यंदाच्या नोबेल पुरस्कारासाठी आम्ही आमचे उत्पादन अतिशय विनम्रपणे सादर करीत आहोत. रसायनशास्त्र , कृषीशास्त्र , जागतिक शांतता , अर्थशास्त्र , समाजशास्त्र या आणि अशा अनेक विषयांसाठीच्या नोबेल पुरस्कारासाठी आमचे हे एकमेवाद्वितीय आणि क्रांतिकारक उत्पादन एकसमयावच्छेदेकरून पात्र आहे , असा आमचा नम्र दावा आहे.
आमच्या या उत्पादनामध्ये अनेक गुण आहेत. याहून अधिक गुण या उत्पादनाआधी फक्त ' परमेश्वर ' या अन्य मानवनिमिर्त उत्पादनातच आढळून आले आहेत. मात्र आमच्या उत्पादनापेक्षाही ते अधिक वादग्रस्त आहे , असे आम्ही समितीच्या नम्रपणे निदर्शनास आणून देऊ इच्छितो.
आमचे उत्पादन हा रसायनक्षेत्रातील आणि कृषीक्षेत्रातील चमत्कार आहे. या उत्पादनाच्या थेंबाथेंबात अपूर्व शक्ती भरलेली आहे. हे उत्पादन शौचकूप स्वच्छ करू शकते , तेच गंज हटविण्यास उपयोगी पडते , कपड्यांवरचे चिकट तेलकट डाग काढू शकते , झाडांवरची कीड मारू शकते. (झुरळे , ढेकूण , डास यांच्यावर प्रयोग सुरू आहेत. हे उपदवी कीटक आमच्या उत्पादनाच्या बाटलीत पडल्यास ते गुदमरून मरतात , असा उत्साहवर्धक निष्कर्ष निघाला आहे. झुरळे पडलेल्या आमच्या उत्पादनाच्या बाटल्यांचे छायाचित्र तुम्ही पाहिले असेलच.) आमच्या उत्पादनाच्या दावणाची ताकद इतकी जबरदस्त आहे की त्यात बुडवलेल्या दातावरचे कठीण एनॅमलही काही तासांत विरघळून जाते. (आता कुणी आपला दात काढून या दावणात का ठेवेल , असा प्रश्न आमच्यावर दात असलेले काही स्पर्धक विचारतील. त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करावे , ही विनंती.)
आमच्या उत्पादनाने सामाजिक आणि आथिर्क क्षेत्रात क्रांतीच घडवली असून त्यायोगे जागतिक शांतता राखण्यात फार महत्त्वाची भूमिका बजावली आहे. आठ आणे-बारा आणे उत्पादन खर्चाचे हे उत्पादन आम्ही बाजारात 10 रुपयांवर किंमतीला विकतो. म्हणजे किती प्रमाणात नफा , मधल्या टप्प्यांवर किती प्रमाणात रोजगारनिमिर्ती होते , याचा विचार करून पाहा. शिवाय धर्म , जात , पंथ , देश , भाषा , इतिहास , भूगोल यांनी विभागलेल्या या जगाला एकत्र आणण्याचे काम आमचे उत्पादन करते. कारण सर्वत्र या उत्पादनाचे तेच नाव , तेच रूप , तीच चव, तेच गुणधर्म आणि आमची तीच व्यवसाय ' नीती '!
आमच्या उत्पादनांनी जगाच्या ' सांस्कृतिक ' एकीकरणाची नांदीच केली आहे, असे म्हणणे वावगे ठरू नये. उदाहरणार्थ , भारतासारख्या देशातील , पिण्याच्या शुद्ध पाण्यासाठी मैलोन्मैल पायपीट करणाऱ्या ग्रामीण भागातील स्त्रिया आताही तेवढीच पायपीट करतात. पण , ( प्रगत देशांतल्या स्त्रियांप्रमाणे) वाटेत तहान लागली तर कोणत्याही ढाब्यात अवघ्या पाच रुपयांत तहान शमवून पुन्हा पाण्यासाठी वणवण करायला सज्ज होतात...
... तहानेचा आणि आमच्या उत्पादनांचा काय संबंध ?
अरे हो , आम्ही आमच्या उत्पादनाचा हा गुणधर्म सांगायला विसरलोच. अहो , आमचे हे बहुगुणी उत्पादन ठिकठिकाणचे लोक शीतकपाटांत साठवतात आणि शीतपेय म्हणून त्यांचे वेळोवेळी सेवनही करतात...
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment