हे परमकृपाळू गणराया... त्यांना क्षमा कर... ते काय करताहेत हेच त्यांना कळत नाहीये. कळत असतं , तर घरच्या गणपतीचा खर्च करून सोसायटीचा एक , गल्लीतला एक , मुख्य रस्त्यावरचा एक आणि अखिल वॉर्डाचा एक अशा फक्त चारच सार्वजनिक गणपतींची वर्गणी द्यायला का कू केली असती का त्यांनी ? अरे , वर्षातून एकदाच येणारा हा मराठी माणसांचा , लोकमान्य टिळक का कोण होते ते- त्यांच्यासारख्या महापुरुषाची आमच्यासारख्यांनाही आठवण होते या सणाला. अशा सणात टांग अडवतात ती आपलीच माणसं!
म्हणे वर्गणी की खंडणी ? अरे , आम्ही या दहा दिवसांत लाखो रुपयांची उलाढाल करतो. कितीतरी मराठी बांधवांना ' रोजगार ' मिळवून देतो. (बरेच जण तर संपूर्ण वर्षाची बेगमी करून घेतात.) एकीकडे मराठी माणसात व्यापारी वृत्ती नाही म्हणायचं आणि दुसरीकडे गणपती उत्सवाचा बाजार मांडला म्हणायचं! ही खेकडावृत्तीच नडते मराठी माणसाला!
अहो , तुमच्या मांडवांच्या विरुद्धही कोर्टात जातात हे लोक. काय तर म्हणे , रहदारीला अडथळा होतो. आता मोठं डेकोरेशन करायचं , देखावा बनवायचा , सेट लावायचा , लायटिंग करायचं , तर मांडव मोठा नको ? शेजारच्या गल्लीतला गणपती सरस ठरला , तर नाक कापलं जाणार ते आमचं. अरे , वर्षातले तीनशे पंचावन्न दिवस फिरताच ना रस्त्यांवरून!
देवा , आम्ही एकसो एक डान्सिकल गाणी लावतो मंडपात , तर या लोकांचे कान किटतात. म्हातारी माणसं , लहान मुलं आणि पेशंट लोकांना त्रास होतो म्हणे आवाजाचा. वातींसाठीचा डब्बल कापूस आणून त्यांचे बोळे करून कानात घालता नाय येत ? कायतरी कुरापती काढायच्या उगाच! मंडपाजवळ हॉस्पिटलं बांधायचीच कशाला ? सगळी हॉस्पिटलं शहराच्या हद्दीबाहेर नेली पाहिजेत कायमची. म्हणजे गणपती-गरबा-महाआरत्या वगैरे निविर्घ्न सुरू राहील.
मांडवाच्या मागे म्हणे आम्ही लोक पत्ते कुटत बसतो! आता तुम्हीच सांगा बाप्पा , आजकाल कोण कुठून येऊन स्फोट घडवेल , कोण कशी विटंबना करील , ते सांगता येतं का ? रात्रभर डोळ्यात तेल (आणि पोटात ' पेट्रोल ') घालून मांडवाचं रक्षण नको करायला ? आणि नुसतंच बसून झोप येते. पत्ते खेळले की तेवढाच टाइमपास होतो. आता , पाच-तीन-दोन खेळायला आम्ही काय बचकुंडी पोरं आहोत का रिकामटेकड्या बाया ? रुपया-दोन रुपये पॉइंटशिवाय पत्त्यात मजा काय ?
तेव्हा हे देवाधिदेवा , या देशात हिंदू धर्मावर हिंदूंकडूनच होणारा हा अन्याय पाहून तुमचंही रक्त खवळेल. पण , तुम्ही शांत राहा. या अज्ञ बांधवांचे अपराध पोटात घाला. त्यांना क्षमा करा. मात्र , फक्त एक करा. चित्रगुप्ताला सांगून या पाप्यांचं वेगळं रजिस्टर करून ठेवा नरकात रवानगी करण्यासाठी. (ज्यादा टिवटिव केली , तर त्यांना चित्रगुप्तापर्यंत ' पोहोचवायची ' जबाबदारी आमची!)
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment