निदर्शक 1 ( तारस्वरात) : भूमी कुणाची? भूमिपुत्रांची?
निदर्शक 2 ( तारस्वरात) : उपऱ्यांनो, परत जा.
बघ्या : एक्स्क्यूज मी. हे काय चाललं आहे?
निदर्शक 1 : आम्ही आमच्या भूमीतल्या उपऱ्यांविरुद्ध निदर्शनं करतोय.
निदर्शक 2 : हे उपरे आमच्या पवित्र आणि समृद्ध भूमीत काही वर्षांपूवीर्च आले.
निदर्शक 1 : आले आणि इथलेच होऊन बसले.
निदर्शक 2 : आम्हा मूळ भूमिपुत्रांपेक्षाही शिरजोर झाले.
बघ्या : अहो , पण असे अघटित कसे घडले ?
निदर्शक 1 : असं आहे. आमच्या भूमीत रोजगाराच्या खूप संधी निर्माण झाल्या. पण , भूमिपुत्रांना की नाही , त्यांच्या सोयीच्या वेळात , त्यांना सोयीचं ठरेल , असं काम हवं. हलक्यासलक्या कामांना तर आम्ही हातसुद्धा लावत नाही.
निदर्शक 2 : त्याचाच फायदा या उपऱ्यांनी घेतला. दरिदी प्रांतातून आले हे! कुठलंही , कसलंही काम करून पोट जाळायला हरहमेश तय्यार! जी जी कामं आम्ही नाकारली , ती ती हे विनातक्रार करू लागले.
निदर्शक 1 : आणि पाठोपाठ यांच्यातले काही शिकलेसवरलेले लोकही आमच्या भूमीकडे वळले. आमचे उच्चशिक्षित भूमिपुत्र ज्या पगारावर काम मागायचे , त्याच्या निम्म्या पगारावरही काम करायची यांची तयारी होती.
निदर्शक 2 : आणि खरं सांगायचं तर तसे हे उपरे कामाला वाघ बरं का! आणि कामात चलाखसुद्धा. झालं. बघता बघता यांनी आमची भूमी पादाक्रांतच केली. आज आमच्या भूमीत यांचाच शब्द चालतो.
निदर्शक 1 ( पुन्हा तारस्वरात) : हा अन्याय आहे.
निदर्शक 2 ( पुन्हा तारस्वरात) : तो आम्ही खपवून घेणार नाही.
निदर्शक 1 ( त्याच स्वरात) : भूमिपुत्रांना न्याय मिळालाच पाहिजे.
निदर्शक 2 ( त्याच स्वरात) : उपऱ्यांनोे चालते व्हा.
बघ्या (निदर्शकांच्या सुरात सूर मिसळून) : मिळालाच पाहिजे... चालते व्हा... मिळालाच पाहिजे... चालते व्हा... (भानावर येऊन , पुन्हा निदर्शकांकडे वळून) पण , पुन्हा एकदा एक्स्क्यूज मी हं! तुम्ही दोघेही मराठी दिसत नाही आहात... खरंतर भारतीयच वाटत नाही आहात...
निदर्शक 1 व 2 : नाहीच आहोत आम्ही भारतीय!
निदर्शक 1 : मी आहे अमेरिकन.
निदर्शक 2 : आणि मी आहे ब्रिटिश.
निदर्शक 1 : माझ्या देशात येऊन सिलिकॉन व्हॅली बळकावणाऱ्या , वैद्यकीय व्यवसाय ताब्यात घेणाऱ्या उपऱ्यांचा निषेध करतोय मी.
निदर्शक 2 : आणि मी माझ्या देशात येऊन सगळा व्यापारउदीम ताब्यात घेणाऱ्या उपऱ्यांचा निषेध करतोय.
निदर्शक 1 आणि 2 : म्हणजे तुम्हा भारतीय उपऱ्यांचा!!!
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment