कळविण्यास एकाच वेळी अतिशय आनंद आणि अतिशय दु:ख होत आहे की 'मराठी दूरचित्रवाणी मालिकांचा -हास' या विषयावर गेली कैक वर्षे सुरू असलेल्या आमच्या संशोधनाचे अंतिम निष्कर्ष आता हाती आले आहेत आणि ते पाहून आम्ही बेशुद्ध झालो आहोत. (खबरदार! एकाही डॉक्टरने आम्हाला शुद्धीत आणण्यासाठी पुढे येण्याची जुर्रत करू नये. घरभेदी लेकाचे!) मराठी टीव्हीमालिकांनी आपल्या सर्व संवेदनांवर जे काही अत्याचार चालवले आहेत, त्याला ही नतदष्ट, दळभदी वगैरे वगैरे डॉक्टर मंडळीच कारणीभूत आहेत, असा आमचा सिद्धांत आहे.
पुरावा आहे का? असं तुम्ही (टीव्हीवरच्या जाहिराती पाहणारे असल्याने) विचारणारच. पण, उत्तर मिळालं की 'काय पुरावा आहे!' असंच तुम्हीही म्हणणार, याची आम्हाला खात्री आहे.
खरंतर टीव्हीवरच्या लेखक-दिग्दर्शक-कलावंतांनाही आपण जी काही डेली दळणं दळतो, त्याचा वीट आलाय, हे हल्ली बऱ्याच मालिकांनी जे वळण घेतलंय, त्यावरून सिद्ध होतं. सध्या सगळीकडे खुनाखुनीचा माहौल आहे.
रडिकाचा काटा काढण्यासाठी भयाणीने गुंडांना सुपारी दिली. त्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. ती रक्तबंबाळ.
आपलीच वहिनी अवदसा हिच्यावर शूर्पणखेने तलवारीने वार केलेत... ती रक्तबंबाळ.
बधिरेशच्या बधीरपणाला कंटाळून त्याची बायको सणकी हिने त्याच्यावर विषप्रयोग केलाय... तो हॉस्पिटलमध्ये चिंताजनक अवस्थेत दाखल.
खाष्ट सासूबाई असूयाबाई हिच्या जाचाला कंटाळलेल्या सालसीसारख्या सज्जन सुनेवर तिच्या खुनाचा आळ यावा म्हणून मंथरेने असूयेला विष घातलंय... तीही बेशुद्ध.
टीव्हीवरच्या आया मुलांना, सास्वा सुनांना, जावा जावांना, नणंदा भावजयांना, नवरे बायकांना, बायका नवऱ्यांना, नवरे मैत्रिणींना, बायका मित्रांना आणि एकमेकांशी कसलाही संबंध नसलेले काहीजण इतर काहीजणांना ठार मारण्याचा आटोकाट प्रयत्न करताना दिसतात. हे पाहून टीव्हीपीडित प्रेक्षकांना आनंदाच्या कोण बरे उकळ्या फुटत असतील...
मालिकेतला जो तो शेवटचे क्षण मोजतोय. आता तो किंवा ती मरणार. मग आणखी कुणीतरी मरणार, मग आणखी कुणीतरी मरणार... सगळ्या मालिकांमधली सगळी पात्रं संपून मालिका संपणार! अहाहा!! काय विलक्षण आनंद दाटून येतो मनात!!!
... इथे नेमके ते नतदष्ट आणि दळभदी डॉक्टर टपकतात आणि मृत्यूच्या दाढेतून ज्याला त्याला, जिला तिला खेचून वगैरे काढतात... पुन्हा पुढचे किमान ४७५ भाग हे लेकाचे एकमेकांना आणि आम्हा प्रेक्षकांना छळायला मोकळे!
(महाराष्ट्र टाइम्स)
No comments:
Post a Comment