Monday, August 8, 2011

खा खा खासदार सुरेशभाई कलमाडी यांस...आदरणीय आद्य विस्मृतीवीर,
 
राजकारणाच्या खेळातले पट्टीचे खेळाडू
 
आणि खा खा खासदार सुरेशभाई कलमाडी यांस,
 
सदाशिव नारायण कसबेकराचा साष्टांग दंडवत
 
कोणाचीही कसलीही पत्रास न ठेवता मायन्याची लंबीचवडी लांबण लावून टोपणनावाने परखड पत्र लिहिण्याच्या आमच्या पेप्रातल्या कॉलमाची जागा ही नव्हे, शेजारची आहे, याचा विसर पडून चुकून आमच्याकडून हे पत्र लिहिले गेले आहे की काय, अशी आपल्याला शंका आली असेल. (अर्थात आपल्याला आधीपासून पेपरवाचनाची सवय असेल आणि तिचा अलीकडे विसर पडला नसेल तरच हे शक्य आहे म्हणा.) शिवाय, पत्रलेखकाचं नाव वाचून ‘हा कोण बुवा?’ असा प्रश्न पडून तुम्ही डोकंही खाजवू लागला असाल, तर थांबा. मेंदूला इतका ताण देण्याची गरज नाही. माझं नाव तुम्ही विसरला असाल, अशी शक्यताच नाही, कारण ते मुळात तुमच्या लक्षात असण्याचं काही कारण नाही. आपला साधा परिचयही नाही. माझ्या नावावरून तुमच्या लक्षात आलंच असेल की तुम्ही ज्या पुण्यनगरीचं संसदेत प्रतिनिधित्व करता, तिचाच मी रहिवासी आहे. या दोहोंचाही तुम्हाला विसर पडलेला नाही, याची खात्री आहे. कारण, संसद अधिवेशनात हजर राहण्याची परवानगी मागणारी याचिका तुम्ही नुकतीच केली होती. आणि पुण्याची महती काय वर्णावी? होनोलुलूहून टिंबक्टूला निघालेलं एखादं विमान पुण्यावरून उडत असताना एखाद्या प्रवाशाचं लक्ष खाली गेलं, तर तोही ‘पुणे पुणे’ म्हणून आनंदभरित होतो आणि आयुष्यभर पर्वती, पेशवे पार्क, शनिवारवाडा यांच्या आठवणी सांगतो, असं- पुण्यात- म्हणतात! तुम्ही तर तिथले खासदार! तुमचं कार्यकर्तृत्व किती मोठं! ज्या शहरातून लोकमान्य टिळकांनी महाराष्ट्राला गणेशोत्सव आणि शिवजयंती असे उत्सव दिले, त्या पुण्याला तुम्ही ‘गणेश फेस्टिवल’ दिलात. ज्वालाग्रही पेट्रोलच्या टाकीवर तीन मजली बांधकाम असलेला जगातला एकमेव पेट्रोल पंप उभारून पुण्याचं नाव गिनीज बुकात नेलंत. अजून त्यांनी या विक्रमाची नोंद केलेली नसली म्हणून काय झालं? आपल्या देशात अशी मनातल्या मनात गिनीज बुकात जाण्याची मोठी परंपरा आहे.
 तर ते सगळं जाऊदेत. ओळखदेख नसताना लिहीत असलेल्या या पत्रास कारण की, तुम्हाला डिमेन्शिया अर्थात स्मृतिभ्रंश या नावाचा विस्मरणाचा विकार झाला आहे, ही बातमी कानावर आली आणि वाईट वाटलं. वयाच्या सदुसष्टाव्या वर्षीही दाढीला कलपबिलप लावून, मॅरेथॉन धावून तरुण-तडफदार असल्याच्या थाटात वावरणाऱ्या कलाक्रीडाप्रवीण नेत्याला एखादा आजार झाला, तर कोणालाही वाईटच वाटेल. माणुसकीचा भाग आहे तो! आता ज्यांचं नाव ‘मो’नं सुरू होतं आणि ‘न’ने संपतं किंवा ज्यांचं आडनाव ‘प’ने सुरू होतं आणि ‘र’ने संपतं, अशा काही लोकांना तुम्ही आजारी असल्यामुळे आनंदही झाला असेल. तो त्यांच्या वृत्तीचा भाग आहे. आम्हाला मात्र तुमच्या आजाराचं ऐकून वाईटच वाटलं. त्यापेक्षा वाईट वाटलं ते ठिकठिकाणी तुमच्या आजाराची जी काही टिंगलटवाळी चालू आहे ती ऐकून.तुम्हाला खरोखरचा आजार झाला असेल, यावर कुणाचा विश्वासच नाही. बरं तरी तुमच्या ना छातीत दुखू लागलं ना ब्लडप्रेशर वाढलं ना शुगर शूटअप झाली. एकदम वेगळा, नव्या नावाचा, नव्या लक्षणांचा फ्रेश आजार झाला तुम्हाला. तर हे नादान लोक म्हणतात, किती सोयीचा आजार शोधून काढला कलमाडींनी. आता राष्ट्रकुल स्पर्धेच्या संदर्भात कोणीही कोणताही प्रश्न विचारला की ते शून्यात नजर लावून सांगणार, ‘मुझे कुछ याद नहीं आ रहा है.. डॉक्टर, मुझे ये क्या हो रहा है?’ मग ‘डॉक्टर’ खेकसून म्हणणार, ‘ओ, मैं डॉक्टर नई हूं, वॉर्डबॉय हूं. कितनी बार बोला की जो सफेद कपडे मे है वो डॉक्टर है, मगर इनको कुछ यादच नई रहता..’
आता यात कांगावा काय आहे, हेच आम्हाला कळत नाही. अहो, काल आपण काय बोललो होतो, हे ज्याच्या आज लक्षात राहतं, असा एक तरी राजकारणी नेता आहे का आपल्याकडे? उलट काही लक्षात ठेवण्याची भानगडच नको म्हणून काही राजकीय नेत्यांनी तर सिलेक्टिव्ह श्रवणशक्तीचं इंजेक्शन टोचून घेतलंय. त्यांना जे सोयीचं असतं, तेच ऐकू येतं, गैरसोयीचं ऐकूच येतच नाही. मग ते लक्षात ठेवण्याची तर भानगडच नाही.
 
