अडाणी आहेत, तेव्हा तिथले निकष इथे लावू नयेत, असा एक लोकप्रिय युक्तिवाद आहे. हे म्हणजे एखादं मूल 35 वर्षांचं झालं तरी रांगतेच आहे, तर त्याच्याकडून चालण्याची अपेक्षा करू नका, असं म्हणण्यासारखं आहे.

...फुटकळ भावनांचे चोचले पुरवण्याइतकी श्ाीमंती आपल्याकडे नाही. या देशात करू पाहणाऱ्याला बरीच कामे आहेत. त्यासाठी जरा रांगणं सोडून, उभे राहून चालायचा प्रयत्न तरी करून पाहायला काय हरकत आहे?

(महाराष्ट्र टाइम्स)

1 comment: