Monday, March 7, 2011

वयम मोठ्ठम खोटम


नाही नाही नाही... आता यात बदल नाही. ठरलं म्हणजे ठरलं. 49 नंतर 51, 59 नंतर 61 आणि 74 नंतर थेट 76...

हे 49, 59 हे कशाचे आकडे आहेत , असं विचारताय ? ( की सुज्ञ वाचक असल्यामुळे तुम्ही आपोआपच ओळखलंत की हे वयाचे आकडे आहेत ?) हे पाहा , इतरांचं आपल्याला ठाऊक नाही. पण आपण आपल्यापुरता निर्णय घ्यावा. तो आम्ही आमच्यापुरता घेतला आहे. आता 49 वर्षांचे झालो(च) तर पुढे एकदम 51 वर्षांचं व्हायचं , 59 पर्यंत पोहोचलो , तर पुढची उडी थेट 61 वर. आणि चौऱ्याहत्तरी गाठलीच , तर पुढे एकदम 76. मधले स्टॉप नाहीतच.

का , म्हणून विचारताय ? ( की सुज्ञ असल्यामुळे तोही प्रश्न पडला नाही ?)

अहो , कुठल्याही थोर माणसाची पन्नाशी , साठी , पंचाहत्तरी यांचं काय कडबोळं होतं , हे पाहिलं नाहीत का तुम्ही आसपास ? आता आम्ही थोर नाही आहोत , हे आम्हालाही ठाऊक आहेच. पण , भविष्यात आम्ही थोर होणारच नाही , याची काय गॅरंटी! कारण , आजकाल माणसांची थोरवी ही त्यांच्या आसपासच्या समाजाच्या खुजेपणावर अवलंबून असते. कधीतरी आपला नंबर लागलाच तर काय घ्या!

आणि थोर झालं ना की मग सगळं आयुष्यच सार्वजनिक होऊन जातं. सगळा समाजच आपल्यावर प्रेम करू लागतो. आणि या प्रेमाची तऱ्हाच न्यारी! इथे प्रेम करणाऱ्यांच्या ऐवजी प्रेमपात्रालाच प्रेमासाठी वाट्टेल ते करावं लागतं आणि वाट्टेल ते सहनही करावं लागतं!

म्हणजे काय होतं की , आपण प्रसिद्धीला कितीही विटलो असलो , तरी वाढदिवसाच्या आदल्या आठवड्यापासून टीव्हीवाले मागे लागतात. प्रत्येकाला ' एक्स्क्लुझिव्ह ' मुलाखती द्याव्या लागतात. वृत्तपत्रवाल्यांनाही काही तुकडे फेकावे लागतात. एखादा अतिप्रेमातला चाहता आदल्याच दिवशी कॅमेरा घेऊन घरी उगवतो. म्हणतो , आजच केक कापा , म्हणजे तसा अभिनय करा. सर्व वृत्तपत्रांना हे छायाचित्र हवं आहे. अशा वेळी काय करणार ? प्रेमाच्या आग्रहापुढे मान तुकवावीच लागते.

मग कुणीतरी पुढाकार घेऊन भव्य सोहळा आखतो. त्याचं देशभर लाइव्ह प्रसारण वगैरे जंगी कार्यक्रम होतो. आता आपली व्यक्तिगत इच्छा नसली तरी , निव्वळ समाजाच्या आनंदासाठी त्यात सहभागी व्हावं लागतं. आपण उत्सवमूतीर् असूनही आपल्या निम्म्या ' उंची ' च्या मंडळींकडून अभीष्टचिंतन स्वीकारण्यासाठी मंचावर वेड्यासारखं तिष्ठत उभं राहावं लागतं. आपण आयुष्यभर ज्या कलेची आराधना केली , तिच्या विटंबनेला विरोध केला , त्या कलेची तीच विटंबना आपल्यालाच ' आदरांजली ' म्हणून पाहावी-ऐकावी , सहन करावी लागते!

आता सांगा , कोण शहाणा माणूस- कुणी कितीही दादा , भाऊ , ताई , दीदी म्हणून गूळ लावला तरी- पन्नाशी , साठी किंवा पंचाहत्तरी जाहीरपणे गाठण्याचा वेडेपणा करील ?

आता आमच्या या सूचनेप्रमाणे अन्य थोर मंडळींनीही आमच्यासारखाच सुज्ञ निर्णय घेतला , तरीही पंचाईत आहेच. कारण , थोरांचे चाहते आणि अनुयायी हे त्या थोरांपेक्षाही थोर असतात. ते यातूनही मार्ग काढतील. आणि मग आपल्याला सोहळे पाहावे-ऐकावे लागतील , ते एकोणपन्नाशी , एकोणसाठी आणि चौऱ्याहत्तरीचे!!!

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment