Saturday, March 12, 2011

आम्ही मरायला समर्थ आहोत...

दिवस- शुक्रवारचा
 
वेळ- हातघाईची
 
वर्तमानपत्राच्या पहिल्या पानावरच्या बातम्यांची उतरंड रचण्यासाठीची न्यूज मीटिंग.. पहिली बातमी अर्थातच जपानची.. किंबहुना तीच एकमेव बातमी.. कारण किल्लारी आणि भूजमधल्या भूकंपांपेक्षा कितीतरी जास्त घातक्षमतेचा, या शतकातला पाचव्या क्रमांकाचा विध्वंसक भूकंप तिथे झालाय.. जपानला भूकंपांची सवय असल्यानं तिथली बांधकामं ब-यापैकी भूकंपप्रुफ आहेत, हे सर्वज्ञात आहे, मात्र, या महाभूकंपामुळे उसळलेल्या त्सुनामीच्या प्रचंड लाटांनी जपानच्या भूभागावर राक्षसी आक्रमण केलंय..
 
टीव्हीच्या पडद्यावर सगळं दिसतंय..
..माणसांनी मोठय़ा मेहनतीनं उभे केलेले, भव्यदिव्य, प्रचंड भासणारे इमले निसर्गाच्या अक्राळविक्राळ थपडांनी पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळतायत.. कचकडय़ाच्या खेळण्यांसारखे वाहून जातायत..
 
बाझीचा-ए-अतफाल है दुनिया मेरे आगे
 
होता है शबो रोज, तमाशा मेरे आगे
 
निसर्ग थेट कृतीतूनच सांगतोय की तुमचा हा सगळा खेळ माझ्यासाठी साधा पोरखेळ आहे.. ही भातुकली मी केव्हाही विस्कटू शकतो..
 
निर्गुण, निराकार आणि निर्हेतुक निसर्गालाही सगुण-साकार-क्रूर रूप देण्याची इच्छा प्रबळ करणारा उत्पात त्यावर किती प्रतिक्रिया..
 
60 माणसांच्या ऑफिसात दोन जण असे निघतात, ज्यांची पहिली प्रतिक्रिया, ‘‘असं काहीतरी मुंबईत व्हायला पाहिजे?’’ ही असते..
 
‘‘का?’’
 
‘‘खूप अनावश्यक माणसं झालीयेत इथे.. खूप गर्दी झालीये.. जरा लोकसंख्या कमी होईल इथली.’’
 
‘‘त्यासाठी त्सुनामीची कशाला वाट बघताय?’’, एक परखड सूचना, ‘‘स्वत: पुढाकार घ्या, तुम्ही दोघे हातात हात गुंफून स्वत:च समुद्रात चालत जा. तेवढीच दोनाने तरी लोकसंख्या कमी होईल मुंबईची.’’
 
‘‘हा हा हा..’’
 
‘‘काय पोझिशनला बातमी घ्यायची?’’ आता चर्चा सिरीयस होते..
 
‘‘अर्थातच लीड.. मुख्य बातमी.. आठ कॉलम हेडलाइन’’
 
‘‘अरे, आधी कॅज्युअल्टी किती आहे पाहा, मग ठरवा..’’
 
‘‘काय भयंकर विध्वंस झालाय बघितलंत का? पाच-दहा हजार बळी पक्के..’’
 
‘‘ग्रेट.. आठ कॉलम स्कायलाइनच करायला लागेल मग..’’ बळींचा आकडा जेवढा मोठा, तेवढे पत्रकार खूष’.
 
‘‘छे छे.. फक्त 22 जण मृत्युमुखी पडलेत..’’
 
‘‘अरेरेरेरे, फारच फुसकी निघाली ही त्सुनामी. मग काय मजा?..’’
 
..ती बातमी आठ कॉलम लीडच होते, पण, रात्री उशिरापर्यंत तिच्यात मजाकाही येत नाही.. बळींचा अधिकृत आकडा साठच्या आगेमागेच घुटमळत राहतो.. अनधिकृत आकडा तीनशे-साडेतीनशेच्या घरात आणि बातम्यांमधली नेहमीची भीती’.. हजारो जणांचा बळी गेला असण्याची शक्यता आहे अशी..
 
गंमतीची गोष्ट म्हणजे सगळे वाढीव आकडे किमान एवढे जण तरी मेले असलेच पाहिजेत यारअशा भारतीय मनोवृत्तीतून आलेले.. इकडे मराठी वृत्तवाहिनीवरची निवेदिका हातवारे करून, घशाच्या शिरा ताणून त्सुनामीच्या लाटेवरच्या फळकुटावरच उभी राहिल्यासारख्या आविर्भावात या दुर्घटनेची बातमी रंगवतअसताना जपान टाइम्सआणि योमिउरी शिंबूनया जपानमधल्या वर्तमानपत्रांच्या वेबसाइट मात्र रडारड, सनसनाटी काहीही न करता सौम्यपणे बातमी देतायत आणि तीनशे-चारशे बळींच्या आकडय़ांवर ठाम आहेत..
 भारतीय प्रसारमाध्यमांचीही चूक नाही म्हणा.. त्यांना भारतीय परिप्रेक्ष्यातून प्रत्येक बातमीकडे पाहतात.. ही आपत्ती भारतावर आदळली असती तर?
तर हा आकडा जपानच्या आकडय़ाच्या हजार पटींनी वाढला असता, याबद्दल कोणाच्याही मनात शंका नसेल..
 
पण, तिकडे हा आकडा कमी का?
 
‘‘तिकडे सगळ्यांचं ट्रेनिंग दिलेलं असतं, अ‍ॅलर्ट पण दिले गेले होते, त्यामुळे, जीवितहानीचा आकडा फार वाढणार नाही. त्यातही नुसता भूकंप असता तर एवढीही प्राणहानी झाली नसती, पण, त्सुनामीमुळे ती वाढली,’’ योगायोगाने तेव्हाच ऑफिसात आलेली, जपानमध्ये काही काळ राहिलेली मैत्रीण सांगते, ‘‘आणि हेही पक्कं की जे बळी असतील, ते आपत्तीचे बळी असतील. बेपर्वाईचे, दिरंगाईचे, अनास्थेचे बळी शून्य.’’
 
हे म्हणजे पुण्याच्या भाषेत अशक्यच आहे.. आपल्याकडे असं ट्रेनिंग देण्याचं ठरलं असतं, तर काय काय झालं असतं.. हे करण्यासाठी चार समित्या आणि 15 उपसमित्या नेमण्यात इतका वेळ गेला असता की त्यात पंधरा भूकंप आणि सात त्सुनामी येऊन गेल्या असत्या. नंतर ट्रेनिंगसाठीच्या सामानाची, मनुष्यबळाची किंमत फुगवून टेंडरं निघाली असती, ते पूर्ण होता होता इतका वेळ गेला असता की तोही खर्च दुपटीवर गेला असता. मधल्या काळात दुय्यम दर्जाचं बंडल सामान खरेदी केलं गेल्याच्या बातम्या आल्या असत्या.. आणि ज्यांना हे ट्रेनिंग देण्यासाठी एवढा खटाटोप, त्या सगळ्या सामान्य माणसांनी आयची कटकटम्हणून ट्रेनिंगला न जाताच ते मिळवल्याची बनावट सर्टिफिकेटं पैदा केली असती आणि आणखी एक घोटाळा उघडकीला आला असता..
 
..या सगळ्यात आपल्या सर्वाचे प्रिय लोकप्रतिनिधी आणि त्यांनी चालवलेली सरकार नावाची यंत्रणा सोडून द्या.. नाहीतरी ती देवाला सोडलेल्या सांडासारखी मोकाटच असते.. आपण कसे वागतो, ते पाहा..
 
..दुस-या महायुद्धात लंडनवर जर्मनीच्या विमानांनी तुफान बॉम्बवर्षाव चालवला असताना जीव वाचवण्यासाठी खणलेल्या बंकर्सच्या दारांबाहेर म्हणे शिस्तप्रिय ब्रिटिशांनी रांगा लावल्या होत्या..
 
..आपल्यावर असा हल्ला झाला आणि त्याआधी अशी बंकर्स बांधून तयार असलीच, तर शत्रूचे बॉम्बचे पैसे वाचतील.. बंकरमध्ये शिरण्यासाठी सुरू असलेल्या बेफाम बेशिस्त गदारोळात चिरडून काही लोक हल्ला होण्याच्या आधीच मरतील.. नंतर विमानं थोडी खाली आणून वैमानिकांनी तोंडानंच धुडुम्असा आवाज काढला, तर घाबरून बाहेर होणाऱ्या पळापळीत आणखी काही मरतील..
 
.. देवस्थानांबाहेरच्या गर्दीमध्ये झालेल्या अपघातात एक-दोन जण मेले असताना, अपघात झाला म्हणून झालेल्या पळापळीत आणि चेंगराचेंगरीत शे दोनशे लोक मरतातच ना इथे?..
..उद्या आपल्याकडेही त्सुनामी आली तर आपण तिला निक्षून सांगूयात, तू तिकडे इंडोनेशिया, मालदीव, जावा, सुमात्रा, बाली, हवाई वगैरे बघ.. इकडे आमचे आम्ही मरायला समर्थ आहोत!   

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, १३ मार्च, २०११)

No comments:

Post a Comment