Monday, March 7, 2011

ये रोग लाईलाज है ...


डॉक्टर : बोला , काय होतंय तुम्हाला ?

तो व ती : आम्हाला फार वाईट स्वप्नं पडतात.

तो : स्वप्नात मला एक भलंमोठं इंजेक्शन माझा पाठलाग करताना दिसतं. कधीकधी लाखो रुपयांच्या ढिगाऱ्याखाली मी गाडला जातोय , असंही दिसतं.

ती : मला स्वप्न पडतं ते माझ्या मुलाची अॅडमिशन 0.001 टक्क्यांनी हुकल्याचं. कधीकधी मुलगा भ्रमिष्ट झाल्याचंही स्वप्न पडतं.

डॉक्टर : अच्छा! तुमच्या व्यक्तिगत आयुष्यात काही प्रॉब्लेम ?

तो : आमचा मुलगा हुशार आहे.

डॉक्टर : (चमकून) हा प्रॉब्लेम आहे ?

तो व ती : हो... म्हणजे नाही... पण , खरंतर ' हो ' च.

तो : म्हणजे असं आहे डॉक्टर , आमचा मुलगा खूप हुशार आहे. डॉक्टर व्हायचं अशी लहानपणापासूनची अॅम्बिशनच आहे त्याची! आणि आताची परिस्थिती...

डॉक्टर : (मध्येच तोडत) थांबा थांबा! त्याची ' लहानपणापासूनची इच्छा ' आहे म्हणताय तुम्ही! जन्माला आल्याबरोबर पहिला शब्द त्यानं ' डॉक्टर ' असा उच्चारला होता का ?

तो व ती : नाही... म्हणजे पहिला शब्द जन्मानंतर बऱ्याच काळानं उच्चारला होता त्यानं ; आणि तो ' आई ' असाच होता.

डॉक्टर : थँक गॉड! निदान मुलगा तरी नॉर्मल आहे तुमचा. मग मला सांगा , ही डॉक्टर होण्याची अँबिशन त्याच्या मनात कशी निर्माण झाली ?

ती : अहो , अगदी लहानपणी तो दवाखान्यात जायचा , तेव्हापासून त्याला डॉक्टरांच्या स्टेथोस्कोपचं , अॅप्रनचं वेडच होतं म्हणा ना!

तो : बोबड्या बोलीत तो सांगायचा , ' बाबा! माला दॉक्तर व्हायचंय! '

डॉक्टर : त्या वयात त्यानं रिक्षा चालवणारा काका पाहिला असेलच ?

तो व ती : (गोंधळून) हो!

डॉक्टर : त्याला पाहून तो बोबड्या बोलीत ' माला लिक्शावाला व्हायचंय ' असं म्हणाला असेल. बरोबर ?

तो व ती : हो...!

डॉक्टर : असंच त्यानं बस ड्रायव्हर , कंडक्टर , मोटरमन , गार्ड , भेळपुरीवाले , हवालदार , सैनिक , तमाशातले सांेगाडे वगैरेही पाहिले असतील लहानपणी आणि आपल्याला तेच बनायचंय असं म्हणाला असेल तो!

ती : हो तर! (कौतुकभरल्या सुरात) अहो , आमच्या दारावर रोज केळी घेऊन येणारा माणूस ' केळी हव्यैय ' असं स्टायलीत विचारायचा! तर आमचा रोहन त्याची झकास नक्कल करायचा आणि ' माला केलीवाला व्हायचंय ' असं सांगायचा.

डॉक्टर : पण , त्याच्या मनात गार्ड , रिक्षावाला , इंजीन ड्रायव्हर किंवा केळीवाला होण्याची महत्त्वाकांक्षा काही रुजली नाही. रुजली ती फक्त डॉक्टर होण्याची महत्त्वाकांक्षा!

तो : तसा इंजीनियर होण्याचाही ऑप्शन होताच बरं का त्याच्या मनात. आमचे काही मित्र होते ना डॉक्टर आणि इंजीनियर!

डॉक्टर : त्यांची कौतुकवर्णनं करून करून तुम्ही मुलावर लहानपणापासून बिंबवलंत की , डॉक्टर-इंजीनियर झालास , तरच तुझ्या आयुष्याला काही अर्थ आहे. बाकी जगात काही नोकरीधंदेच नाहीत. मधल्या काळात देशात किती डॉक्टर , किती इंजीनियर तयार झाले , त्यांचं पुढे काय झालं , या दोन प्रोफेशन्सव्यतिरिक्त किती प्रकारच्या करीयर ऑपॉर्च्युनिटीज् निर्माण झाल्या , याची तुम्ही कधी माहितीच घेतली नाही. झापडं लावलेल्या गुरांसारखे एका चाकोरीतून हाकत राहिलात मुलाला. डॉक्टर किंवा इंजीनियरच बनायचंय , ही त्याला ' स्वत:ची ' महत्त्वाकांक्षा आहे , वाटावी , इतकं बेमालूम फसवलंत त्याला आणि आता झोप हरवलीये तुमची!

तो व ती : हो ना! काहीतरी करा डॉक्टर. जालिम औषध द्या एखादं.

डॉक्टर : सॉरी. मी माणसांच्या शरीरमनांना होणाऱ्या सामान्य आजारांना बरा करणारा एक डॉक्टर आहे. आपल्या मुलांचे आपल्या मनासारखे बॉन्साय घडवणारी क्रूर प्रवृत्ती , आसपासच्या परिस्थितीबद्दलचं घोर अज्ञान , जगाच्या आकलनाचा अभाव आणि भलते वेडगळ अट्टहास या तुमच्यासारख्यांच्या दुर्धर रोगांवर माझ्याकडेही औषध नाही आणि आमच्या वैद्यकशास्त्राकडेही.

तो : (मवाळपणे) ठीकाय डॉक्टर! येतो आम्ही! किती पैसे झाले आपले!

डॉक्टर : दीड हजार रुपये.

तो व ती : (चित्कारून) दीड हजार रुपये ? अहो , तुम्ही तर तपासणीही केली नाहीत आणि औषधही दिलं नाहीत.

डॉक्टर : पण रोगनिदान करून त्यावर माझ्याकडे उपाय नाही , ही माहिती तर दिली ना! मीही मॅनेजमेंट कोट्यातून डॉक्टर झालोय. माझ्या वडिलांनी खर्च केलेले पैसे वसूल नकोत करायला?

(महाराष्ट्र टाइम्स)

No comments:

Post a Comment