यांच्या तुलनेत तुम्ही किती सरळ! तुमच्या मेडिकल रिपोर्टमध्ये स्मृतिभ्रंशाचा उल्लेख असताना तुम्ही मात्र एक दिवस ‘आपलं मन आणि मेंदू शाबूत आहे’ असं ठणकावून सांगितलंत आणि आपल्याला स्मृतिभ्रंश झालाय, याचा निर्णायक पुरावा दिलात. स्मृतिभ्रंश झाल्याचा तुम्ही कांगावाच करत असता तर विस्मरणाचं नाटक करत बसला असतात, तेच तुमच्या सोयीचं होतं. पण, तुम्हाला विस्मरणाचंच विस्मरण झालं आणि आपल्याला काहीही झालेलं नाही, असं तुम्ही गरजून सांगितलंत, तिथं आमच्यापुरती तरी शंका फिटली. शिवाय, ‘माझं मन आणि मेंदू शाबूत आहे’ असं (भले स्मृतिभ्रंशामुळे का असेना!) अभिमानानं सांगू शकणारा एक राजकीय पुढारी या देशात आहे आणि तो चक्क आपला खासदार आहे, हे ऐकल्यावर आमच्या मनात अभिमान दाटून आला आणि डोळ्यातून घळघळा आनंदाचे अश्रूच वाहू लागले, ते वेगळंच.
 
काही म्हणा कलमाडीसाहेब. तुम्ही भाग्यवान खरे. पुण्यनगरीचे खासदार म्हणून जे काही पुण्यकार्य तुमच्या हातून घडलं असेल, त्याची पावती म्हणूनच तुम्हाला हा विस्मृतीचा विकार जडला, यात शंकाच नाही. अहो, आज केलं ते उद्या लक्षात राहू नये, रोज कोऱ्या पाटीने सुरुवात व्हावी, यालाच मोक्ष म्हणतात! त्यासाठी ष्टद्धr(7०)षी-मुनींना कठोर तप:श्चर्या करावी लागली होती आणि आम्हाला शेंबडय़ा पोटोबाच्या बोळातल्या ‘मोक्षा’ नावाच्या विस्मृतीवर्धक अपेयपान केंद्रात दरहप्त्याला जाऊन कडुझार औषधी द्रव प्राशन करावे लागतात. त्याने विस्मृतीवर्धन होण्याच्या ऐवजी ज्या विसरलो आहोत, अशी समजूत होती, त्याच गोष्टी प्राधान्यानं आठवू लागतात, असा आमचा अनुभव आहे.. असतात एकेकाचे भोग!
 
पण, तुम्हाला मात्र या दैवी विस्मरणशक्तीचा लाभ झाला याचा आनंद आहे.
 
बाकी तब्येतीला जपावे. जास्त धावाधाव करू नये. ती केल्याने होणारे टळत नाही, याचा अनुभव तुम्हाला आतापावेतो आलेला असेलच.
 तुम्ही आमचे खासदार आहात, याचा आम्हाला लवकरात लवकर कायमचा विसर पडावा यासाठी फेस्टिवल गणेशाला नवस बोलण्याच्या तयारीत असलेला,
आपला मतदार,
 स. ना. कसबेकर

(चित्र : प्रदीप म्हापसेकर)

(प्रहार, ७ ऑगस्ट, २०११)

1 comment: