Sunday, March 6, 2011

विक्रम वेताळ आणि दडपशाही!

रात्रीच्या किर्र अंधारात ती गाडी टीव्हीच्या शोरूमसमोर येऊन थांबली.. राजा विक्रमादित्य गाडीतून बाहेर पडला.. त्याने इकडेतिकडे पाहत कंपाऊंडवरून अलगद आत उडी मारली.. शोरूमच्या अंधा-या बाजूकडची एक काच अलगद कापून आत प्रवेश केला..
आत मंद प्रकाशात नाना प्रकारचे टीव्ही चमकत होते.. एसीडी, एलईडी, प्लाझ्मा.. 29 इंची, 32 इंची40 इंची54 इंची.. सगळे बंद.. फक्त अगदी कोप-यातला एक सोडून.. तो टीव्ही सुरू होता आणि विक्रमाच्या अंदाजाप्रमाणे वेताळ समोर एक खुर्ची टाकून टीव्ही पाहत बसला होता.
.
‘‘ये ये, राजा ये,’’ वेताळ गडगडाटी हसून म्हणाला, ‘‘तू अतिशय बुद्धिमान असल्यामुळे माझ्यापर्यंत पोहोचशीलच याची खात्री होती मला.’’
‘‘वर्ल्ड कपचा सीझन आहे. तू टीव्हीसमोरच सापडशील, याची मलाही खात्री होतीच.’’ विक्रमाने अगदी अनौपचारिक गप्पा मारत असल्याच्या सुरात बोलताबोलता चपळाईने झेप घेऊन वेताळाची गठडी वळली आणि त्याला पाठुंगळी घेतले.
‘‘काय तुला तरी हौस आहे मला कुठून कुठून शोधून पाठीवर घेण्याची,’’ वेताळ म्हणाला, ‘‘माझ्याशिवाय करमत नाही बहुतेक तुला. अरे बोल बोल, मनातल्या भावना अशा दडपू नकोस. हा हा हा हा! मला पाठुंगळी घेतलं की तुझी बोलतीच बंद होते. तू बोला के मै चला.. असो, भावना दडपण्यावरून आठवलं मला.. तुझ्याच राज्यातल्या एका दडपशाहीची गोष्ट सांगतो तुला. पण, ही गोष्ट ऑडिओ-व्हिज्युअल आहे, त्यामुळे तुला इथेच थांबून ती पाहावी लागेल.’’
वेताळाने रिमोट दाबून चॅनल बदलला. एका सभेची दृश्यं दिसू लागली. मंचावर एक गृहस्थ बोलत होते. ते बोलता बोलता थांबले. व्यासपीठाकडे वळले. तिथे बसलेल्यांपैकी एका गृहस्थांनी यांना रोखलं. पुढचं दृश्य त्याच सभेचं. आणखी एक गृहस्थ बोलताना थांबले.. मंचाकडे वळले, पुन्हा मंचावरच्या त्याच गृहस्थांनी यांना दटावल्याचं दिसलं, त्यांनी तणतणत काही कागद फेकून मंचावरून काढता पाय घेतला..
हे दृश्य पॉझ करून वेताळ विक्रमाला म्हणाला, ‘‘पाहिलंस विक्रमा तुझ्या राज्यात ही केवढी दडपशाही चालली आहे ती. एका जाहीर सभेत एक जबाबदार मंत्री अशा प्रकारे बोलणा-यांची मुस्कटदाबी करतो, हे बरोबर आहे का? राज्याचे प्रमुख शेजारी बसलेले असताना यांची ही हिंमत होते, म्हणजे काय? त्यांना ताबडतोब बडतर्फ का केले जात नाही? राजा, मी तुला हा प्रश्न नाही, जाब विचारतोय, असं समज आणि उत्तर दे. ठाऊक असूनही तू उत्तर दिलं नाहीस तर..’’
‘‘..तर माझ्या डोक्याची शंभर शकलं होऊन माझ्याच पायाशी लोळू लागतील, ठाऊक आहे रे मला,’’ विक्रम उत्तरला, ‘‘कूल डाऊन वेताळा, शांत हो, आज तुझ्या मातोश्रींनी तुला कमळाची भाजी खायला घातल्याप्रमाणे एकदम धनुष्यबाण घेऊन धावून का येतोयस अंगावर! अरे, दिसतं तसं नसतं म्हणूनच जग फसतं..’’
‘‘म्हणजे, मी माझ्या डोळ्यांनी जे पाहिलं ते खोटं? अरे, कुणाची तरी ऐकीव माहिती मी सांगोवांगी ठोकून दिली असती, तर एकवेळ तुझं म्हणणं पटलं असतं. पण, समोर धडधडीत दिसणारं दृश्य..’’
‘‘..धडधडीत खोटं असू शकतं.. तेच तर मी तुला सांगतोय, वेताळा! आपल्याला समोर काय दिसतं हे आपल्याला काय दाखवलंजातं, यावर ठरतं, नजरबंदीचे खेळ पाहिलेले नाहीस का कधी?’’ विक्रमानं रिमोट आपल्या हातात घेतला, ‘‘आता तुला दिसलेली दृश्यंच आपण परत पाहू. म्हणजे मी काय म्हणतो ते तुला थेटच कळेल. पहिलं दृश्य पाहा.. इथे हे गृहस्थ बोलता बोलता थांबले. त्यांना मंचावरच्या मंत्र्यांनी थांबवलं.. करेक्ट? आता ऐक ते काय बोलले?’’
त्या गृहस्थाचं बोलणं ऐकू येतं, तो हे सरकार अनौरसआहे, अशा अर्थाचं विधान करतो.. विक्रम दृश्य पॉझ करतो.. ‘‘विचार कर वेताळा, राज्याचा मुख्यमंत्री मंचावर असताना, तो आपलं म्हणणं ऐकून घेण्यासाठी आपल्या भागात पाहुणा म्हणून आला असताना त्याच्यासमोर सरकारविषयी असे उद्गार काढणं योग्य आहे का? हे मंत्री त्यांना सांगताहेत की हे शब्द मागे घ्या आणि यापुढे असे शब्द उच्चारू नका. यात चूक काय?’’
वेताळ काहीच बोलत नाही, हे पाहून विक्रमाने दुसरं दृश्य सुरू केलं, ‘‘आता हे पाहा. हा राज्याचा आमदार. हा मुख्यमंत्र्यासमोर सांगतो की माझा या सरकारवर विश्वास नाही. वर याला निवेदन द्यायचंय. सरकारने काहीही केलं तरी यांना विरोधासाठी विरोधच करायचाय, मग यांनी निवेदनं देण्याचा उपचार तरी का पार पाडायचा? इथेही मंत्री त्यांना हेच सांगताहेत. त्यावर बोट वर कुणाचं झालं ते पाहा. मग पुढचं वाक्य ओठांच्या हालचालींवरून ऐक. समोर मंत्री, मुख्यमंत्री आहेत, बोट खाली करून बोला.कळलं, आता सांग, इथे चूक कोणाची?’’
‘‘अरे, पण..’’ वेताळ चाचरत म्हणाला, ‘‘त्या दिवशी दिवसभर सगळ्या वाहिन्यांवर हेच दाखवत होते.. कशी दडपशाही सुरू आहे ते..’’
‘‘ते बरोबरच आहे,’’ विक्रम म्हणाला, ‘‘दडपशाही सुरूच आहे.. आपण दाखवतो त्या दृश्यांमधलं सत्य दडपायचं आणि आपल्याला हवं तेच दडपून द्यायचं, ही वाहिन्यांची दडपशाही.वेताळा, सर्व दृश्यमाध्यमांमध्ये दृश्यांच्या साखळीतून आणि त्याबरोबर उमटणा-या ध्वनीतून प्रेक्षकाला अर्थबोधहोतो. बातम्यादेणा-या वाहिन्यांनी मूळ दृश्यामधला अर्थ अधिक स्पष्ट करणा-या ध्वनीचीच जोड द्यावी, अशी अपेक्षा असते. पण, इथे वाहिन्या दृश्यांची मोडतोड करतात. इकडचे तिकडे जोडून, वाक्यं अर्धवट तोडून अंगावर येणारे आणि अर्थाचा अनर्थ करणारी शीर्षकदृश्यं तयार करतात आणि त्यातून दिवसभर सनसनाटी पसरवून टीआरपी मिळवतात.. त्यांचीही मजबुरी समजून घे.’’
कपाळावर हात मारून वेताळ म्हणाला, ‘‘आता डोळ्यांचाही भरवसा नाही राहिला म्हणायचा. असो, तू बोललास, त्यामुळे मी चाललो. तू पुन्हा मला शोधून काढशीलच. पण, माझी एक रिक्वेस्ट आहे.’’
‘‘कोणती?’’
‘‘मला वर्ल्ड कप संपेपर्यंत शोधून काढू नकोस, प्लीज. त्याबदल्यात मीही तुला न मागता एक वचन देतो..’’
‘‘कोणतं?’’
‘‘यापुढे बातमीसाठी कोणतीही वृत्तवाहिनी आंधळेपणानं न पाहण्याचं!

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)(प्रहार, ६/३/११)

No comments:

Post a Comment