Monday, March 7, 2011

ऊप्स... कुंभमेळा


दीपक तिजोरीला मानलं पाहिजे हां!

काय टायमिंग साधून त्यानं सिनेमा रिलीज केलाय!

दीपक तिजोरी... ? आठवतोय ना... तो ' आशिकी ' मधला भावखाऊ दोस्त... अॅक्टिंगमध्ये फारसं बस्तान बसत नाही म्हटल्यावर प्रथेप्रमाणे तो दिग्दर्शनाकडे वळला. त्याचा दिग्दर्शक म्हणूनचा पहिला सिनेमा ' ऊप्स ' गेल्या शुक्रवारीच प्रदशिर्त झालाय... ऐन कुंभमेळ्याचा फर्मास मुहूर्त साधून...

' ऊप्स'चा कुंभमेळ्याशी काय संबंध ?


हा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर तुम्हाला दोन गोष्टींची माहिती नाही , हे सिद्ध होतं.

1. ' ऊप्स ' ची थीम

2. कुंभमेळ्याचे खास आकर्षण

त्यामुळेच तुम्हाला , कुंभमेळ्याला इच्छा असूनही हजेरी लावायला न जमलेल्यांची ' ऊप्स ' ने केवढी मोठी सोय केली आहे , हे कळणार नाही.

ठीक आहे. निदान नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे जो कुंभमेळा भरलाय , त्याला देशभरातून लोक का जातात , हे तरी ठाऊक आहे का तुम्हाला ?...

... बोंबला , तुम्ही ती सिंहस्थ पर्वणी , देव-दानव युद्ध , अमृताचा थेंब , पर्वकाळातल्या स्नान-दानाचं पुण्य वगैरे पौराणिक टेप लावलीत उत्तरादाखल. कम ऑन! गेट रियल! खरं खरं उत्तर द्या , नाहीतर माहिती नाही , म्हणून कबूल तरी करा.

हे पाहा , आता आम्हाला अधिकृत गोटातूनच कळलेलं आहे... थेट साधूंकडून...

... साधू... ? आठवतायत ना... कुंभमेळ्याच्या परिसरात मोकाट गुरांसारखे फिरणारे , अनेक दिवस आंघोळ न केल्यासारखे (बहुधा ' शाही स्नाना ' साठी खरोखरीच आंघोळ न केल्यामुळे) दिसणारे , ' आखाडे ' हे नाव सार्थ करीत एकमेकांवर हल्ले करणारे , पोलिसांशीही शिवराळ उर्मटपणा करू धजणारे , मंत्र्यांच्या अंगांवर तलवारी घेऊन धावून जाणारे , स्वत:च्या सुमो , क्वालिस , टाटा सफारीच नव्हे , तर पजेरो आणि हेलिकॉप्टरंही बाळगणारे , त्यातून चरस-गांजाची वाहतूक करणारे सर्वसंगपरित्यागी साधू... आठवताहेत ना! यातल्याच नागा साधू (जो ' नंगा साधू ' चाच अपभ्रंश असावा , अशी खात्रीलायक शक्यता आहे) नामक उपजमातीतल्या परमानंद नामक साधूनं हा गौप्यस्फोट केलाय. त्यानं स्वच्छ सांगितलंय , कुंभमेळ्यात गदीर् होते ती आम्हाला (म्हणजे त्यांना- म्हणजे नागा साधूंना) पाहायला! संपूर्ण दिगंबरावस्थेत हे साधू स्नानाला जातात , तो सोहळा डोळेभरून पाहण्यासाठीच कुंभमेळ्याला लोक जमतात म्हणे!

मग सांगा , ज्यांचा कुंभमेळा हुकला , त्यांच्यासाठी ' ऊप्स ' नं मस्त सोय केलीये की नाही ?

कशी काय विचारताय ?

' ऊप्स ' हाही या साधूंसारख्याच ' मेल स्ट्रिपर्स'वरचा (म्हणजे कॅब्रे डान्सर बायांप्रमाणे क्लबांत, कपडे उतरवत नाचणाऱ्या बाप्यांवरचा) सिनेमा नाही का!!!

(महाराष्ट्र टाइम्स) 

No comments:

Post a Comment