Monday, March 7, 2011

'अळी मिळी'... गुपचिळी


( ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग...)

ग्राहक : हॅलो , ग्राहकहितकारी मंच का ? मी शेणगावातून गणा रामा बोलतोय. आम्ही खरेदी केलेल्या चॉकलेटात अळ्या निघाल्याहेत हो!

मंचाचा कार्यकर्ता : या कंपन्या महाबदमाष आहेत हो. सर्व ग्राहकांकडून एकच किंमत घेतात आणि काही ग्राहकांनाच अळ्या पुरवतात. हा अन्याय आहे. त्याविरुद्ध दाद मागितलीच पाहिजे.

ग्राहक : पण आता मी काय करू?

कार्यकर्ता : ते मी कसं सांगणार? तुम्ही अळ्या बाजूला करून चॉकलेट खायचं की चॉकलेट बाजूला करून अळ्या खायच्या ते तुमच्या आवडीनिवडीवर आहे, नाही का?

ग्राहक : पण या अळ्या पोटात गेल्या तर त्रास नाही का व्हायचा ?

 कार्यकर्ता : काहीतरीच काय? भारतात राहतो आपण! इथे साधं पाणी प्यायलात, तर न दिसणारे सूक्ष्मजीव जातात पोटात; मिनरल वॉटर प्यायलात, तर सहज दिसतील असे डास जातात. खाद्यपदार्थांतनं तर काय काय जात असेल! अळ्यांची कसली भीती बाळगताय? वर एक कीटकनाशक कोल्ड्रिंक प्या झकास. पण, कोल्ड्रिंक पिण्याआधी त्यात कीटकनाशकांचं प्रमाण योग्य आहे ना, याची खातरजमा करून घ्यायला विसरू नका हं! आम्ही कोल्ड्रिंक कपन्यांशी न्यायालयीन लढा देऊन कीटकनाशकांचं प्रमाण स्टँडर्डाइझ करून घेतलंय आणि ते बाटलीवरच नमूद करण्याची सक्तीही करायला लावली आहे सरकारला!!!

( ट्रिंग ट्रिंग... ट्रिंग ट्रिंग...)


चॉकलेट कंपनी अधिकारी : हॅलो , कोल्ड्रिंक कंपनी ? मी चॉकलेट कंपनीमधून बोलतोय!

कोल्ड्रिंक कंपनी अधिकारी : अभिनंदन! हाटिर्एस्ट काँग्रॅच्युलेशन्स! तुमचं प्रॉडक्ट जाम चचेर्त आहे बुवा!

चॉकलेट अधिकारी : का उगाच चेष्टा करताय? आमच्या चॉकलेटांत अळ्या सापडतात म्हणून गदारोळ उडालाय सगळीकडे. खटले भरले गेलेत, माल जप्त होतोय, माकेर्टमध्ये उठाव नाही आणि अभिनंदन कसलं करताय?

 कोल्ड्रिंक अधिकारी : वेडे आहात... अहो , आजच्या जमान्यात ' बॅड पब्लिसिटी टू इज गुड पब्लिसिटी '! बदनाम सही , नाम तो हुआ! जरा समजून घ्या. निवडणुका येताहेत आता. आपल्यासारख्या ' बड्या बकऱ्यां ' च्या संदर्भात अशी वादळं उठायचीच. ती आपण ' योग्य प्रकारे ' शमवायची. म्हणजे संसदेत , थेट मंत्र्यांकडूनच क्लीन चिट मिळून जाईल फटाक्कन!

चॉकलेट अधिकारी : पण गमावलेली पत कशी भरून काढायची?

 कोल्ड्रिंक अधिकारी : कसली गमावलेली पत नि कसलं काय? अहो , इतकं नाविन्यपूर्ण उत्पादन शोधून काढल्याबद्दल सत्कारच व्हायला हवा तुमचा! शहाणे असाल तर ताबडतोब पेटंट नोंदवून घ्या त्याचं... ' मांसाहारी , प्रोटीनयुक्त ' चॉकलेट्स म्हणून! आणि वर घोषणा करा की , तुमच्या ' आर अँड डी ' विभागानं 25 वर्षं संशोधन करून खास प्रकारच्या चविष्ट , पौष्टिक अळ्या विकसित केल्या आहेत आणि भारतातल्या गरीब ग्राहकांना परवडाव्या म्हणून तुम्ही त्या सबसिडाइझ करूनच चॉकलेटांमधून पुरवत आहात. या अळ्यांच्या नियमित सेवनानं एड्स , कॅन्सर , हृदयरोग , मधुमेह , अॅसिडिटी , अपचन , तारुण्यपीटिका , जवानी की भूल वगैरे सगळ्यांवर उपचार होतो , असं जाहीर करून टाका... मामला खल्लास!

चॉकलेट अधिकारी : असं केलं तर भरून निघेल आमचं डॅमेज?

 कोल्ड्रिंक अधिकारी : डॅमेज ? या किरकोळ वादंगांनी आपलं अगदीच फुटकळ नुकसान झालंय. पण फायदा किती झालाय हे तुमच्या लक्षातच नाही आलेलं! अहो विचार करा नीट , आज लोक कशाची चर्चा करताहेत ? मिनरल वॉटरमधल्या डासांची , कोल्ड्रिंक्समधल्या कीटकनाशकांची आणि चॉकलेटांमधल्या अळ्यांची! पण मुळात आपण दहा पैशाचं नळाचं पाणी दहा रुपयांना विकतो , दीडदमडीचं रंगीत , फसफसतं , आरोग्याला घातक पाणी दसपट किंमतीला खपवतो आणि मूळ चॉकलेटच मुलांचे दात किडवतं , हे आज कुणाच्या गावी तरी आहे का???

(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment